नि. ११
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा. अध्यक्ष - श्री अनिल य. गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. २२४९/२००९
-----------------------------------------------
तक्रार नोंद तारीख: - १३/११/२००९
तक्रार दाखल तारीखः - १७/११/२००९
निकाल तारीखः - १६/१/२०१२
--------------------------------------------
श्री जयवंत रामगोंडा गडदे
वय वर्षे – ३४, धंदा – व्यापार
रा.मु.पांडोझरी, पो.आसंगी, ता.जत
जि. सांगली ..... तक्रारदार
विरुध्द
१. मे.एस.पी.मोटर्स तर्फे प्रोप्रा.
श्री सलीम मौलासो पाच्छापुरे (नदाफ)
सातारा रोड, जत, ता.जत जि.सांगली
२. मे.एस.एम.घाटगे +ìण्ड सन्स
हिंद को-ऑप.हाऊसिंग सोसायटी,
रुईकर कॉलनी, कोल्हापूर – ४१६ ००५
३. हिरो होंडा मोटर्स लि.
मुख्य कार्यालय - ३४, कम्युनिटी सेंटर,
बसंतलोक, वसंतविहार, न्यू दिल्ली-११० ०५७ ..... जाबदार
तक्रारदार तर्फे – +ìड.श्री घेरडे ए.एस.
जाबदार क्र.१ ते ३ – एकतर्फा
नि का ल प त्र
द्वारा- मा. सदस्या- गीता घाटगे.
तक्रारदारांनी जाबदार क्र.३ कंपनीची मोटारसायकल जाबदार क्र.२ यांचे सबडीलर जाबदार क्र.१ यांचेकडून खरेदी घेतली होती. खरेदीनंतर बराच कालावधी उलटून गेला तरीसुध्दा जाबदारांनी त्यांना या वाहनाचे आर.टी.ओ.रजिस्ट्रेशन व इन्शुरन्स करुन दिला नाही. त्याकरिता तक्रारदारांनी सदरहू तक्रारअर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्यात हकीकत खालीलप्रमाणे -
१. तक्रारदारांनी जाबदार क्र.३ यांच्या कंपनीची हिरो होंडा ग्लॅमर ही मोटारसायकल दि.६/८/२००७ रोजी जाबदार क्र.२ यांचे सबडीलर जाबदार क्र.१ यांचेकडून खरेदी घेतली होती. खरेदी घेतेवेळी तक्रारदारांनी रक्कम रु.८,०००/- जाबदार क्र.१ यांचेकडे जमा केले व त्यानंतर त्यांनी तक्रारदारांना दि.६/८/०७ व दि.२०/८/०७ रोजी रक्कम रु.२०,०००/- व रक्कम रु.२५,०००/- असे अदा केले. या वाहनापोटी तक्रारदारांनी जाबदार क्र.१ यांना एकूण रु.५३,०००/- इतकी रक्कम अदा केली. वाहन खरेदी घेतेवेळी तक्रारदारांनी जाबदार यांच्या मागणीप्रमाणे खरेदीसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जाबदारांकडे जमा केली होती. परंतु वाहनाचा ताबा दिल्यानंतरसुध्दा जाबदारांनी सदरहू वाहनाच्या रजिस्ट्रेशन व इन्शुरन्सची कागदपत्रे तक्रारदारांना दिली नाहीत. याबाबत त्यांना विचारणा केली असता एक महिन्यात कागदपत्रे देण्यात येतील असे सांगण्यात आले. परंतु त्यानंतरही तक्रारदारांना सदरहू कागदपत्रे मिळाली नाहीत. म्हणून त्यांनी जाबदारांना प्रत्यक्ष भेटून व अर्ज देवून त्याबाबत वारंवार विचारणा केली असता जाबदारांनी रजिस्ट्रेशन व इन्शुरन्ससाठी कागदपत्रे योग्य त्या ऑफिसकडे सादर केलेली आहेत अशी कारणे सांगून तक्रारदारांना त्यांनी मागणी केल्याप्रमाणे कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केली व तक्रारदारांच्या मागणीची दाद घेतली नाही आणि अशा रितीने जाबदारांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारदारांना सदोष सेवा पुरविली अशी तक्रारदारांची तक्रार आहे. तक्रारदार पुढे असेही कथन करतात की, अद्यापी त्यांच्या गाडीचे रजिस्ट्रेशन व इन्शुरन्स झाला नसल्या कारणाने तक्रारदारांना या वाहनाचा प्रत्यक्षात वापर करणे अशक्य झाले आहे त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे तसेच त्यांना शारिरिक व मानसिक त्रास झालेला आहे. आणि म्हणून त्यांना सदरहू तक्रारअर्ज दाखल करावा लागला आहे.
तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारअर्जामध्ये जाबदार क्र.१ यांचेकडून खरेदी केलेल्या वाहनाचे आर.टी.ओ. रजिस्ट्रेशन व इन्शुरन्स करुन मिळावा तसेच जाबदारांनी अवलंबिलेल्या अनुचित व्यापारी प्रथेमुळे तक्रारदारांना जो शारिरिक, मानसिक व आर्थिक त्रास झाला त्याकरिता म्हणून व तक्रारअर्जाचे खर्चापोटी म्हणून एकूण रक्कम रु.२५,०००/- मिळावेत अशी मागणी केली आहे. तक्रारअर्जाचे पुष्ठयर्थ तक्रारदारांनी प्रतिज्ञापत्र दाखल करुन नि.५ अन्वये एकूण ६ कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
२. मंचाच्या नोटीशीची बजावणी जाबदार क्र.१ ते ३ यांचेवर होऊनदेखील ते प्रस्तुत प्रकरणी हजर झाले नाही. सबब नि.१ वर त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करणेत आला.
३. प्रस्तुत प्रकरणी तक्रारअर्जाचे अवलोकन करता मंचास एक बाब दिसून आली ती म्हणजे वादातील वाहनाची खरेदी ही दि.६/८/२००७ रोजी झाली व त्याचदिवशी तक्रारदारांना या वाहनाचा ताबा मिळाला. तक्रारदारांच्या कथनानुसार वाहनाचा ताबा मिळाल्यापासून १ महिन्यात त्यांना सदरहू कागदपत्रे मिळतील असे जाबदारांकडून सांगणेत आले होते. म्हणजेच खरेदी तारखेपासून एक महिन्यानंतर (दि.६/९/२००७) वादास कारण घडले. तक्रारदारांनी सदरहू तक्रारअर्ज दि.१३/११/२००९ रोजी दाखल केला आहे. याचा विचार करता तक्रारदारांनी सदरहू तक्रारअर्ज हा विलंबाने दाखल केलेला आहे हे स्पष्ट दिसून येते. वास्तविक तक्रारदारांनी सदरहू तक्रारअर्ज हा ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम २४-ए-(१) नुसार वादास कारण घडल्यापासून दोन वर्षाचे मुदतीत दाखल करणे आवश्यक होते. परंतु तसे झाल्याचे इथे दिसून येत नाही. तक्रारदारांनी सदरहू तक्रारअर्जासोबत विलंबमाफीचा अर्ज देखील सादर केलेला नाही. याचा विचार करता तक्रारदारांचा तक्रारअर्ज हा कायदा मुदतीत बसत नसल्याकारणाने नामंजूर करणे मंचास क्रमप्राप्त ठरते व त्यानुसार अंतिम आदेश पारीत करण्यात येतो.
४. प्रस्तुत प्रकरणी मंचास आणखी एका बाबींची नोंद सदरहू निकालपत्रात करावीशी वाटते ती म्हणजे तक्रारदारांची अशी मुख्य तक्रार आहे की, त्यांना वाहनाच्या रजिस्ट्रेशन व इन्शुरन्सची कागदपत्रे देण्यात आलेली नाहीत. परंतु त्यांनी जाबदार क्र.१ कडे वाहनाच्या रजिस्ट्रेशन व इन्शुरन्सकरिता रक्कम जमा केली होती याबाबतचा कोणताही कागदोपत्री पुरावा प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेला नाही. त्यांनी नि.५ अन्वये दाखल केलेल्या पावत्यांवरुन सदरहू रकमा रजिस्ट्रेशन व इन्शुरन्सकरिता होत्या याचा खुलासा होत नाही. त्यामुळे तक्रारदारांची जाबदारांविरुध्द असलेली अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन सदोष सेवा दिल्याची तक्रार ही प्रस्तुत प्रकरणी पुराव्याअभावी सिध्द होवू शकली नाही असा मंचाचा निष्कर्ष निघतो. आणि म्हणून देखील तक्रारदारांचा तक्रारअर्ज नामंजूर करणे मंचास क्रमप्राप्त ठरते व त्यानुसार अंतिम आदेश पारीत करण्यात येतो.
सबब, मंचाचा आदेश की,
आ दे श
१. तक्रारदारांचा तक्रारअर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
२. खर्चाबाबत कोणतही आदेश नाहीत.
सांगली
दि.१६/१/२०१२
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.