रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग. तक्रार क्र.12/2009. तक्रार दाखल दि.16-1-2009. तक्रार निकाली दि.9-3-2009.
नॅशनल कॉम्प्लेक्स को.ऑप.हौसिंग कॉम्प्लेक्स, रजिस्टर्ड सोसायटी, प्लॉट नं.बी-11 व 12, सेक्टर 6, न्यू पनवेल ईस्ट, तर्फे चेअरमन- श्रीमती मेरी थॉमस व सचिव श्री.अंजान सरकार. ... तक्रारदार.
विरुध्द मे.शिवम एंटरप्रायजेस, प्रोप्रायटरी फर्म, तर्फे श्री.डी.आर.पांडे, 1. भैरी भवानी छाया, प्लॉट नं.15, रोड नं.10, सेक्टर 11, न्यू पनवेल. 2. कैलाश भुवन, राहुल नगर नं.1, ए.टी.आय.समोर, व्ही.एन.पुरव मार्ग, चुनाभट्टी मुंबई. ... विरुध्द पक्षकार.
उपस्थिती- मा.श्री.आर.डी.म्हेत्रस, अध्यक्ष. श्री.बी.एम.कानिटकर, सदस्य. तक्रारदारतर्फे वकील- सौ.शारदा पिंजारी. सामनेवाले –गैरहजर. -निकालपत्र -
द्वारा- मा.सदस्य, श्री.बी.एम.कानिटकर. 1. तक्रारदार नॅशनल कॉम्प्लेक्स को.ऑप.हौसिंग कॉम्प्लेक्स ही रजिस्टर्ड सोसयटी असून त्यांनी आपली तक्रार चेअरपर्सन श्रीमती मेरी थॉमस व अंजना सरकार मार्फत मे.शिवम एंटरप्रायजेस यांचेविरुध्द दाखल केली आहे. सदर सोसायटीचा प्लॉट नं.बी-11 व बी-12 नवीन पनवेलच्या सेक्टर 6 वर असून ती महाराष्ट्र को.ऑप.सोसायटी अक्ट 1960 अन्वये नोंदणीकृत केलेली संस्था आहे. सामनेवाले हे शिवम एंटरप्रायजेस नावाची प्रोप्रायटरी फर्म आहे. दि.22-1-07 रोजी सामनेवालेबरोबर सोसायटीने खालील कामासाठी करार केला. एकंदर कामाची रक्कम रु.10,85,000/- ठरवली गेली. त्या कराराअंतर्गत सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटीने मान्य केलेले मटेरियल वापरुन इमारतीला गेलेले तडे भरणे, वॉटरप्रुफिंग, सिमेंट, रंग वॉटरप्रुफ केमिकलसह सर्वत्र लावणे, तसेच एशियन एपेक्स पेंटचे दोन हात देणे, दोन हात आय.सी.आय.पेंट किंवा एशियन पेंट यांनी इमारतीच्या स्टिल्टच्या सिलींगला जिन्याला आणि लिफ्टच्या भागाला तसेच फायर शाफ्टला रंग देणे. एक हात रेड आक्साईड प्रिमियम रंग देणे व शेवटी हायक्लास प्रिमियर एनॅमल पेंटने बसवलेले ग्रील, टेरेस येथील कोलॅप्सेबल शटर्स, व रोलिंग शटर्स यांना रंग देणे. याप्रमाणे वर्क ऑर्डर सामनेवालेना देण्यात आली. सामनेवालेनी ठरवलेल्या कामाला म्हणजे तडे बुजवण्याच्या कामाला सुरुवात केली. सामनेवालेनी वरील अटी व शर्ती मान्य करुन कामाला सुरुवात केली. तसेच त्याने दि.31-1-07 चे पत्रान्वये हे काम करण्यास मान्यता दिली आहे. सोसायटीने दि.20-3-07 रोजी वाढीव कामालासुध्दा मान्यता दिली आहे. सोसायटीने सामनेवालेना एकूण रु.13,35,000/- सदर कामापोटी दिले आहेत. सामनेवालेनी वेळोवेळी दिलेल्या रकमांच्या पावत्या घेतलेल्या असून त्यांची पावती रेकॉर्डमध्ये दाखल आहे. दि.28-7-07 रोजी सामनेवालेनी उत्तम कामाच्या हमीचे पत्र सोसायटीला दिले आहे. जुलै 07 मध्ये सर्व काम संपल्यावर सोसायटीने रु.65,000/- रक्कम सामनेवालेच्या सोसायटीकडे हमी रक्कम म्हणून जमा केली आहे. रंगकाम झाल्यानंतर लगेच पाऊस सुरु झाला. त्यानंतर इमारतीच्या बाहेरील भिंतीतून पाणी झिरपून मोठे काळया रंगाचे डाग इमारतीबाहेरील भिंतीवर दिसू लागले, तसेच भिंतीच्या रंगाचे काही ठिकाणी टवके उडाले आहेत. काही ठिकाणचा रंग धुवून गेला आहे असे निदर्शनास आले व तडे भरलेले असूनसुध्दा त्यातून पाणी झिरपत आहे. सामनेवालेनी दिलेले हमीपत्र हे 5 वर्षासाठी होते. परंतु पहिल्या पावसाळयात ती हमी खोटी ठरली. पाण्याची होणारी गळती, सोसायटीच्या सभासदानी यासंबंधी तक्रार केल्यार ताबडतोब सोसायटीच्या पदाधिका-यांनी सामनेवालेना त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला व कमी दर्जाचे सामान वापरल्यामुळे त्यांना दिलेल्या मोबदल्याची रक्कम परत का मागू नये यासाठी नोटीस पाठविली. इमारतीच्या खराब झालेल्या रंगकामाचे फोटो काढण्यात आले. सामनेवालेनी सादर केलेल्या हमीपत्राप्रमाणे वापरण्यात आलेला रंग हा उडणार नाही, गळून जाणार नाही, कमी होणार नाही यासाठी किमान 5 वर्षाची हमी दिली होती, परंतु सामनेवालेनी केलेल्या कमी दर्जाच्या कामामुळे प्रचंड प्रमाणात गळती दिसून येत आहे व सोसायटीच्या इमारतीला त्यामुळे इजा पोचत आहे. सामनेवालेनी याबाबत अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचा आरोप सोसायटीने केला आहे. त्यामुळे तक्रारदारानी सामनेवालेना दि.8-12-08 रोजी कायदेशीर नोटीस बजावली आहे. त्या नोटीसची पोचपावती सदर तक्रारीसोबत जोडली आहे. त्या नोटीसीला सामनेवालेनी त्यांच्या वकीलांमार्फत उत्तर दिले असून त्यात इमारतीच्या बाहेरील भिंतीला काळे मोठे डाग पडण्याचे कारण म्हणजे प्लॅस्टरिंग करताना योग्य प्रतीचे सिमेंट वापरलेले नाही हे आहे. ही बाब तक्रारदारानी अमान्य केली आहे व त्यामुळे मंचात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी मंचाला खालीलप्रमाणे विनंती केली आहे- 1. सामनवालेनी त्यांच्या सेवेमध्ये कसूर केली असून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे जाहीर करावे. 2. सामनेवालेनी तक्रारदाराना मानसिक त्रासापोटी रु.चार लाख दयावेत. 3. सामनेवालेनी त्यांचे काम व्यवस्थित व योग्यरित्या गुणवत्तेने पुन्हा दुरुस्त करुन दयावे. 4. न्यायिक खर्चापोटी सामनेवालेनी रु.50,000/- दयावेत. 2. नि.1 अन्वये तक्रारदारानी तक्रारअर्ज दाखल केला असून नि.2 अन्वये प्रतिज्ञापत्र दिले आहे. नि.3 अन्वये श्रीमती पिंजारी यांचे वकीलपत्र दाखल केले असून नि.4 अन्वये अनेक कागदपत्र दाखल केली असून इमारतीचे काढलेले फोटोही जोडलेले आहेत. सामनेवालेना नि.5 अन्वये नोटीस काढण्यात आली असून नि.7 वर त्याच्या पोचपावत्या दाखल आहेत. योग्य ती संधी देऊनही सामनेवाले मंचापुढे आले नाहीत त्यामुळे दि.2-3-09 रोजी मंचाने त्यांचेविरुध्द एकतर्फा चौकशीचा आदेश पारित केला. दि.4-3-09 रोजी एकतर्फा सुनावणी झाली त्यावेळी तक्रारदारातर्फे वकील व तक्रारदार हजर होते. त्यांचा युक्तीवाद ऐकण्यात आले व तक्रारीची सुनावणी अंतिम आदेशासाठी स्थगित ठेवण्यात आली. 3. योग्य ती संधी देऊनही सामनेवाले सातत्याने गैरहजर राहिले. त्यामुळे दि.2-8-09 रोजी त्यांचेविरुध्द एकतर्फा चौकशीचा आदेश पारित करण्यात आला. दि.4-3-09 रोजी तक्रारदाराच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकण्यात आला व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करुन तक्रारीच्या निराकरणार्थ प्रामुख्याने खालील मुद्दयांचा मंचाने विचार केला. मुद्दा क्र.1 – सामनेवालेकडून तक्रारदारांना दोषपूर्ण सेवा दिली गेली आहे काय? उत्तर - होय. मुद्दा क्र.2 – तक्रारदारानी विनंती केल्याप्रमाणे त्यांना नुकसानभरपाई मंजूर करता येईल काय? उत्तर - अंतिम आदेशात नमूद केल्याप्रमाणे. विवेचन मुद्दा क्र. 1 – 4. सामनेवालेनी केलेले रंगकाम तसेच इमारतीला पडलेल्या भेगा बुजविण्याचे काम व्यवस्थित केलेले नाही हे सदरच्या फोटोवरुन स्पष्टपणे दिसून येत आहे. हे काम करण्यापूर्वी सामनेवालेनी तक्रारदाराना त्यांनी केलेले रंगकाम जून 07 पासून पुढे पाच वर्षे उत्तमप्रकारे राहील, रंग फिका पडणार नाही, किंवा तो उतरुनही जाणार नाही याची हमी दिली होती. त्या दोघांत ठरल्याप्रमाणे तक्रारदारानी सामनेवालेना कामाचा पुरेपूर मोबदला दिला होता व त्याच्या पोचपावत्या अभिलेखात दाखल आहेत. तक्रारदाराच्या वकीलांनी ही बाब कबूल केली असून तक्रारदाराकडून सामनेवालेना सदर कामापोटी रु.13,35,000/- पोच असल्याचे म्हटले आहे. सदर पत्रामध्ये रंगकाम व इमारतीच्या भेगा व्यवस्थित भरल्या न गेल्याचे कारण हे आधीच्या प्लॅस्टरच्या वेळी वापरण्यात आलेला माल कमी गुणवत्तेचा असल्यामुळे काळे डाग पडले आहेत हे त्यांचे नोटीसीला दिलेल्या उत्तरातील म्हणणे मंचाला संयुक्तीक वाटत नाही. त्याचा खराब झालेला भाग पुन्हा दुरुस्त करुन, व्यवस्थित रंगवून दयावा. तसेच त्यांना योग्य संधी देऊनही त्यांनी मंचापुढे येऊन आपली बाजू मांडलेली नाही यावरुन त्यांनी तक्रारदारास दिलेली सेवा ही दोषपूर्ण असल्याचे मंचाचे मत आहे. सबब या मुद्दयाचे उत्तर होय असे आहे. विवेचन मुद्दा क्र.2 – 5. तक्रारदारानी सामनेवालेना एकूण रक्कम रु.13,35,000/- इतकी कामापोटी अदा केली आहे. सामनेवालेनी पाच वर्षाची हमी देऊनही त्यांनी केलेले रंगकाम पहिल्याच पावसाळयात उतरुन आले. इमारतीला बाहेरच्या बाजूने काळे मोठे डाग पडले म्हणजे या सर्व कामाचा हेतू फुकट गेल्याचे सिध्द होते. यापोटी त्यांनी मागितलेली रु.4,00,000/-ची शारिरीक व मानसिक त्रासापोटीची नुकसानभरपाई ही योग्य असल्याचे मंचाचे मत आहे. कारण तक्रारदार ही सोसायटी आहे. सोसायटीतील सर्व सभासदांनी एकत्रित वर्गणी काढून मेंटेनन्ससारख्या बाबी करण्याचे ठरविले होते व त्याप्रमाणे रकमा गोळा केल्या होत्या. रु.13 लाख ते साडेतेरा लाखासारखी रक्कम सामनेवालेस मिळूनही त्याचेकडून योग्य काम झाल्याचे दिसून येत नाही. तक्रारदारानी ही जी नुकसानी मागितली आहे ती झालेल्या खर्चाच्या 25 टक्के इतकी मागितलेली दिसते. त्यामुळे ती योग्य असल्याचे मंचाचे मत आहे. याठिकाणी ही नुकसानभरपाई सोसायटीस म्हणजे अर्जदारास देण्याची आहे. सोसायटी ही त्याचे सभासदांमार्फत चालविली जाते त्यामुळे सभासदांना जो शारिरीक, मानसिक त्रास झाला त्यामुळे ती दयावी असेही मंचाचे मत आहे. तसेच न्यायिक खर्चापोटी तक्रारदारानी रु.50,000/-ची मागणी केली आहे ती रक्कम अवाजवी असल्याचे मंचाचे मत आहे. त्यामुळे न्यायिक खर्चापोटी रु.5,000/- दयावेत असे मंचाचे मत आहे. 6. सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यात येतो- -ः अंतिम आदेश ः- आदेश पारित तारखेपासून 45 दिवसाच्या आतः- 1. सामनेवालेनी तक्रारदारास रु.4,00,000/- (रु.चार लाख मात्र) दयावेत. 2. न्यायिक खर्चापोटी रु.5,000/-(रु.पाच हजार मात्र) सामनेवालेनी तक्रारदारांस दयावेत. 3. इमारतीच्या ज्या भागाला काळे डाग पडले आहेत ते स्वखर्चाने व्यवस्थित रंगवून दयावेत. 4. वर कलम 1 मधील रक्कम विहीत मुदतीत तक्रारदाराना न दिल्यास ती रक्कम द.सा.द.शे. 8 टक्के दराने वसूल करण्याचा तसेच कलम 2 मधील रक्कम वसूल करण्याचा अधिकार तक्रारदारास राहील. 4. सदर आदेशाच्या सत्यप्रती सर्व पक्षकाराना पाठविण्यात याव्यात.
ठिकाण- रायगड-अलिबाग. दि. 9-3-2009. (बी.एम.कानिटकर) (आर.डी.म्हेत्रस) सदस्य अध्यक्ष रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.
......................Hon'ble Shri R.D.Mhetras ......................Shri B.M.Kanitkar | |