(आदेश पारीत द्वारा- श्रीमती जयश्री येंडे, मा.सदस्या)
-/// आ दे श ///-
(पारीत दिनांक – 12 मार्च, 2012)
तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तूत तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे.
प्रस्तूत प्रकरणातील तक्रारदाराचे म्हणण्यानुसार तक्रारदाराने गैरअर्जदार नं.1 यांनी दिलेल्या जाहीरातीला प्रतिसाद देऊन गैरअर्जदार नं.1 निर्मित फियाट लिनीया इमोशन पॅक, युरो—4 हे वाहन एकूण रक्कम रूपये 8,74,775/- (सर्व करासहित) एवढ्या मोबदल्यात गैरअर्जदार नं.1 यांचे अधिकृत विक्रेता गैरअर्जदार नं.2 यांचेकडून दिनांक 24/6/2010 रोजी खरेदी केले होते. त्याचा चेचीस नंबर MCA11071B09018 108ENZ व इंजिन नंबर 0085600 हा होता. सदर वाहन खरेदी केल्याचे दुसरे दिवशी म्हणजेच दिनांक 25/6/2010 रोजी तक्रारदारास सदर वाहनाच्या मागच्या सीटखाली पाय ठेवण्याचे जागेवर काचेचे तुकडे आढळून आले. सदर तुकडे मागच्या सिटखाली असल्याने वाहनाची खरेदी करतेवेळी दिसून आले नाही. तसेच गैरअर्जदार ही प्रतिष्ठीत कंपनी असल्यामुळे सदर वाहनाचे बारकाईने निरीक्षण करण्यात आले नाही. सदर बाबीसंबंधात तक्रारदाराने गैरअर्जदार नं.2 यांचेशी संपर्क साधून त्यांचेकडे तक्रार नोंदविली. गैरअर्जदार नं.2 यांनी केलेल्या सूचनेवरून त्यांच्या वर्कशाप मधील श्री राव यांनी सदर वाहनाची तपासणी केली असता एक किलोपेक्षा जास्त काचेचे तुकडे सिटखाली होते. तसेच वाहनाच्या चौकटीच्या उजव्या बाजूला समोरचे मुख्य पोलचे व मागच्या पोलचे सुध्दा नुकसान झालेले आहे व त्यास पुन्हा पेंट मारण्यात आलेला आहे. गैरअर्जदार नं.2 यांनी सदरील बाब गैरअर्जदार नं.1 यांचे व्यवस्थापकाला कळविली व हेही सांगीतले की, सदर वाहनाची तपासणी तज्ञाकडून केली असता वाहन अपघातग्रस्त असून पुन्हा रंगरंगोटी करून तक्रारदारास विकण्यात आले आहे. त्यानंतर गैरअर्जदार नं.1 यांच्या तज्ञाद्वारे सदर वाहानाची पुन्हा तपासणी करण्यात आली व ही बाब मान्य करण्यात आली की, सदर वाहन अपघातग्रस्त आहे. तसेच वाहनाच्या उजव्या बाजूचे मुख्य पोल व मागच्या बाजूचे मुख्य पोल यांचे नुकसान झालेले आहे व ज्यावर वाहनाची संपूर्ण बांधणी केली जाते. वाहनाचा सदर पोल केंव्हाही तुटून अपघात होऊ शकतो व असे नुकसान फक्त अपघातातच होते. सदर वाहनाचे नुकसान गैरअर्जदार नं.1 यांच्या कारखान्यात झालेले आहे व त्यावर पुन्हा पेंट मारण्याचे काम गैरअर्जदार नं.1 यांचे कारखान्यात झाल्याचे गैरअर्जदार नं.2 यांनी मान्य केले आहे.
तक्रारदाराने सदर बाबींची माहिती फोनद्वारे श्री बालाजी यांना दिली, तसेच फियाट इंडीयाचे प्रमुख व्यवस्थापक श्री दिलीप राव यांनाही दिली असता त्यांनी सदर वाहन दिनांक 6/7/2010 रोजी बदलवून देण्याचे, तसेच नवीन वाहनाचे नोंदणी व करापोटी जो खर्च येईल तो खर्च करण्याचे देखील आश्वासन दिले, परंतू अद्यापही त्यांनी सदर आश्वासनाची पूर्तता केली नाही. गैरअर्जदार यांनी तक्रारदारास सदर अपघातग्रस्त वाहन, नवीन आहे असे भासवून विकण्याची कृती ही त्यांनी तक्रारदारास दिलेल्या सेवेतील कमतरता आहे. म्हणुन तक्रारदाराने ही तक्रार मंचासमक्ष दाखल केली असून, तीद्वारे गैरअर्जदार नं.1 व 2 यांना फियाट लिनीया इमोशन पॅक, युरो—4 हे वाहन आणि त्यावरील नोंदणी व इतर खर्चासह तक्रारदारास देण्याचा आदेश व्हावा, तसेच आर्थिक व मानसिक त्रासापोटी रूपये 1 लक्ष 18% व्याजासह परत मिळावे आणि न्यायालयीन खर्च रूपये 25,000/- मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत.
तक्रारदाराने सदर तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केलेली असून, सोबत टॅक्स इन्व्हाईस, नोंदणी प्रमाणपत्र, टॅक्सेशन प्रमाणपत्र, वाहन क्षतीग्रस्त भागाच्या फोटोकॉपी इत्यादी दस्तऐवज मंचासमक्ष दाखल केलेले आहेत.
सदर प्रकरणात गैरअर्जदार यांना मंचातर्फे नोटीस बजाविण्यात आल्या, त्यावरुन हजर होऊन त्यांनी आपापले लेखी जबाब मंचासमक्ष दाखल केलेल आहेत.
गैरअर्जदार नं.1 यांचे कथनानुसार गैरअर्जदार यांना सदर प्रकरणात विनाकारण सामील करण्यात आलेले आहे. गैरअर्जदार हे सदर प्रकरणी वादातित कार म्हणजेच फियाट लिनिया (इमोशन पॅक) युरो—4, चेचीस नं.एमसीए 11071 बी 0918108 एनझेड व इंजिन नं. 0085600 या वाहनाचे केवळ उत्पादक आहेत आणि या तक्रारीशी त्यांचा कुठलाही संबंध येत नाही. गैरअर्जदार नं.2 हे फियाट इंडीया ऑटोमोबाईल लिमिटेडचे विक्रेते नसून ते टाटा मोटर्स लिमिटेडचे विक्रेते आहेत. वादातित कार ही टाटा मोटर्स लिमिटेड यांचेकडे वितरणाकरीता विकण्यात आली. गैरअर्जदार नं.2 यांनी वादातित कार ही फियाट इंडीया ऑटोमोबाईल लिमिटेड यांचेकडून खरेदी न करता टाटा मोटर्स लिमिटेड यांचेकडून खरेदी केलेली होती. गैरअर्जदार नं.1 यांचे टाटा मोटर्स लिमिटेड यांचेसोबत झालेले सर्व व्यवहार व देवाणघेवाण ही ‘principal to principal’ या तत्वावर आधारीत आहे.
वास्तविक सदर वाहन गैरअर्जदार नं.1 यांचेद्वारा तक्रारदाराला विकण्यात आलेले नाही. गैरअर्जदार नं.1 हे मोटार कार्सचे प्रतिष्ठित उत्पादक असून ‘ISO 9000:2008’ प्रमाणित आहेत व कडक अभिसंगती प्रक्रियांचे पालन करीतात. गैरअर्जदार नं.1 निर्मीत सर्व कार्स काळजीपूर्वक तपासणीतून जात असतात आणि त्यांचे प्रदान टाटा मोटर्स लिमिटेड यांना करण्यापूर्वी ओके सर्टिफिकेट देण्याआधी निरीक्षणाची मालीका पूर्ण करण्यात येते. तसेच फॅक्टरी गेटवर वाहनाची डिलीव्हरी घेतेवळेस वाहनाच्या स्थितीबाबत संपूर्ण निरीक्षण रितसर प्रमाणित केल्यानंतर टाटा मोटर्स लिमिटेड मार्फत वाहनांची डिलीव्हरी घेण्यात येते. म्हणुन एकदा वाहनाची डिलीव्हरी दिल्यानंतर पुढील होणारी कोणतिही हालचाल, वाहतूक, ट्रान्सशिपमेंट या दरम्यान किंवा त्यानंतर होणा-या कोणत्याही किंवा संपूर्ण अनुषंगिक नुकसानीकरीता गैरअर्जदार नं.1 यांना जबाबदार धण्यात येऊ नये. तसेच सदर वाहनात कोणताही उत्पादकिय दोष असल्याचे तक्रारदाराचे अभिकथन नाही.
वरील सर्व बाबी लक्षात घेता, गैरअर्जदार नं.1 यांना विनाकारण या प्रकरणात सामील करण्यात आले असून त्यांचा या प्रकरणात कोणताही दोष नाही. म्हणुन सदर तक्रार त्यांचेविरुध्द खारीज करण्यात यावी अशी त्यांनी विनंती केली आहे.
गैरअर्जदार नं.2 यांनी तक्रारदाराने सदरचे वाहन चेचीस नबर MCA 11071 B090810ENZ, इंजिन नंबर 0085600, नोंदणी क्रमांक MH31 DH 3000 गैरअर्जदार नं.2 यांचेकडून रूपये 8,74,775/- एवढ्या किंमतीत दिनांक 24/6/2010 रोजी खरेदी केल्याचे तक्रारदाराचे म्हणणे मान्य केलेले आहे, परंतू तक्रारदाराचे इतर आरोप अमान्य केले आहेत.
गैरअर्जदार यांच्या कथनानुसार दिनांक 25/6/2010 रोजी तक्रारदार सदरचे वाहन गाडीचे मागील तट स्पेसमध्ये काचेचे काही तुकडे आढळले म्हणुन घेऊन आला ही नक्कीच गाडीच्या PRE-DELIVERY INSPECTION मध्ये राहिलेली त्रुटी आहे, परंतू वाहनाच्या मुख्य व मागच्या पोलचे नुकसान झाल्याचे व त्यावर पुन्हा पेंट मारल्याचे तक्रारदाराचे म्हणणे खोटे आहे. तसेच गैरअर्जदार यांचेकडे श्री राव या नावाचे गृहस्थ काम करीत नाहीत. मागील पिलरवरील रंग ‘Soft’ होता व त्यावर नखांचे ओरखडे परीक्षण करताना आढळले व तकारदाराच्या आग्रहावरून सदरची बाब गैरअर्जदार नं.1 यांना दूरध्वनीद्वारे कळविण्यात आली.
वास्तविक गैरअर्जदार नं.1 यांचेकडून आलेल्या किमतीतच वाहन विकण्यात आले. सदरचे वाहन अपघातग्रस्त असते तर ते विकण्यात आले नसते. सदर वाहन उत्तम स्थितीत आहे व त्यात कुठलाही तांत्रिक किंवा इतर दोष नाही. गैरअर्जदार नं.2 हे अधिकृत विक्रेता या नात्याने उत्पादक आणि ग्राहक यातील मध्यस्ताची भूमिका पार पाडतात, आणि जर समजा उत्पादनामध्ये दोष आहे असे गृहित धरले तर ती बाब उत्पादक सोडवू शकतो. सदर तक्रार कुठल्याही तांत्रिक मतावर आधारीत नाही. सदरचे प्रकरण निवारणाकरीता ऑटोमोबील एक्सपर्ट यांचेकडे देणे योग्य होईल.
वरील सर्व बाबी लक्षात घेता, गैरअर्जदार यांनी दिलेल्या सेवेत कोणतीही कमतरता नाही म्हणुन सदरची तक्रार त्यांचेविरुध्द खारीज करण्यात यावी अशी विनंती गैरअर्जदार यांनी केलेली आहे.
// का र ण मि मां सा //
. प्रस्तूत प्रकरणातील एकंदर वस्तूस्थिती पाहता या मंचाच्या असे निदर्शनास येते की, निर्विवादपणे तक्रारदाराने गैरअर्जदार नं.1 यांनी उत्पादित केलेले फियाट लिनीया इमोशन पॅक, युरो—4, चेचीस नं. MCA11071B09018 108ENZ व इंजिन नं. 0085600 हे वाहन गैरअर्जदार नं.1 यांचे अधिकृत विक्रेता गैरअर्जदार नं.2 यांचेकडून दिनांक 24/6/2010 रोजी रूपये 8,74,775/- एवढ्या मोबदल्यात खरेदी केलेले होते.
तक्रारदाराचे मते सदरचे वाहन अपघातग्रस्त होते. सदरचे वाहनात दुस-याच दिवशी म्हणजेच दिनांक 26/6/2010 रोजी वाहनाचे सिटखाली पाय ठेवण्याचे जागेवर एक किलो काचेचे तुकडे आढळून आले. तसेच सदर वाहनाची तपासणी केली असता, वाहनाच्या चौकटीच्या उजव्या बाजूला समोरच्या मुख्य पोलचे व मागच्या पोलचे नुकसान झाले व त्यास पुन्हा पेंट मारण्यात आल्याचे आढळले.
सदरचे वाहन अपघातग्रस्त आहे का ? व त्यात तक्रारदाराने नमूद केलेले दोष आहेत काय ? हे पाहण्यासाठी मंचाने कमीश्नर म्हणुन प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर त्यांची नियुक्ती केली व त्यांनी दिनांक 11/4/2011 रोजी दिलेल्या अहवालात असे नमूद केले आहे की, ‘वाहनाचे समोरील मुख्य पिलर तुटलेले आढळले नाही. त्यावरील पेंट सुध्दा व्यवस्थित होता. तसेच वाहनाच्या मागच्या बाजूचे मुख्य पोलची उजव्या आणि डाव्या बाजूने, आतील upholstery काढून बारकाईने तपासणी केली असता, दोन्हीही पोल आतून क्षतिग्रस्त झालेले किंवा दुरूस्त आढळले नाहीत.’ सदरचा अहवाल कमीश्नर यांनी तक्रारदाराच्या उपस्थितीत वाहनाची पूर्ण तपासणी करुन देण्यात आलेला असल्यामुळे तो ग्राह्य धरणे योग्य होईल. सदरचे वाहन क्षतिग्रस्त झालेले नव्हते या निष्कर्षापर्यंत हे मंच येते. परंतू त्याचबरोबर सदर अहवालात असे देखील नमूद केले आहे की, ‘परंतू वाहनाचे मागील भागात उजव्या बाजूच्या साईड पॅनल फ्रेममधील Paint (Rear-RH panal फ्यूएल टँक इनटेकचा भाग) मध्ये फरक जाणवला. त्यामध्ये सदर भाग परत पेंट केला असल्याची वरील बाजूने शक्यता जाणवली. डिक्की उघडून आतील बाजूने साईड फ्रेम पॅनल (उजव्या बाजूचे मागील) चेक केले असता क्षतीग्रस्त किंवा दुरूस्त केले असल्याचे आढळले नाही. डिक्कीच्या आधारासाठी दिलेल्या उजव्या हिंग जवळ साईड पॅनल rear RH paint उखडत असत्याचे आढळले.’
गैरअर्जदार नं.2 यांच्या जबाबात देखील मागील पिल्लरवरील रंग ‘Soft’ होता व त्यावर नखांचे ओरखडे परीक्षण करताना आढळले असे नमूद केले आहे. ही बाब वाहन खरेदी केले त्याच्या दुस-याच दिवशी आढळून आलेली आहे. या बाबी लक्षात घेता, गैरअर्जदार यांनी गुणवत्तेमध्ये कमतरता कमी असलेले वाहन तक्रारदारास विकून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येते. तसेच सदर वाहनात मागील तट स्पेसमध्ये काही काचेचे तुकडे आढळले ही बाब गैरअर्जदार नं.2 यांनी देखील मान्य केलेली आहे. तसेच ही Pre Delivery inspection मध्ये राहिलेली चूक आहे असे सांगून गैरअर्जदार नं.2 यांनी कंपनी म्हणुन आपली जबाबदारी टाळणे संयुक्तिक वाटत नाही. म्हणजेच गैरअर्जदार यांच्यासारख्या नामांकित कंपनी व विक्रेत्याकडून सदर चूकीची अपेक्षा करता येणार नाही. एवढी मोठी किंमत दिल्यानंतर नवीन घेतलल्या वाहनामध्ये दोष आढळले, मग ते कितीही लहान असोत, त्यामुळे ग्राहकाला नाराजी व मानसिक ताप होतो व अशा ग्राहकाची व्यथा ग्राहक मंच समजू शकते.
वरील वस्तूस्थिती आणि परीस्थिती पाहता हे मंच अशा निष्कर्षाप्रत येते की, गैरअर्जदार यांनी कमी गुणवत्ता असलेले वाहन विकून निश्चितच सेवेतील कमतरता दिली आहे व त्यासाठी ते तक्रारदाराच्या नुकसान भरपाईस व मानसिक त्रास यासाठी जबाबदार आहेत. गैरअर्जदार कंपनीचा व्यावसायाचा व्याप बघता व त्यांचेकडून झालेला निष्काळजीपणा बघता, तक्रारदारास रूपये 50,000/- एवढी रक्कम नुकसान भरपाई व मानसिक त्रासाबाबत देणे न्यायोचित होईल असे मंचाचे मत आहे.
गैरअर्जदार न.1 ही सदर वाहनाची उत्पादक कंपनी आहे व गैरअर्जदार नं.2 हे सदर कंपनीचे अधिकृत विक्रेते आहेत ही बाब गैरअर्जदार नं.2 यांनी आपल्या जबाबात मान्य केलेली आहे. त्यामुळे टाटा कंपनीला पक्षकार केले नाही, म्हणुन सदरची तक्रार खारीज करण्यात यावी ही गैरअर्जदार नं.1 यांची मागणी या मंचाला मान्य नाही.
गैरअर्जदार यांनी सादर केलेल्या निवाड्यांमधील वस्तूस्थिती व या तक्रारीतील वस्तूस्थिती ही वेगळी असल्यामुळे सदर निवाडे विचारात घेणे योग्य होणार नाही. सबब हे मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
-/// अं ती म आ दे श ///-
1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) गैरअर्जदार नं.1 व 2 यांनी वैयक्तिक वा सयुंक्तिकरित्या तक्रारदारास नुकसान भरपाई करीता रूपये 50,000/- (रूपये पन्नास हजार फक्त) द्यावेत.
3) गैरअर्जदार नं.1 व 2 यांनी वैयक्तिक वा सयुंक्तिकरित्या तक्रारदारास मानसिक व शारीरिक त्रासापोटी रूपये 10,000/- आणि तक्रारीचे खर्चाबाबत रूपये 5,000/- याप्रमाणे एकंदरीत रुपये 15,000/- (रूपये पंधरा हजार फक्त) एवढी रक्कम द्यावी.
गैरअर्जदार नं.1 व 2 यांनी उपरोक्त आदेशाचे पालन त्यांना आदेशाची प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून एक महिन्याचे आत करावे.