::: नि का ल प ञ ::: (मंचाचे निर्णयान्वये,अधि.वर्षा जामदार,मा.सदस्या) (पारीत दिनांक : 23.02.2012) 1. अर्जदाराने, प्रस्तुत तक्रार ग्राहक सरंक्षण कायद्याचे कलम 12 व 14 अन्वये दाखल केली आहे. अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
2. अर्जदार हे 73 वर्षाचे आहे व ते भागयश्री नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांना वारंवार बँकेत ये-जा करण्यासाठी दोन चाकी वाहनाची गरज होती. वयोमाना नुसार त्यांनी सेल्फस्टार्ट लाईट दोन चाकी वाहन घेण्याचे ठरविले. गै.अ.क्रं. 1 यांनी जाहीरात देवून अपंग, जेष्ठनागरीक व इतर नागरीकांसाठी सेल्फ स्टार्ट टू व्हिलर बनविली. अर्जदाराने दि.04/09/2010 ला गै.अ. क्रं. 1 चे अधिकृत विक्रेते गै.अ.क्रं. 2 यांचे कडून रु.34,392/- ला M – KINE मॉडेलची गाडी खरेदी केली. सदर वाहनाची नोंद क्षेञिय परिवहन कार्यालय चंद्रपूर येथे करण्यात आली. सदर वाहनाचा वारंटी क्रं. 23/557 असुन त्याचा वारंटी कालावधी दि.06/09/2010 ते दि.05/09/2011 पर्यंत आहे. वरील उल्लेख केलेल्या दुचाकी वाहनाचा आर.टी.ओ. रजि.नं. MH – 34 – AD- 6312, JC No. 1267 हा आहे. अर्जदाराने खरेदी केलेल्या वाहनाच्या खरेदीनंतर तिन महिन्याच्या आत सेल्फ स्टार्ट बटन काम करेनाशी झाली. जेष्ठ नागरीक म्हणून अर्जदाराला दुचाकी वाहन सुरु करण्यासाठी किक मारणे कठिण काम होते. तसेच दुचाकी वाहनाची किक नादुरुस्त झाली म्हणून अर्जदाराने विनोद कामडी, श्री.अनंत अमृतकर व नरेश सदनपवार यांचे मार्फत पाच – सात वेळा वाहन चंद्रपूरला गै.अ.क्रं. 2 कडे दुरुस्तीला पाठविले. अर्जदाराला नवरगाव ते चंद्रपूर दोन – तिन वेळचे भाडे रु.600/- लागले व पेट्रोल 3 लिटर रु.150/- प्रमाणे 3 वेळा 450/- रु.लागले. ज्या व्यक्तीला पाठविले त्याचा मेहताना, जाणे-येणे रु.300/- प्रत्येक वेळा अर्जदाराला खर्च करावे लागले. अर्जदार स्वतः तिन वेळा गै.अ.क्रं.2 च्या वर्कशॉप मध्ये वाहन दुरुस्ती करिता चार चाकी वाहनाने आले. त्यामुळे प्रत्येक वेळी खर्च 2150/- प्रमाणे 6550/- रु. आला. अशा प्रकारे अर्जदाराला दुचाकी वाहन दुरुस्ती करण्यासाठी रु.7,000/- ते 8,000/- खर्च आला. अर्जदाराने गै.अ.क्रं.2 कडे अनेकवेळा गाडी दुरुस्त करुनही ती दुरुस्त न झाल्यामुळे दि.31/05/2011 ला गै.अ.ला पञ पाठविले. त्यावर गै.अ.क्रं.2 ने दि.01/06/2011 ला अर्जदाराला पञ पाठवून गाडी दुरुस्त करुन देण्याची हमी दिली. त्यानुसार अर्जदाराने गाडी दुरुस्ती करिता गै.अ.क्रं.2 च्या वर्कशॉप मध्ये पाठविली. दोन दिवसानतर अर्जदाराने गाडी घेवून येण्यास भाग्यश्री पंतसंस्थेच्या कर्मचा-यास पाठविले असता गाडी वर्कशॉपच्या बाहेरच बंद पडली त्यामुळे ती गाडी लगेचच पुन्हा गै.अ.क्रं.2 कडे वापस ठेवली. परंतु गै.अ.क्रं.2 ने गाडी दुरुस्ती करुन दिली नाही म्हणून दि.25/06/2011 रोजी गै.अ.क्रं.1 व 2 यांना नोटीस पाठविला. गै.अ.क्रं.2 ने दि.01/07/2011 व दि.08/07/2011 ला अर्जदाराला संदिग्ध स्वरुपाचे पञ पाठवून गाडी दुरुस्त झाल्याचे कळविले, व गाडी घेवून जाण्यास सांगितले. अर्जदाराने गाडी नेल्यावर ती गाडी लगेचच बंद पडत असे. दि.15/07/2011 ला गै.अ. कडून गाडी घेवून जात असतांना चंद्रपूर, मूल रोडवर जानाळा येथे गाडी बंद पडली. तरी ती गाडी चोक देवून- देवून मूल पर्यंत आणण्यात आली. अर्जदाराने गै.अ.क्रं.2 यांच्याशी फोनवर झालेल्या बोलण्यानुसार मूलचे सबडिलर श्री.संजय हेडाऊ अथर्व मोटर्स मूल, यांच्याकडे गाडी दुरुस्तीसाठी दिली. अर्जदाराने वाहन दुरुस्तीसाठी भाग्यश्री सहकारी पतसंस्थेचे कर्मचारी श्री.नरेश सदनपवार यांचे मार्फत गै.अ. कडे दोन-तिन वेळा लेखीतक्रार दिली. परंतु गै.अ.ने तक्रार घेण्यास नकार दिला. दि.30/07/2011 ला गै.अ.ने पञ पाठवून अर्जदाराला गाडी घेवून जाण्यास कळविले असता ती गाडी पुन्हा बंद पडली. तेव्हा पासुन अर्जदाराने ती गाडी गै.अ.क्रं.2 कडे ठेवली आहे, व अद्यापही पूर्णपणे दुरुस्त करुन अर्जदाराला गाडी मिळालेली नाही. अर्जदार हे जेष्ठ नागरिक असून भाग्यश्री नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांना कामानिमीत्त जवळपासच्या गावी जाणे-येणे करावे लागते. परंतु अर्जदाराने घेतलेली गाडी खरेदीच्या काही दिवसातच ञास देवू लागली. गै.अ.क्रं.1 व 2 ने जे दोन चाकी वाहन अर्जदाराला विक्री केले ते मॉडेल हलक्या प्रतिचे असल्यामुळे लगेचच खराब झाले. गै.अ.नी अर्जदाराला योग्य सेवा दिली नाही आणि गाडीही पूर्णपणे दुरुस्त करुन दिली नाही त्यामुळे अर्जदाराला गाडीचा उपयोग करता आला नाही. अर्जदाराने सदर तक्रार गै.अ.विरुध्द दाखल करुन नवीन वाहन अर्जदाराच्या वाहनाशी बदलवून देण्यात यावे अथवा अर्जदाराने घेतलेल्या वाहनाची पूर्ण किंमत 34,392/- रु. अर्जदाराने परत करावे असा आदेश गै.अ.विरुध्द व्हावा अशी मागणी केलेली आहे. तसेच अर्जदाराला गाडी दुरुस्तीसाठी आलेला खर्च रु.10,000/- आणि मानसीक ञासाबद्दल रु.60,000/- अर्जदाराला दयावे असा आदेश गै.अ.विरुध्द व्हावा ही सुध्दा मागणी अर्जदाराने केली आहे. अर्जदाराने आपल्या तक्रारीसोबत नि. 4 नुसार 13 दस्ताऐवज दाखल केलेले आहेत. 3. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गै.अ.विरुध्द नोटीस काढण्यात आले. गै.अ.क्रं.1 ने नि. 16 नुसार व गै.अ.क्रं.2 ने नि.12 नुसार आपले लेखीउत्तर दाखल केलेले आहेत. गै.अ.नी अर्जदाराच्या तक्रारीतले संपूर्ण कथन अमान्य केले आहे. गै.अ.च्या म्हणणेनुसार अर्जदार हे तांञिकदृष्टया अपरिपक्व असल्याने जॉबकार्ड व अर्जदाराच्या प्रतिनिधीनी लिहून दिलेल्या पञावरुन लक्षात येते. अर्जदाराने ओनर्स मॅन्युअल मध्ये दिलेल्या सुचना नुसार विहीत कालावधीमध्ये किंवा विहीत किलोमिटर रंनिंग नुसार वाहनाचे सर्व्हिसींग केले नाही. आवश्यक किलोमिटर रंनिंग होत नव्हती म्हणून बॅटरी डिस्चार्ज होत होती. व सेल्फस्टार्ट उचलल्या जात नव्हते. अर्जदार याच्या वाहनामध्ये पेट्रोलसोबत विहीत माञेत जे ऑईल टाकावयाचे पाहिजे ते टाकत नव्हते. त्यावेळी इंजिन वेळोवेळी बंद पडण्यास कारणीभूत होत होते. गाडी नादुरुस्त अर्जदाराच्या स्वतःच्या चुकीमुळे होत होती. यामध्ये गै.अ.नी सेवा पुरविण्यास कोणतीही ञुटी केलेली नाही. अर्जदाराच्या आवश्यकतेनुसार त्याचे वादातील वाहन योग्य प्रकारे दुरुस्त करुन दिल्या गेलेले आहे. अर्जदाराचे वाहन दुरुस्त झाल्यानंतरही व त्याला तसे अवगत केल्यानंतरही गै.अ.चे कार्यशाळेत दि.24/08/2011 रोजी वाहन आणून ठेवलेले आहे. ते निष्कारण गै.अ. ना सांभाळावे लागत आहे. त्यासाठी अर्जदार रु. 50/- प्रति दिवस प्रमाणे दि.24/08/2011 पासुन अर्जदार त्याचे वाहन नेईपर्यंत गै.अ.च्या कार्यशाळेत ठेवण्याचा किराया देण्यास जबाबदार आहे. अर्जदाराने वाहनाची टेस्ट ड्राईव्ह घेवून त्याचे वाहन गै.अ.क्रं.2 चे कार्यशाळेमधून घेवून जावे. गाडीच्या प्रतिबाबत कोणतेही विधान तंज्ञाच्या प्रमाणपञा शिवाय बेजबाबदारपणाचे आहे. गाडीच्या उत्पादनात दोष असल्याचे अर्जदाराचे कथन कोणत्याही ठोस पुराव्या अभावी अमान्य आहे. त्यामुळे अर्जदाराची तक्रार दंडांर्ह रकमेसह खारीज होण्यास पाञ आहे. गै.अ.क्रं.2 ने आपल्या उत्तरासोबत नि. 13 नुसार 22 दस्ताऐवज दाखल केलेले आहेत. 4. अर्जदाराने नि. 23 नुसार आपले शपथपञ व नि. 24 नुसार अर्जदारातर्फे साक्षदाराचे शपथपञ दाखल केले. गै.अ.क्रं.2 ने नि. 25 नुसार व साक्षदाराचे शपथपञ नि. 26 नुसार दाखल केलेले आहेत. गै.अ.क्रं.1 ने नि. 30 नुसार दाखल केलेला लेखीयुक्तीवाद, अर्जदार व गै.अ.क्रं.2 चे वकीलांनी केलेला तोडीयुक्तीवाद, दाखल दस्ताऐवजावरुन खालील कारणे व निष्कर्ष काढण्यात येत आहे. // कारणे व निष्कर्ष // 5. अर्जदार हे वरिष्ठ नागरिक असुन त्यांनी त्यांच्या वयाला व शारिरीक क्षमतेला योग्य होईल या उद्देशाने दि.06/09/2010 ला रु.34,392/-ला M-KINE ही सेल्फ स्टार्ट होणरी गाडी खरेदी केली. दि.23/09/2010 ला अर्जदाराचे वाहन 136 किलोमिटर चालले होते. त्यामध्ये सेल्फ स्टार्ट सह इतर ञास सुरु झाल्यामुळे अर्जदाराने सदर वाहन हे गै.अ.क्रं.2 कडे दुरुस्तीला दिले. गै.अ.क्रं.1 च्या पुस्तिकेनुसार 45 दिवस किंवा 500 ते 750 किलोमिटर चालल्यावर प्रथम मोफत सर्व्हिसींग करायला हवी. परंतु अर्जदाराच्या वाहनाला फक्त 17 – 18 दिवसातच दुरुस्तीची गरज पडली म्हणून अर्जदाराने वाहन गै.अ.क्रं.2 कडे नि.13 ब- 1 प्रमाणे दुरुस्तीसाठी दिले. त्यानंतर फक्त 26 दिवसानंतर लगेच दुरुस्तीसाठी दयावे लागले. अर्जदाराने दि. 19/10/2010 रोजी 110 दिवस पूर्ण होण्यापूर्वीच वाहन गै.अ.क्रं.2 कडे दुरुस्तीसाठी गै.अ.कडे नेले व पुन्हा पूर्वीच्याच असलेल्या तक्रारीबाबत सांगितले. परंतु त्यानंतरही अर्जदाराचा ञास कमी झाला नाही. त्यामुळे नि. 13 ब- 3 प्रमाणे दि.16/11/2010 रोजी, दि.14/12/2010 रोजी नि. 13 ब- 4 प्रमाणे, नि. 13 ब 5 प्रमाणे दि.18/01/2011 रोजी, नि. 13 ब- 7 प्रमाणे दि.16/02/2011 रोजी असे अनेक वेळा वाहन दुरुस्ती केली. म्हणजे पूर्ण 1 महिना लगातार अर्जदाराचे वाहन कधीच चालत नव्हते व लगेच दुरुस्ती करायला भाग पडत होते. 6. गै.अ.क्रं.2 ने जॉबकार्ड वर असे लिहीले कि ‘’गाडीका रनिंग कम होने से सेल्फ स्टार्ट नही होती.’’ अर्जदार हा तहसिल सिंदेवाही येथील नवरगाव हया गावात राहतो. अर्जदाराचे वय हे 73 वर्ष आहे. नवरगाव सारख्या छोटया गावात अर्जदाराचे वय पाहता गाडीचे रनिंग खूप होईल अशी अपेक्षा करु शकत नाही. त्याउपरही अर्जदाराचे वाहन 13 – 15 किलोमिटर रोज चालत होते. गै.अ. ने अर्जदाराला दिलेल्या मॅन्युअल मधील सर्व्हिसिंग च्या हिशोबाप्रमाणे वाहन हे 11 ते 15 किलोमिटर रोज सरासरी चालणे आवश्यक आहे. गै.अ.क्रं.2 ने दाखल केलेले दस्ताऐवज नि. 13 ब 2 व इतर जॉब कार्डसवरुन अर्जदाराचे वाहन ही त्याच प्रमाणत चालल्याचे दिसुन येते. त्यामुळे गै.अ.चे म्हणणे की, वाहनाचे रनिंग कमी असल्यामुळे बॅटरी डाऊन होते व सेल्फ स्टार्ट होत नाही हे तथ्यहिन आहे.
7. गै.अ.क्रं.1 ने वर्तमान पञाव्दारे जाहिरात देऊन कंपनीने अपंग, जेष्ठ नागरिकांसाठी सेल्फ स्टार्ट टू-व्हिलर बनविण्यात नावलौकिक केला आहे असे वाहनाच्या जाहिरातीत म्हटले आहे. म्हणजे M-KINE हे वाहन विशेष करुन अपंग व जेष्ठ नागरिकांसाठी आहे, असा सामान्य अर्थ निघतो. गै.अ.क्रं.1 व 2 ने ही बाब मान्य केली आहे. ‘’आपल्या वस्तुची विक्री करण्याकरिता त्याची जाहिरातीव्दारे प्रसिध्दी करणे हा व्यवसायाचा भाग आहे व तो वास्तविक आहे.’’ असे गै.अ.क्रं.2 ने आपल्या लेखीउततरात शपथेवर सांगितले आहे. परंतु प्रत्याक्षात वाहनाचा वापर केल्यावर जाहिरातीप्रमाणे अर्जदाराला अनुभव आला नाही. अर्जदाराला वाहन खरेदीनंतर 18 दिवसातच वाहन दुरुस्तीसाठी न्यावे लागले. जाहिरातीच्या माध्यमातुन दिलेली शाश्वती वाहन चालवितांना अनुभवाला आली नाही. गै.अ.क्रं.2 ने दाखल केलेले दस्ताऐवज नि. 13 ब-1, ते ब-12 नुसार दि.23/09/2010 ते दि.14/07/2011 पर्यंत सतत गाडीमध्ये बिघाड होत होता. टेस्टराईड घेऊन गाडी सुस्थितीत आली तरी काही अंतर चालल्यावर लगेच दुरुस्ती साठी द्यावी लागत होती. गै.अ.क्रं.2 ने ही आपल्या लेखीउत्तरात मान्य केले की, अर्जदाराला वेळोवेळी व अर्जदाराच्या आवश्यकतेनुसार वाहन दुरुस्त करुन दिले आहे. याचाच अर्थ ज्यावेळी अर्जदाराला आवश्यकता होती त्या-त्या वेळी अर्जदाराला वाहन दुरुस्त करुन द्यावे लागत होते. दि.24/08/2011 पासुन सदर वाहन हे गै.अ.क्रं.2 च्या ताब्यात असुन दुरुस्तीला दिलेले आहे. परंतु सतत च्या अनुभवावरुन दुरुस्त केलेले वाहन जर पुन्हा ञास देत असेल तर ते वाहन अर्जदाराच्या उपयोगी पडू शकत नाही. अर्जदाराला वाहन दुरुस्ती साठी नवरगाव ते चंद्रपूर वारंवार चकरा माराव्या लागल्या. अर्जदार वरिष्ठ नागरिक असल्याने प्रत्येक वेळी त्यांना स्वतः येणे शक्य नाही. म्हणून इतर व्यक्तीमार्फत वाहन ने-आण करावे लागले. हया सर्व प्रकारासाठी बराच पैसा खर्च झाला. ऐवढे करुनही गै.अ.क्रं.1 ने तयार केलेले व गै.अ.क्रं.2 मार्फत विकलेले वाहन अर्जदाराची कुठलीच सोय करु शकले नाही. वाहन चालण्यापेक्षा दुरुस्तीसाठीच जास्त वेळ गै.अ. कडे न्यावे लागले. त्यामुळे गै.अ.क्रं.1 ने सदोष वाहनाची निर्मीती करुन गै.अ.क्रं. 2 मार्फत विक्री करुन अर्जदाराला न्युनतापूर्ण सेवा दिली आहे, हया निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे. गै.अ.ने दिलेल्या न्युनतापूर्ण सेवेसाठी मोबदला देण्यास गै.अ.जबाबदार आहेत. तसेच अर्जदाराला झालेल्या खर्चासाठीही गै.अ.हे जबाबदार आहे असे हया न्यायमंचाचे ठाम मत आहे. 8. अर्जदाराने आपल्या कथनाच्या पृष्ठार्थ मा.राष्ट्रीय आयोगाने दिलेल्या निर्णयाचा हवाला दिला. ” Consumer Protection Act, 1986 Section 2(1)(g) – Motor Vehicles Manufacturing defects—Troubles started within few days of purchase of vehicle – Persisted even after several repairs – Possession delivered to dealer for repairs, within period 6 months – Vehicle used by dealer for years, as evident from meter reading – O.Ps., dealer and manufacturer jointly and severally liable to refund cost of defective vehicle with interest @ 12% p.a.” II (2006) CPJ 64(NC) R.RAJA RAO Versus MUSORE AUTO AGENCIES & ANR. 9. सदर प्रकरणात दिलेला निर्णय अर्जदाराच्या प्रकरणालाही लागु पडतो. वाहन विक्रीनंतर काहीच दिवसात दुरुस्तीसाठी न्यावे लागत असेल तर गै.अ.क्रं. 1 व्दारे निर्मित वाहनात निर्मीती दोष असल्याचे सिध्द होते, आणि दुरुस्ती नंतरही पुन्हा पुन्हा खराब होत असेल तर गै.अ.क्रं.1 व 2 ने अर्जदाराला खराब वाहन विकून न्युनतापूर्ण सेवा दिली असे सिध्द होते. अर्जदाराने गै.अ ला नि.क्रं. 4 अ- 1 नुसार रु.34392/- दिलेले आहेत. त्यातील रजिस्ट्रेशन फी रु.2352/- इंशुरंस फी रु.750/- आणि इन्सिडेन्टल चार्ज रु.300/- वळते जाता गाडीची मूळ किंमत रु.30990/- आहे. गै.अ अर्जदारास सदर गाडीची मूळ किंमत देण्यास जबाबदार आहे असे या न्यायमंचाचे ठाम मत आहे. त्यामुळे खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे. // अंतिम आदेश //
(1) गै.अ.क्रं.1 व 2 ने अर्जदाराला त्याचे गाडीची किंमत रु.30,990/- दि.06/09/2010 पासुन पदरी पडे पर्यंत 9 टक्के व्याजासह परत करावी (2) अर्जदाराला झालेल्या मानसिक, शारिरीक व आर्थिक ञासापोटी रु.10,000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसाचे आत द्यावे. (3) तक्रारीचा खर्च सर्व पक्षांनी आपआपला सहन करावा. (4) सर्व पक्षांना आदेशाची प्रत देण्यात यावी. चंद्रपूर, दिनांक : 23/02/2012. |