निकालपत्र ः- द्वारा- मा.सदस्या, सौ.मांधळे. 1. तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे- तक्रारदारांनी सामनेवाले 1 व 2यांचेकडे ते बांधत असलेल्या भूखंड क्र.150 सेक्टर 44, नेरुळ नवी मुंबई, जि.ठाणे येथे श्री.सिध्दीविनायक अपार्टमेंट या इमारतीत सदनिका बुक केली. सदर सदनिकेची किंमत रु.7,56,250/- ठरली होती. सामनेवाले 1 यांनी तक्रारदारांना ही अट टाकली होती की, लेटर ऑफ अलॉटमेंट प्लॅनसहित व तसेच करारनामा हा सामनेवाले 1 सोबत केला जाईल. जेव्हा तक्रारदार सदनिकेची बुकींगची रक्कम रु.50,000/- भरतील त्याप्रमाणे तक्रारदारांनी दि.9-11-05 रोजी सामनेवाले 1 यांना बुकींगची रक्कम दिली व ते बांधत असलेल्या श्री.सिध्दीविनायक अपार्टमेंटस मध्ये सदनिका क.404 ज्याचे क्षेत्र.605 आहे ते बुक केले. सामनेवाले 1 यांनी तक्रारदारांना सदर बुकींग रकमेची पावतीही दिली. त्याप्रमाणे तक्रारदाराना सदर सदनिकेचे अलॉटमेंट लेटर मिळाले. त्यानंतर दि.9-11-05रोजी सामनेवाल 1 सोबत सदर सदनिकेचा औपचारिक करार करण्यात आला. नंतर दि.25-11-05 रोजी करारनाम्याचे एक्झीक्युशन झाल्यावर तक्रारदारानी सामनेवाले 1 यांना रु.1,06,000/- रोखीने दिले. त्याप्रमाणे सामनेवाले 1 ने त्या रकमेची पावतीही दिली. तक्रारदारानी सामनेवाले 1 ला एकूण रु.1,56,000/- दिल्यावर त्यांचेशी प्रत्यक्ष व फोनवर बोलून त्यांची भेट घेतली व त्यांना पक्का करार करण्यास सांगितले. कारण त्यांना उर्वरित रकमेसाठी व हौसिंग लोन मिळणेसाठी फिनांशियल इन्स्टीटयूटकडे कागद दयायचे होते. त्यांच्याकडे करारनामा व उर्वरित कागदपत्रे नसल्याने त्यांना कोणतीही बँक लोन देण्यास तयार नव्हती. सामनेवाले 1 हे करार करण्यास मुद्दाम विलंब लावत होते. 2. तक्रारदारांचे म्हणणे असे की, ते सामनेवाले 1 यांना करारनाम्यासाठी लागणारी स्टॅम्प डयूटी व रजि.चार्जेस भरणेस तयार होते तरीही सामनेवाले 1 करार करण्यासाठी विलंब करत होते. यासाठी तक्रारदारानी सामनेवालेना कायदेशीर नोटीस पाठवली व रजिस्ट्रेशन करणेची विनंती केली. तरीही सामनेवालेनी त्याना प्रतिसाद दिला नाही. अदयापही सदनिका क्र.404 सामनेवालेंच्या ताब्यात आहे. सामनेवालेनी त्यांना दुस-या व्यक्तीस जास्त रकमेसाठी विक्रीस ठेवले आहे. तक्रारदारांनी सामनेवालेना वारंवार विंनती केली पण सामनेवालेनी त्यांना रजि.करणेस मदत केली नाही याचा त्यांना अतिशय मानसिक व शारिरीक त्रास झाला. तक्रारदारांची विनंती की, अजूनही सदनिका क्र.404 जी त्यानी बुक केली होती ती सामनेवालेंच्या ताब्यात आहे. मंचाने सामनेवालेना आदेश दयावा की त्यांनी सदर सदनिकेत कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीचे हक्क निर्माण करु नयेत. तसेच सामनेवालेना आदेश दयावा की, त्यांनी तक्रारदारांना ताबडतोब सदर सदनिकेचा रजि.करार करुन दयावा व त्यासोबत असलेले दस्तऐवज त्यांना दयावेत तसेच त्यांना झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासाबाबत सामनेवालेनी त्यांना नुकसानभरपाई दयावी व तक्रारीचा खर्चही मिळावा. 3. तक्रारदारांनी तक्रारीसोबत नि.3 अन्वये दस्तऐवज दाखल केले आहेत. त्यात मुख्यतः तक्रारदारानी 9-11-05 रोजी सामनेवालेंना रक्कम रु.50,000/- दिल्याची पावती, अलॉटमेंट लेटर, रु.50/-च्या स्टॅम्पपेपरवर करारनामा, दि.25-11-05 रोजी तक्रारदारानी सामनेवालेंना रु.1,06,000/- दिल्याची पावती, तक्रारदारानी सामनेवालेना पाठवलेली नोटीस, प्रतिज्ञापत्र, इ.कागद दाखल आहेत. 4. नि.6 अन्वये तक्रारदारानी अंतरिम अर्ज प्रतिज्ञापत्रासह दाखल केला आहे. 5. मंचाने नि.9 अन्वये सामनेवाले 1,2 ला नोटीस पाठवून जबाब देणेसाठी निर्देश दिला. नि.10 अन्वये सामनेवाले 2 ची नोटीस अनक्लेम्ड शे-याने परत आली. तसेच सामनेवाले 1 ची नोटीस नॉट नोन शे-याने परत आली. नि.16 अन्वये सामनेवालेना मंचाच्या नोटीसची बजावणी होत नसल्याने जाहीर नोटीसीद्वारे हजर रहाण्यासाठी कळवणेत आले व असेही कळवणेत आले की, जाहीर नोटीस दिल्यावर सामनेवालेनी वैयक्तिक किंवा वकीलांतर्फे मंचात हजर राहून त्यांचा लेखी जबाब दयावा. तसे न केल्यास सदर तक्रारीची एकतर्फा सुनावणी होईल. नि.18 अन्वये वृत्तपत्रात सदर नोटीस दिल्याबाबतचे कात्रण दाखल केले आहे. नि.23 अन्वये तक्रारदारानी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. 6. दि.10-1-11 रोजी सामनेवालें नोटीस पाठवूनही हजर झाले नाहीत व जबाबही दिला नाही, तसेच तक्रारदारानी पेपर नोटीस प्रसिध्द केली तरीही सामनेवालेनी जबाब दाखल केला नाही, त्यामुळे सामनेवाले 1,2 विरुध्द एकतर्फा चौकशी आदेश पारित करणेत आला आहे. 7. दि.3-3-11 रोजी सदरची तक्रार अंतिम सुनावणीसाठी आली असता तक्रारदार हजर होते व सामनेवाले 1,2 गैरहजर होते. तक्रारदारांचे युक्तीवाद ऐकण्यात आल व सदर तक्रार अंतिम आदेशासाठी ठेवण्यात आली. 8. तक्रारदारानी दिलेला तक्रारअर्ज, प्रतिज्ञापत्र, दस्तऐवज या सर्वांचा विचार करुन मंचाने खालील मुद्दयांचा विचार केला- मुद्दा क्र.1- सामनेवाले 1 हे तक्रारदाराना दिलेल्या दोषपूर्ण सेवेसाठी जबाबदार आहेत काय? उत्तर - होय. मुद्दा क्र.2- तक्रारदार सामनेवालेंकडून सदनिकेचा ताबा मिळण्यास पात्र आहे काय? उत्तर - होय. मुद्दा क्र.3- तक्रारदार सामनेवालेकडून नुकसानभरपाई व न्यायिक खर्च मिळणेस पात्र आहेत काय? उत्तर - होय. विवेचन मुद्दा क्र.1- 9. या मुद्दयाबाबत मंचाचे असे निदर्शनास येते की, तक्रारदारानी सामनेवाले 1 सोबत दि.9-11-05 रोजी करारनामा केला. सदरचा करारनामा रु.50/-चे स्टॅम्पपेपरवर करणेत आला आहे. सदरचे करारनाम्यावर सामनेवाले 1 व तक्रारदारांची सही आहे. त्यासोबत दोन साक्षीदारांच्या सहया आहेत. सामनेवाले 1 चे वतीने श्री.राजेश नरेश पाटील यांनी सही केली आहे. सदरचे करारानुसार तक्रारदारानी सामनेवालेंकडे ते बांधत असलेल्या भूखंड क्र.150, सेक्टर 44, नेरुळ, नवी मुंबई, श्री.सिध्दीविनायक अपार्टमेंटमधील सदनिका क्र.404, चौथा मजला, 605 चौ.फूट रु.7,56,500/- ला खरेदी करण्याचा करार झाला होता. त्यावेळी तक्रारदारानी सामनेवालेंस रु.50,000/- रोखीने सामनेवाले 1 ला दिले होते. तशी पावती सामनेवाले 1 ने तक्रारदारास दि.9-11-05 रोजी दिली आहे. त्याच दिवशी सामनेवाले 1 यानी तक्रारदाराना सदर सदनिकेचे अलॉटमेंट लेटर दिले. त्यानंतर तक्रारदारानी दि.25-11-05 रोजी सामनेवाले 1 यांना रु.1,06,000/- दिले. तशी पावती सामनेवाले 1 ने तक्रारदारास दिली आहे. म्हणजेच तक्रारदारानी सामनेवाले 1 याना एकूण रु.1,56,000/- दिल्याचे दिसते. रु.1,56,000/- दिल्यावर तक्रारदारानी सामनेवाले 1 यांना अनेकदा विनंती करुन अधिकृत करार करण्यासाठी सांगितले. कारण तक्रारदाराना अधिकृत करार केल्यानंतर एका फिनांशियल इन्स्टीटयूटमध्ये सदनिकेच्या उर्वरित रकमेसाठी कर्ज घ्यायचे होते. पण सामनेवालेनी त्यांना अधिकृत करार करण्यासाठी टाळाटाळ केली. तक्रारदारानी सामनेवालेंना त्यांच्या वकीलामार्फत कायदेशीर नोटीस पाठवली. सदर नोटीसीत करारनामा रजिस्टर्ड करणेची विनंती केली, तसेच कर्जासाठी लागणारे आवश्यक दस्त देण्याची विनंती केली पण सामनेवालेनी त्याना प्रतिसाद दिला नाही. सामनेवाले 1 यानी तक्रारदाराकडून सदनिकेची 21 टक्के रक्कम देऊनही अधिकृत करारनामा केला नाही. ही त्यानी तक्रारदाराना दिलेली दोषपूर्ण सेवा असल्याचे मंचाचे मत आहे. विवेचन मुद्दा क्र.2- 10. या मुद्दयाबाबत विचार केल्यास असे दिसते की, तक्रारदारानी सामनेवालेंना सदनिकेची ठरलेल्या रकमेपैकी 21 टक्के रक्कम दिली आहे. पण अदयापही अधिकृत करार करुन दिलेला नाही. अधिकृत करारनामा केला नसल्याने तक्रारदाराना पुढील रकमेसाठी कोणत्याही आर्थिक संस्थेत कर्जासाठी अर्ज करु शकत नव्हते. त्यामुळे त्यांना सदनिकेची उर्वरित रक्कम तक्रारदाराना सामनेवाले 1 ला देता आली नाही,पण त्यांनी तक्रारदारांना प्रत्यक्षात जाऊन व लिगल नोटीसीने कळवले की, त्यांना सदरचे सदनिकेच्या खरेदीसाठी व करारनामा करणेसाठी लागणारा सर्व खर्च करण्यास तयार आहेत पण तरीही सामनेवाले 1 ने त्यांना कोणत्याही प्रकारे अधिकृत करारनामा करणेस सहाय्य केले नाही, पण तक्रारदारानी सदनिकेच्या खरेदी रकमेपैकी 21 टक्के रक्कम दिली असल्याने तो सामनेवाले 1 कडून सदर सदनिकेचा ताबा मिळणेस पात्र आहे. आदेश पारित तारखेपासून 45 दिवसाचे आत सामनेवाले 1 ने तक्रारदारांना सदनिका क्र.404 चा अधिकृत करारनामा करुन दयावा, तो झाल्यावर त्वरीत तक्रारदारानी सदनिकेची उर्वरित रक्कम सामनेवाले 1 ला दयावी व सामनेवाले 1 ने तक्रारदाराना ताबा दयावा असे मंचाचे मत आहे. विवेचन मुद्दा क्र.3- 11. या मुद्दयाबाबत मंचाचे मत असे की, तक्रारदारानी सामनेवाले 1 यांचेकडे सदनिका क्र.404 बुक केली. त्यानंतर तक्रारदारानी त्वरीत त्यांना रु.50,000/- बुकींग रक्कम दिली. त्यानुसार सामनेवाले 1 ने तक्रारदारांना अलॉटमेंट पत्र दिले व तक्रारदारांनी सामनेवाले 1 यांस रु.1,06,000/- दिल्यावर म्हणजेच एकूण रक्कम रु.1,56,000/- दिल्यावर रु.50/-चे स्टॅम्प पेपरवर करारनामा करुन दिला. तक्रारदारांनी सदनिकेच्या रकमेची 21 टक्के रक्कम सामनेवाले 1 ला दिल्यावर सामनेवाले 1 ने त्यांना मालकी हक्क कायदयाच्या तरतुदीनुसार अधिकृत करारनामा करुन देणे आवश्यक होते, परंतु सामनेवालेनी तसे न करता तक्रारदारांच्या सर्वच बाबींना प्रतिसाद दिला नाही याचे तक्रारदारांना साहजिकच शारिरीक व मानसिक त्रास झाला. सबब तक्रारदार सामनेवाले 1 कडून शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाईची रक्कम रु.25,000/- मिळणेस पात्र आहे असे मंचाचे मत आहे. सामनेवाले 1 तक्रारदारांना त्यांच्या लाभात अधिकृत करारनामा करुन देत नसल्याने तक्रारदाराना त्यांचे वकीलांतर्फे सामनेवाले 1 ला नोटीस पाठवावी लागली. त्याचीही सामनेवालेनी दखल न घेतल्याने त्यांच्या न्याय्य मागणीसाठी तक्रार दाखल करावी लागली. सबब तक्रारदार सामनेवाले 1 कडून न्यायिक खर्चापोटी रु.5,000/- मिळणेस पात्र असल्याचे मंचाचे मत आहे. 12. सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यात येतो- -ः आदेश ः- 1. तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते. 2. आदेश पारित तारखेच्या 45 दिवसाचे आत सामनेवाले 1 ने तक्रारदारांना त्यांच्या लाभात अधिकृत करारनामा करुन दयावा. तो झाल्यावर तक्रारदारांनी ताबडतोब सामनेवाले 1 ला सदनिकेची उर्वरित रक्कम दयावी. 3. सामनेवाले 1 ने तक्रारदारांना नुकसानभरपाईपोटी रु.25,000/- व न्यायिक खर्चापोटी रु.5,000/- दयावेत. 4. उपरोक्त आदेशाचे पालन सामनेवाले 1 ने विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदार वरील कलम 3 मधील रक्कम द.सा.द.शे.10 टक्के दराने मिळण्यास पात्र राहील. 5. सदर आदेशाच्या सत्यप्रती सर्व पक्षकारांना पाठवण्यात याव्यात.
दि.5-3-2011. ठिकाण- कोकणभवन, नवी मुंबई. (ज्योती अभय मांधळे) (आर.डी.म्हेत्रस) सदस्या अध्यक्ष अति.ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नवी मुंबई
| Hon'ble Mrs.Jyoti A.Mandhle, MEMBER | Hon'ble Mr. R. D. Mhetras, PRESIDENT | , | |