निकालपत्र :- (दि.27/09/2010) ( सौ. वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला वकीलांमार्फत मंचापुढे उपस्थित झाले. त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले. उभय पक्षकारांच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकणेत आला. सदरची तक्रार दुचाकी वाहन खरेदीसाठी सामनेवालांना डीडीने रक्कम देऊनही वाहन तक्रारदारास न दिल्याने सेवेत त्रुटी ठेवलेमुळे दाखल केली आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी :-यातील सामनेवाला हे हिरो होंडा कंपनीचे दुचाकी वाहनाचे अधिकृत वितरक आहेत. यातील तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडून हिरो होंडा कंपनीची फॅशन प्लस ड्रम-कास्ट व्हील ही दुचाकी गाडी खरेदी करणेसाठी ठरवले. त्याप्रमाणे सामनेवाला यांनी सदर गाडीचे रक्कम रु.47,235/- चे कोटेशन तक्रारदार यांना दिले. त्याप्रमाणे तक्रारदाराने दि.06/01/2010 रोजी रक्कम रु.5,000/- सामनेवाला यांना दिले व सामनेवाला यांनी सदर गाडी 30 ते 45 दिवसाचे आत देण्याचे वचन यातील तक्रारदार यांना दिले. ब) त्यानुसार सामनेवाला यांचेकडे 30 दिवसानंतर तक्रारदार यांनी वारंवार प्रत्यक्ष भेटून सदर गाडीची मागणी केली असता सामनेवाला यांनी तक्रारदारांना खोटी आश्वासने दिली. तक्रारदार यांनी कोल्हापूर महिला सह.बँकेचे कर्ज घेऊन उर्वरित रक्कमेचा म्हणजे रक्कम रु.42,235/- चा दि.16/02/2010 रोजीचे सदर बँकेच्या डीडी क्र.006179 अन्वये सामनेवाला यांना रक्कम अदा केली. सामनेवाला यांना तक्रारदारांनी संपूर्ण रक्कम अदा करुनही सामनेवालांनी आजअखेर गाडी दिली नाही. याउलट सदर गाडीची किंमत वाढली असून वाढीव किंमत रक्कम रु.780/- दयावी लागेल असे सांगून तक्रारदारांकडून दि.03/02/2010 रोजी सदर वाढीव रक्कम वसूल केली. तरीही अदयापपर्यंत सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सदर गाडी दिलेली नाही. सदर फॅशन प्लस ड्रम-कास्ट व्हील गाडी घेणेकरिता तक्रारदाराने कोल्हापूर महिला सह.बँक लि. यांचे हायर पर्चेस स्वरुपाचे कर्ज उचल केली आहे.सदर कर्जाचे हप्ते तक्रारदार सदर बॅंकेत वेळोवेळी भरत आहेत. बँकेकडून सदर गाडीचे कागदपत्रांचे मागणी वारंवार होत आहे. परंतु सामनेवाला यांनी तक्रारदार यांना गाडी दिलेली नसलेने तक्रारदार बॅंकेत सदर गाडीच्या कागदपत्रांची पूर्तता करु शकत नाहीत. सामनेवाला व तक्रारदार यांचे संबंध मालक व ग्राहक असे आहेत. क) सबब सामनेवाला यांनी तक्रारदारास वर नमुद प्रमाणे फॅशन प्लस ड्रम-कास्ट व्हील ही गाडी न देऊन हेतू पुरस्सर व जाणीवपूर्वक सेवा देणेस त्रुटी केली आहे. त्यामुळे सामनेवालांचे या कृत्यामुळे तक्रारदारास नाहक मानसिक व आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर होऊन तक्रारदारांना सामनेवाला यांनी फॅशन प्लस ड्रम-कास्ट व्हील ही गाडी तात्काळ देणेबाबत आदेश व्हावा तसेच कोटेशन पेक्षा जास्त वसुल केलेली रक्कम व बँकेचे भरावे लागत असलेले व्याजाची रक्कम तसेच मानसिक त्रासापोटी व कोर्ट खर्च, वकील फी इत्यादी करता रक्कम रु.25,000/- सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावा अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत सामनेवाला यांनी तक्रारदारांना दिलेले कोटेशन, तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे दुचाकी गाडीकरिता भरलेल्या रक्कमेच्या पावत्या, सामनेवाला यांनी तक्रारदार यांचेकडून घेतलेली जादा रक्कमेची पावती इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदार यांनी रिजॉइन्डर दाखल केले आहे. तसेच दि.09/06/2010 रोजी कोल्हापूर महिला सह.बँक लि. या बँकेने तक्रारदारांना दिलेले पत्र, दै.पुढारीमध्ये प्रसिध्द करणेत आलेला हिरो होंडा गाडीचे कृत्रिम टंचाई बाबतचा लेख इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (4) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेमध्ये तक्रारदाराची तक्रार खोटी, लबाडीची व कायदयाला सोडून असलेने फेटाळून लावण्यात यावी तसेच तक्रार दाखल करण्यास Locus Standi नसल्याने तक्रार काढून टाकावी अशी विनंती केली आहे. सामनेवाला आपल्या म्हणणेत पुढे सांगतात, तक्रार अर्जातील कलम 1 ते 4 मधील मजकूर साधारणत: बरोबर आहे.परंतु सामनेवाला यांनी प्रत्यक्षात गाडी दिली नाही हे तक्रारदाराचे म्हणणे निखलास खोटे आहे. तक्रार अर्जातील कलम 5 मधील सामनेवाला यांनी रक्कम रु.780/- भरुन घेतले हा मजकूर खरा व बरोबर आहे. परंतु इतर मजकूर खोटा व लबाडीचा असलेने सामनेवाला यांना तो मान्य नाही. तसेच तक्रार अर्जातील कलम 6 ते 11 मधील सर्व मजकूर खोटा व लबाडीचा असलेने सामनेवाला यांना तो मान्य व कबूल नाही. तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडून दि.06/01/010 रोजी गाडीचे कोटेशन घेतले त्या कोटेशनमध्ये असे स्पष्ट नमुद केले आहे की, वाहनाची किंमत पूर्व सुचना न देता बदलू शकेल व गाडीची किंमत व इतर आकार गाडीच्या डिलीव्हरीच्या वेळी जे असतील ते लागू होतील. तक्रारदार यांनी गाडीची संपूर्ण किंमत दि.22/02/2010रोजी भरली. त्यानंतर दि.27/02/2010 रोजी गाडयांच्या किंमती वाढल्या. त्यामुळे सामनेवाला यांचेकडे दि.31/03/2010 रोजी वाढलेली रक्कम रु.780/-तक्रारदाराने स्वत:हून भरली आहे. त्यानंतर सामनेवाला यांनी तक्रारदार यांची गाडी आर.टी.ओ.पासींग व रजिस्ट्रेशन करुन कंपनीच्या ऑफिसमध्ये घेऊन आले. त्यांनतर आजतागायत तक्रारदार सदर गाडी घेऊन जाण्यास अदयापि आलेले नाहीत. सामनेवाला हे यापूर्वी व आजही गाडी देण्यास तयार आहेत. सामनेवाला यांची कोणत्याही सेवेमध्ये त्रुटी नाही. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्जकोर्ट खर्चासह काढून टाकावा व नुकसान भरपाई दाखल तक्रारदाराकडून सामनेवाला यांना रक्कम रु.3,000/- देणेबाबत आदेश व्हावा अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (5) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेसोबत तक्रारदार यांना दिलेले कोटेशन, सामनेवाला यांचे शोरुममधील गाडयांचे प्राइज् लिस्ट, तक्रारदार यांचे गाडीचे टॅक्स सर्टीफिकेट,रजिस्ट्रेशन सर्टीफिकेट, सदर गाडीचे इन्शुरन्स सर्टीफिकेट, सामनेवाला यांनी तक्रारदाराचे गाडीचा केलेला टॅक्स नमुना/प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. सदर कागदपत्रांच्या दि.08/9/2010 रोजी अस्सल प्रती दाखल केल्या आहेत. (6) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, रिजॉइन्डर, लेखी युक्तीवाद, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, दाखल कागदपत्रे व उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? --- होय. 3. काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1:- तक्रारदाराने सामनेवाला कंपनीकडून हिरो होंडा कंपनीची फॅशन प्लस ड्रम-कास्ट व्हील ही गाडी खरेदी केलेचे मान्य केले आहे. तक्रारदाराने दाखल केलेले कोटेशन क्र.बी/सीओ/13878 दि.06/01/2010 प्रमाणे प्रस्तुत गाडीची किंमत रक्कम रु.42,346/- असून रजिस्ट्रेशन फी, रोड टॅक्स, इन्शुरन्स हॅन्डलींग चार्जेस व इतर असे एकूण रक्कम रु.4,889/- प्रमाणे एकूण रक्कम रु.47,235/- असलेचे दिसून येते. तक्रारदाराने सामनेवालांकडे दि.22/02/2010 रोजी रिसीट नं.बी/आरसी/23102 नुसार नमुद वाहनापोटी रक्कम रु.42,235/- भरलेचे दिसून येते. तसेच रिसीट नं.बी/आरसी/240103 नुसार रक्कम रु.780/-दि.03/03/2010रोजी भरलेचे दिसून येते. तसेच रिसीट नं.बी/आरसी/18537 दि.06/01/2010 रोजी रक्कम रु.5,000/- भरलेचे दिसून येते व सदर रिसीटवर गाडीची डिलीव्हरी अंदाजे 30 ते 45 दिवसात मिळेल असे नमुद केलेचे दिसून येते. या रक्कमा दिलेचे सामनेवाला यांनी मान्य केलेले आहे. प्रस्तुत नमुद दुचाकीच्या खरेदीपोटी दि.06/01/2010 रोजी रक्कम रु.5,000/- भरुनही व तदनंतर नमुद मुदतीत मागणी करुनही सामनेवालांनी प्रस्तुत वाहन तक्रारदारास दिलेले नाही. याचा विचार करता सामनेवालांनी दि.06/01/2010 रोजीच संबंधीत वाहन 30 ते 45 दिवसात मिळेल असे नमुद केलेले आहे. रिसीट नं.बी/आरसी/23102 दि.22/02/2010 रोजी कोटेशनप्रमाणे एकूण रक्कम रु.47,235/- देय होते. पैकी रु.5,000/- दि.06/01/2010 रोजी व उर्वरित रक्कम रु.42,235/-कोल्हापूर महिला सह.बँक यांचेवरील काढलेला डीडी 16/02/2010रोजी तक्रारदाराने दिलेबाबतची रिसीट दि.22/02/2010 रोजी दिलेली आहे. तशी नोंद नमुद रिसीटवर आहे. याचा विचार करता 45 दिवसात तक्रारदाराने गाडीची संपूर्ण रक्कम अदा केलेली आहे. त्याचप्रमाणे वाढीव रक्कम रु.780/- ही दि.03/03/2010 रोजी अदा केलेली आहे ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. नियमाप्रमाणे डिलीव्हरीच्यावेळी जर का वाढीव किंमत असेल तर ती घेऊन गाडी योग्य कायदेशीर प्रक्रिया पार पाडून ग्राहकाच्या ताब्यात दिली जाते. सामनेवाला यांनी तक्रारदाराने सदर वाढीव किंमत भरलेनंतर प्रस्तुतची गाडीपोटीचा टॅक्स दि.08/03/2010 रोजी अदा केलेचा दिसून येतो. तसेच सदर तारखेस रजिस्ट्रेशन व इतर असे मिळून रक्कम रु.170/- अदा केलेले आहेत तसेच सदर तारखेस सदर गाडीचा रक्कम रु.1143.99 पै.अदा करुन इन्शुरन्स उतरविलेला आहे. तसेच इन्व्हाईस नं. बी/व्हीजी/1539 दि.06/03/2010 गाडीचा टॅक्स नमुना/प्रमाणपत्र दिसून येते नमुद वाहनाचा इंजिन क्र.बी13875 तर चेसीस क्र.बी11506 तसेच रजिस्ट्रेशन मार्क व नंबर new 0001 असल्याचे इफको टोकिया जनरल इन्शुरन्सकडे उतरविलेल्या पॉलीसीमध्ये नोंद दिसून येते. सामनेवाला यांनी तक्रारदाराने स्वत:हून वाढीव किंमत भरलेचे मान्य केले आहे. तक्रारदारास सामनेवाला यांनी प्रस्तुत गाडीची रक्कम मिळालेनंतर नमुद गाडीचे रजिस्ट्रेशन झालेले आहे. आपण गाडी घेऊन जावे असे कुठेही कळवलेचे दिसून येत नाही. गाडीची पूर्णत: रक्कम स्विकारलेनंतर नमुद गाडीचे रजिस्ट्रेशन झाले किंवा नाही याबाबत तक्रारदारासच पाठपुरावा करणे भाग पडते. सामनेवालांची प्रस्तुत गाडीचे रजिस्ट्रेशन,विमा टॅक्स ची प्रक्रिया पार पाडलेली आहे.सबब गाडीची डिलीव्हरी घ्यावी याबाबतचे एखादे पत्र अथवा साधा फोन केलेचेही निदर्शनास आलेले नाही. अथवा त्यांचे लेखी म्हणणेमध्ये असे कळवलेचे कुठेही नमुद केलेले नाही. उलट तक्रारदाराच अदयापही वाहन नेणेस आले नसलेचे नमुद केले आहे.सामनेवालाने तक्रारदारास नमुद वाहनाचे रजिस्ट्रेशन व अन्य प्रक्रिया पूर्ण झालेली असून सदर वाहनाची डिलीव्हरी घ्यावी असे कळवले असते व तदनंतर जर तक्रारदाराने नमुद वाहनाची डिलीव्हरी घेतली नसती अथवा जाणीवपूर्वक घेणेचे टाळले असते तर सामनेवाला यांचे कथनास अर्थ राहिला असता ग्राहकाकडून गाडीपोटीच्या संपूर्ण रक्कमा स्विकारायच्या मात्र त्याबाबत ग्राहकाला कोणतीही माहिती कळवण्याची जबाबदारी मात्र पार पाडावयाची नाही.तक्रारदाराने प्रस्तुत गाडीची रक्कम भागवणेसाठी कोल्हापूर महिला सह. बँकेचे कर्ज घेतलेले आहे. सदर कर्जाचे हप्ते तो व्याजासहीत भरतो आहे. अशा पध्दतीने गाडी खरेदीसाठी पैसे भरले असताना व त्याला सदर वाहनाची गरज होती. सर्वसाधारण व्यवहाराचा विचार करता जो ग्राहक कर्ज काढून गाडी खरेदीपोटी रक्कम देतो तो संपूर्ण रक्कम भागवलेनंतर गाडी ताब्यात घेण्यासाठी येणार नाही हे सर्वसामान्य माणसाला देखील पटण्यासारखे नाही अशा परिस्थिती तक्रारदार वाहन नेण्यासच आला नाही या सामनेवालांच्या कथनावर विश्वास ठेवता येणार नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब सामनेवाला यांनी नमुद वाहनापोटीची संपूर्ण रक्कम व वाढीव रक्कम स्विकारुनसुध्दा नमुद वाहनाची डिलीव्हरी देणेबाबत अथवा तसे काही प्रयत्न केलेचे प्रस्तुत मंचाचे निदर्शनास आलेले नाही. प्रस्तुतची तक्रार दाखल झालेनंतर मात्र सामनेवाला आम्ही तक्रारदारास गाडी पूर्वीपासूनच देणेस तयार होतो अशाप्रकारची कथने करतात. मात्र सदर तक्रार दाखल होण्यापूर्वी योग्य ते प्रयत्न केले असते तर प्रस्तुतची तक्रारच दाखल झाली नसती असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. सबब सामनेवाला यांनी गाडीची विक्रीपश्चात दयावयाची डिलीव्हरीबाबत व रजिस्ट्रेशनबाबतची माहिती तक्रारदारास कळवलेचे दिसून येत नाही. सबब स्वत:चे चुकीचे खापर तक्रारदाराचे माथी सामनेवाला यांना मारता येणार नाही. सबब सामनेवाला यांनी अभिवचन दिलेप्रमाणे नमुद मुदतीत गाडीची डिलीव्हरी देणेबाबतची प्रक्रिया पार न पाडून सेवेत त्रुटी ठेवलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मु्द्दा क्र.2 :- सामनेवालांच्या सेवात्रुटी मुळे तक्रारदारास प्रस्तुत गाडीचा उपभोग घेता आला नाही. तसेच त्यामुळे तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रास झालेला आहे ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. तक्रारदाराने आपल्या लेखी युक्तीवादामध्ये सामनेवाला हे 6 महिन्यापूर्वी नोंद केलेली जूनी गाडी देऊ पहात आहेत असे नमुद केले आहे. तसेच सदर गाडी जुने पासींग असलेमुळे सदर वाहनाचे मुल्यामध्ये घट होते. मात्र तक्रारदाराचे या युक्तीवादास अर्थ रहात नाही. कारण दाखल कागदपत्रावरुन तक्रारदाराचे नमुद वाहनाचे पासींग हे दि.08/03/2010 रोजी झालेले आहे. सदर मंचास तक्रारदाराने गाडीची संपूर्ण रक्कम अदा करणेपूर्वी नमुद वाहनाचे पासींग झालेचे दिसून आलेले नाही. सबब तक्रारदाराचा हा युक्तीवाद मान्य करता येणार नाही. त्याचप्रमाणे तक्रारदाराने नमुद वाहन खरेदीसाठी स्वेच्छेने कर्ज काढलेले आहे. त्यामुळे सदर कर्जाच्या व्याजाची रक्कम त्यांना मागता येणार नाही. तसेच कोटेशनपेक्षा जास्त रक्कम वसुल केलेल्या रक्कमेची मागणीही मान्य करता येणार नाही. कारण कोटेशनपेक्षा जास्त रक्कम घेतलेचे आढळून आलेले नाही. तसेच नमुद कोटेशनवरील मागील बाजूस असलेल्या क्लॉज् क्र.5 प्रमाणे वाढीव रक्कम रु.780/- घेतलेले आहेत. तक्रारदार हा मानसिक व शारिरीक त्रासापोटी व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम मिळणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते. 2. सामनेवालांनी तक्रारीत नमुद केले वर्णनाचे हिरो होंडा कंपनीचे फॅशन प्लस ड्रम-कास्ट वाहन तक्रारदाराचे ताब्यात दयावे. 3. सामनेवालांनी तक्रारदारस झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- (रु.पाच हजार फक्त) द्यावेत. 4. सामनेवालांनी तक्रारदारास तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) द्यावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |