तक्रारदार : गैरहजर.
सामनेवाले : गैरहजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. सा.वाले क्र.1 ही पर्यटन क्षेत्राच्या ठिकाणी त्यांच्या सभासदांना निवासस्थानाची सेवा सुविधा पुरविणारी कंपनी आहे. तर सा.वाले क्र.2 हे सा.वाले क्र.1 कंपनीचे कार्यकरी संचालक आहेत. यापुढे दोन्ही सा.वाले यांना केवळ सा.वाले असे संबोधिले जाईल. तक्रारदार व त्यांच्या पत्नी हया दोघेही सा.वाले कंपनीचे 99 वर्षाचे सभासद झाले. व त्यांच्या सभासदत्वाचा कालावधी 1997—2095 असा होता. सा.वाले यांनी तक्रारदारांच्या मागणी प्रमाणे पर्यटनस्थळी त्यांचे निवासस्थानामधील एक निवासस्थान तक्रारदार यांचेकरीता राखुन ठेवावयाचे होते. सामनेवाले हयांनी कराराप्रमाणे गोवा येथील सामनेवाले हयांचे पर्यटन केंद्रामध्ये 19 मे, ते 26 मे, 2007 या कालावधीमध्ये निवासस्थान राहूख ठेवले व तक्रारदार आपल्या कुटुंबियासमवेत गोवा येथे त्या निवासस्थानावर पोहोचले.
2. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथना प्रमाणे निवासस्थान अस्वच्छ होते. आतील फर्नीचर मोडकळीस आलेले होते. वातानुकुलीत यंत्र चालू नव्हते. पोहण्याची सुविधा उपलब्ध नव्हती, व त्यामुळे तक्रारदार शांतपणे तेथे झोपू शकले नाही. दुस-या दिवशी सकाळी विद्युत पुरवठा खंडीत झाला व पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याने तेथे राहणे अशक्य झाले. अंतीमतः तक्रारदार हॉटेल गौतम यांच्या भाडयाचे खोलीत रहावयास गेले. व त्यांना भाडयाच्या खोलीबद्दल रु.22,400/- ज्यादा खर्च करावे लागले. तक्रारदार सहलीवरुन परत आल्यानंतर दिनांक 13.8.2007 रोजी सा.वाले यांना नोटीस दिली व नुकसान भरपाईची मागणी केली. परंतु त्यास सा.वाले यांनी उत्तर दिले नाही. अंतीमतः तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली व त्यामध्ये सा.वाले यांचेकडून नुकसान भरपाईची मागणी केली. हॉटेलचा खर्च रु.22,400/- अधिक मानसिक त्रास, गैरसोय, व कुचंबणा या बद्दल नुकसान भरपाई रु.50,000/- ची मागणी केली.
3. सा.वाले यांनी आपली कैफीयत दाखल केली. व त्यामध्ये तक्रारदार सभासद आहेत ही बाब मान्य केली. व त्यामध्ये असे कथन केले की, तक्रारदार हे सा.वाले यांच्या पूर्वी लोणावळा येथील निवासस्थानाचे सभासद होते व तक्रारदारांच्या विनंतीवरुन ते उटी येथील पर्यटन स्थळाकडे बदलून देण्यात आले. तरी देखील तक्रारदारांनी सा.वाले यांचे विरुध्द तक्रार क्रमांक 246/2002 ही सेवा सुविधा पुरविण्यात कसुर झाली अशी दाखल केली व त्यामध्ये चर्चेअंती समेट झाले व कोडाई लेक व्हू या पर्यटन केंद्राचे सभासदत्व स्विकारले. सा.वाले असे म्हणतात की, त्यांचे सभासद एका विशिष्ट पर्यटन केंद्राची आग्रहाची मागणी करु शकत नाही. तथापी सा.वाले यांनी तक्रारदारांना गोवा येथील पर्यटन केंद्रामध्ये निवासस्थानाची व्यवस्था केली व तेथे तक्रारदारांना निवासस्थान दिले होते ही बाब नाकारली नाही. सा.वाले यांनी त्या खोलीतील सामान टाकावू होते , वातानुकुलीत यंत्र नादुरुस्त होते, या बाबी नाकारल्या. पोहण्याचा तलाव दुरुस्तीकामी बंद केला असेल तसेच डिझेल जनरेटर काही काळ बंद असेल अशी कथने केली. या प्रमाणे सा.वाले यांनी तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली या आरोपास नकार दिला.
4. तक्रारदारांनी आपले प्रति उत्तर दाखल केले. व त्यामध्ये तक्रारीतील कथनांचा पुर्नउच्चार केला.
5. सा.वाले यांनी त्यांचे अधिकारी परीमल तिवारी याचे पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. तक्रारदारांनी तक्रारीसोबत पुराव्याचे शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली. त्यानंतर लेखी युक्तीवाद व अर्जासोबत निवासस्थानातील गैरसोईबद्दल छायाचित्रे दाखल केली.
6. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्र, कागदपत्रे व तक्रारदारांचा लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले यांनी तक्रारदारांना गोवा येथे पर्यटन केंद्राचे संदर्भात त्यांचे निवासस्थानात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय. |
2 | तक्रारदार सा.वाले यांचेकडून तक्रारीतील मागणीप्रमाणे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? | होय.(परंतु रु.35,000/-) |
3. | अंतीम आदेश | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा
7. सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीमध्ये तक्रारदारांच्या मुळच्या पर्यटन क्षेत्राच्या संदर्भात सविस्तर कथन केलेले आहे. व सा.वाले यांच्या कथना प्रमाणे तक्रारदारांनी बरीच पर्यटन केंद्रे बदलून घेतली. व अंतीमतः कोडाई लेक व्हू येथे पर्यटन केंद्र स्विकारले. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथना प्रमाणे तक्रारदार यांनी सा.वाले यांना त्यांच्या गोवा येथील येथील पर्यटन केंद्रामध्ये दिनांक 19.5.2007 ते 26.5.2007 या कालावधीमध्ये निवासस्थानाची व्यवस्था करण्यात यावी अशी विनंती केली हेाती. व त्याप्रमाणे ते गोवा येथे पोहोचले व सा.वाले यांचे गोवा पर्यटन केंद्रातील निवासस्थानी मुक्काम केला. येथे एक बाब नमुद करणे आवश्यक आहे की, सा.वाले यांनी तक्रारदारांचे विनंतीनुसार तक्रारदार यांना गोवा येथील पर्यटन केंद्रामध्ये दिनांक 19.5.2007 ते 26.5.2007 या कालावधीमध्ये निवासस्थानाची व्यवस्था केली होती या कथनास नकार दिलेला नाही. यावरुन सा.वाले यांनी त्या कालावधीमध्ये तक्रारादारांची गोवा येथील निवासस्थानामध्ये व्यवस्था केली होती ही बाब मान्य करतात असा निष्कर्ष काढावा लागतो.
8. सा.वाले त्यांच्या कैफीयतीमध्ये श्री.परीमल तिवारी विभागीय व्यवस्थापक यांचे शपथपत्रामध्ये असे कथन करतात की, काही वेळा विद्युत पुरवठा खंडीत झाला असेल, परंतु तो दोष सा.वाले यांचा नाही. डिझेल जनरेटर काही काळ बंद असेल असेही कथन करतात. कदाचित तो बिघडलेला असेल असेही कथन करतात. वातानुकुलीत यंत्र देखील काही काळ बंद पडले असेल असे कैफीयतीमध्ये कथन करतात. यावरुन सा.वाले त्यांच्या कैफीयतीमधील तसेच त्यांचे पुराव्याचे शपथपत्रातील विधाने सुस्पष्ट नाहीत नाहीत व ती मोघम आहेत असे दिसून येते.
9. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीमध्ये असे स्पष्ट कथन केले आहे की, एक रात्र सा.वाले यांच्या निवासस्थानी कसेबसे थांबले परंतु नंतर दुस-या दिवशी त्यांनी हॉटेल गौतम येथे आपला मुक्काम हलविला. सा.वाले यांनी तक्रारारांच्या या कथनास स्पष्टपणे नकार दिलेला आहे. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत पृष्ट क्र.13 वर हॉटेल गौतम, गोवा यांचे बिलाची प्रत हजर केलेली आहे. त्यातील नोंदी वरुन असे दिसते की, तक्रारदारांनी दिनांक 19.5.2007 ते 26.5.2007 या कालावधीमध्ये हॉटेल गौतम येथे मुक्काम केला होता व त्या बद्दल सदर हॉटेल चालकास रुपये 21,630/- अदा केले होते. सा.वाले यांनी तक्रारदारांच्या या कथनास स्पष्टपणे नकार दिला आहे. सा.वाले यांच्या गोवा येथील पर्यटन केंद्रामध्ये निवासाची व्यवस्था जर चांगली असती तर निच्छितच तक्रारदार पर्यटन केंद्र सोडून हॉटेलमध्ये मुक्काम करणेकामी गेले नसते. सा.वाले यांच्या पर्यटन केद्रामधील सुविधा ही सभासद म्हणून तक्रारदारांना पुरविण्यात आली होती. व तक्रारदारांना हॉटेलमध्ये मुक्काम करुन ज्यादा खर्च करणे शक्य नव्हते. तथापी तक्रारदार त्यांच्या कुटुंबिया समवेत सा.वाले यांचे पर्यटन केंद्र सोडून हॉटेलमध्ये मुक्काम करण्यास जातात व ज्यादा भाडे हॉटेल चालकास अदा करतात ही बाब तक्रारदारांच्या कथनास पुष्टी देते की, सा.वाले यांचे गोवा येथील पर्यटन केद्रावरील निवासस्थानाची सुविधा निकृष्ट दर्जाची असल्याने तक्रारदार यांना ती सहन झाली नाही, व तक्रारदारांना हॉटेलमध्ये मुक्काम करणे भाग पडले. यावरुन सा.वाले यांनी तक्रारदारांना पर्यटन केंद्रावरील निवासस्थानाचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असा निष्कर्ष काढावा लागतो.
10. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडून नुकसान भरपाईदाखल हॉटेल चालकास अदा केलेले रु.22,400/- च्या व्यतिरिक्त नुकसान भरपाई रु.50,000/- अशी मागणी केलेली आहे. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत हॉटेल गौतमचे रु.22,400/-चे बिल दाखल केलेले आहे. तक्रारदारांना सा.वाले यांच्या गोवा येथील पर्यटनकेंद्रात निवासस्थानामध्ये एक रात्र राहण्यामध्ये बरीच गैरसोय व कुचंबणा झाली असेल. त्यानंतर तक्रारदारांना हॉटेलमध्ये स्थलांतरणाकामी गैरसोय व त्रास झाला असेल या सर्व प्रकारामध्ये त्यांना मानसिक त्रास व कुचंबणा झाली असेल. तक्रारदारांनी हॉटेल गौतम यांना अदा केलेले रु.21,630/- व मानसीक त्रास, कुंचंबणा, गैरसोय या बद्दलची ज्यादा नुकसान भरपाई असे एकत्रित रुपये रु.35,000/-अशी नुकसान भरपाई सा.वाले यांनी तक्रारदारांना अदा करणे योग्य व न्याय राहील असे मंचाचे मत झाले आहे.
11. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 544/2007 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेंवाले यांनी तक्रारदारांना गोवा येथील पर्यटन केंद्राव्दारे निवासस्थानाची सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले यांनी तक्रारदारांना त्याबद्दल नुकसान भरपाई रु.35,000/- अदा करावेत व त्या व्यतिरिक्त तक्रारीच्या खर्चाबद्दल रु.5000/- असे एकत्रित रु.40,000/-अदा करावेत असा आदेश देण्यात येतो.
4. सामनेवाले यांनी वरील आदेशाची पुर्तता न्याय निर्णयाची प्रत मिळाल्यापासून आठ आठवडयाचे आत करावी. अन्यथा नुकसान भरपाईच्या रक्कमेवर विहीत मुदत संपल्यापासून 9 टक्के व्याज रक्कम अदा करेपर्यत द्यावे.
5. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.