(पारीत व्दारा श्री भास्कर बी.योगी, मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक– 23 ऑगस्ट, 2019)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्षा विरुध्द संपूर्ण मोबदल्याची रक्कम देऊनही कृषीपयोगी साहित्य रोटरी टिलर (Rotary Tiller) न पुरविल्यामुळे प्रस्तुत ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्ता हा सिमेंट विक्री व ऑटो पार्ट विक्रीचा व्यवसाय करीत असून सोबत शेतीचा व्यवसाय सुध्दा करतो. त्याला शेत नांगरणीचे कामा करीता रोटरी टिलरची आवश्यकता असल्याने त्याने विरुध्दपक्ष कृषीपयोगी अवजारे विक्रेत्याशी संपर्क साधला. विरुध्दपक्षाने त्यास दिनांक-31.05.2016 रोजी रोटरी टिलरचे कोटेशन दिले, सदर कोटेशन नुसार तक्रारकर्त्याने रोटरी टिलरची संपूर्ण रक्कम रुपये-82,250/- दिनांक-02.06.2016 रोजी कॅनरा बँक, भंडारा येथून एनएफटीव्दारे विरुध्दपक्ष नॅशनल अॅग्रो ट्रेडर्सचे बँक खात्यात जमा केली व विरुध्दपक्षाने सात दिवसात रोटरी टिलर पुरविण्याचे आश्वासन दिले. अशाप्रकारे तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष यांचे मध्ये ग्राहक विक्रेता असे संबध निर्माण झालेत. परंतु विरुध्दपक्षाशी वेळोवेळी संपर्क साधूनही आज पर्यंत रोटरी टिलर पुरविले नाही त्यामुळे तक्रारकर्त्याला शेतीची कामे दुसरी कडून भाडयाने ट्रॅक्टर आणून करावी लागत आहे. विरुध्दपक्षाने संपूर्ण किम्मत स्विकारुनही त्यास रोटरी टिलर आज पर्यंत न पुरविल्याने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला व दोषपूर्ण सेवा दिली. परिणामी तक्रारकर्त्यास आर्थिक, मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागत आहे. तक्रारकर्त्याने वकीलांचे मार्फतीने विरुध्दपक्षास दिनांक-10.08.2016 रोजीची कायदेशीर नोटीस रजिस्टर पोस्टाने पाठविली परंतु नोटीस मिळून सुध्दा विरुध्दपक्षाने कोणतीही पुर्तता केली नाही तसेच नोटीसचे उत्तर सुध्दा दिले नाही. शेवटी तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचा समोर दाखल करुन विरुध्दपक्षा विरुध्द खालील प्रकारे मागण्या केल्यात-
(01) विरुध्दपक्षाने दोषपूर्ण सेवा दिल्याने अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब केल्याचे जाहिर करण्यात यावे.
(02) विरुध्दपक्षाला आदेशित करण्यात यावे की, त्याने तक्रारर्त्याला दिनांक-31.05.2016 रोजीचे कोटेशन प्रमाणे रोटरी टिलर उपलब्ध करुन द्यावा किंवा असे करणे शक्य नसल्यास विरुध्दपक्षाने रोटरी टिलरपोटी तक्रारकर्त्या कडून स्विकारलेली संपूर्ण रक्कम रुपये-82,250/- परत करावेत आणि सदर रकमेवर ती स्विकारल्याचा दिनांक-02.06.2016 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो वार्षिक-18 टक्के दराने व्याज तक्रारकर्त्याला द्यावेत.
(03) तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-50,000/- आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-25,000/-अशा रकमा विरुध्दपक्षाने देण्याचे आदेशित व्हावे.
(04) या शिवाय योग्य ती दाद तक्रारकर्त्याचे बाजूने मंजूर करण्यात यावी.
03. विरुध्दपक्षाला ग्राहक मंचा तर्फे पाठविलेली रजिस्टर नोटीस मिळूनही तो ग्राहक मंचा समोर उपस्थित झाला नाही म्हणून त्याचे विरुध्द प्रस्तुत तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश ग्राहक मंचाव्दारे दिनांक-21.01.2019 रोजी पारीत केला. तक्रारीत नमुद केलेला पत्ता आणि नोटीस पाठविल्याचा पत्ता एक सारखा आहे. याशिवाय विरुध्दपक्षा विरुध्द एकतर्फी तक्रार चालविण्याचे ग्राहक मंचाचे आदेशाला विरुध्दपक्षाने मा.राज्य ग्राहक आयोगात कोणतेही आव्हान दिलेले नसल्याने ग्राहक मंचाचा सदर आदेश कायम आहे.
04. तक्रारकर्त्याने पान क्रं 09 वरील दस्तऐवज यादी नुसार अक्रं 01 ते 06 प्रमाणे दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात, ज्यामध्ये प्रामुख्याने कोटेशन, एनईएफटी कन्फरमेशन लेटर, विरुध्दपक्षाला पाठविलेल्या रजिस्टर नोटीसची प्रत, रजि.पोस्टाची पावती, पोच व तक्रारकर्त्याचे शेतीचा 7/12 उतारा अशा दस्तऐवजाचे प्रतींचा समावेश आहे. तक्रारकर्त्याने शपथपत्र दाखल केले. तसेच लेखी युक्तीवाद दाखल केला.
05 तक्रारकर्त्या तर्फे वकील सौ.सोनाली अवचट यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला.
06. तक्रारकर्त्याची तक्रार, शपथपत्र, लेखी युक्तीवाद तसेच त्याने दाखल केलेल्या दस्ताऐवजांचे अवलोकन ग्राहकमंचाव्दारे करण्यात आले, त्यावरुन ग्राहक मंचा समोर न्यायनिवारणार्थ खालील मुद्ये उपस्थित होतात-
अक्रं | मुद्या | उत्तर |
1 | तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचा ग्राहक होत काय? | -होय- |
2 | विरुध्दपक्षाने कोटेशन प्रमाणे रक्कम स्विकारुनही तक्रारकर्त्याला रोटरी टिलर न पुरवून अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब व दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते काय ? | -होय- |
3 | काय आदेश? | अंतिम आदेशा नुसार |
:: कारण मिमांसा ::
मुद्दा क्रं 1 व 2 -
07. तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे त्याला शेतीचे नांगरणीचे कामा करीता रोटरी टिलरची आवश्यकता असल्याने त्याने विरुध्दपक्ष विक्रेत्याशी संपर्क साधला. विरुध्दपक्ष नॅशनल अॅग्रो ट्रेडर्सने त्यास दिनांक-31.05.2016 रोजी रोटरी टिलरचे कोटेशन दिले, त्यानुसार रोटरी टिलरची संपूर्ण रक्कम रुपये-82,250/- दिनांक-02.06.2016 रोजी कॅनरा बँक, भंडारा येथून एनएफटीव्दारे विरुध्दपक्ष नॅशनल अॅग्रो ट्रेडर्सचेखात्यात जमा केली अशाप्रकारे तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्ष यांचेमध्ये ग्राहक व विक्रेता असे संबध प्रस्थापित होतात. विरुध्दपक्षाने सात दिवसात रोटरी टिलर पुरविण्याचे आश्वासन दिले. परंतु त्यानंतर वेळोवेळी संपर्क साधूनही आज पर्यंत रोटरी टिलर पुरविले नाही त्यामुळे तक्रारकर्त्याला शेतीची कामे दुसरी कडून भाडयाने ट्रॅक्टर आणून करावी लागत आहे. विरुध्दपक्षाने संपूर्ण किम्मत स्विकारुनही त्यास रोटरी टिलर आज पर्यंत न पुरविल्याने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला व दोषपूर्ण सेवा दिली म्हणून तक्रारकर्त्याने वकीलांचे मार्फतीने विरुध्दपक्ष नॅशनल अॅग्रो ट्रेडर्सला दिनांक-10.08.2016 रोजीची कायदेशीर नोटीस रजिस्टर पोस्टाने पाठविली परंतु नोटीस मिळून सुध्दा विरुध्दपक्षाने कोणतीही पुर्तता केली नाही तसेच नोटीसचे उत्तर सुध्दा दिले नाही.
08. आपले म्हणण्याचे पुराव्यार्थ तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष नॅशनल अॅग्रो ट्रेडर्स, नागपूर तर्फे त्याला दिनांक-31 मे, 2016 रोजीचे रोटरी टिलरचे कोटेशनची प्रत पान कं 10 वर दाखल केली त्यामध्ये एकूण किम्मत रुपये-82,250/- एवढी आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष नॅशनल अॅग्रो ट्रेडर्सचे बॅकेतील खाते क्रमांक-27017000003 मध्ये NEFT व्दारा दिनांक-02.06.2016 रोजी एकूण रुपये-82,250/- एवढी रक्कम वळती केल्याचे पान क्रं 11 वर दाखल ‘NEFT CONFIRM” दस्तऐवजावरुन सिध्द होते. तक्रारकर्त्याने त्याचे वकील श्री राकेश कुमार सक्सेना यांचे मार्फतीने विरुध्दपक्ष नॅशनल अॅग्रो ट्रेडर्स या नावाने दिनांक-10.08.2016 रोजीची रजिस्टर नोटीस पाठविल्या बाबत नोटीसची प्रत पान क्रं 12 वर दाखल केलेली आहे. तसेच रजिस्टर पोस्टाची पावती पान क्रं 13 वर व ती रजि. नोटीस विरुध्दपक्षाला त्याचे नागपूर येथील पत्त्यावर दिनांक-22.08.2016 रोजी मिळाल्या बाबत पोस्टाचा शिक्का तसेच विरुध्दपक्ष नॅशनल अॅग्रो ट्रेडर्स, नागपूर प्रोप्रायटर असा शिक्का असून तर्फे मोहम्मद मिया अशी सही सुध्दा नमुद आहे. पंरतु तक्रारकर्त्याने पाठविलेली रजिस्टर नोटीस प्राप्त होऊनही विरुध्दपक्षाने कोणताही प्रतिसाद दिला नाही. तक्रारकर्त्याने पान क्रं 14 वर त्याचे शेतीचा 7/12 सुध्दा दाखल केला.
09. विरुध्दपक्षाला तक्रारकर्त्याने पाठविलेली रजिस्टर नोटीस मिळून सुध्दा तसेच त्याने संपूर्ण मोबदला स्विकारुनही रोटरी टिलर दिला नाही किंवा तक्रारकर्त्या कडून स्विकारलेली रक्कम परत करण्याचा प्रयत्न केला नाही वा तक्रारकर्त्याचे नोटीसला कोणताही उत्तर दिले नाही. तसेच ग्राहक मंचाची नोटीस मिळूनही विरुध्दपक्ष ग्राहक मंचा समोर उपस्थित झालेला नाही. विरुध्दपक्षाची एकंदरीत कृती पाहता विरुध्दपक्षाने अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब करुन तक्रारकर्त्यास दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते. विरुध्दपक्षाला ग्राहक मंचाची नोटीस मिळूनही तो उपस्थित झाला नाही वा त्याने लेखी निवेदन दाखल केलेले नाही म्हणून तक्रारकर्त्याची तक्रार, शपथपत्र, दाखल दस्तऐवजाचे आधारे ही तक्रार गुणवत्तेवर (On Merit) निकाली काढण्यात येते. वरील वस्तुस्थितीचा विचार करता आणि दाखल पुरावे पाहता आम्ही मुद्या क्रं 01 व 02 चे उत्तर “ होकारार्थी” नोंदवित आहोत.
मुद्दा क्रं -3
10. विरुध्दपक्ष नॅशनल अॅग्रो ट्रेडर्सने कोटेशन नुसार रोटरी टिलरपोटी संपूर्ण रक्कम रुपये-82,250/- तक्रारकर्त्या कडून स्विकारुनही आज पर्यंत त्याला ते पुरविले नाही म्हणून विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्या कडून रोटरी टिलरपोटी स्विकारलेली रक्कम रुपये-82,250/- परत करावी आणि सदर रक्कम स्विकारल्याचा दिनांक-02.06.2016 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो वार्षिक-12 टक्के दराने व्याज तक्रारकर्त्याला द्यावे असा आदेश पारीत करणे योग्य व न्यायोचित होईल. तसेच तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक शारिरीक त्रासा बद्यल रुपये-10,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/- तक्रारकर्त्याला द्यावेत असा आदेश पारीत करणे योग्य व न्यायोचित होईल असे ग्राहक मंचाचे मत आहे.
11. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन आम्ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
:: अंतिम आदेश ::
- तक्रारकर्त्याची तक्रार विरुध्दपक्ष नॅशनल अॅग्रो ट्रेडर्स, नागपूर याचे विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष मे.नॅशनल अॅग्रो ट्रेडर्स शुक्रवारी, नागपूर याला आदेशित करण्यात येते की, त्याने तक्रारकर्त्या कडून रोटरी टिलरपोटी स्विकारलेली रक्कम रुपये-82,250/- (अक्षरी रुपये ब्याऐंशी हजार दोनशे पन्नास फक्त) तक्रारकर्त्याला परत करावी आणि सदर रक्कम स्विकारल्याचा दिनांक-02.06.2016 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो वार्षिक-12 टक्के दराने व्याज विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला द्यावे
- तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) अशा रकमा विरुध्दपक्ष मे.नॅशनल अॅग्रो ट्रेडर्स शुक्रवारी, नागपूर याने तक्रारकर्त्याला द्याव्यात.
- सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष मे.नॅशनल अॅग्रो ट्रेडर्स शुक्रवारी, नागपूर याने प्रस्तुत निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे.
- निकालपत्राच्या प्रमाणित उभय पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
- तक्रारकर्त्याला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.