::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 20/01/2016 )
आदरणीय अध्यक्षा सौ. एस. एम. उंटवाले, यांचे अनुसार
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे, …
तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 2 कडून सोनी कंपनीचा सी-6802-एक्सपेरीया-झेड-अलट्टा हा मोबाईल संच दि. 03/01/2015 रोजी रु. 20,000/- नगदी देवून विकत घेतला, सदर संचाचा आयएमईआय क्र. हा 357656050226446 हा होता. सदर संचावर एक वर्षाची वॉरंटी आहे. सदर मोबाईल काही दिवस सुरळीत चालला, परंतु त्यानंतर त्यामधील कॅमेरा हा बरोबर चालत नव्हता. या करिता तक्रारकर्त्याने सदर मोबाईल संच विरुध्दपक्ष क्र. 2 कडे दाखविला असता त्यांनी सदर मोबाईल संच हा विरुध्दपक्ष क्र. 3 कडे दाखविण्यास सांगितले, त्यावरुन दि. 07/01/2015 रोजी सदर संच विरुध्दपक्ष क्र. 3 कडे दुरुस्तीकरीता दिला. विरुध्दपक्ष क्र. 3 यांनी वरील वर्णीत मोबाईल बदलून त्याच मॉडेलचा दुसरा नविन मोबाईल संच तक्रारकर्ता यास दि. 12/01/2015 रोजी दिला ज्याचा आयएमईआय क्र. 357656053608392 असा होता. त्यानंतर तक्रारकर्त्याने सदर नविन मोबाईल संच वापरत असतांना मोबाईल संचामधील कॅमेरा तसेच नेटवर्क मध्ये दोष आढळून आले. यावेळी तक्रारकर्त्याने सदर संच विरुध्दपक्ष क्र. 2 यांना दाखविला व संच परत घेवून त्याची रक्कम परत मागीतली. यावर विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी अत्यंत वाईट भाषेमध्ये उत्तर दिले, तसेच ते जबाबदार नाहीत असे सांगितले. या करिता तक्रारकर्त्याने दि. 28/01/2015 रोजी विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांना वकीलामार्फत नोटीस पाठवून सदर मोबाईल संच परत घेऊन त्याची रक्कम परत मिळण्याकरिता सुचित केले. परंतु या नोटीसला विरुध्दपक्षांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 3 यांच्याकडे सदर मोबाईल संच दि. 02/02/2015 व दि. 04/02/2015 रोजी दिला. त्यानंतर सुध्दा सदर मोबाईल संचा मधील असलेला दोष दुर झाला नाही म्हणून तक्रारकर्त्याने परत विरुध्दपक्ष क्र. 3 कडे सदर मोबाईल संच दि. 12/2/2015 रोजी दुरुस्तीकरिता दिला. तक्रारकर्ता सदर मोबाईल संच परत घेण्याकरिता गेला असता विरुध्दपक्ष क्र. 3 यांनी वेगवेगळे कारण देवून सदर मोबाईल संच दिला नाही. त्यामुळे नाईलाजास्तव दि. 09/03/2015 रोजी विरुध्दपक्ष क्र. 1, 2 व 3 यांना वकीलामार्फत नोटीस पाठवून, सदर मोबाईल संचाच्या रकमेची मागणी तसेच नुकसान भरपाईची मागणी केली. त्यावर विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्त्याला दि. 4/3/2015 रोजी पत्र पाठविले. सदर पत्र तक्रारकर्त्याला दि. 16/3/2015 रोजी मिळाले, सदर पत्रामध्ये तक्रारकर्त्याच्या मोबाईल मधील दोष हा दुरुस्त करता येत नव्हते, म्हणून तक्रारकर्त्याला आधीचा मोबाईल संच बदलून नविन मोबाईल संच घेण्याकरिता विरुध्दपक्ष क्र. 3 कडे जाण्यास सांगितले, सदर पत्र मिळाल्यानंतर तक्रारकर्ता विरुध्दपक्ष क्र. 3 कडे गेला, त्यावर विरुध्दपक्ष क्र. 3 यांनी तक्रारकर्त्याला त्याच मॉडेलचा नविन मोबाईल संच दिला, ज्याचा आयएमईआय क्र. 357656051792131 होता. तक्रारकर्त्याला सदर नविन मोबाईल संच त्याच दिवशी वापरत असतांना सदर मोबाईल संचामधील येणारे कॉल तसेच मोबाईल मधील स्पीकर मधून आवाज न येणे, असे दोष आढळून आले असता, तक्रारकर्त्याने ताबडोब त्याच दिवशी म्हणजे दि. 16/3/2015 रोजी सदर मोबाईल विरुध्दपक्ष क्र. 3 यांच्याकडे दिला. तरी देखील सदर मोबाईल संचामधील दोष दुर झाला नाही. सदर मोबाईल हा निर्मिती दोषयुक्त असल्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तीन वेळा बदली करुन दिला, मुळत: सदर मॉडेलचा फोन हा दोषयुक्त आहे. अशा प्रकारे विरुध्दपक्ष यांनी सेवा देण्यातील न्युनता, निष्काळजीपणा व हलगर्जीपणामुळे तक्रारकर्त्यास मानसिक व आर्थिक त्रास सोसावा लागत आहे, आज रोजी सदर मोबाईल संच हा नादुरुस्त आहे. तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, तक्रारकर्त्याची तक्रार मंजुर व्हावी व विरुध्दपक्षाला आदेश द्यावा की, तक्रारकर्त्याने घेतलेल्या मोबाईल फोनची रक्कम रु. 20,000/- दि. 3/1/2015 पासून 18 टक्के व्याजासह परत करावी व तक्रारकर्त्यास होणा-या मानसिक त्रासापोटी रु. 25,000/- तसेच नोटीसचा खर्च रु. 2000/- तसेच सदर तक्रारीचा खर्च रु. 5000/- देण्यात यावे.
सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 18 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्ष क्र. 1 यांचा लेखीजवाब :-
2. विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी त्यांचा लेखी जबाब इंग्रजीत दाखल केला, तो थोडक्यात येणे प्रमाणे…
तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 2 कडून सोनी कंपनीचा मोबाईल संच दि. 3/1/2015 रोजी रु. 20,000/- किंमतीचा विकत घेतला, हे खरे आहे. त्यावर एका वर्षाची वॉरंटी होती. वॉरंन्टीच्या अटी शर्ती विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी जबाबात नमुद केल्या आहेत. तसेच विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी, सदर मोबाईल किती वेळेस दुरुस्तीसाठी विरुध्दपक्ष क्र. 3 कडे टाकला व त्या बदल्यात विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी नवीन दुसरा मोबाईल तक्रारकर्त्याला वापरण्यासाठी दिला, या बद्दलचे कथन मान्य करुन तक्रारकर्त्याचा मोबाईल हा वॉरंन्टीच्या अटी शर्तीनुसार दुरुस्त करुन दिला, म्हणून सेवा न्युनता नाही, असे कथन केले आहे. मोबाईल संचासोबत मोबाईल कसा हाताळावा, या बद्दलची पुस्तीका दिली आहे, त्यानुसार सदर मोबाईल तक्रारकर्त्याने हाताळला नाही. विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी जबाबात न्याय निवडे नमुद केले आहेत. सदर लेखी जबाब प्रतीज्ञालेखासह दाखल केला आहे.
विरुध्दपक्ष क्र. 2 यांचा लेखीजवाब :-
विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी सदर प्रकरणात लेखी जबाब दाखल केला असून, तक्रारकर्त्याचे आरोप नाकबुल केले आहेत व अधिकचे कथनात असे नमुद केले आहे की, विरुध्दपक्ष क्र. 2 हा कंपनीद्वारे आलेले मोबाईल फक्त विक्रीचा व्यवसाय करतो, त्या मोबाईलच्या गॅरंटी वारंटीशी किंवा त्याच्या निर्मितीशी विरुध्दपक्ष क्र. 2 चा काहीही संबंध नसतो. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 2 कडून सदर मोबाईल योग्यरित्या पडताळून, त्यात कोणताही दोष नाही, याची योग्य ती पडताळणी करुन विकत घेतला होता. तक्रारकर्त्याने त्याला असलेल्या इलेक्ट्रानिक्स वस्तुचे ज्ञानाचा गैरफायदा घेवून विरुध्दपक्ष क्र. 3 कडून वारंवार मोबाईलमध्ये बनावटी दोष दर्शवून बदलून घेतलेला आहे. तक्रारकर्त्याने स्वत: मोबाईलच्या हाताळणीमध्ये खोळसाळपणा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तक्रारकर्ता, विरुध्दपक्ष क्र. 2 कडून मोबाईल विकत घेतल्यानंतर कधीही परत आलेला नाही, त्याने परस्पर विरुध्दपक्ष क्र. 3 सोबत काय व्यवहार केला, ह्याबद्दल विरुध्दपक्ष क्र. 2 ला काहीही माहीती नाही. विरुध्दपक्ष क्र. 2 ने तक्रारकर्त्यास योग्य ती सेवा दिलेली आहे. विरुध्दपक्ष क्र. 2 चा मोबाईलच्या निमिर्ती दोषासंबंधी काहीही संबंध नाही. त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 2 विरुध्द केलेली तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
विरुध्दपक्ष क्र. 3 यांचा लेखीजवाब
विरुध्दपक्ष क्र. 3 यांनी सदर प्रकरणात लेखी जबाब दाखल न केल्यामुळे सदर प्रकरण विरुध्दपक्षाच्या लेखी जबाबाशिवाय पुढे चालविण्याचे आदेश मंचाने पारीत केले.
3. त्यानंतर विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी प्रतिज्ञालेखाद्वारे पुरावा दाखल केला व उभय पक्षांनी युक्तीवाद केला.
::: का र णे व नि ष्क र्ष :::
4. या प्रकरणातील तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 चा स्वतंत्र लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, विरुध्दपक्ष क्र. 1 चा पुरावा, उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद यांचे काळजीपुर्वक अवलोकन करुन खालील निष्कर्ष कारणे देवून नमुद केला.
सदर प्रकरणात विरुध्दपक्ष क्र. 3 यांनी मुदतीत लेखी जबाब दाखल न केल्यामुळे, प्रकरण विरुध्दपक्ष्ा क्र. 3 विरुध्द लेखी जबाबाशिवाय पुढे चालविण्याचा आदेश मंचाने पारीत केला. तसेच सदर प्रकरणात तकारकर्ते व विरुध्दपक्ष क. 1 व 2 यांना मान्य असलेल्या बाबी अश्या आहेत की, तक्रारकर्ते यांनी विरुध्दपक्ष क्र. 2 कडून विरुध्दपक्ष क्र. 1 निर्मित सोनी कंपनीचा सी-6802-एक्सपेरीया-झेड-अल्ट्रा मोबाईल दि. 3/1/2015 रोजी रु. 20,000/- किमतीत खरेदी केला होता, त्यामुळे तक्रारकर्ता हा ग्राहक या संज्ञेत बसतो, असे मंचाचे मत आहे. विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी त्यांच्या लेखी जबाबात हे मान्य केले की, दि. 7/1/2015 रोजी तक्रारकर्त्याने या मोबाईल मधील कॅमेरा बद्दलची तक्रार करीत, मोबाईल दुरुस्तीकरीता विरुध्दपक्ष क्र. 3 कडे दिला होता, तेंव्हा विरुध्दपक्ष क्र. 3 यांनी सदर मोबाईल बदलून त्याच मॉडेलचा दुसरा नवीन मोबाईल संच तक्रारकर्त्यास दि. 12/1/2015 रोजी दिला, तसेच त्याबद्दलचे दस्त क्र. डी-2 रेकॉर्डवर दाखल आहे. विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी लेखी जबाबात तक्रारकर्ते यांनी विरुध्दपक्षास दि. 28/1/2015 रोजीची नोटीस दिली, हे कबुल केले आहे. सदर नोटीस रेकॉर्डवर दस्त क्र. डी-3 वर आहे. सदर नोटीसचे अवलोकन केले असता, असे दिसते की, तक्रारकर्त्याने त्यात विरुध्दपक्ष क्र. 3 ने दिलेल्या नवीन मोबाईल संचात सुध्दा नेटवर्क व कॅमेरा बद्दलचा दोष आढळल्यामुळे सदर ओरीजनल मोबाईलची रक्कम परत मिळण्याकरिता विरुध्दपक्षास सुचित केले होते. विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी पुढे त्यांच्या लेखी जबाबात दि. 2/2/2015 ची जॉबशिट ( दस्त क्र. डी-7 ) व दि. 4/2/2015 चे Retail Invioce (दस्त क्र. डी-8) हे दस्त कबुल केले आहे. हे दस्त असे दर्शवितात की, विरुध्दपक्षाने दिलेला नवीन मोबाईल हा कॅमेरा व नेटवर्क बद्दलच्या तक्रारीमुळे पुन्हा तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 3 कडे दुरुस्तीसाठी दिला होता व त्यात मोबाईल दुरुस्त करुन देण्याची तारीख 9/2/2015 अशी नमुद होती. विरुध्दपक्ष क्र. 1 चे असे कथन आहे की, दि. 9/2/2015 रोजी सदर दोष दुरुस्त केल्यामुळे तक्रारकर्त्याने मोबाईल Perfect Working Condition मध्ये वापस घेतला, परंतु तक्रारकर्त्याने दाखल केलेले दस्त डी-9 दि. 12/2/2015 रोजीचे असे दर्शवितात की, सदर नवीन मोबाईल कॅमेरा व साऊंडच्या दोषाकरिता तक्रारकर्त्याने पुन्हा दि. 12/2/2015 रोजी विरुध्दपक्ष क्र. 3 कडे दुरुस्तीसाठी टाकला होता. त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 1 चे वरील कथन मंचाला स्विकारता येणार नाही. तक्रारकर्ते यांनी दाखल केलेले दस्त क्र. डी-11 असे दर्शवितात की, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षांना दि. 9/3/2015 रोजी वकीलाव्दारे नोटीस पाठवून मोबाईल संचाच्या रकमेची मागणी, इतर त्रासापोटीच्या नुकसान भरपाईसह केली होती व दस्त क्र. 16 विरुध्दपक्ष क्र.1 चे तक्रारकर्त्याला पाठविलेले पत्र, जे विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी त्यांच्या लेखी जबाबात मान्य केले आहे, असे दर्शविते की, विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्त्याला असे कळविले होते की, या नवीन मोबाईल संचामधील दोष सुध्दा दुरुस्त करता येणार नसल्यामुळे पुन्हा त्या ऐवजी नवीन मोबाईल संच घेण्याकरिता विरुध्दपक्ष क्र. 3 कडे तक्रारकर्त्याने जावे. दाखल दस्त असे दर्शवितात की, विरुध्दपक्ष क्र. 3 यांनी तक्रारकर्त्याला त्याच मॉडेलचा नवीन मोबाईल संच दिला होता. सदर पुन्हा दिलेला नवीन मोबाईल संच देखील दोषपुर्ण होता, असे दि. 16/3/2015 च्या दस्त क्र. डी-17 वरुन दिसुन येते. हा दस्त ( दस्त क्र. डी-17) विरुध्दपक्ष क्र. 1 ने जबाबात मान्य केला आहे, म्हणजे विरुध्दपक्षाने तीन वेळा बदली करुन दिलेला मोबाईल सुध्दा दोषपुर्ण आहे, असे तक्रारकर्त्याने रेकॉर्डवर दाखल केलेल्या सर्व दस्तांवरुन ( ज्याबद्दलची कबुली विरुध्दपक्ष क्र. 1 ने लेखी जबाबात दिली ) सिध्द झाले आहे. विरुध्दपक्ष क्र. 1 चे यावर असे भाष्य आहे की, यात त्यांचा वाईट हेतु नव्हता, ते वॉरन्टीच्या अटी शर्तीला अधिन राहून, असे वागले व योग्य सेवा दिली. तक्रारकर्त्याने User Guide मधील Precautions नुसार मोबाईल हाताळला नाही. विरुध्दपक्षाने मा. वरीष्ठ न्यायालयांचे पुर्ण निवाडे दाखल न करता फक्त त्यातील ठळक निर्देश जबाबात कथ्न केले, त्यामुळे ते मंचाला स्विकारता येणार नाही, कारण विरुध्दपक्ष क्र. 1 च्या मान्य केलेल्या बाबीतुन व दस्तांवरुनच हे सिध्द झाले की, त्यांनी तक्रारदाराला विकलेल्या मोबाईल मध्ये निर्मिती दोष असून, विरुध्दपक्षाने त्यापोटी सेवा देण्यात न्युनता दर्शविलेली आहे, त्यामुळे तक्रारकर्त्याची विनंती अंशत: मंजुर केल्यास ते न्यायोचित होईल, या निष्कर्षाप्रत सदर मंच आले आहे. म्हणून अंतीम आदेश पारीत केला तो येणे प्रमाणे…
:::अं ति म आ दे श:::
- तक्रारकर्ते यांची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांनी संयुक्तपणे वा वेगवेगळे तक्रारकर्त्यास त्याने घेतलेल्या मोबाईल फोनची रक्कम रु. 20,000/- ( रुपये विस हजार ) द.सा.द.शे. 8 टक्के व्याज दराने, प्रकरण दाखल तारखेपासून ( दि. 15/4/2015 ) ते देय तारखेपर्यंत व्याजासहीत ( तक्रारकर्त्या जवळचा दोषपुर्ण मोबाइल परत घेऊन ) द्यावे. तसेच शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी व प्रकरण खर्च मिळून रु. 5000/- ( रुपये पांच हजार ) इतकी रक्कम द्यावी.
- सदर आदेशाचे पालन, विरुध्दपक्ष क्र. 1,2 व 3 यांनी निकालाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांच्या आंत करावे.
4) सदर आदेशाच्या प्रती संबंधीतांना निशुल्क देण्यात याव्या.