नि. ३४
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा. अध्यक्ष - श्री अनिल य. गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. १८२६/२००९
-----------------------------------------------
तक्रार नोंद तारीख: - ११/०५/२००९
तक्रार दाखल तारीखः - १२/०५/२००९
निकाल तारीखः - २७/०९/२०११
--------------------------------------------
श्री भिमराव तुकाराम लाड
वय वर्षे – ३८, धंदा – शेती
रा.कुंभारगांव, ता.कडेगाव जि.सांगली ..... तक्रारदार
विरुध्द
१. मे.वसंतलाल एम.शाह आणि कंपनी
हायस्कूल रोड, सांगली
२. मॅनेजर, गोल्डन सीड्स,
सरोजिनीदेवी रोड, सिकंदराबाद ..... जाबदार
तक्रारदार तर्फे – +ìड.एस.व्ही.वाकणकर
जाबदार क्र.१ व २ तर्फे – +ìड. व्ही.जी.कुलकर्णी
नि का ल प त्र
द्वारा- मा. सदस्या- गीता घाटगे.
तक्रारदारांनी जाबदार क्र.२ यांनी उत्पादित केलेले कार्ल्याचे बियाणे जाबदार क्र.१ यांचेकडून खरेदी केले. परंतु या बियाण्याची पेरणी केल्यानंतर तक्रारदारास बियाणाची पुरेशी वाढ न झाल्याचे आढळून आले. यावरुन जाबदारांनी तक्रारदारांना भेसळयुक्त बियाणे पुरविल्याचे तक्रारदारांच्या लक्षात आले. त्यामुळे तक्रारदारांचे जे नुकसान झाले आहे त्याकरिता तक्रारदारांनी सदरहू तक्रारअर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्यात हकीकत खालीलप्रमाणे -
१. तक्रारदार हे सांगली जिल्हयातील कडेगाव तालुक्यामधील शेतकरी आहेत. त्यांच्या मालकीच्या २०/२५ गुंठयाच्या शेतजमीनीमध्ये ते निरनिराळया पिकांची लागवड करुन उदरनिर्वाह करतात. याकरिता त्यांनी दि.२२/१०/२००८ रोजी जाबदार क्र.१ यांचेकडून जाबदार क्र.२ यांनी उत्पादित केलेले कार्ल्याचे गोल्डन एफ-१ या वाणाचे बियाणे विकत घेतले. त्यानंतर तक्रारदारांनी या बियाणाची पेरणी त्यांच्या मालकीच्या गट नं.५ब या जमीनीमध्ये केली. पेरणीनंतर आवश्यक तो कालावधी उलटून गेल्यानंतरदेखील कार्ले पिकाचे अत्यंत अल्प उत्पादन तक्रारदारांना मिळाले. याबाबत तक्रारदारांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती, कडेगाव व कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद सांगली यांचेकडे लेखी अर्ज दिला. या अर्जातील मागणीनुसार दि.१/४/२००९ रोजी मोहिम अधिकारी, जिल्हा परिषद सांगली यांनी तक्रारदारांच्या पिकक्षेत्राची पाहणी करुन पंचनामा अहवाल तयार केला या अहवालामध्ये कार्ले पिकाची पुरेशी वाढ न झाल्यामुळे पेरणीसाठी वापरलेले बियाणे भेसळयुक्त असल्याचे नमूद करण्यात आले. तक्रारदार त्यांचे तक्रारअर्जामध्ये पुढे असेही कथन करतात की, पंचनामा होतेवेळी जाबदार क्र.२ या उत्पादक कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी हजर होते. समितीच्या पंचनामा अहवालाप्रमाणे कार्ल्याचे बियाणे हे भेसळयुक्त निघाल्याने तक्रारदारांनी त्यांचे जे काही नुकसान झालेले आहे या नुकसान भरपाईची मागणी जाबदार क्र.१ व २ यांचेकडे केली. परंतु जाबदारांनी तक्रारदारांच्या तक्रारीस व मागणीस अद्यापी दाद दिलेली नाही. आणि म्हणून तक्रारदारांना सदरहू तक्रारअर्ज दाखल करावा लागला आहे. तक्रारदारांनी तक्रारअर्जामध्ये त्यांनी खरेदी केलेले बियाणे हे बनावट व भेसळयुक्त असल्याचे जाहीर होवून मिळावे अशी विनंती केली आहे, त्याचप्रमाणे चालू हंगामामध्ये पिक हाताशी न आल्याने त्यांचे जे काही नुकसान झालेले आहे, त्याकरिता तसेच कार्ल्याचे पिक वाढविण्यासाठी ज्या ज्या काही अनुषंगिक बाबींची आवश्यकता असते, त्या सर्व बाबींकरिता जो काही त्यांना खर्च आला, त्याकरिता तसेच मानसिक त्रासाकरिता व तक्रारअर्जाच्या खर्चाकरिता म्हणून एकूण रक्कम रु.७७,१७०/- ची मागणी केली आहे. तक्रारअर्जाचे पुष्ठयर्थ तक्रारदारांनी नि.३ अन्वये प्रतिज्ञापत्र दाखल करुन नि.५ अन्वये एकूण १० कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
२. मंचाच्या नोटीशीची बजावणी जाबदार क्र.१ व २ यांचेवर झाल्यावर दोघांनी विधिज्ञांमार्फत हजर होवून त्यांचे म्हणणे प्रस्तुत प्रकरणी दाखल केले.
जाबदार क्र.१ व २ यांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये तक्रारदारांनी जाबदार क्र.२ यांनी उत्पादित केलेले बियाणे जाबदार क्र.१ यांचेकडे खरेदी केली ही बाब मान्य केली आहे. मात्र तक्रारअर्जातील अन्य कथने या जाबदारांनी पूर्णपणे अमान्य केली आहेत. जाबदारांनी त्यांचे म्हणणेमध्ये असेही नमूद केले आहे की, तक्रारदारांनी ऑक्टोबर २००८ मध्ये बियाणांची खरेदी केली तर मार्च २००९ मध्ये बियाणांच्या बाबतीत कृषी अधिकारी, जिल्हा परिषद सांगली व गटविकास अधिकारी यांचेकडे तक्रारअर्ज केला. व त्यानंतर पिक पाहणीचा अहवाल तयार केला गेला. जाबदारांच्या म्हणण्यानुसार कार्ले पिकाचा कालावधी हा लागवडीपासून ३ ते ४ महिन्यांचा असतो. तक्रारदारांनी या कालावधीमध्ये कार्ल्याचे भरघोस उत्पन्न घेतले आहे आणि त्यानंतर त्यांनी पिकाबाबत तक्रार करुन बियाणे भेसळयुक्त असल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे या बाबींचा विचार करता जाबदारांच्या म्हणण्यानुसार हंगामाचा कालावधी उलटल्यानंतर पिकपाहणी होवून जो अहवाल केला गेला, त्या अहवालावेळी काढले गेलेले अनुमान हे चुकीचे आहे. वास्तविक हंगामाच्या कालावधीनंतर सुध्दा तक्रारदारांना ३ ते ४ इंच लांबीच्या हिरव्या रंगाचे कार्ले मिळालेले आहे. त्यामुळे जाबदारांतर्फे उत्पादित केलेले बियाणे हे भेसळयुक्त नाही व त्याबाबतचे काढलेले अनुमान हे पूर्णपणे चुकीचे असून ते शेतीशास्त्रानुसार नाही. आणि म्हणून तक्रारदारांची तक्रार ही खोटी असून ती रद्द होण्यास पात्र आहे असे जाबदारांनी त्यांचे म्हणणे मांडलेले आहे. जाबदार पुढे असेही म्हणणे मांडतात की, तक्रारदारांनी वादातील बियाणाबाबत दोष असल्याचा कोणताही शास्त्रीय पुरावा दिलेला नाही. आणि म्हणून देखील तक्रारदारांची तक्रार खोटी आहे. जाबदारांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांना विकण्यात आलेले कार्ल्याचे वाण हे इतर शेतक-यांना देखील विकण्यात आलेले आहे. व त्याचे त्यांना चांगल्या प्रकारचे उत्पन्न मिळालेले आहे. या वाणाबद्दल अन्य कोणाचीही तक्रार नाही. जाबदारांनी त्यांच्या म्हणण्याच्या पुष्ठयर्थ सन्मा.न्यायालयाचे न्यायनिवाडे दाखल करुन तक्रारदारांचा तक्रारअर्ज नामंजूर करावा अशी विनंती केली आहे. म्हणण्याच्या पृष्ठयर्थ जाबदार यांनी नि. १३ अन्वये प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
३. प्रस्तुत प्रकरणी जाबदारांचे म्हणणे दाखल झालेनंतर तक्रारदारांनी त्यांचा लेखी युक्तिवाद व त्यासोबत सन्माननीय न्यायालयाचे न्यायनिवाडे दाखल केले. त्यानंतर जाबदारांनी त्यांचा लेखी युक्तिवाद व सन्मा. न्यायालयांचे न्यायनिवाडे दाखल केले. त्यानंतर अर्जदारांतर्फे तोंडी युक्तिवाद ऐकून जाबदार गैरहजर असलेने प्रकरण निकालासाठी नेमणेत आले.
४. प्रस्तुत प्रकरणी दाखल तक्रारअर्ज, म्हणणे, पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, दाखल कागदपत्रे, लेखी व तोंडी युक्तिवाद व उभय पक्षाने दाखल केलेले न्यायनिवाडे यांचा साकल्याने विचार करता मंचापुढे खालील मुद्दे (Points for consideration) विचारार्थ उपस्थित होतात.
मंचाचे मुद्दे व त्याची उत्तरे खालीलप्रमाणे –
मुद्दे उत्तरे
१. जाबदार क्र.१ व २ यांनी तक्रारदारांना दूषित सेवा जाबदार क्र.२ यांनी दूषित सेवा
पुरविली ही बाब शाबीत होते का ? पुरविल्याचे शाबीत होते.
२. कोणता आदेश ? अंतिम आदेशानुसार.
विवेचन
मुद्दा क्र.१
जाबदारांनी तक्रारदारांना दूषित सेवा पुरविली किंवा कसे हे पाहण्याकरिता वादातीत बियाणे हे भेसळयुक्त होते किंवा कसे हे पाहणे महत्वाचे आहे. परंतु त्याहीपूर्वी वादातीत बियाणाची पेरणी ज्या शेतजमीनीमध्ये करण्यात आली होती ती शेतजमीन तक्रारदारांच्या मालकीची आहे अथवा कसे हे प्रथम पाहणे आवश्यक आहे असे एकूणच प्रकरणाचे अवलोकन करता मंचास वाटते. त्या अनुषंगे मंचाचे विवेचन खालीलप्रमाणे –
तक्रारदारांचे नाव “भिमराव तुकाराम लाड” असे तक्रारअर्जात नमूद करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे वादातीत बियाणे हे तक्रारदारांनी त्यांच्या मालकीच्या गट नं.५ब या शेतजमीनीत पेरले होते असेही तक्रारअर्जात नमूद करण्यात आले आहे. तक्रारदारांनी त्यांच्या या कथनाच्या अनुषंगे नि.३३/१ अन्वये गट क्र.५ब या जमीनीचा सातबाराचा उतारा दाखल केलेला आहे. या सातबारा उता-याचे अवलोकन करता त्यामध्ये तक्रारदारांचे नाव कोठेही आढळून येत नाही. तक्रारदारांनी प्रस्तुत प्रकरणी नि.२९ अन्वये शपथपत्र दाखल केलेले आहे. या शपथपत्रामध्ये त्यांनी ५ब या मिळकतीच्या सातबारा पत्रकी माझ्या वडीलांचे नाव असून वयोमानामुळे त्यांना शेतीकाम होत नसल्याने शेतीचे सर्व व्यवहार मी वैयक्तिकरित्या पार पाडतो असे नमूद केले आहे. परंतु नि.३३/१ अन्वये दाखल करण्यात आलेल्या सातबारा पत्रकी तक्रारदारांचे वडील “तुकाराम रामचंद्र लाड” यांचे नावाला कंस करण्यात आल्याचे दिसून येते व तशी नोंद १८७३ अन्वये झाल्याची दिसून येते. तक्रारदारांनी नि.३३/२ अन्वये हक्काचे पत्रक (फेरफार उतारा) दाखल केलेले आहे. या फेरफार नोंदीचा अनुक्रमांक १८७३ असून त्यावरती तक्रारदारांच्या वडीलांनी श्री हनुमान ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. कुंडल या पतसंस्थेस सदरहू जमीन तारण गहाण दिल्याची नोंद दिसून येते. त्यानंतर तक्रारदारांनी नि.३३/३ अन्वये खाते क्र.१२६ चा तुकाराम रामचंद्र लाड यांचे नावचा खातेउतारा दाखल केला आहे. त्यावरती गट क्र.५ब हा तक्रारदारांच्या वडीलांचे नावे म्हणजेच तुकाराम रामचंद्र लाड यांचे नावे असल्याचे दिसून येते. यावरुन वादातीत बियाणे जरी तुकाराम रामचंद्र लाड यांचे नावावर असणा-या शेतजमीनीत पेरण्यात आलेले असले तरी देखील मुलगा या नात्याने या जमीनीवर तक्रारदारांचा हक्क असून ते सदरहू जमीन मालकी हक्काने कसतात हे सिध्द होते.
तक्रारदारांनी जाबदार क्र.२ यांनी उत्पादित केलेले बियाणे तक्रारदार क्र.१ यांचेकडून विकत घेतले ही बाब जाबदारांनी नाकारलेली नाही. त्यामुळे यानंतर प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे सदरहू बियाणे तक्रारदार तक्रार करतात त्याप्रमाणे भेसळयुक्त होते किंवा कसे याबाबतचा. तक्रारदारांच्या या तक्रारीच्या पुष्ठयर्थ नि.५/६ अन्वये तक्रारदारांनी मोहिम अधिकारी, जिल्हा परिषद सांगली यांच्या प्रक्षेत्र भेटीच्या पंचनाम्याचा अहवाल दाखल केलेला आहे. या अहवालामध्ये
“कंपनीचे प्रतिनिधी प्रशांत पाटील उपस्थित होते त्यांनी सदरची कार्ली ८ ते ९ इंचापर्यंत लांब, हिरवा रंग, असा येणे आवश्यक होते अशी माहिती दिली. कार्ली ३ ते ४ इंच लांबीची व हिरव्या रंगाची झाल्याचे आढळून आले. काही झाडांवरील कार्ले १५ ते २० टक्के समाधानकारक वाढल्याचे दिसून आले. समितीचे सदरच्या बियाणाबाबत बियाणे भेसळ असल्याचे मत झाले.”
असे नमूद करुन बियाणे भेसळयुक्त असल्याचा निष्कर्ष काढण्यात आल्याचे दिसून येते. या पंचनामा अहवालावर मोहिम अधिकारी, जिल्हा परिषद सांगली यांच्या तसेच तक्रारदार यांची व गोल्ड कंपनीचे प्रतिनिधी यांच्या सहया आहेत.
तक्रारदारांच्या तक्रारीच्या अनुषंगे तक्रारदारांनी हा जो अहवाल दाखल केला आहे, तो अहवाल जाबदारांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये पूर्णपणे नाकारला आहे. जाबदारांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांनी वादातीत बियाणे दोषयुक्त असल्याबाबतचा प्रयोगशाळेतला कोणताही अहवाल दाखल केलेला नाही. त्यामुळे केवळ कार्ल्याची लांबी कमी भरली यावरुन बियाणांमध्ये दोष होता किंवा बियाणे भेसळयुक्त होती असे अनुमान काढता येणार नाही. तक्रारदारांच्या या तक्रारीस कोणताही शास्त्रीय आधार नाही आणि या कारणावरुन जाबदारांनी तक्रारदारांनी दाखल केलेला मोहिम अधिकारी, जिल्हा परिषद सांगली यांचा अहवाल अमान्य केला आहे. जाबदारांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये असेही नमूद केलेले आहे की, ज्यावेळी पिक फुलो-यामध्ये येते, त्यावेळी दिवस व रात्र यामधील तापमान, हवामान, आर्द्रता, इ. गोष्टींचाही फरक कार्ल्याच्या वाढीच्या वेळी होत असतो आणि त्यामुळे पिकाची वाढ कमी जास्त प्रमाणात होत असते ही बाब लक्षात घेवून अहवाल देण्यात आलेला नाही. आणि म्हणून देखील तक्रारदारांनी भेसळयुक्त बियाणाबाबत जी तक्रार केली आहे ती या जाबदारांनी अमान्य केली आहे. मात्र जाबदारांनी त्यांच्या या म्हणण्याच्या पुष्ठयर्थ कोणताही कागदोपत्री पुरावा प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेला नाही. तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीच्या पुष्ठयर्थ मोहिम अधिकारी यांचा पंचनामा अहवाल दाखल करुन त्यांची तक्रार सिध्द केलेली आहे. त्यानंतर त्यांची तक्रार खोटी आहे हे सिध्द करण्याची जबाबदारी सर्वस्वी जाबदारांवरती येते. परंतु जाबदारांनी सदरहू बियाणे हे भेसळयुक्त नव्हते याबाबतचा कोणताही कागदोपत्री पुरावा प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेला नाही. वास्तविक जाबदार जेव्हा त्यांचे बियाणे हे भेसळयुक्त नव्हते असा दावा करतात त्यावेळी त्यांनी सदरहू बियाणे विक्रीला काढण्यापूर्वी त्याची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली होती व सदरहू बियाणे विक्रीस योग्य असल्याचा निर्वाळा या प्रयोगशाळेमार्फत देण्यात आला होता याबाबतचा शास्त्रीय अहवाल दाखल करणे आवश्यक होते. परंतु जाबदारांनी असा कोणताही अहवाल प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेला नाही. त्यामुळे केवळ जाबदार म्हणतात म्हणून सदरहू बियाणे भेसळयुक्त नव्हते हे मान्य करणे कागदोपत्री पुराव्याअभावी मंचास शक्य नाही.
जाबदारांनी त्यांच्या म्हणण्याच्या पुष्ठयर्थ सन्मा.न्यायालयांचे न्यायनिवाडेही दाखल केलेले आहेत. यापैकी एक न्यायनिवाडा हा सन्मा. सर्वोच्च न्यायालयाचा आहे. या न्यायनिवाडयामध्ये तक्रारदार व जाबदार बियाणे कंपनी या दोघांनीही बियाणाबाबतचा अहवाल दाखल केलेला होता. तक्रारदारांनी सर्कल अॅग्रीकल्चरल ऑफिसर आणि अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ऑफिसर कलायत यांचे मार्फत देण्यात आलेला अहवाल दाखल केला होता तर बियाणे कंपनीतर्फे एक्सपर्ट कमिटीचा अहवाल दाखल करण्यात आला होता. त्यामुळे या निवाडयामध्ये दोन्ही अहवालांमध्ये तुलनात्मक विचार होवून त्यानुसार बियाणे कंपनीने दाखल करण्यात आलेल्या एक्सपर्ट कमिटीचा अहवाल ग्राहय धरण्यात आला होता. परंतु प्रस्तुत प्रकरणी केवळ तक्रारदारांनीच मोहिम अधिकारी, जिल्हा परिषद यांचा पंचनामा अहवाल दाखल केलेला आहे तर जाबदारांतर्फे कोणताही अहवाल दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे जाबदारांतर्फे दाखल करण्यात आलेल्या सन्मा.सर्वोच्च न्यायालयाच्या या निवाडयाचे गुणोत्तर प्रस्तुत प्रकरणी लागू पडत नाही असे मंचाचे मत आहे.
या पार्श्वभूमीवर तक्रारदारांनी सन्मा.राज्य आयोग मुंबई यांचे न्यायनिवाडे प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेले आहेत. ते प्रस्तुत प्रकरणी लागू पडतात असे मंचाचे मत पडते. तक्रारदारांनी नि.२८ अन्वये प्रस्तुत प्रकरणी जिल्हा परिषद सांगली येथील जनमाहिती अधिकारी, यांनी प्रसिध्द केलेली माहिती दाखल केलेली आहे. या माहितीचे अवलोकन करता त्यामध्ये तक्रारदारांनी कार्ल्याच्या बियाणाबाबत तक्रार केलेबाबतचा मजकूर दिसून येतो. या सर्व बाबींचा एकत्रितपणे विचार करता तक्रारदारांना पुरविण्यात आलेल्या कार्ल्याचे बियाणे हे भेसळयुक्त होते ही बाब प्रस्तुत प्रकरणी शाबीत होते असा मंचाचा निष्कर्ष निघतो.
यानंतर प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे भेसळयुक्त बियाणांची जबाबदारी दोनही जाबदारांवर येते अथवा कसे. बियाणाचे उत्पादन हे जाबदार क्र.२ कंपनीचे आहे तर जाबदार क्र.१ हे जाबदार क्र.२ यांचेकडून बियाणे घेवून त्याची विक्री करतात. बियाणे उत्पादन करण्याच्या प्रक्रियेमध्ये केवळ जाबदार क्र.२ यांचाच पूर्णपणे सहभाग आहे. त्यामुळे भेसळयुक्त बियाणाची जबाबदारी ही सर्वस्वी जाबदार क्र.२ यांचेवर येते. तर जाबदार क्र.१ हे बियाणाचे विक्रेता असल्या कारणाने त्याची जबाबदारी जाबदार क्र.१ यांचेवर येत नाही असे मंचाचे मत आहे. त्यामुळे जाबदार क्र.२ यांनी तक्रारदारांना भेसळयुक्त बियाणे पुरवून दूषीत सेवा दिल्याचेही शाबीत होते असा मंचाचा निष्कर्ष निघतो. त्यानुसार मुद्दा क्र.१ चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
मुद्दा क्र.२
तक्रारदारांनी कार्ल्याच्या पिकाचे उभारणीसाठी मंडपाचा आलेला खर्च, औषधफवारणीचा खर्च, ठिबक सिंचन योजनेचा खर्च तसेच खते, मजूरी त्यानंतर पेट्रोल, ट्रॅक्टर यासारखे शेतीस पूरक वापरण्यात आलेली वाहने यांचा खर्च, वीज, बियाणांची किंमत व तक्रारअर्ज आणि मानसिक त्रासाकरिता म्हणून अशी एकूण रक्कम रु.७७,१७०/- ची मागणी प्रस्तुत प्रकरणी केली आहे. परंतु तक्रारदारांनी कार्ले पिकाच्या पेरणीसाठी व त्या अनुषंगे ज्या ज्या बाबी कराव्या लागतात त्या करता जो खर्च आला असे नमूद केलेले आहे, त्याबाबतचा कोणताही कागदोपत्री पुरावा प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेला नाही. त्यामुळे तक्रारदारांची मंडपाचा खर्च, औषध रासायननिक खते ठिबक सिंचन मजूरी, पेट्रोल, ट्रॅक्टर पंप, वीज इ. बाबतची केलेली मागणी नामंजूर करणे मंचास क्रमप्राप्त ठरते. मात्र तक्रारदारांनी बियाणे खरेदी केल्याची रिसीट नि.५/३ अन्वये प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेली आहे. ती रक्कम रु.६७०/- तक्रारदारांना मंजूर करण्यात येत आहे. तसेच पंचनामा अहवालावरुन तक्रारदारांनी भेसळयुक्त बियाणे पुरविण्यात आलेले होते हे प्रस्तुत प्रकरणी सिध्द झालेले आहे मात्र त्यावरुन त्यांचे नेमके किती रकमेचे नुकसान झाले हे समजून येत नाही. किंवा तक्रारदारांनी त्यांच्या हाती नेमके किती पीक आले, त्यावेळी त्याची बाजारभावाने काय किंमत होती, तसेच या बियाणाच्या वाणाचे किती पिक येणे अपेक्षित होते यामधील फरक दर्शविणारा कोणताही कागदोपत्री पुरावा त्यांनी प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेला नाही. त्यामुळे जरी बियाणे हे भेसळयुक्त असले तरी देखील त्यामुळे तक्रारदारांचे नेमके किती नुकसान झाले हे प्रस्तुत प्रकरणी समजून येत नाही. तक्रारदारांना नाममात्र रक्कम रु.१०,०००/- मंजूर करणे योग्य व न्याय्य ठरेल असे मंचास वाटते. मोहिम अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांनी बियाणे भेसळयुक्त असलेबाबतचा अहवाल दि.२/४/२००९ रोजी तक्रारदारांना दिलेला आहे. प्रक्षेत्र पाहणीच्या वेळेला गोल्ड कंपनीचे प्रतिनिधी हजर होते. सदरहू बियाणे भेसळयुक्त असल्याचे त्यांना मान्य होते हे अहवालावरुन स्पष्ट होते. प्रक्षेत्र पाहणी दि.१/४/२००९ रोजी झाली. वास्तविक त्यानंतर तक्रारदारांना नुकसान भरपाई मिळणे आवश्यक होते परंतु जाबदारांनी तक्रारदारांच्या मागणीस दाद दिलेली नाही. याचा विचार करता दि.२/४/२००९ रोजीपासून म्हणजेच तक्रारदारांना अहवाल प्राप्त झाल्यापासून सदरहू रक्कम रु.१०,०००/- वर संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.६ टक्के व्याज मंजूर करण्यात येते. या सर्व घटनाचक्रामध्ये तक्रारदारांना निश्चितच शारिरिक, मानसिक त्रासास सामोरे जावे लागले याची जाणीव मंचास होते. त्यामुळे शारिरिक, मानसिक त्रासापोटी म्हणून रक्कम रु.३,०००/- तर तक्रारअर्जाच्या खर्चापोटी म्हणून रक्कम रु.२,०००/- तक्रारदारांना मंजूर करण्यात येत आहेत.
सबब, मंचाचा आदेश की,
आ दे श
१. यातील जाबदार क्र.२ यांनी तक्रारदारांना रक्कम रु.१०,०००/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) दि.२/४/२००९ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. ६ टक्के व्याजदराने अदा करावी.
२. यातील जाबदार क्र.२ यांनी तक्रारदारांना शारिरिक व मानसिक त्रासापोटी म्हणून व तक्रारअर्जाच्या खर्चापोटी म्हणून एकूण रक्कम रु.५,०००/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) अदा करावेत.
३. वर नमूद आदेशाची अंमलबजावणी जाबदार क्र.२ यांनी दि.१२/११/२०११ पर्यंत न केल्यास तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदींअंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
सांगली
दि.२७/०९/२०११
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.
प्रतः-
तक्रारदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११
जाबदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११