उपस्थिती - उभय पक्ष स्वतः हजर आदेश (दिः15/09/2011) द्वारा श्री.एम.जी.रहाटगावकर - मा.अध्यक्ष 1. तक्रारकर्तीचे म्हणणे थोडक्यात खालील प्रमाणेः- तीने दि.27/04/2010 रोजी पावती क्र.195 अन्वये रु.15,100/- या किमतीस विरुध्द पक्षाकडुन फर्निचर विकत घेतले. यात लोखंडी कपाट - 1 नग, लाकडी शोकेस - 1 नग व लाकडी पलंग - 1 नग यांचा समावेश होता. दुकानात ज्या वस्तु विरुध्द पक्षाने तिला दाखवल्या होत्या व ज्यांच्यासाठी तीने विरुध्द पक्षाला वर प्रमाणे रक्कम अदा केली होती त्या वस्तु तीच्या घरी न पाठवता विरुध्द पक्षाने हलक्या दर्जाच्या वस्तु तीचे घरी पाठविल्या. स्टिल कपाट 18 गेजचे राहिल असे सांगितले होते प्रत्यक्षात ते 22 गेजचे आहे. कपाटाचा दरवाजा बरोबर लागत नाही. कुलुप हे दरवाज्याचे व लॉकरचे लागत नाही व हे कपाट नवीन नसुन जुने असल्याचे आढळते. .. 2 .. (तक्रार क्र. 389/2010) लाकडी शोकेस वॉटर फ्रुफ मरीन प्लायऊडचे राहिल असे सांगितले होते प्रत्यक्षात हलक्या दर्जाच्या प्लायऊड वापरुन बनवलेले पाठविण्यात आले. शोकेस देखील जुनाट असल्याचे आढळते. लाकडी पलंग वॉटर फ्रुफ व मरीन प्लायऊडचा राहिल व त्याला सॅलऊडची चौकट राहिल असे विरुध्द पक्षांनी आश्वासन दिले होते प्रत्यक्षात सामान्य दर्जाचा प्लायऊड वापरुन बनवलेला जुना व खराब अवस्थेतला पलंग विरुध्द पक्षाने पाठवला. तीचे पुढे म्हणणे असे की, उपरोक्त फर्निचर हे तीने आपल्या मुलीला तीच्या लग्नात भेट म्हणुन दिले होते मात्र त्यातील दोषामुळे मुलीच्या सासरची मंडळी तीला नावे ठेवतात व टोमणे मारतात व सतत तक्रारकर्तीस दोष देतात त्यामु्ळे तीची बदनामी झाली, मनस्ताप झाला, तसेच तीला दवाखान्यात भरती करावे लागले व मोठा खर्च सहन करणे भाग पडले. फर्निचर मधील दोषासंदर्भात विरुध्द पक्षाकडे अनेकवेळा संपर्क साधन्यात आला व तक्रार करणेत आली. मात्र विरुध्द पक्षाने कोणतीही दखल घेतली नाही. शेवटी दि.06/07/2010 रोजी वकीलामार्फत नोटिस पाठवण्यात आली. त्याचा विरुध्द पक्षाने पाठवलेला जबाब चुक व खोटा आहे. त्यामुळे प्राथनेत नमुद केल्याप्रमाणे 18% व्याजासह रु.15,100/- रक्कम परत मिळावी. दोषपुर्ण फर्निचर बदलुन मिळावे तसेच रु.50,000/- नुकसान भरपाई व रु.10,000/- खर्च मिळावा अशी तीची मागणी आहे. निशाणी 2 अन्वये तक्रारीचे समर्थनार्थ प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे तसेच दि.27/04/2010 रोजी विरुध्द पक्षाने दिलेली रु.15,100/- ची पावती जोडण्यात आली. तसेच विरुध्द पक्षाला दि.06/07/2010 रोजी पाठवलेली नोटिस व विरुध्द पक्षाने पाठवलेला नोटिसचा जबाब यांच्या प्रती दाखल करण्यात आल्या. 2. विरुध्द पक्षाने निशाणी 5 अन्वये आपला लेखी जबाब दाखल केला. त्यांचे म्हणणे थोडक्यात खालील प्रमाणे आहे. तक्रार संपुर्णपणे खोटी असुन तक्रारदाराचे आरोप निराधार असल्याने अमान्य आहे. तक्रारकर्तीने स्वतः प्रत्यक्ष पहाणी करुन तसेच जे साहित्य वस्तु बनवण्यासाठी वापरण्यात आले होते त्याची देखील तपासणी केल्यानंतर हरकत घेतली नव्हती अथवा त्यातील कथीत दोषासंदर्भात तक्रार देखील केली नव्हती. या साहित्याची कोणतीही हमी दिलेली नव्हती व तसा स्पष्ट उल्लेख बिलामध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे सदर खोटी तक्रार मंचाने खर्चासह खारीज करावी. .. 3 .. (तक्रार क्र. 389/2010) निशाणी 6 अन्व्ये जबाबाचे समर्थनार्थ त्यांनी आपले प्रतिज्ञापत्र दाखल केले. तक्रारकर्तीने निशाणी 9 अन्वये आपले प्रतीउत्तर सादर केले 3. अंतिम सुनावणीचे वेळेस मंचाने हजर असणा-या तक्रारकर्तीचे म्हणणे ऐकुण घेतले उभय पक्षाचे युक्तीवाद विचारात घेण्यात आले, तसेच कागदपत्रांचे अवलोकन करण्यात आले. त्या आधारे खालील मुद्दांचा प्रामुख्याने विचार करणेत आला. मुद्दा क्र. 1 - वादग्रस्त फर्निचर दोषपुर्ण आहे काय? उत्तर - सिद्ध झालेले नाही. मुद्दा क्र. 2 - तक्रारकर्ती परतावा रक्कम, नुकसान भरपाई व खर्च मिळणेस पात्र आहे काय? उत्तर - नाही. स्पष्टिकरण मुद्दा क्र. 1 - मुद्दा क्र. 1 चे संदर्भात विचार केला असता असे आढळते की, तक्रारकर्तीने विरुध्द पक्षाकडुन दि.27/04/2010 रोजी रु.15,100/- या रकमेस विकत घेतलेल्या तीन वस्तु लोखंडी कपाट, लाकडी शोकेस व लाकडी पलंग यात तक्रारकर्तीने तक्रारीत नमुद केलेले दोष आहेत ही बाब सिद्ध करण्यासाठी कोणताही पुरावा समोर आणलेले नाही. पुराव्याअभावी तक्रारकर्तीचे कथन मान्य करता येत नाही. दुसरा महत्वाचा भाग असा की, जे साहित्य व जो दर्जा विरुध्द पक्षाने वस्तु दाखवतांना कबुल केला होता तो दर्जा त्या साहित्य व वस्तुंचा नव्हता हे तक्रारकर्तीचे म्हणणे गृहीत धरल्यास तीने वस्तु तब्यात घेतांना ताबडतोब त्याप्रमाणे लेखी तक्रार विरुध्द पक्षाकडे नोंदवणे आवश्यक होते. प्रत्यक्षात दि.27/04/2010 रोजी वस्तु विकत घेतल्या मात्र दि.06/07/2010 रोजी जवळपास 2 महिन्यानंतर विरुध्द पक्षाकडे नोटिस पाठवल्याचे आढळते. तीसरा महत्वाचा भाग असा की, जे बिल तक्रारीसोबत तीने दाखल केलेले आहे त्यात कोणत्या साहित्याचा वापर केला जाणार आहे याचा कोणताही उल्लेख नाही. केवळ 6 x 4 कपाट, शोकेस, 6 x 4 पलंग ऐवढाच उल्लेख त्यात आहे. या सर्व बाबींचा मंचाने विचार केला असता वादग्रस्त फर्निचरमध्ये दोष आहे ही बाबही तक्रारकर्तीला सिद्ध करता आली नाही असे मंचाला आढळते. .. 4 .. (तक्रार क्र. 389/2010) स्पष्टिकरण मुद्दा क्र 2 - मु्द्दा क्र. 2 चे संदर्भात मंचाचे मत असे की, दोषपुर्ण फर्निचर विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीस विकले हा आक्षेप तक्रारकर्ती पुराव्याच्या आधारे सिद्ध करुन न शकल्याने ती विरुध्द पक्षाकडुन कोणताही परतावा, नुकसान भरपाई व खर्च मिळणेस पात्र नाही. 4. सबब अंतीम आदेश पारित करण्यात येतो- आदेश 1. तक्रार क्र. 389/2010 नामंजुर करण्यात येते. 2. खर्चाचे वहन उभय पक्षांनी स्वतः करावे.
| [ HON'BLE MRS. JYOTI IYER] MEMBER[ HON'BLE MR. M.G. RAHATGAONKAR] PRESIDENT | |