रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग. तक्रार क्र.29/2009. तक्रार दाखल दि.11-2-2009. तक्रार निकाली दि.16-4-2009.
श्री.महादेव दादू कांबळे, रा.फ्लॅट नं.307, तिसरा मजला, सी विंग, पद्मावती बिल्डिंग, प्लॉट नं.18, सेक्टर 7, कामोठे, नवी मुंबई 410 209. ... तक्रारदार.
विरुध्द पद्मावती डेव्हलपर्सतर्फे भागीदार- 1. श्री.परेश रसिकलाल व्होरा रा. डी-7/401, कुंठनूर सीएचएस लि. कुंथू अपार्टमेंट, सर्वोदय नगर, एन.रोड, मुलूंड-वेस्ट, मुंबई 400 209. 2. श्री.निरंजन नलिनकुमार जोशी, रा. 15, तिसरा मजला, दत्तछाया, रोड नं.16, वागळे इस्टेट, श्रीनगर, ठाणे 400 604. ... विरुध्द पक्षकार.
उपस्थिती- मा.श्री.आर.डी.म्हेत्रस, अध्यक्ष. श्री.बी.एम.कानिटकर, सदस्य. तक्रारदारतर्फे वकील- श्री.आर.एच.जगताप. सामनेवाले- एकतर्फा आदेश. -निकालपत्र -
द्वारा- मा.अध्यक्ष, श्री.आर.डी.म्हेत्रस. 1. तक्रारदारानी ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदयांतर्गत दाखल केली असून तिचे स्वरुप खालीलप्रमाणे आहे- सामनेवाले हे रजिस्टर्ड भागीदारी संस्था असून त्यांचे ऑफिस तक्रारीत नमूद केलेल्या पत्त्यावर आहे. सामनेवाले क्र.1 व 2 हे पद्मावती डेव्हलपर्सचे भागीदार आहेत. त्यांचा व्यवसाय डेव्हलपर, प्रमोटर व बिल्डर असा आहे. तक्रारदारानी सामनेवाले यांच्या पद्मावती बिल्डिंग, प्लॉट नं.18, सेक्टर 7, कामोठे, नवी मुंबई येथील इमारतीमध्ये सदनिका क्र.307, तिस-या मजल्यावरील खरेदी करण्याचे ठरविले व दि.21-11-06 रोजी सामनेवालेंबरोबर त्याचे करारपत्र झाले. सदरील सदनिकेची किंमत रु.3,75,500/- ठरली व सदनिकेबाबत काय सेवासुविधा देणार यासंदर्भात करार करण्यात आला. 2. तक्रारदारानी ही तक्रार सामनेवालेकडून त्याला योग्य प्रकारे सेवा मिळाली नाही, तसेच सामनेवालेनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला, करारातील अटींचे पालन केले नाही व मूलभूत सेवासुविधा दिल्या नाहीत, तसेच को.ऑप.हौसिंग सोसायटी करुन दिली नाही व ऑक्युपन्सी प्रमाणपत्र दिले नाही,त्याचप्रमाणे पद्मावती बिल्डिंगचे कन्व्हेनियन्स दिले नाही अशा प्रकारे त्यांनी सेवासुविधा देण्यात त्रुटी केली आहे. 3. तक्रारदार व सामनेवालेंदरम्यान जी किंमत रु.3,75,000/- ठरली होती ती सदनिकेची किंमत, इलेक्ट्रिकल कनेक्शन चार्जेस, सोसायटी रजिस्ट्रेशन चार्जेस, सिडको ट्रान्स्फर चार्जेस इ.सर्व मिळून आहे. तक्रारदार व सामनेवालेंदरम्यान दि.22-11-06 रोजी उरण येथे सबरजिस्ट्रार कार्यालयात रजिस्टर्ड अग्रीमेंट फॉर सेल करण्यात आला त्यावेळी तक्रारदारानी रक्कम रु.23,500/- दिली. त्यांचे पुढे असे कथन आहे की, उर्वरित रक्कम रु.3,50,000/- त्यांनी अग्रीमेंट टु सेलमध्ये ठरले होते त्याप्रमाणे सामनेवालेंस दिले. त्याच्या पावत्या त्यांच्याकडे आहेत. सामनेवालेनी तक्रारदारास दि.17-2-07 रोजी सदनिकेचा ताबा दिला आहे. तेव्हापासून तक्रारदार हे सदनिका क्र.सी-307 मध्ये रहात आहेत. तक्रारदाराना सदनिकेचा ताबा देतेवेळी को.ऑप.हौसिंग सोसायटी करारात ठरल्याप्रमाणे करुन देण्याचे कबूल केले तसेच सर्व सदनिकाधारक, दुकानदार यांच्या सोसायटीच्या नावे बिल्डिंग ही ट्रान्स्फर करण्याचे कबूल करुन दिले. या सर्व बाबी त्यांनी 2-3 महिन्यात करुन देण्याचे कबूल केले होते. 4. ताबा घेतल्यानंतर तक्रारदाराच्या असे निदर्शनास आले की, सामनेवालेनी करारात कबूल केल्याप्रमाणे ज्या सेवासुविधा दिल्या नाहीत त्या खालीलप्रमाणे- सामनेवालेनी इमारतीतील बी विंगवर ओव्हरहेड वॉटर टँक बांधली नाही, जी मूळ नकाशात होती. ए व सी या विंगवरील ज्या वॉटर टँक बांधल्या आहेत त्या खराब दर्जाच्या असून त्यातून पाणी गळत असते. जर वेळचेवेळी त्या दुरुस्त झाल्या नाहीत तर त्यातून काहीही निर्माण होऊ शकते व त्या सदनिकाधारकांना धोकादायक होऊ शकतील. सामनेवालेनी तक्रारदारांस असे सांगितले की, आम्ही चांगल्या प्रकारे बांधकाम केले असून माहितीपत्रकाप्रमाणे सर्व सेवासुविधा दिल्या आहेत, परंतु या वॉटरटँककडे पहाता सामनेवालेचे हे कथन खरे असल्याचे दिसून येत नाही. तक्रारदारांचे कथन असे की, सामनेवालेनी त्यांच्याकडून एक वर्षाचा आगाऊ मेंटेनन्स करण्यासाठी घेतला असून तो प्रत्येक महिना रु.1, दर चौ.फुटास एक याप्रमाणे आहे, परंतु अशा प्रकारे रक्कम घेऊनसुध्दा त्या वर्षात सामनेवाले हे कधीही फिरकले नाहीत व त्यांनी मेंटेनन्स केला नाही. वॉटर व इलेक्ट्रिकल चार्जेस या सर्व बाबी तक्रारदार व इतर सभासदांना दिल्या आहेत. वास्तविक ही बीले सामनेवालेनी देण्याची आहेत त्यासाठी त्यांनी त्यांच्याकडून आगाऊ रक्कम घेतलेली आहे. तक्रारदार व इतर सभासदांनी बी विंगवर टाकी बांधण्यासाठी गव्हर्नमेंट रजिस्टर्ड कॉंट्रॅक्टरकडून निविदा मागविल्या होत्या कारण सामनेवालेनी मंजूर प्लॅनप्रमाणे तेथे ती बांधली नव्हती. त्यासाठी त्यांना रु.5,22,500/- खर्च येणार आहे. त्याचप्रमाणे त्यांनी इतर दोन टाक्यांच्या दुरुस्तीसाठी निविदा मागविल्या आहेत, त्यासाठी त्यांना रु.1,40,000/- चा खर्च येणार आहे. एवढी रक्कम पद्मावती बिल्डिंगमधील लोकांना एकत्र करणे शक्य होणार नाही. ही सर्व जबाबदारी सामनेवालेंची आहे. 5. दि.23-6-07 रोजी पद्मावती बिल्डिंगच्या मॅनेजिंग कमिटीने सामनेवालेंस सर्व सभासदांचे वतीने पत्र देऊन आपल्या तक्रारी मांडल्या व अडचणी दूर करण्यासाठी कळविले होते. ते पत्र त्यांनी स्पीडपोस्टद्वारे तक्रारदारास सामनेवालेच्या शेवटच्या माहित असलेल्या पत्त्यावर पाठविले, परंतु ते पत्र Office closed, Returned to sender म्हणून परत आले आहे. त्यानंतर पुन्हा दि.6-1-09 रोजी इतर काही सदनिकाधारकांनी सामनेवालेना चार पत्रे दिली व आपल्या तक्रारी मांडल्या. ही पत्रे त्यांनी त्यांना माहित असलेल्या सामनेवालेच्या शेवटच्या पत्त्यावर पाठवली आहेत व ती पत्रे सुध्दा Office closed, Returned to sender म्हणून परत आली आहेत. तक्रारदारानी पाठविलेली पत्रे Not claimed म्हणून परत आली आहेत, तसेच त्यांनी यु.पी.सी.द्वारेसुध्दा सामनेवालेना पत्रे पाठविली, परंतु ती परत आली नाहीत. तक्रारदार व इतर सदनिकाधारकांनी सामनेवालेशी अनेकदा बोलणी केली आहेत व लेखीसुध्दा कळविले तरीही सामनेवालेनी त्यांना दाद दिली नाही. तो पाणी, वीजबील भरत नाही, त्यांनी सोसायटी स्थापन केली नाही किंवा इमारतही सोसायटीच्या नावे ट्रान्स्फर केली नाही. त्यांच्याकडून काहीही कृती झालेली नाही. 6. तक्रारदार व इतर सदनिकाधारक हे जून 07 पासून सर्वांकडून पैसे जमा करुन बीले भरत आहेत. सामनेवालेनी महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट कायदयाच्या तरतुदचा भंग केला आहे व फौजदारी गुन्हा केला आहे. तक्रारदारानी अनेकवेळा सांगूनही सामनेवाले दाद देत नाहीत म्हणून तक्रारदारास सामनेवालेविरुध्द अर्जात नमूद केल्याप्रमाणे कामे करुन घेण्यासाठी ही तक्रार मंचाकडे दाखल करावी लागली आहे. सामनेवालेंच्या या कृतीमुळे तक्रारदारास जो शारिरीक, मानसिक त्रास होत आहे त्यासाठी रु.3,00,000/- मिळण्यासाठी त्यांची मागणी आहे. त्यांची अशी विनंती आहे की, सामनेवालेनी तक्रारदारास कबूल करुनसुध्दा योग्य सेवासुविधा दिली नाही, तसेच अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे गृहित धरुन त्याला बी विंगवर स्वखर्चाने वॉटर टँक बांधण्याचा आदेश करावा, तसेच ए व सी विंगवरील वॉटर टँकची दुरुस्ती स्वखर्चाने करुन देण्याबाबत त्याला आदेश व्हावा, बिल्डिंगला पडलेल्या भेगा स्वखर्चाने दुरुस्त करुन देण्याबाबत आदेश व्हावा, तसेच त्याने सदनिकाधारकांची को.ऑप.हौसिंग सोसायटी स्थापन करावी व पद्मावती बिल्डिंग व त्याखालील जमीन संस्थेच्या नावे ट्रान्स्फर करण्याचे आदेश देण्यात यावेत. त्यांना पद्मावती बिल्डिंगची सर्व कागदपत्रे सोसायटीकडे सुपूर्द करण्याबाबत आदेश करावा. 7. याचबरोबर तक्रारदारास जो शारिरीक, मानसिक त्रास झाला त्याबाबत त्याला रु.3,00,000/- देण्यात यावेत व ही तक्रार दाखल करण्यासाठी झालेल्या न्यायिक खर्चापोटी रु.25,000/- मिळण्याबाबत त्यांची विनंती आहे. 8. तक्रारदारानी तक्रारीसोबत नि.2 अन्वये प्रतिज्ञापत्र दिले असून नि.3 ला कागदपत्राची यादी देऊन एकूण 10 कागद त्यानी दाखल केले आहेत. त्यामध्ये अग्रीमेंट टु सेल, ताबा पावती, दि.23-6-07 चे पत्राची प्रत, अनक्लेम्ड पोस्टल कव्हर्स, दि.31-12-08 चे पत्राची प्रत, त्याची अनक्लेम्ड पोस्टल कव्हर्स, यु.पी.सी.ची प्रत, तसेच बी विंगवरील कोटेशन व प्लॅन इ.कागदांचा समावेश आहे. 9. तक्रार दाखल झाल्यावर सामनेवालेना नि.5 अन्वये नोटीसा काढण्यात आल्या. सुरुवातीला तक्रारदारानी तक्रार ही पद्मावती डेव्हलपर्स व त्यांचे भागीदार म्हणून श्री.प्रकाश रसिकलाल व्होरा व श्री.निरंजन नलिनीकुमार जोशी यांचेविरुध्द दाखल केली होती. यापैकी पद्मावती डेव्हलपर्स यांची नोटीस कार्यालय बंद असल्यामुळे परत आली तर निरंजन नलिनीकुमार जोशी यांना नोटीस मिळाली त्याची पोच नि.6 ला आहे. तसेच श्री.परेश रसिकलाल व्होरा यांची नोटीस अनक्लेम्ड म्हणून मंचाकडे परत आली. प्रस्तुतच्या तक्रारीत पद्मावती डेव्हलपर्स या भागीदारी फर्मचे कार्यालय बंद असल्यामुळे त्यांना नोटीसची बजावणी होणार नाही म्हणून तक्रारदारानी भागीदारी फर्म यांची नावे या तक्रारीतून कमी करण्याची परवानगी मागितल्यावरुन ती त्यांना देण्यात आली, त्यामुळे प्रस्तुतची तक्रार संबंधित फर्मचे भागीदाराविरुध्द चालू राहिली. 10. त्यांना नोटिसची बजावणी होऊनसुध्दा ते मंचापुढे हजर झाले नाहीत. त्यांना योग्य संधी देऊनही त्यांनी मंचापुढे म्हणणे न दिल्यामुळे त्यांचेविरुध्द दि.31-3-09 रोजी एकतर्फा चौकशीचा आदेश पारित केला व तक्रार युक्तीवादासाठी नेमण्यात आली. या कामी तक्रारदारांचे वकील श्री.जगताप यांनी केलेला युक्तीवाद ऐकला तसेच त्यानी दाखल केलेल्या कागदपत्राचे अवलोकन केले, त्यावरुन सदर तक्रारीच्या निराकरणार्थ खालील मुद्दयांचा मंचाने विचार केला- मुद्दा क्र.1 – तक्रारदारास सामनेवालेकडून त्रुटीपूर्ण सेवा मिळाली आहे काय? उत्तर - होय. मुद्दा क्र. 2 – तक्रारदारांची तक्रार त्यांच्या मागणीप्रमाणे मंजूर करणे योग्य होईल काय? उत्तर - अंतिम आदेशात नमूद केल्याप्रमाणे. विवेचन मुद्दा क्र. 1 11. या कामी तक्रारदार व सामनेवालेबरोबर झालेला करार पाहिला, त्यांनी दाखल केलेल्या नकाशाची सत्यप्रत पाहिली. त्यावरुन टेरेसवर ए, बी व सी विंगमध्ये ओव्हरटँक बांधण्याची परवानगी नगरपरिषदेने दिली होती, असे असूनही सामनेवालेनी वॉटरटँक बांधल्याचे दिसून येत नाही. या कामी सामनेवाले हजर झालेले नाहीत. त्यांनी त्यांचे कोणतेही म्हणणे दाखल केलेले नाही, याउलट तक्रारदारानी त्यांचे म्हणणे प्रतिज्ञापत्र व कागदपत्रासह दाखल केले आहे. त्याचे शपथपत्र हे अनचॅलेंज्ड राहिले आहे. अशा परिस्थितीत तक्रारदारानी दिलेले म्हणणे अमान्य करण्याचे काहीही कारण नाही. सामनेवालेनी वॉटरटँक बांधलेली नाही,तसेच त्याने को.ऑपरेटीव सोसायटीही फॉर्म केलेली नाही, सोसायटीच्या नावे फरोक्तखत करुन दिल्याचे दिसून येत नाही. या सर्व बाबी करारनाम्यात असतानाही सामनेवालेनी त्या केलेल्या नाहीत. हे त्यांचे वर्तन त्रुटीपूर्ण सेवेचे निदर्शक आहे. तक्रारदारानी सामनेवालेस वारंवार सूचना दिल्या आहेत, नोटीसाही पाठविल्या आहेत. तक्रारदार तसेच इतर सदनिकाधारक आहेत त्यांनी त्यांना सामनेवालेचा जो शेवटचा पत्ता माहित आहे त्यावर तक्रारीत नमूद केलेल्या सुविधा देण्याबाबत पत्रे पाठविल्याचे दिसून येत आहे, परंतु सामनेवालेंचे कार्यालयच बंद असल्याने ती सर्व पत्रे परत आली आहेत. सामनेवाले हजर नसल्याने व त्यांनी योग्य प्रकारे प्रतिसाद न दिल्याने तो कबूल केल्याप्रमाणे सेवा देत नसल्याचे दिसून येत आहे. त्याची एकूण सर्व कृती दोषपूर्ण सेवेचे निदर्शक असल्याचे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर होय असे आहे. विवेचन मुद्दा क्र.2 12. जर सामनेवालेकडून त्रुटीपूर्ण सेवा दिली गेल्याचे दिसून आले तर तक्रारदारांचा अर्ज मंजूर करता येईल किंवा नाही याबाबत निर्णय देणे योग्य होईल. मंचाचे मते सामनेवालेकडून तक्रारदारास त्रुटीपूर्ण सेवा दिली गेल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे त्यांचा अर्ज मंजूर करावा असे मंचाचे मत आहे. तक्रारदारानी इमारतीची दुरुस्ती करुन घेण्यासाठी व वॉटरटँक बांधण्यासाठी निविदा मागविल्याचे कागदपत्रावरुन दिसून येते. वास्तविक तो खर्च करण्याची जबाबदारी सामनेवालेची आहे. परंतु ती त्याने पार पाडलेली नाही. अशा प्रकारचा खर्च तक्रारदारानी करणे त्यांना शक्य होणार नाही. मुळातच तक्रारदारानी सामनेवालेस करारपत्रात ठरल्याप्रमाणे सदनिकेची सर्व रक्कम देऊनच ताबा घेतला आहे, त्यामुळे सामनेवालेकडून ज्या त्रुटी राहिल्या आहेत किंवा ज्या गोष्टींची पूर्तता होत नाही त्या गोष्टींची पूर्तता त्यास स्वखर्चाने करणेबाबत आदेश करणे योग्य होईल असे मंचाचे मत आहे. पॅरा- तक्रारदारानी त्यांच्या अर्जात एकूण ए पासून आय पर्यंत मागण्या केल्या आहेत, त्यामध्ये कॉम्पेंसेंशन म्हणून रु.3,00,000/- तर तक्रार दाखल करण्यासाठी झालेला खर्च म्हणून रु.25,000/-ची मागणी केली आहे. मंचास त्याच्या या मागण्या मंजूर करणे योग्य वाटत नाही. त्याने रु.3,00,000/-ची मागणी केली आहे, ती एकटयासाठी किंवा सर्व सभासदांसाठी केली आहे याचा खुलासा त्याने केलेला नाही, तसेच त्याने तक्रारसुध्दा सर्वांसाठी केली हे ही दिसून येत नाही. त्याची तक्रार असत्य आहे तसेच त्यास सामनेवालेकडून दोषपूर्ण सेवा मिळाली नाही असे मंचाचे मत नाही, परंतु त्याने ज्या आर्थिक स्वरुपाच्या मागण्या केल्या आहेत, त्या अवास्तव असल्याचे मंचाचे मत आहे. सर्व सभासदांसाठी आपण या मागण्या करीत आहोत असे त्याने म्हटले असते व त्यास इतर सभासदांची साथ असती तर त्याच्या मागणीप्रमाणे नुकसानी देण्याचा विचार करणे शक्य झाले असते. आर्थिक मागणी करताना त्याचा हेतू प्रामाणिक नाही असे मंचाचे मत आहे, त्याचबरोबर त्यास सदनिकाधारक म्हणून त्रास झाला नसल्याचेही मंचाचे मत नाही, परंतु त्याच्या मागणीप्रमाणे त्यास शारिरीक, मानसिक त्रासापोटी रु.3,00,000/-ची व न्यायिक खर्चासाठी रु.25,000/-ची रक्कम देणे योग्य होणार नाही. सबब तक्रारदारास शारिरीक, मानसिक त्रासापोटी रु.5,000/- तर न्यायिक खर्चापोटी रु.5,000/- दयावेत असे मंचाचे मत आहे, यासोबतच्या त्याच्या इतर मागण्याही मंजूर कराव्यात असे मंचाचे मत आहे. 13. सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यात येत आहे- -ः आदेश ः- सामनेवालेनी खालील निर्देश केलेल्या आदेशाचे पालन आदेश पारित तारखेपासून 45 दिवसाचे आत करावे- 1. सामनेवालेनी तक्रारीत नमूद केलेल्या पद्मावती बिल्डिंगच्या ’बी’ विंगमध्ये स्वखर्चाने मंजूर प्लॅनप्रमाणे पाण्याची टाकी स्वखर्चाने बांधून दयावी व त्यास पाणीपुरवठा उपलब्ध करुन दयावा. 2. या बिल्डिंगमधील ’ए’ व ’सी’ विंगमध्ये ज्या टाक्या बांधल्या आहेत, त्याची दुरुस्ती गळती योग्य प्रकारे काढून स्वखर्चाने करुन दयावी, तसेच या बिल्डिंगमधील भिंतीना ज्या भेगा पडल्या आहेत, त्याचीही दुरुस्ती स्वखर्चाने करुन दयावी. 3. त्याने पद्मावती बिल्डिंगमधील रहिवासी व गाळेधारकांची को.ऑप.हौसिंग सोसायटी स्वखर्चाने स्थापन करुन रजिस्टर्ड करावी, तसेच सोसायटी स्थापन झाल्यावर पद्मावती बिल्डिंग व त्या सर्व कॅम्पसमधील म्हणजेच प्लॉट नं.18 मधील सर्व जागा इमारतीसह सोसायटीच्या नावे स्वखर्चाने हस्तांतरित करुन दयावी व त्याचे योग्य ते फरोक्तखत (कन्व्हेनियन्स डीड) सोसायटीचे नावे करुन दयावे व मिळकतीचा ताबा सोसायटीकडे दयावा. तसेच यासंदर्भातील सर्व कागदपत्रेही सोसायटीच्या ताब्यात देऊन त्याची पोच घ्यावी. 4. तक्रारदारास झालेल्या मानसिक शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- दयावेत. 5. तक्रारदारास न्यायिक खर्चापोटी रु.5,000/- दयावेत. 6. सामनेवालेनी पोटकलम 1 ते 3 मधील आदेशाचे पालन न केल्यास ते पूर्ण करेपर्यंत तक्रारदार सामनेवालेकडून प्रतिदिन रु.500/- प्रमाणे नुकसानी म्हणून वसुल करण्यास पात्र रहातील. 7. कलम 4 मधील रक्कम न दिल्यास तक्रारदार ती रक्कम द.सा.द.शे.8 टक्के प्रमाणे वसूल करण्यास पात्र रहातील. 8. सदर आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना पाठविण्यात याव्यात. ठिकाण- रायगड-अलिबाग. दिनांक- 15-4-2009.
(बी.एम.कानिटकर) (आर.डी.म्हेत्रस) सदस्य अध्यक्ष रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.
......................Hon'ble Shri R.D.Mhetras ......................Post vacant ......................Shri B.M.Kanitkar | |