(आदेश पारीत व्दारा - श्री नितीन मा. घरडे, मा.सदस्य)
(पारीत दिनांक : 29 सप्टेंबर 2016)
1. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केली असून तक्रारीचे थोडक्यात स्वरुप असे आहे की, तक्रारकर्त्याला विरुध्दपक्ष म्हणजे वीज पुरवठा कंपनी यांचेकडून फेब्रुवारी 2012 ते आजपर्यंत वाढीव रकमेचे विद्युत देयक दिल्या कारणाने विरुध्दपक्ष यांनी सेवेत ञुटी केली आहे.
2. तक्रारकर्ता आपल्या तक्रारीत नमूद करतो की, तक्रारकर्ता हे विरुध्दपक्षाचे ग्राहक असून त्याचा ग्राहक क्रमांक 410013395181 असा असून ते विरुध्दपक्ष वीज पुरवठा कंपनीचे ब-याच वर्षापासून म्हणजे 1997 पासून ग्राहक आहे व त्यांनी घरगुती वापरासाठी वीजचे पुरवठा घेतला आहे. तक्रारकर्त्याच्या घरी जानेवारी 2012 मध्ये जुने ईलेक्ट्रीक मिटर काढून तक्रारकर्त्याच्या अनुपस्थितीमध्ये नवीन ईलेक्ट्रॉनीक ईलेक्ट्रीक मिटर लावण्यात आले व फेब्रुवारी 2012 पासून त्यांनी आजपर्यंतचे वाढीव रकमेचे विद्युत देयक बेकायदेशिर देण्यात आले. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष यांना सदरचे वाढीव बिल येत आहे याबाबत वेळोवेळी विरुध्दपक्षांना भेटून वाढीव बिल येत असल्याचे लक्षात आणून दिले. परंतु विरुध्दपक्षाने कुठलिही मदत किंवा सकारात्मक प्रयत्न केले नाही. त्यामुळे विरुध्दपक्ष यांनी मे 2012 ते ऑगस्ट 2012 पर्यंत बेकायदेशिर दिलेल्या विद्युत देयकाचा भरणा केलेला नाही. तक्रारकर्ता पुढे असे नमूद करतो की, विद्युत मिटरचा संशय आल्यामुळे तक्रारकर्ता यांनी दिनांक 12.6.2012 रोजी विरुध्दपक्ष यांचेकडे विद्युत मिटर तपासणीकरीता रुपये 100/- भरणा केला, त्याबाबत रितसर पावती सुध्दा तक्रारकर्त्यास देण्यात आली. परंतु विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्याच्या विद्युत मिटरची तपासणी केली नाही व योग्य अहवाल सुध्दा दिलेला नाही. सदरची कृती ही विरुध्दपक्षाची सेवेतील ञुटी सिध्द होते. सदर बाबत तक्रारकर्त्याने दिनांक 22.4.2012 रोजी लेखी तक्रार विरुध्दपक्ष यांना दिली, तरी सुध्दा कायदेशिर कार्यवाही अजुनपर्यंत करण्यात आली नाही. तक्रारकर्ता पुढे असे नमूद करतो की, विद्युत देयकाचे सुक्ष्म अवलोकन केले असता असे लक्षात येते की, एप्रिल 2012 च्या विद्युत देयकाची रक्कम सुध्दा अंतरभूत आहे. तसेच तक्रारकर्त्याचा वापर केलेल्या युनिटचा सुक्ष्म विचार केला असता, साधारणपणे 200 ते 250 युनिट वापर तक्रारकर्त्याचा होता, त्यामुळे विरुध्दपक्ष यांनी फेब्रुवारी 2012 ते सप्टेंबर 2012 या चालु महिण्याचे पाठविलेले विद्युत देयक पूर्णपणे चुकीचे व बेकायदेशिर असल्या कारणाने हेतुपुरस्पर पाठविलेले दिसून येते. तक्रारकर्ता पुढे असे नमूद करतो की, तक्रारकर्त्यास त्याचे नवीन मिटर तपासून देण्यास व त्यात दोष आढळल्यास तो काढून देण्यास व त्याने बेकायदेशिर हेतुपुरस्परपणे पाठविलेले संपूर्ण विद्युत देयक परत घेण्यास व सुधारीत विद्युत देयक देण्यास विरुध्दपक्ष जबाबदार आहे. या सर्व कारणास्तव तक्रारकर्त्याला अतिशय शारिरीक, मानसिक ञास सहन करावा लागला व त्याकरीता विरुध्दपक्ष नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहे. याकरीता तक्रारकर्त्याने सदरची तक्रार मंचात दाखल करुन खालीलप्रमाणे प्रार्थना केलेली आहे.
1) विरुध्दपक्ष यांना आदेशीत करावे की, तक्रारकर्त्याला मार्च 2012 पासून वाढीव रकमेचे विद्युत देयक पाठविलेले आहे, त्याचे योग्य मोजमापन करुन योग्य वाचन केलेले विद्युत देयक तक्रारकर्त्यास देण्यात यावे व चुकीचे व बेकायदेशिर पाठविलेले विद्युत देयक रद्द करुन विरुध्दपक्ष यांनी अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केले व सेवेत ञुटी दिलेली आहे, असे घोषीत करावे.
2) मार्च 2012 पासून पाठविलेले प्रत्येक विद्युत देयक चुकीचे व बेकायदेशिर असल्याचे निष्पन्न झाल्यास विरुध्दपक्ष यांना सुधारीत विद्युत देयक प्रतिमाह 70 युनिट प्रमाणे देण्याचे निर्देश द्यावे.
3) विरुध्दपक्ष यांना तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक ञासोपोटी रुपये 25,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 10,000/- एवढी रक्कम देण्याचे आदेशीत व्हावे.
3. तक्रारकर्तीचे तक्रारीला अनुसरुन विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांना मंचाची नोटीस पाठविण्यात आली. त्यावर विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांनी उपस्थित होऊन तक्रारकर्त्याच्या तक्रारीला निशाणी क्र.10 नुसार लेखीउत्तर दाखल करुन त्यात नमूद केले की, तक्रारकर्ता हा ग्राहक आहे. तक्रारकर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे विद्युत मिटर बदलविण्याकरीता तक्रारकर्त्याला कुठल्याही प्रकारची नोटीस किंवा सुचना दिली नाही, कारण जुने मिटर बदलवून नवीन मिटर बसविणे ही विरुध्दपक्ष यांची मोहीम होती, त्यामुळे यात अनुचित व्यापार पध्दतीचा कुठलाही अवलंब झाला नाही. तसेच तक्रारकर्ता यांनी ऑक्टोंबर 2012 ला दिलेले विजेचे देयक रद्दबादल करावे असे म्हणणे आहे, परंतु दाखल CPL रेकॉर्डचे अवलोकन केले असता, तक्रारकर्ता हा वीजेच्या बिलाचा भरणा नियमितपणे करीत नव्हता. तसेच सदरची तक्रार दाखल करण्यापूर्वी आलेले वीजेचे देयक दिनांक 10.6.2012 चे सुध्दा तक्रारकर्त्याने भरले नाही. तसेच त्याच कारणास्तव तक्रारकर्त्यावर एकूण रुपये 24,678.50 पैशाचे बिल आलेले आहे. विरुध्दपक्षाने उत्तरात पुढे असे नमूद केले की, तक्रारकर्त्याचे नवीन मिटर बसविल्यानंतर तक्रारकर्त्याने मिटर तपासणीकरीता अर्ज केला होता व त्याप्रमाणे तक्रारकर्त्याचे मिटर तपासून आले असता मिटर योग्य परिस्थितीमध्ये होते. त्यामुळे तक्रारकर्त्याला जे वीजचे देयक फेब्रुवारी 2012 ते एप्रिल 2012 हे बरोबर आहे. त्याचप्रमाणे हे म्हणणे चुकीचे आहे की, मे 2012 ते ऑगस्ट 2012 पर्यंत जे वीजचे देयक तक्रारकर्त्यास दिले आहे ते सुध्दा बरोबर आहे. तसेच तक्रारकर्ता नियमितपणे वीजेचे बिल भरीत नाही, परंतु वीजेचा उपभोग घेतो, तसेच विरुध्दपक्ष यांचेवर तक्रारकर्त्याने लावलेले सर्व आरोप प्रत्यारोप आपले उत्तरात खोडून काढले व तक्रारकर्ताची तक्रार ही कोणत्याही एका विशिष्ट आधारावर नसून फक्त विरुध्दपक्ष यांना ञास देण्याकरीता दाखल केलेली आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज होण्यास पाञ आहे.
4. तक्रारकर्त्याने सदरच्या तक्रारीबरोबर 1 ते 6 दस्ताऐवज दाखल करुन त्यात प्रामुख्याने दिनांक 13.3.2012 पासून 16.10.2012 पर्यंतच्या विद्युत देयकांची छायांकीत प्रती दाखल केलेल्या आहेत. तसेच विरुध्दपक्ष यांनी आपल्या उत्तराबरोबर CPL, मिटर टेस्टींग रिपोर्ट दाखल केली आहे.
5. दोन्ही पक्षांचा मौखीक युक्तीवाद मंचासमक्ष ऐकण्यात आला. तसेच अभिलेखावर दाखल लेखी युक्तीवाद व दोन्ही पक्षांनी दाखल केलेल्या दस्ताऐवजाचे अवलोकन करण्यात आले. त्याप्रमाणे खालील प्रमाणे मुद्दे व निष्कर्ष देण्यात येते.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष यांचा ग्राहक होतो काय ? : होय
2) विरुध्दपक्ष यांचेकडून तक्रारकर्त्यास अनुचित व्यापार : नाही
प्रथेचा अवलंब किंवा सेवेत ञुटी दिसून येते काय ?
दिली याबाबत सिध्द होते काय ?
3) आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
// निष्कर्ष //
6. तक्रारकर्त्याची सदरची तक्रार थोडक्यात अशाप्रकारे आहे की, तक्रारकर्त्याला विरुध्दपक्ष यांचेकडून प्राप्त झालेले बिल हे जास्तीच्या रकमेचे आलेले असून तक्रारकर्त्याचे असे म्हणणे की, तक्रारकर्त्याचा वीज वापर कमी असतांना त्यांना वाढीव बिल प्राप्त होत आहे. तक्रारकर्त्याचे जुने वीजेचे मिटर बदलविण्यापूर्वी तक्रारकर्त्याला विरुध्दपक्षाने कोणतीही सुचना किंवा नोटीस दिली नाही. तसेच तक्रारकर्त्याला आलेले दिनांक 7.9.2012 चे वीजेचे देयक रुपये 6,830/- रद्दबादल करण्यात यावे. विरुध्दपक्ष यांनी दाखल केलेल्या CPL चे वाचन केले असता असे दिसून येते की, तक्रारकर्त्याचा मिटर क्रमांक 00623266 असून सप्टेंबर 2011 ते जानेवारी 2012 पर्यंत तक्रारकर्त्याचे मिटरचे वाचन योग्यरित्या होऊन योग्य बिल देण्यात येत होते. परंतु, फेब्रुवारी 2012 मध्ये तक्रारकर्त्याचे वीजेचे मिटर बदलवून त्याचा मिटर क्रमांक 03015049 झाल्यानंतर सुध्दा फेब्रुवारी 2012 ते ऑक्टोंबर 2012 पर्यंत तक्रारकर्त्याचे मिटरचे वाचन योग्य व सुरक्षित पध्दतीचे झालेले दिसून येते. परंतु तक्रारकर्त्याने वीजेच्या बिलाचा भरणा केला नाही व तक्रारकर्त्याच्या मिटर तपासणीच्या अर्जावरुन दिनांक 10.9.2013 रोजी मिटरची तपासणी केली असता सदरचे मिटर हे योग्य व सुरक्षित चालत आहे, असा अहवाल सुध्दा अभिलेखावर दाखल आहे. त्यामुळे तक्रारकर्ता यांनी वीजेच्या बिलाचा भरणा न केल्यामुळे थकीत रक्कम व त्यावर येणारे व्याज असे मिळून तक्रारकर्त्याला एकूण सप्टेंबर 2012 चे देयक रुपये 6,830/- आलेले आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याला ती रक्कम भरणे भाग आहे. सबब, खालील आदेश पारीत करण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
(2) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 29/09/2016