(घोषित दि. 28.12.2011 व्दारा श्री.डी.एस.देशमुख,अध्यक्ष)
गैरअर्जदारांनी सदोष बियाणे विक्री केल्याच्या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
थोडक्यात तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, त्याने गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडून गैरअर्जदार क्रमांक 2 पंचगंगा सिड्स प्रा.लि. यांनी उत्पादीत केलेले तुरीचे बियाणे खरेदी करुन स्वत: च्या शेतात पेरले होते. त्याने पिकाची योग्य काळजी घेऊन पिकांना आवश्यक खते दिली आणि पिकावर किटक नाशकांची फवारणी केली आणि त्यामुळे त्याच्या शेतातील तुरीच्या पिकाची वाढ चांगली झाली. परंतू तुरीच्या झाडाला अनेकवेळा फुले येऊन ती गळाली. सदर बाब त्याने गैरअर्जदारांचे निदर्शनास आणली असता गैरअर्जदारांनी त्यास औषध फवारणी करण्यास व खत देण्यास सांगितले व त्यानुसार त्याने पिकाला आवश्यक खते दिली व औषधांची फवारणी केली. परंतू त्याचा उपयोग झाला नाही व तुरीच्या झाडाला लागलेली फुले टिकली नाही व त्यामुळे झाडाला शेंगा लागल्या नाही. सदर बाब बियाण्या मध्ये दोष असल्यामुळेच घडत असल्यामुळे त्याने कृषी अधिकारी पंचायत समिती भोकरदन यांच्याकडे तक्रार दिली. त्यावरुन संबंधित कृषी अधिका-याने त्याच्या शेतातील पिकाची पाहणी केली आणि त्याने कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद जालना यांच्याकडे अहवाल पाठविला. त्या अहवालावरुन कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद जालना यांनी दिनांक 22.12.2010 रोजी त्याच्या शेताला प्रत्यक्ष भेट दिली आणि त्यांनी पंचनाम्यामध्ये सदोष बियाण्यामुळे त्याचे नुकसान झाल्याचे नमूद केले. गैरअर्जदारांनी सदोष बियाणे विक्री केल्यामुळे त्याचे नुकसान झाले म्हणून त्याने अशी मागणी केली आहे की, त्यास गैरअर्जदारांकडून रुपये 2,47,000/- नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावेत.
गैरअर्जदार क्रमांक 1 यांना पुरेशी संधी देवूनही त्यांनी लेखी निवेदन दाखल केले नाही. म्हणून त्यांच्या विरुध्द हि तक्रार लेखी निवेदनाविना चालविण्यात आली.
गैरअर्जदार क्रमांक 2 पंचगंगा सिड्स यांनी लेखी निवेदन दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, त्यांनी तक्रारदारास विक्री केलेले बियाणे उच्च प्रतीचे होते. त्या बियाण्यामध्ये कोणताही दोष नसून तक्रारदाराच्या शेतातील तुरीच्या पिकाची वाढ चांगली झाली होती आणि तक्रारदाराला तुरीचे उत्पन्न देखील मिळालेले आहे. तक्रारदाराने दाखल केलेल्या कृषी विकास अधिका-याच्या अहवालामध्ये गैरअर्जदारांनी उत्पादीत केलेले बियाणे सदोष असल्याचा उल्लेख नाही. तक्रारदाराच्या शेतातील तुरीच्या झाडाला लागलेली फुले करपलेली होती असे अहवालात नमूद केलेले आहे. तुरीच्या झाडाची फुले हवामानामुळे किंवा रोगामुळे करपू शकतात. त्यामध्ये बियाण्याचा कोणताही दोष असू शकत नाही. तक्रारदाराला विक्री केलेले बियाणे मुळीच सदोष नव्हते. म्हणून ही तक्रार फेटाळावी अशी मागणी गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी केली आहे.
दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात
मुद्दे उत्तर
1.गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी उत्पादीत केलेले
तुरीचे बियाणे सदोष आहे काय ? नाही
2.आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे
कारणे
मुद्दा क्रमांक 1 – दोन्ही पक्षातर्फे युक्तीवाद करण्यात आला. तक्रारदाराच्या वतीने अड.व्ही.जी.चिटणीस आणि गैरअर्जदार क्रमांक 2 च्या वतीने अड.ओ.एस.तिपोळे यांनी युक्तीवाद केला.
तक्रारदाराने गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी उत्पादीत केलेले तुरीचे बियाणे त्याच्या शेतात पेरले होते या विषयी वाद नाही. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार त्याच्या शेतात पेरलेल्या तुरीच्या पिकाची वाढ चांगली झाली. परंतू तुरीच्या पिकाला लागलेली फुले गळाल्यामुळे पिकाला शेंगा लागल्या नाही. तक्रारदाराचे म्हणणे असे आहे की, गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी उत्पादीत केलेले तुरीचे बियाणे सदोष असल्यामुळेच त्याच्या शेतातील पिकाला लागलेली फुले गळाली.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी उत्पादीत केलेले तुरीचे बियाणे सदोष असल्याचे सिध्द् करण्यासाठी तक्रारदाराने कृषी अधिकारी पंचायत समिती भोकरदन यांनी दिनांक 17.01.2011 रोजी केलेला पंचनामा (नि.3/2) दाखल केला आहे. सदर पंचनामा पाहता असे दिसुन येते की, कृषी अधिका-याने तक्रारदाराच्या शेतात पेरलेल्या बियाण्यामध्ये दोष असल्याबाबत कोणतेही निरीक्षण नोंदविलेले नाही. कृषी अधिका-याने तक्रारदाराच्या शेतातील तुरीच्या झाडावर भरपूर प्रमाणात पाला असुन वरील टोकाला फुले येत असुन ती गळून जातात असे नमूद केले आहे. परंतू तुरीच्या झाडावरील फुले कशामुळे गळून जातात याचा काहीही खुलासा कृषी अधिका-याने पंचनाम्यामध्ये केलेला नाही. वास्तविक बियाणे जर सदोष असते तर बियाण्याची उगवण योग्य प्रमाणात झाली नसती. परंतू तक्रारदाराच्या शेतात पेरलेल्या तुरीच्या बियाण्याची उगवन चांगली झाली होती व पिकाची वाढ देखील चांगली होती. तुरीच्या झाडावर लागलेली फुले जमिनीत ओलावा नसल्यामुळे गळू शकतात. बियाण्यातील दोष हे तुरीच्या झाडावरील फुले गळण्याचे कारण असू शकत नाही. तक्रारदाराने दाखल केलेल्या पुराव्यावरुन गैरअर्जदार क्रमांक 2 ने उत्पादीत केलेले तुरीचे बियाणे सदोष असल्याचे सिध्द् होत नाही. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले.
म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते.
- तक्रारीचा खर्च संबंधितांनी आपापला सोसावा.
- संबंधितांना आदेश कळविण्यात यावा.