ः निकालपत्र ः- द्वारा- मा.सदस्या, सौ.ज्योती मांधळे. तक्रारदारांचे म्हणणे खालील प्रमाणे- सामनेवाले 2 यांना 12.5 या योजनेअंतर्गत शेतजमीनीच्या संपादनाच्या मोबदल्यात महाराष्ट्र शासनाने भूखंड दिला होता. सदरील भूखडाचे वर्णन प्लॉट क्र.बी-150,क्षेत्रफळ-136.65 चौ.मि.मौजे ,कोरपखैरणे, सेक्टर 19 ,नवी मुंबई, जिल्हा ठाणे, असा आहे. सिडकोने सामनेवाले 2 यांना वरील भूखंड 60 वर्षाच्या नोंदणीकृत भाडेपटयाने दिलेला आहे. सामनेवाले 2 यांनी सामनेवाले 1 यांच्या सोबत सदर भूखंड विकसन करण्यासाठी व त्यावर इमारत बांधण्यासाठी दिनांक 30.6.2001 रोजी विकसन करार केला. सामनेवाले 1 यांनी या भूंखंडावर तळ मजला अधिक 4 मजले अशी इमारत आर.सी.सी बांधकामाने बांधली जाईल असा करार केला. तक्रारदार यांनी सामनेवाले 1 यांच्याकडे ते बांधत असलेल्या मिनाक्षीधाम इमारतीतील जी इमारत प्लॉट क्रमांक 150 या भूंचखंडावर उभी असून तेथे सदनिका क्रमांक 201 दुसरा मजला, क्षेत्रफळ 544 चौ.फु.सुपर बिल्टअप ऐरिया खरेदी करण्याची तयारी दर्शविली सामनेवाले 1 यांनी सदर मिळकतीची किंमत रुपये 4,91,000/- एवढया किंमतीत विकण्याचे कबूल केले. तक्रारदाराने सामनेवाले 1 यांच्या सोबत दिनांक 31.7.2001 रोजी सदर दावा मिळकतीची नोंदणी केली. व नोंदणी करताना त्यांनी सामनेवाले 1 यांना बयाना रक्कम रुपये 2,91,000/- रोख स्वरुपात दिले. व दिनांक 3.8.02 रोजी दावा मिळकतीसबंधी साठेकरार करण्यात आला. व दिनांक 2-8-00 रोजी सदर साठेकरार नोंदणीकृत करण्यात आला व त्या साठेकरारातील अटी व शर्तीनूसार सदर दावा मिळकतीची खरेदी किंमत रुपये 2.50.000/- इतकी ठरली. परंतु दावा मिळकतीची खरी किंमत रुपये 4,91,000/- इतकीच ठरली होती. वरिल रकमांच्या सामनेवाले 1 यांनी रितसर पोचपावत्या दिलेल्या आहेत. संपूर्ण रक्कम रुपये 4,91,000/- व दिनांक 3.8.02 च्या करारानूसार ठरलेली रक्कम रुपये 2,50,000/- पूर्ण मिळाल्यानंतर सामनेवाले 1 यांनी तक्रारदारांना सदर सदनिकेचा ताबा घेण्यास सांगितले. फेबु्वारी 2004 मध्ये तक्रारदारांनी सदर सदनिकेचे परिक्षण केले असता. सदर सदनिकेमध्ये पाणी जोडणी, दारे खिडक्या जोडणी, आतील प्लॅस्टर इ. कामे झालेली नव्हती, तसेच सामनेवाले 1 यांना सदर इमारतीचे महानगरपालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र मिळाले नसल्याचे सामनेवाले 1 यांनी सांगितले. तेव्हा तक्रारदारांनी सामनेवाले 1 यांना सांगितले की, सदर सदनिकेमधील सर्व त्रूटींची पूर्तता करुन मगच मला सदनिकेचा परिपूर्ण ताबा दया, परंतु सामनेवाले 1 यांनी तक्रारदारास असे सागितले की, त्यांनी सर्वाना ताबा दिलेला आहे. तेव्हा तुम्हीही तात्पुरता ताबा घ्या, व सर्व त्रुटींची पुर्तता केल्यानंतर मी तुम्हाला लवकरच ताबा देईन व त्यानुसार 10.2.04 रोजी सामनेवाले 1 यांनी तक्रारदारांना सदनिकेचा तात्पुरता ताबा दिला व कुलपाची एक चावी तक्रारदारांना दिली व दुसरी चावी स्वत-कडे ठेवली. त्यानंतर अनेक वेळा तक्रारदार सामनेवाले 1 यांना सदर सदनिकेमधील त्रुटी दुर करण्याची आठवण करीत होते. परंतु सामनेवाले 1 त्यांना प्रतिसाद देत नव्हते. डिसेंबर 2007 मध्ये सामनेवाले 1 यांनी तक्रारदार यांच्याकडे रुपये 40,000/- ची इतक्या अतिरिक्त रक्कमेची मागणी केली. सदर सदनिकेमध्ये अनेक दोष असल्याने मुख्य म्हणजे पाणी पुरवठा नसल्याने, तसेच बाथरुमच्या दारे खिडक्या योग्य प्रकारे न बसविल्याने तक्रारदाराला तेथे रहाणे अश्यक्य होते. तेव्हा त्यांनी सामनेवाले 1 यांना सांगितले की, आधी तुम्ही सदनिकेचे काम पूर्ण करा तेव्हाच मी तुम्हाला अतिरिक्त रुपये 40,000/- देईल परंतु त्यांना काहीही प्रतिसाद दिला नाही. म्हणून तक्रारदारापे दिनांक 16.3.07 रोजी त्यांच्या विरुध्द त्यांच्या वकीलामार्फत नोटीस पाठविली. परंतु सामनेवाले 1 यांनी त्यांच्या नोटीसीला काही उत्तर दिले नाही. तक्रारदारचे म्हणणे असे की, सामनेवाले 1 व 2 यांच्यात विकसन करारावरून मतभेद झाल्यावर सामनेवाले 1 यांनी त्यांची वादग्रस्त सदनिका सामनेवाले 2 यांना न सांगताच परस्पर देण्याचे कबुल केले. असे तक्रारदारांना सामनेवाले 2 कडून कळले. म्हणून सामनेवाले 2 यांनी दिनांक 15.2.2009 ते 15.1.2010 या कालावधीसाठी वापर परवाना पत्राने श्री.तरुण बन्सल या व्यक्तीस त्यांची वादग्रस्त सदनिका भाडयाने रहाण्यास दिली व परस्पर सदरहू सदनिकेच्या इमारतीचे नाव मिनाश्रीधाम ऐवजी श्रीराम निवास असे बदलले सदर परवाना पत्रामध्ये दावा मिळकतीत श्रीराम निवास अशी दाखविण्यात आली आहे. व सदरील इमारतीचा भूखंड क्रमांक बी 150 असा दाखविलेला आहे. तक्रारदराच्या म्हणण्यानूसार बी 150 या भूखंडावर मिनाक्षी धाम या इमारतीखेरीज इतर कोणतीही इमारत उभी नाही. तक्रारदारांनी सामनेवाले 1 यांच्याशी संपर्क साधला त्यावर त्यांचे असे म्हणणे झाले की, सामनेवाले 1 यांनी जबरदस्तीने सदनिकेचा ताबा घेतला आहे. ते सामनेवाले 2 यांच्याशी तडजोड करुन सदर सदनिकेचा ताबा लगेच घेतील परंतु त्यासाठी तक्रारदारांनी त्यांनी रुपये 40,000/- अतिरिक्त रक्कम दयावी. सामनेवाले 1 यांनी त्यांना ताबा देण्यास नकार दिल्याने त्यांचे अतोनात नुकसान झाले. त्यांनी सामनेवाले 1 सोबत साठेकरार केलल्या सदनिकेची किंमत सध्याच्या बाजारभावाने रुपये 16,00,000/- झालेली आहे. सामनेवाले 1 यांनी जर त्यांना ताबा दिला नाही तर आताच्या बाजारभावानुसार रुपये 16,00,000/- त्यांना मिळावे त्यांना ताबा न मिळाल्यामुळे त्यांना त्यांच्या मुलासाठी शाळेमध्ये घेतलेला प्रवेश रदद करावा लागला. त्यांना आर्थिक, मानसिक व शारीरीक त्रास झाला त्याबददल त्यांना नुकसान भरपाई रक्कम रुपये 3,00,000/- मिळावी असे तक्रारदारचे म्हणणे आहे. त्यांना सदनिका क्रमांक 201 चा ताबा मिळावा, सदर सदनिकेबाबत झालेला साठेकरार अस्तीत्वात असून सदरचा साठेकरार सामनेवाले यांच्यावर बंधनकारक आहे असे जाहीर करावे तसेच काही कारणास्तव सामनेवाले यांना ताबा देणे शक्य झाले नाही तर सामनेवाले यांनी त्यांना रक्क्म रुपये 16,00,000/- नुकसान भरपाईचा मोबदला देण्याचा आदेश पारीत करावा तसेच त्यांना झालेल्या आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रासाबाबत रुपये 3.00.000/- तसेच त्यांना सामनेवालेंकडून तक्रारीचा खर्चही मिळणेबाबत मंचाने आदेश करावा. तक्रारदारानी आपल्या तक्रारअर्जात नि. 2 अन्वये प्रतिज्ञापत्र दाखल केले. नि. 3 अन्वये कागदपत्रांची यादी दाखल केली आहे. त्यात मुख्यतः तक्रारदारांनी सामनेवाले 1 यांना रुपये 2,91,000/- दिल्याची नोंदी रक्कमेची रु.100 च्या स्टम्पपेपरवर पोचपावती, दिनांक 3.8.02 रोजीचे नोदणीकृत साठेकरार, तक्रारदरानी सामनेवाले 1 यांना सदनिकेच्या खेरदी किंमतीच्या दिलेल्या रकमेच्या सामनेवाले 1 यांनी दिलेल्या पोचपावत्या, दिनांक 26.12.02 रोजी सामनेवाले यांना रुपये 50,000/- रोख स्वरुपात दिल्यावर सामनेवाले 1 यांनी यांनी त्याबददल दिलेली पावती, बॅक स्टेटमेंट, विजबिले, दि. 10.2.04 रोजी सामनेवाले 1 यांनी तक्रारदारांना दिलेले तात्पुरते ताबा पत्र, नोटीस, सामनेवाले 2 यांनी त्यांची सदनिका श्री.तरुण बन्सल यांना भाडयाने दिल्यावर केलेली लिव्ह अँड लायसन इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. नि. 5 अन्वये सामनेवाले 1 व 2 यांना नोटीस पाठवून त्यांना आपला लेखी जबाब सादर करण्याचे निर्देश दिले नि. 8 अन्वये सामनेवाले 2 यांनी आपला लेखी जबाब प्रतिज्ञापत्रासोबत दाखल केला. सामनेवाले 2 हे आपल्या लेखी जबाबात म्हणतात की, तक्रारदारानी दाखल केलेली तक्रार त्यांना अमान्य आहे. त्यांना याबाबत काही माहिती नाही. तक्रारदारांनी दाखल केलेले दस्तऐवज खोटे आहेत. ते पुढे म्हणतात की, 'मीनाक्षीधाम' व 'श्रीराम निवास' या इमारती वेगळया आहेत. हे म्हणणे खरे नाही की, त्यांनी वादग्रस्त सदनिका त्यांच्या ताब्यात जबरदस्तीने दिल्या आहेत. तक्रारदारानी दाखल केलेली तक्रार ही दिवाणी स्वरुपाची असल्यामुळे व त्यांच्यामध्ये दाखल केलेल्या दस्तऐवजाची सखोल चौकशी करावयास हवी होती. तक्रारदारानी आपल्या तक्रारअर्जात तरुण बन्सल यांना पक्षकार केलेले नाही व सदर तक्रारीत तक्रारदारानी तक्रार दाखल करण्याबाबत काही कारण नाही. तक्रारदारानी सदरची तक्रार मुदतीत दाखल केली नसल्यामुळे खारीज करावी असे सामनेवाले 2 चे कथन आहे. नि.10 अन्वये सामनेवाले 1 ने आपला लेखी जबाब दखल केला व सोबत प्रतिज्ञापत्रही दिले. सामनेवाले 1 आपल्या लेखी जबाबात पुढे म्हणतात की, त्यांनी सामनेवाले 1 कडून प्लॉट नं.बी-150 ज्याचे क्षेत्र 136.65 चौ.मी. आहे जे सेक्टर 19 कोपरखैरणे येथे आहे. हे भूखंड त्यांनी सामनेवाले 2 कडून 30-6-01 रोजी विकसन करारानुसार ताब्यात घेतले आहेत. विकसन करारानुसार सदरचा भूखंड विकसित करणार आहेत. त्यांनी मीनाक्षीधाम ही इमारत सदर भूखंडावर बांधली आहे. तक्रारदारानी सखोल चौकशी करुन त्यांच्या इमारतीमध्ये सदनिका खरेदी करण्याचे ठरवले त्यानुसार दि.3-8-02 रोजी करारनामा करण्यात आला. करारनामा करताना तक्रारदारानी सामनेवाले 1 ला रु.50,000/- दिले आहेत. सदरच्या सदनिकेची किंमत रु.2,50,000/- ठरवण्यात आली होती. तक्रारदारानी सामनेवालेना खालीलप्रमाणे रकमा अदा केल्या आहेत- अ.क्र. | तारीख | रक्कम रु. | 1. | 3-8-02 | 50,000/- रोखीने. | 2. | 26-12-02 | 50,000/- रोखीने | 3. | 30-12-02 | 25,000/- रोखीने. | 4. | 26-4-03 | 30,000/- चेकने. |
अशा स्वरुपात तक्रारदारानी त्यांना एकूण रु.2,10,000/- दिले आहेत. उर्वरित रक्कम रु.40,000/- त्याच्याकडून येणे बाकी आहे. तरीसुध्दा त्यांनी तक्रारदारास सदनिकेचा ताबा दिला आहे. त्यानुसार तक्रारदारानी ताबा पावतीवर सही केली आहे. त्यांनी तक्रारदाराकडून सदनिकेच्या उर्वरित रकमेची बांधणी केली परंतु तक्रारदारास सदर रक्कम भरावयाची नव्हती म्हणून त्यांनी खोटी भांडणे सुरु केली. सध्या तक्रारदारांच्या ताब्यात सदरची सदनिका आहे. तक्रारदारानी सामनेवाले 2 शी संगनमत करुन तरुण बन्सल यांचे नावे वापर परवाना तयार केला आहे. तक्रारदाराना उर्वरित रक्कम भरावयाची नाही म्हणून त्यांनी सदर तक्रार मंचाकडे दाखल केली आहे. त्यांनी तक्रारदारास सदर सदनिकेमध्ये सर्व सोयीसुविधा पुरवल्या आहेत. आता त्यांचे कोणतेही काम बाकी नाही. दि.10-2-04 रोजी त्यांनी तक्रारदारास सदनिकेचा ताबा दिला आहे. तक्रारदारानी दाखल केलेली तक्रार खोटी असल्यामुळे ती फेटाळावी असे सामनेवाले 1 चे म्हणणे आहे. नि.13 अन्वये सामनेवाले 1 ने लेखी युक्तीवाद दाखल केला आहे. दि.14-2-11 रोजी सदरची तक्रार अंतिम सुनावणीसाठी आली असता तक्रारदार व त्यांचे वकील हजर होते. सामनेवाले 1 चे वकीलांनी त्या दिवशी लेखी युक्तीवाद मंचाकडे दाखल केला आहे. तक्रारदाराच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकण्यात आला व सदरचे प्रकरण अंतिम निकालासाठी ठेवण्यात आले. तक्रारदारानी दाखल केलेली तक्रार, प्रतिज्ञापत्र, दस्तऐवज तसेच सामनेवाले 1,2 ने दिलेले लेखी जबाब, दस्तऐवज, प्रतिज्ञापत्र, तोंडी व लेखी युक्तीवाद यांचा विचार करुन मंचाने खालील मुद्दयांचा विचार केला- मुद्दा क्र.1- सामनेवाले 1 हे तक्रारदाराना दिलेल्या दोषपूर्ण सेवेसाठी जबाबदार आहेत काय? उत्तर - होय. मुद्दा क्र.2- सामनेवाले 2 हे तक्रारदाराना दिलेल्या दोषपूर्ण सेवेसाठी जबाबदार आहेत काय? उत्तर - होय. मुद्दा क्र.3- तक्रारदार सामनेवाले 1 यांच्याकडून ताबा मिळण्यास पात्र आहेत काय? उत्तर - होय. मुद्दा क्र.4- तक्रारदार सामनेवाले 1,2 कडून नुकसानभरपाई तसेच न्यायिक खर्च मिळण्यास पात्र आहेत काय? उत्तर - होय. विवेचन मुद्दा क्र.1- या मुद्दयाबाबत मंचाचे निदर्शनास असे येते की, तक्रारदारानी सामनेवाले 1 यांच्याकडे ते विकसित करत असलेल्या मीनाक्षीधाम इमारतीत सदनिका बुक केली. त्याबाबत त्यांनी दि.3-8-02 रोजी करारनामा केला. करारनाम्यानुसार त्यांनी सदनिका क्र.201 दुसरा मजला. 545 चौ.फुट सुपर बिल्टअप रु.2,50,000/- साठी बुक केल्या. सामनेवाले 2 यांना त्यांच्या मिळकतीच्या मोबदल्यात महाराष्ट्र शासन सिडकोतर्फे 12.5 टक्के योजनेअंतर्गत प्रकल्पग्रस्त या नात्याने सदर भूखंड दिला आहे. सामनेवाले 2 यांनी सदरील भूखंड विकसन करुन इमारत बांधणेचे ठरवले, त्यासाठी त्यांनी दि.30-7-01 रोजी सामनेवाले 1 यांचेसोबत विकसन करार केला. सदर विकसन करारानुसार सामनेवाले 1 यांनी भूखंड क्र.बी’150, सेक्टर 19, क्षेत्र, 136.65 चौ.मी.कौ.कोपरखैरणे, नवी मुंबई जि.ठाणे या भूखंडावर मीनाक्षीधाम इमारत बांधणेचे ठरवले. तक्रारदारानी या इमारतीमध्ये सदनिका क्र.201 सामनेवाले 1 यांचेसोबत करारनामा केला. दि.7-8-02 रोजी सदरचा करारनामा नोंदणीकृत करण्यात आला. करारनामा करताना तक्रारदारानी सामनेवाले 1 यांना रु.50,000/- रोख दिले. याची पावती करारनाम्याच्या पान 16 वर आहे. तक्रारदारांनी सामनेवाले 1 यांना खालीलप्रमाणे रकमा दिल्याचे दिसते. अ.क्र. | दिनांक | रक्कम रु. | नि.क्र. | 1. | 31-7-02रोखीने | 2,19,000/- | 3/1 | 2. | 3-8-02रोखीने | 50,000/- | 3/2 | 3. | 23-4-03रोखीने | 40,000/- | 3/3 | 4. | 23-4-03रोखीने | 30,000/- | 3/4 | 5. | 23-4-03रोखीने | 30,000/- | 3/5 | 6. | 26-12-02 रोखीने | 50,000/- | 3/6 | 7. | -- | 25,000/- | 3/7 | 8. | 30-12-02चेकने | 25,000/- | 3/8 | 9. | 24-4-03 चेकने | 30,000/- | 3/9 | 10. | 23-4-03 चेकने | 30,000/- | 3/10 |
याप्रमाणे तक्रारदारानी सामनेवाले 1 यांना रु.6,01,000/- दिल्याचे कागदपत्रावरुन दिसून येते. दि.10-2-04 रोजी नि.3/17 अन्वये दाखल केलेंल्या दस्तऐवजावरुन असे दिसते की, सामनेवाले 1 यांनी तक्रारदाराना तात्पुरता ताबा दिला आहे. सदरच्या ताबा पावतीत तक्रारदारानी त्यांच्या सदनिकेमध्ये फर्निचरचे काम करण्याचे असल्यामुळे त्यानी सामनेवाले 1 यांच्याकडून सदनिकेचा ताबा घेतला होता असे नमूद करण्यात आले आहे. असे असताना सामनेवाले 2 यानी तरुण बन्सल बरोबर लीव्ह अँड लायसेन्स करार करुन त्याला दि.15-2-09 ते 15-1-10 या कालावधीसाठी भाडे करारावर दिला. तक्रारदारानी सामनेवालेला करारनाम्यात नमूद केलेल्या रकमेपैकी जास्त रक्कम देऊनही सदनिकेचा अधिकृत ताबा दिलेला नाही ही सामनेवाले 1 यांनी तक्रारदाराना दिलेली दोषपूर्ण सेवा आहे असे मंचाचे मत आहे. विवेचन मुद्दा क्र.2- या मुद्दयाबाबत मंचाचे असे निदर्शनास येते की, सामनेवाले 2 यांना त्याच्या मिळकतीच्या मोबदल्यात महाराष्ट्र शासन सिडकोतर्फे 12.5 टक्के योजनेअंतर्गत प्रकल्पग्रस्त या नात्याने भूखंड दिला आहे. सदर भूखंडावर इमारत बांधणेसाठी व विकसित करणेसाठी विकसनकरारानंतर सदर मिळकतीचे बांधकाम फक्त सामनेवाले 1 ने करण्याचे होते. त्या इमारतीतील सदनिका विकणेसाठी त्यांनी सदनिका क्र.201 चा व्यवहार तक्रारदाराशी केला म्हणणे तक्रारदारानी सामनेवाले 1 यांचेसोबत करारनामा केला. सदरचा व्यवहार हा फक्त तक्रारदार व सामनेवाले 1 यांचेशी निगडीत आहे व त्यामुळे सामनेवाले 2 यानी वादग्रस्त सदनिकेचा व्यवहार इतर व्यक्तीबरोबर करणे हे योग्य नाही. सामनेवाले 2 यानी वादग्रस्त सदनिकेचा व्यवहार तरुण बन्सल सोबत लीव्ह अँड लायसेन्स करार केला. तक्रारदारानी सामनेवाले 1 यांचेशी व्यवहार केला असल्यामुळे सामनेवाले 2 यांना या व्यवहारात दखल घेण्याची काही गरज नव्हती. त्यांनी वादग्रस्त सदनिका लीव्ह अँड लायसेन्सचे करारावर दिली ही सामनेवाले 2 चे सेवतील त्रुटी आहे. विवेचन मुद्दा क्र.3- सदर मुद्दयाबाबत मंचाचे मत असे की, तक्रारदारानी सामनेवाले 1 यांचेकडे दि.3-8-02 रोजी करारनामा केला. व त्यानुसार सामनेवाले 1 तक्रारदारांना त्यांनी नोंदणी केलेला सदनिका क्र.201 दुसरा मजला, क्षेत्र.544 चौ.फूट सुपर बिल्टअप एरिया हा खरेदी केला. सदरचा करारनामा दि.7-8-02 रोजी नोंदणीकृत करणेत आला आहे. नोंदणीकृत केलेल्या करारनाम्यात सदनिकेची खरेदीची रक्कम रु.2,50,000/- ठरली होती, तक्रारदाराने सामनेवाले 1 यांना करारनाम्यात ठरलेल्या रकमेपेक्षा जादा रक्कम देऊनही सामनेवाले 1 ने त्यांना ताबा दिला नाही. त्यामुळे ते सामनेवाले 1 कडून ताबा मिळण्यास पात्र आहेत. सामनेवाले 1 यांनी तक्रारदारांना दि.10-2-04 रोजी तात्पुरता ताबा दिला होता. नंतर सामनेवाले 2 ने त्यांची सदनिका तिस-या व्यक्तीला भाडयाने दिली होती त्यामुळे तक्रारदारांकडे आता त्यांच्या घराचा ताबा नाही. सामनेवाले 1 यानी तक्रारदारांना आदेश पारित तारखेचे 45 दिवसाचे आत सामनेवाले 1 बांधत असलेल्या मीनाक्षीधाम इमारतीतील सदनिका क्र.201, दुसरा मजला याचा अधिकृत ताबा दयावा. तसेच ताबापावती करुन दयावी. करारनाम्यात ठरल्यानुसार सगळया सोयीसुविधांसह सामनेवाले 1 ने तक्रारदारांना त्यांच्या सदनिकेचा ताबा दयावा असे मंचाचे मत आहे किंवा सदर सदनिकेची आज बाजारभावाने संपूर्ण रक्कम दयावी. तक्रारदारानी सदर सदनिकेची आजच्या बाजारभावाने रु.16,00,000/-ची मागणी केली आहे, ती योग्य आहे असे मंचाचे मत आहे. सबब तक्रारदार सदर सदनिकेची नुकसानभरपाई रक्कम रु.16,00,000/- मिळणेस पात्र आहे. विवेचन मुद्दा क्र.4 – या मुद्दयाबाबत मंचाचे असे मत आहे की, तक्रारदारांनी सामनेवाले 1 सोबत दि.3-8-02 रोजी करारनामा केला. सन 2002 मध्ये करारनामा करुनही अजूनपर्यंत सामनेवालेनी त्यांना त्यांच्या सदनिकेचा ताबा दिला नाही. त्यांना त्यांच्या घरात रहाण्यापासून वंचित करण्यात आले. त्यांना त्यांच्या पाल्याच्या शाळेचा प्रवेश रद्द करावा लागला. याचा त्यांना आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रास होणे अपरिहार्य आहे. त्यामुळे ते सामनेवाले 1 कडून मानसिक त्रासापोटी रु.25,000/- मिळणेस पात्र आहेत, तसेच सामनेवाले 2 यांनी त्यांचा या व्यवहाराशी काहीही संबंध नसताना तक्रारदारांची सदनिका तिस-या व्यक्तीला भाडयाने दिली याचाही तक्रारदारांना मानसिक त्रास होणे अपरिहार्य आहे. सबब तक्रारदार सामनेवाले 2 कडून मानसिक त्रासापोटी रु.5,000/- मिळणेस पात्र आहेत, तसेच तक्रारदाराना सामनेवाले 1 यांना नोटीस पाठवावी लागली व या मंचाकडे तक्रार दयावी लागली त्यासाठी ते सामनेवाले 1,2 कडून वैयक्तिक व संयुक्तीकरित्या न्यायिक खर्चापोटी रु.5,000/- मिळणेस पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यात येतो- -ः आदेश ः- आदेश पारित तारखेच्या 45 दिवसाचे आत सामनेवाले 1 यांनी तक्रारदारांना त्यांच्या सदनिकेचा सगळया सोयीसुविधांसह अधिकृत ताबा दयावा. किंवा आदेश पारित तारखेच्या 45 दिवसाचे आत सामनेवाले 1 यांनी तक्रारदारांना सदनिकेच्या नुकसानभरपाईची रक्कम रु.16,00,000/- दयावी. 1. सामनेवाले 1 व 2 यानी आदेश पारित तारखेच्या 45 दिवसाच्या आत तक्रारदारांना खालीलप्रमाणे रकमा दयाव्यात अ) सामनेवाले 1 यांनी नुकसानभरपाईपोटी रु.25,000/- दयावेत. ब) सामनेवाले 2 यांनी नुकसानभरपाईपोटी रक्कम रु.5,000/- दयावेत. क) न्यायिक खर्चापोटी रक्कम रु.5,000/- दयावी. 2. सदर आदेशाचे पालन सामनेवाले 1 व 2 यांनी न केल्यास तक्रारदार उपरोक्त सर्व रकमा सामनेवाले 1 व 2 कडून आदेश पारित तारखेपासून ते प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.10 टक्के व्याजाने वसूल करण्यास तक्रारदार पात्र रहातील. 3. सदर आदेशाच्या सत्यप्रती सर्व पक्षकारांना पाठवणेत याव्यात. दि.5-3-2011. ठिकाण- कोकणभवन, नवी मुंबई. (ज्योती अभय मांधळे) (आर.डी.म्हेत्रस) सदस्या अध्यक्ष अति.ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नवी मुंबई.
| Hon'ble Mrs.Jyoti A.Mandhle, MEMBER | Hon'ble Mr. R. D. Mhetras, PRESIDENT | , | |