( पारीत दिनांक : 09/10/2014)
( मा. प्रभारी अध्यक्ष , श्री मिलींद आर.केदार यांच्या आदेशान्वये)
- तक्रारकर्ता यांनी प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारकर्ता हा वार्ड नं. 27, आनंदनगर, पुलफैल, वर्धा येथील रहिवासी असून चार चाकी व्यवसाय म्हणजेच मालाची वाहतूकीची कामे करतो. त.क.नुसार वि.प. क्रं. 1 चे कार्यालय वर्धा येथे असून ते अशोक लेलॅन्डचे जिल्हा प्रतिनिधी आहे व वि.प. 2 हे अशोक लेलॅन्ड चारचाकी वाहनाचे विभागीय कार्यालय व डीलर व विक्रेते आहेत.
त.क.ने दि. 27.07.2012 रोजी वि.प. 1 व 2 डिलरकडून अशोक लेलॅन्ड कंपनीचा गुडस कॅरींग वाहन ज्याची निर्मिती सन 2012 ला करण्यात आली होती व सदर वाहनाचा चेसीस क्रं. एमबीआयअेअे-22ई9 व इंजिन नं. टीसीएच 015576 पी हे वाहन खरेदी केले. सदर वाहनाचा रजिस्ट्रेशन नं. एमएच-32, क्यु- 2307 असा आहे. सदरचे वाहन मे. श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी लिमिटेड, वर्धा यांच्याकडून फायनान्स घेऊन खरेदी केल्याचे त.क.चे म्हणणे आहे.
- सदर वाहनाला एक वर्षाची वॉरन्टी वि.प.यांनी दिली होती व सदर वाहनात कुठल्याही प्रकारचा दोष नसल्याचे त.क. ला सांगितले होते. त.क.नी पुढे नमूद केले की, वि.प. 1 यांनी नियमानुसार सदर वाहन सव्वा टन भार वाहून नेते असे सांगितले. त.क.ने सदर वाहनाची किंमत देऊन वि.प. क्रं. 1 व 2 यांच्याकडून वाहन खरेदी केले. त्यामुळे त.क. हा वि.प. यांचा ग्राहक आहे असे त्याने तक्रारीत नमूद केले.
- त.क.ने पुढे नमूद केले की, सदर वाहनाचा ताबा त.क.ला दिल्यानंतर वाहनाचे दस्ताऐवज एक महिन्यानंतर दिले. थोडयाच दिवसात सदरहू वाहनाचे समोरील टायर आतल्या भागातून 2 -3 इंच चाटायला सुरुवात केली. याबाबतची तक्रार त.क. ने वि.प. 1 यांच्याकडे केली. त्यांनतर सदर वाहन वि.प. 2 यांच्या वर्कशॉप मध्ये नेण्यात आले व सर्व्हीसिंग केल्यानंतर सदर वाहन वापरत असतांना गाडीच्या समोरील बाजूला बॉयलर बुश तुटला याबाबतची माहिती वि.प.यांना दिली. सदर दोष दुरुस्त करुन दिल्यानंतरही वाहन सुरु होत नव्हते. त्यावेळी वि.प. 2 च्या मॅक्यानिकने गाडीची पावर बॅटरी लो असल्यामुळे बॅटरी चार्जींग करणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे त.क.च्या गाडीची बॅटरी चार्ज करण्यात आली. तरी देखील गाडी सुरु झाली नाही व त्यानंतर सर्विस लाईटचा दोष निर्माण झाला. यासर्व दोषांची सूचना वि.प. 1 ला दिली असता त्यांनी त्वरित कारवाई न करता 3-4 दिवसांनी मॅक्यानिक पाठविला. सदर मॅक्यानिकने वायरिंग चेक करण्याचे मीटर नसल्यामुळे तो गाडी चेक करण्यास असमर्थता दर्शविली. त्यानंतर दोन दिवसानी दुसरा मॅक्यानिककडून गाडी दुरुस्त करुन दिली. त्यांनतर माल भरल्यानंतर तळेगांव (टालाटुले) येथे गाडी बंद पडली. त्यामुळे सदर वाहन टोचनने वर्धेला आणली. वाहन बंद पडल्यामुळे त.क. पार्टीला वेळेवर माल पोहचवू शकला नाही, त्यामुळे मालाची अर्धी किंमत म्हणजचे रु.20,000/- पार्टीला द्यावे लागले तसेच पार्टीने त.क.ला गाडीचे भाडे सुध्दा दिले नाही असे तक्रारीत नमूद केले.
- सदर वाहनामध्ये वेळोवेळी दोष निर्माण होत असल्यामुळे त.क.ने वि.प. 2 यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर वाहन सर्विस सेंटरमध्ये घेऊन येण्यास सांगितले. सदर वाहन वॉरन्टी कालावधीत असतांना सुध्दा त.क.ला दोन टायर विकत घ्यावे लागले. सदर वाहन वॉरन्टी कालावधीत असतांना देखील वि.प.ने त.क.च्या तक्रारीचे निरासन केले नाही. त्यामुळे वि.प. यांनी दिलेल्या सेवेतील दोष व कमतरतेसाठी वि.प. 1 व 2 हे वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार असल्याचे त.क. ने तक्रारीत नमूद केले.
- त.क.ने पुढे नमूद केले की, वि.प. यांनी त्याला दोषपूर्ण सेवा दिली. तसेच सदर वाहनाचे टायर निकृष्ट दर्ज्याचे दिले. बॉयलर बुश बिघडले, बॅटरी वारंवारं चार्ज करावी लागते, सर्विस लाईट मध्ये देखील बिघाड आले. सदर वाहन दुरुस्तीस व वेळोवेळी आलेला खर्च म्हणून रु.40,000/-, शारीरिक, मानसिक त्रासाकरिता 20,000/-रुपये,गाडी नादुरुस्त असल्याने वेळोवेळी झालेले नुकसान म्हणून 30,000/-रुपये व तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रु.10,000/- असे एकूण रु.1,00,000/- खर्चाचा मोबदला त.क. ने मागितला असून त्यावर 15%व्याजाची मागणी केली आहे.
- सदर तक्रारीची नोटीस विरुध्द पक्ष 1 व 2 यांना बजाविण्यात आली. विरुध्द पक्ष 2 यांनी सदर प्रकरणात लेखी उत्तर दाखल केले. वि.प. 1 यांनी दि. 31.01.2014 रोजी नि.क्रं.15 वर पुरसीस दाखल करुन वि.प.2 यांचे लेखी उत्तर हेच वि.प.1 चे उत्तर समजण्यात यावे असे नमूद केले.
- वि.प. यांनी आपल्या लेखी प्राथमिक आक्षेपात सदर तक्रर ग्राहक सरंक्षण कायद्याच्या परिभाषेत येत नसल्यामुळे ग्राहक सेवा पुरविणारे संबंध स्थापित न करणारी असल्यामुळे निकाली काढणे योग्य नाही असे नमूद केले आहे. तसेच तक्रारीत नमूद गाडीचे टायर, बॅटरीच्या इत्यादी दोषाबाबतचे असून सदरहू पार्टच्या वॉरन्टीकरिता वि.प. जबाबदार नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. वि.प.यांनी पुढे नमूद केले की, टायर व बॅटरी हे वेगळया कंपनीचे आहे व त्यांना सदर प्रकरणात पक्षकार केले नाही. त्यामुळे सदर प्रकरण खारीज करण्यात यावे.
- वि.प. यांनी परिच्छेद निहाय उत्तरात त.क.चे सर्व म्हणणे नाकारले असून त.क.ने गाडीमध्ये बदलकेल्याचे आढळले व मागील भागात अतिरिक्त स्प्रिंग पट्टे टाकले. वाहन कंपनीच्या मॅन्युअलनुसार वाहनात कुठलाही बदल केल्यास वॉरन्टी तात्काळ रद्द होते असे नमूद केले आहे व त.क. यांनी मॅन्युअलचे उल्लंघन केले असून त.क.ने वाहनामध्ये केलेल्या अतिरिक्त बदलामुळे टायरचे प्रोब्लेम सुरु झाले. त्याकरिता वि.प. जबाबदार नसल्याचे त्यांनी आपल्या उत्तरात नमूद केले आहे. त.क.चे इतर सर्व म्हणणे नाकारले असून सदर तक्रार खारीज करण्याची विनंती केली आहे.
- सदर प्रकरणामध्ये दाखल केलेले दस्ताऐवज उभय पक्षाचे
कथन, शपथपत्र, युक्तिवाद इत्यादीचे मंचाने अवलोकन केले असता, खालील बाबी व मुद्दे विचारार्थ उपस्थित झाले.
अ.क्रं | मुद्दे | उत्तर |
1 | तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ? | नाही. |
2 | विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिली काय ? | नाही |
3 | अंतिम आदेश काय ? | आदेशानुसार |
कारणे व निष्कर्ष
10 मुद्दा क्रमांक 1 व 2 चे बाबत- त.क.नी अशोक लेलॅन्ड कंपनीचे वाहन क्रं. एम.एच.-32, क्यु 2307 चेसीस क्रं. एमबीआअेअे-22ई9 व इंजिन नं. टीसीएच 015576 हे वाहन वि.प.क्रं. 1 यांच्याकडून खरेदी केले.वि.प.क्रं.1 हे अशोक लेलॅन्डचे जिल्हा प्रतिनिधी असून वि.प.क्रं.2 हे विभागीय कार्यालय, डीलर व विक्रेते आहे ही बाब उभय पक्षांचे कथन व दस्ताऐवजावरुन स्पष्ट होते. परंतु त.क.यांनी त्याच्या तक्रारीमध्ये तो मालवाहतुकिचा व्यवसाय करतो असे नमूद केले आहे. त.क.यांनी सदर व्यवसाय कुटुंबाचे उपजिविकेकरिता करतो असे कोणतेही विधान व कथन तक्रारीत केले नाही. त्यामुळे त.क. यांनी सदर वाहन हे व्यावसायिक कारणासाठी खरेदी केले होते ही बाब स्पष्ट होते. ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये व्यावसायिक कारणाकरिता घेतलेली सेवा अथवा व्यवहार हा ग्राहक या संज्ञेत येत नाही. त्यामुळे त.क. हा वि.प. यांचा ग्राहक ठरत नाही असे मंचाचे मत आहे.
त.क.नी तक्रारीत नमूद केले आहे की, सदर वाहनाला एक वर्षाची वॉरन्टी होती व सदर कालावधीत वाहनात दोष निर्माण झाला. त.क.नुसार वाहनाचे टायर खराब झाले. वि.प.यांनी आपल्या लेखी उत्तरात त.क.यांनी टायरचे निर्माते यांना पक्षकार केले नसल्याचे नमूद केले आहे. तसेच वॉरन्टीमध्ये टायर व बॅटरीचा समावेश नसतो ही बाब त्यांनी आपल्या लेखी उत्तरात व युक्तिवादाच्या वेळी म्हटले आहे. पान नं. 46 , दस्ताऐवज क्रं. 9 वर मंचाचे लक्ष वेधले असून त्यामध्ये पुढील व मागचे पाटे वाढवू नका अशी सूचना असल्याचे नमूद केले आहे. असे असतांना वि.प. यांनी मंचासमक्ष दाखल केलेले पान क्रं. 42 वरील फोटो हे दर्शविते की, त.क. ने वाहनाच्या मागील भागात जास्तीचे स्प्रिंग पट्टे लावले आहे. ही बाब त.क.ने कोणतेही दस्ताऐवजावरुन नाकारले नसून सदर फोटोबाबत आक्षेप घेतलेला नाही. वि.प.यांचे म्हणणे आहे की, सदर अल्ट्रेशन त.क. यांनी केल्यामुळे टायरमध्ये दोष निर्माण झाला व टायर आतल्या बाजुला चाटला गेला. सदर प्रकरणात त.क.यांनी तज्ञांचा कोणताही अहवाल दाखल केला नाही की, जेणेकरुन वाहनामध्येच निर्मित दोष असल्यामुळे बॅटरी व टायरमध्ये दोष निर्माण झाला. त.क.ने दोष हे उत्पादित आहे हे सिध्द करणे गरजे होते व ते त्यांनी सिध्द केले नाही.
11 वि.प.यांनी पान क्रं. 30, दस्ताऐवज 3 वर मंचाचे लक्ष वेधले असून, सदर दस्ताऐवज Satisfaction Note होते. त.क.चे वाहन जेव्हा वि.प. यांच्याकडे दि.03.10.2012 रोजी दुरुस्तीकरिता आले तेव्हा त्यांनी समाधान झाल्याबद्दलचे सदर दस्ताऐवज दिले आहे. वि.प.यांनी मॅन्यूअलप्रमाणे टायर खरेदी केले नसून त्याबाबतचे कोणतेही कथन त.क.ने तक्रारीत केलेले नाही. सदर प्रकरणातील तथ्य स्पष्ट करण्याकरिता व सिध्द करण्याकरिता त.क.अपयशी ठरले आहे. त्यामुळे त.क.ची तक्रारीतील मागणी अमान्य करण्यात येते. तसेच सदर तक्रार खारीज होण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
वरील निष्कर्षाच्या आधारे मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
- तक्रारकर्त्यांची तक्रार खारीज करण्यात येते.
- मा.सदस्यांसाठीच्या ‘ब’ व ‘क’ फाईल्स संबंधितांनी परत घेवून जाव्यात.
- निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधित पक्षांना माहितीस्तव व उचित कार्यवाहीकरीता पाठविण्यात याव्यात.