(घोषित दि. 21.06.2014 व्दारा श्रीमती. नीलिमा संत, अध्यक्ष)
प्रस्तुत तक्रार तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत सेवेतील कमतरतेसाठी केलेली आहे. तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार हे जालना येथील रहिवासी असून व्यापार करतात व्यवसाय निमित्त बाहेरगावी जाण्या येण्यासाठी तक्रारदारांनी गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडून टाटा कंपनीने उत्पादित केलेली टाटा इंडिका व्ही 2 एलएस ही गाडी दिनांक 27.07.2011 रोजी खरेदी केली. तिचा नोंदणी क्रमांक एम.एच.21 व्ही 4033 असा आहे. गाडी घेण्यासाठी तक्रारदार यांनी टाटा फायनान्स कंपनीकडून अर्थ सहाय्यही घेतले आहे.
तक्रारदार यांनी गाडी घेतल्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडून विनामूल्य असलेल्या सर्व फ्री सर्विसिंग करुन घेतल्या तसेच त्यानंतर शोरुमच्या नियमानुसार देय असलेले सर्विसिंगचे पैसे देवूनही वेळोवेळी सर्विसिंग करुन घेतली आहे. तक्रारदारांनी खरेदी केलेल्या वाहनाची वॉरंटी अद्याप अस्तित्वात आहे. वॉरंटी कालावधी संपण्यापूर्वीच तक्रारदारांनी खरेदी केलेल्या गाडीत बिघाड झालेला आहे. त्याबाबत वेळोवेळी गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडे तक्रार करुनही गैरअर्जदार यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
तक्रारदारांनी शेवटी दिनांक 17.08.2013 रोजी गाडी गैरअर्जदार यांचेकडे दुरुस्तीला टाकली व शॉकअप् खराब झाले आहेत. इंजिनात बिघाड आहे, इंजिन हेड लीक आहे अशा बाबी त्यांच्या निदर्शनास आणल्या तेंव्हापासून तक्रार दाखल करेपर्यंत गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी गाडी दुरुस्त करुन दिली नाही तेंव्हा पासून गाडी वर्कशॉप मध्येच आहे व तक्रारदारांना बाहेगावी जाण्यासाठी भाडयाने वाहन वापरावे लागत आहे.
तक्रारदारांनी गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडून गाडी खरेदी केली आहे व त्यांच्याच सांगण्यानुसार गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडे ती वेळोवेळी दुरुस्तीसाठी दिली आहे. ग्राहकाच्या वाहनाची देखभाल, दुरुस्ती वॉरंटी मधील सुटे पार्ट बदलून देणे ही सर्व जबाबदारी गैरअर्जदार 1 व 2 ची आहे. वॉरंटी कालावधीत असून देखील गैरअर्जदार यांनी तक्रारदारांच्या वाहनाचे इंजिन बदलून दिले नाही. ही सर्व गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत केलेली त्रुटी आहे. या त्रुटीबद्दल नुकसान भरपाई मिळावी म्हणून तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. त्या अंतर्गत तक्रारदार वाहन भाडे, मानसिक त्रास, वाहन गैरअर्जदार यांच्या शोरुमवर पडून राहिल्याची भरपाई व तक्रार खर्च अशी एकूण रुपये 1,60,000/- एवढी नुकसान भरपाई मागत आहेत. आपल्या तक्रारी सोबत तक्रारदारांनी वाहनाच्या नोंदणीचे प्रमाणपत्र व वेळोवेळी वाहनाची सर्विसिंग व दुरुस्ती केल्या बद्दलची बिले (Tax Invoice) दाखल केलेली आहेत.
गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 मंचा समोर हजर झाले. त्यांनी आपला संयुक्त लेखी जबाब दाखल केला. त्यांच्या जबाबात त्यांनी खालील प्रमाणे कथन केले आहे. टाटा मोटर्स या कंपनीने बाजारात विक्रीसाठी आणलेल्या गाडया Automotive Research Association of India यांनी प्रमाणित केलेल्या असतात. गुणवत्तेची खात्री व रस्त्यावर टेस्ट घेतल्यानंतरच त्या विक्रीसाठी आणल्या जातात.
तक्रारदारांनी प्रत्यक्षात गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडूनच एम.एच.21 व्ही 4033 ही इंडिका गाडी खरेदी केली. त्यांनी गैरअर्जदार क्रमांक 1 यांना अनावश्यक प्रतिपक्ष केले आहे. तक्रारदारांनी तक्रारी सोबत जोडलेल्या पावत्यांनुसार त्यांनी 24 वेळा गाडी वर्कशॉपला आणली. प्रत्येक वेळा गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी तत्परतेने गाडीची सर्विसिंग केलेली आहे व वॉरंटी पॉलीसी प्रमाणे समाधानकारक रित्या दुरुस्ती देखील करुन दिली आहे.
दिनांक 16.08.2013 रोजी तक्रारदारांचे प्रतिनिधी वहीद यांनी गाडी वर्कशॉपला आणली व गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या कर्मचा-यांना काहीही कल्पना न देता ती तेथे सोडून ते निघून गेले. गाडीची काय दुरुस्ती करायची आहे याबाबत दूरध्वनीने विचारणा केली असता त्यांनी गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या प्रतिनिधीला धमकी दिली. त्याबाबत गैरअर्जदारांनी कदीम जालना पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज देखील दिला.
तक्रारदारांनी गाडीच्या उत्पादकांना प्रतिपक्ष केलेले नाही. वॉरंटीच्या कालावधीत इंजिन बदलून देणेही असलीच तर उत्पादकाची जबाबदारी आहे. विक्रेत्याची नाही त्यामुळे उत्पादकांना प्रतिपक्ष केलेले नाही म्हणून (Non-Joinder of necessary party) देखील तक्रार नामंजूर करणे योग्य ठरेल.
तक्रारदारांनी गाडी भाडयाने घेतल्याबाबतचा कोणताही पुरावा मंचा समोर दाखल केलेला नाही. त्यामुळे त्याबाबतची नुकसान भरपाई मागण्याचा त्यांना अधिकार नाही.
तक्रारदारांनी वेळोवेळी गाडी सर्विसिंगसाठी दिली होती. त्या वेळी घेतलेल्या मीटर नोंदीनुसार तक्रारदारांची गाडी 740 दिवसात 82,712 की.मी. म्हणजेच सरासरी प्रत्येक दिवशी 112 की.मी. एवढी चालवली गेली आहे. यावरुन तक्रारदार गाडी स्वत: साठी न वापरता भाडयाने देत होते असे दिसते. म्हणून तक्रारदार ग्राहक संरक्षण कायदा कलम 2 (i) (d) नुसार ग्राहक या संज्ञेत येत नाहीत. शिवाय यावरुन असे दिसते की, गाडीचा एवढा जास्त वापर असल्यामुळेच तिला वारंवार दुरुस्तीची गरज होती. गाडीच्या उत्पादनातील दोषांमुळे नव्हे. वरील सर्व कारणांचा विचार करुन तक्रारदारांची तक्रार फेटाळण्यात यावी अशी प्रार्थना गैरअर्जदार यांनी केली आहे.
दाखल कागदपत्रांच्या अभ्यासावरुन मंचाने खालील मुद्दे विचारात घेतले.
मुद्दे निष्कर्ष
1.तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत गैरअर्जदार
क्रमांक 1 व 2 यांनी त्रुटी केली आहे का ? नाही
2.काय आदेश ? अंतिम आदेशा नुसार
कारणमीमांसा
तक्रारदार व त्यांचे वकील सातत्याने सहा तारखांना मंचा समोर गैरहजर आहेत. त्यामुळे तक्रार गुणवत्तेवर निकाली करण्यात येत आहे. गैरअर्जदार यांचे वकीलांचा युक्तीवाद एैकला. त्यांनी लेखी युक्तीवाद दाखल केला.
तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार वॉरंटी कालावधीत त्यांच्या गाडीचे इंजिनात बिघाड झाला व गैरअर्जदारांनी इंजिन बदलून दिले नाही म्हणून केलेली आहे. इंजिनात बिघाड असेल तर ते बदलून देण्याची जबाबदारी उत्पादकाची आहे असे असताना तक्रारदारांनी गाडीची उत्पादक कंपनी (टाटा मोटर्स लि.) ला प्रतिपक्ष न करता केवळ विक्रेत्यां विरुध्द तक्रार केली आहे. त्यामुळे (Non-Joinder of necessary party) या तांत्रिक कारणाने तक्रार नामंजूर करणे योग्य ठरेल असे मंचाचे मत आहे.
तक्रारदारांनी गाडी विकत घेतल्याची पावती अथवा वॉरंटी पॉलीसी मंचात दाखल केलेली नाही. त्यामुळे तक्रारदारांनी गाडी नेमकी कोणत्या विक्रेत्या कडून घेतली ? कोणत्या तारखेला घेतली आणि गाडीच्या इंजिनची वॉरंटी उत्पादकाने किती कालावधीसाठी दिलेली होती यापैकी कोणत्याच गोष्टीचा उलगडा होत नाही. तक्रारदारांनी गाडी खरेदी पावती मंचात दाखल केलेली नाही त्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडून तक्रारदारांनी गाडीची खरेदी केली ही गोष्ट सिध्द होत नाही. म्हणजेच तक्रारदार गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे ग्राहक आहेत ही बाब देखील तक्रारदार सिध्द करु शकलेले नाहीत.
तक्रारदारांनी दाखल केलेल्या सर्विसिंग व दुरुस्तीच्या बिलांवरुन असे दिसते की, सुमारे दोन वर्षांच्या कालावधीत गाडी 82,712/- की.मी. चालवली गेली आहे. त्यावरुनच गाडीच्या इंजिनमध्ये उत्पादनातील काही दोष नाही ही गोष्ट स्पष्ट होते. गाडीचा इतका जास्त वापर झाल्यामुळेच गाडीला वारंवार सर्विसिंगची गरज लागली.
त्याच प्रमाणे सर्विसिंगच्या बिलांवरुन स्पष्ट दिसते की, गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी वेळोवेळी गाडीच्या तक्रारींकडे लक्ष दिले, व गाडीचे सर्विसिंग तत्परतेने करुन दिले आणि ज्या दिवशी गाडी वर्कशॉप मध्ये आणली त्याच दिवशी काम पूर्ण करुन गाडी तक्रारदारांना परत केलेली आहे. म्हणजेच तक्रारदारांना द्यायच्या सेवेत त्यांनी काहीही कमतरता केलेली नाही असे दिसते.
गैरअर्जदार क्रमांक 1 अथवा 2 यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत काही त्रुटी केलेली आहे ही गोष्ट तक्रारदार पुराव्यानिशी सिध्द करु शकलेले नाहीत असे मंचाचे मत आहे.
म्हणून मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
- तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
- खर्चा बाबत आदेश नाही.