रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग. तक्रार क्र.21/2009. तक्रार दाखल दि.31-1-2009. तक्रार निकाली दि.15-4-2009.
श्री.एस.एम.शिंदे, जी-004 तळमजला, श्रीजी रेसिडेन्सी, प्लॉट नं.61/8, जुना ठाणा नाका रोड, एच.ओ.सी.कॉलनीजवळ, पनवेल 410 206. ... तक्रारदार.
विरुध्द
मे.महिंद्रा हॉलिडे अँड रिसॉर्टस इंडिया लि. सी-412, बीएसईएल, टेक पार्क, वाशी रेल्वेस्टेशन, वाशी, नवी मुंबई 400705. ... विरुध्द पक्षकार.
उपस्थिती- मा.श्री.आर.डी.म्हेत्रस, अध्यक्ष. श्री.बी.एम.कानिटकर, सदस्य. तक्रारदार- स्वतः सामनेवाले- एकतर्फा आदेश. -निकालपत्र -
द्वारा- मा.अध्यक्ष, श्री.आर.डी.म्हेत्रस. 1. तक्रारदारानी ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदयांतर्गत दाखल केली असून त्याच्या तक्रारीचे स्वरुप खालीलप्रमाणे आहे- त्याने सामनेवाले कंपनीकडून सुटीचे पॅकेज खरेदी केले असून त्या पॅकेजपोटी त्याने दि.21-8-08 रोजी रक्कम रु.33,725/- आय.सी.आय.सी.आय. क्रेडिट कार्डद्वारे जमा केली आहे. त्यांच्या योजनेनुसार वर्षातून एक आठवडा सामनेवाले कंपनीची जेथे जेथे हॉटेल रिझॉर्टस आहेत तेथे तेथे सुटी उपभोगता येईल त्यानुसार त्याने हे बुकींग केले होते. 2. तक्रारदाराला त्याच्या काही वैयक्तिक, आर्थिक अडचणीमुळे त्या काळात सुटी उपभोगणे शक्य नसल्यामुळे त्याने सामनेवालेना आपण बुकींग रद्द करीत आहोत व मी भरलेल्या रकमेतून योग्य ते चार्जेस कापून घेऊन राहिलेली रक्कम परत दयावी असे दि.4-11-08 रोजी स्पीडपोस्टाने कळविले, त्या पत्रात त्याने पूर्वी दि.5-9-08 रोजी यासंदर्भात एक पत्र दिले होते त्याची प्रतही जोडली. परंतु त्याने पाठविलेल्या स्पीडपोस्टची पावती तक्रारदाराकडून गहाळ झाली आहे. तक्रारदाराने ईमेल द्वारे हीच बाब सामनेवालेस कळवली. त्याची पोच या कामी त्याने दाखल केली आहे. तो ईमेल पत्ता sheetal31369@ असा आहे. सामनेवालेनी त्यास दि.13-9-08 रोजी रक्कम परत करण्याचे आश्वासनही दिले, परंतु त्याप्रमाणे त्यांनी रक्कम परत पाठवली नाही. सामनेवाले कंपनीच्या एरिया मॅनेजर श्री.योगेश कुंदर यांनी तक्रारदारास बुकींग रद्द केल्यास काही नाममात्र रकमेची कपात करुन रक्कम परत करता येईल असे सांगितले होते. तसेच त्याने असे आश्वासन दिले होते की, सामनेवाले कंपनी ही विश्वासार्ह कंपनी असून त्यांच्याकडे कधीही मालप्रॅक्टीस केली जात नाही तसेच ते जाणीव ठेवून व्यवसाय करतात. 3. तक्रारदाराने अनेकदा विनंती करुन तसेच दि.11-9-08, 13-9-08 रोजी लेखी ईमेलद्वारे व्यवहार करुन तसेच फोनवरुन बोलणी करुनही व सामनेवालेनी वचन देऊनही रक्कम परत केली नाही त्यामुळे त्यास खूप मानसिक त्रास सोसावा लागला आहे. सामनेवाले हे रक्कम परत देत नसल्याने त्यास जो मानसिक त्रास सोसावा लागला व त्यांच्याकडून त्याला त्रुटीपूर्ण सेवा मिळाली असल्याने ही तक्रार दाखल केली आहे. सबब त्याची विनंती खालीलप्रमाणे आहे- त्याने हॉलिडे पॅकेजपोटी भरलेली रक्कम रु.33,725/- सामनेवाले कंपनीने योग्य ते मिनीमम चार्जेस कमी करुन उर्वरित रक्कम त्यास 18 टक्के व्याजदराने दि.10-9-08 पासून परत दयावी. तसेच त्यास जो शारिरीक, मानसिक त्रास सोसावा लागला आहे, त्यापोटी त्यास रु.10,000/- मिळावेत. 4. तक्रारीसोबत त्याने नि.2 अन्वये सामनेवाले कंपनीशी जे पत्रव्यवहार केले आहेत, त्याच्या प्रती जोडल्या आहेत, तसेच रजिस्टर्ड केल्याची पोस्टाची पावतीही जोडली आहे. त्यात त्याने दि.11-9-08 पासून दि.17-12-08 पर्यंत ईमेलद्वारे झालेला पत्रव्यवहार जोडला आहे. नि.5 अन्वये त्याने पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले असून नि.6 अन्वये सामनेवाले कंपनीस दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या पत्त्यावर नोटीस काढण्यात आली. त्याची पोच नि.7 अन्वये आहे. नोटीस मिळूनही सामनेवाले या कामी हजर झालेक नाहीत, त्यामुळे मंचाने त्यांचेविरुध्द एकतर्फा चौकशीचा आदेश दि.4-4-09 रोजी पारित केला. त्याने नि.8 अन्वये अर्ज देऊन त्यांचेदरम्यान झालेला पत्रव्यवहार दाखल केला आहे. तो नि.9 ते 18 येथे दाखल आहे. 5. सामनेवाले हजर नसल्यामुळे तक्रारीची सुनावणी एकतर्फा करण्यात आली. तक्रारदारानी कागदपत्राच्या आधारे तक्रार विचारात घेऊन निकाल देण्यास हरकत नसल्याचा युक्तीवाद मंचापुढे केला. तक्रारदारांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर व त्यांची कागदपत्रे अवलोकन केल्यानंतर या तक्रारीच्या निराकरणार्थ खालील मुद्दे मंचाने विचारात घेतले- मुद्दा क्र.1 – तक्रारदारांस सामनेवालेकडून त्रुटीपूर्ण सेवा दिली गेली आहे काय? उत्तर - होय. मुद्दा क्र.2 – तक्रारदारांचा अर्ज त्यांच्या मागणीप्रमाणे मंजूर करता येईल काय? उत्तर - अंतिम आदेशात नमूद केल्याप्रमाणे. विवेचन मुद्दा क्र.1 – 6. तक्रारदाराची तक्रार ही त्याला सामनेवालेकडून योग्य ती सेवा मिळाली नसल्याबाबतची आहे. सामनेवाले या कामी हजर नाहीत. त्यांनी त्यांचे कोणतेही म्हणणे दिलेले नाही. अशा परिस्थितीत सामनेवालेनी जे कागदपत्र दाखल केले आहेत व अर्ज दिला आहे याचा विचार करुन या तक्रारीचा निर्णय देण्याचा आहे. तक्रारदारानी आपल्या अर्जासोबत प्रतिज्ञापत्र दिले आहे व त्याने जे कागदपत्र दाखल केले आहेत ती सामनेवालेनी नाकारलेली नाहीत. तक्रारदाराचे स्टेटमेंट हे अनचॅलेंज्ड आहे. मंचाने त्याने दाखल केलेल्या पुराव्याचा विचार केला. त्याने सभासदत्व रद्द करण्याबाबत दि.5-9-08 पासून सामनेवालेबरोबर पत्रव्यवहार केला आहे. त्यासंदर्भातील स्पीडपोस्टची पावती दाखल केली आहे. त्याने सामनेवाले कंपनीकडे पैसे जमा असल्याचे दाखवून दिले आहे व कंपनीने सुध्दा पैसे मिळाले नसल्याचे नाकारलेले नाही. त्याने पत्रव्यवहार करुन मी माझया आर्थिक टंचाईमुळे पुढील व्यवहार पूर्ण करु शकत नाही व योग्य ते वजावट चार्जेस परत करुन माझी रक्कम मला परत पाठवावी असे कळविले आहे असे रेकॉर्डवरुन स्पष्टपणे दिसून येते. त्याने सामनेवाले कंपनीबरोबर ईमेलद्वारे पत्रव्यवहार केला आहे तो सुध्दा यात नि.6 अन्वये दाखल आहे. तो पत्रव्यवहार दि.9-11-08 पासून दि.17-12-08 अखेर प्रत्येक ईमेलद्वारे त्याने सामनेवाले कंपनीकडे रिफंड देण्याची मागणी केली आहे. इतके करुनही त्याला सामनेवाले कंपनीने प्रतिसाद दिला नाही. सामनेवालेनी प्रतिसाद का दिला नाही याची कारणे त्याना माहीत, परंतु त्यांचे हे वर्तन त्रुटीपूर्ण सेवेचे निदर्शक असल्याचे मंचाचे मत आहे. एखादी व्यक्ती वारंवार जर आपण जमा केलेली रक्कम ज्या कारणास्तव जमा केली आहे तिचा वापर करणार नसेल तर त्यास ते परत मागण्याचा हक्क आहे. सामनेवाले कंपनीने त्याला सेवेपोटी हॉलिडेजमध्ये सेवा देण्याचे कबूल केले होते, परंतु त्याना काही अडचणीमुळे सेवा घेण्याची नव्हती म्हणून तो रिफंड मागत होता व त्याची मागणीसुध्दा योग्य ती वजावट करुन रिफंड दयावा अशी होती, यावरुन त्यांचा प्रामाणिकपणा स्पष्टपणे दिसून येतो. अशा प्रकारचे वर्तन करणा-या व्यक्तीस साथ न देणे ही सुध्दा त्रुटीपूर्ण सेवा असल्याचे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर होय असे आहे. विवेचन मुद्दा क्र.2 – 7. सामनेवालेकडून तक्रारदारास त्रुटीपूर्ण सेवा दिली गेली असेल तर त्याचा अर्ज मंजूर करावयाचा किंवा नाही हे ठरविता येईल. या तक्रारीमध्ये सामनेवालेकडून तक्रारदारास त्रुटीपूर्ण सेवा दिली गेली असल्याचे मंचाचे मत आहे. त्यामुळे त्याने जी रक्कम जमा केली होती ती त्याला मिळणे आवश्यक आहे व सामनेवालेकडून जे कृत्य घडले आहे म्हणजे सामनेवालेकडून त्याला जी दोषपूर्ण सेवा दिली गेल्यामुळे जो मनस्ताप झाला त्यापोटी त्याला योग्य मोबदला मिळणे आवश्यक असल्याचे मंचाचे मत आहे. सबब त्यांचा अर्ज मंजूर करावा या निष्कर्षाप्रत मंच आले आहे. तक्रारदारानी आपल्या तक्रारीत वजावट करुन त्याने भरलेली रक्कम परत मागितली आहे, परंतु ती वजावट किती असावी याबाबत काही खुलासा त्यांनी केलेला नाही. मंचाच्या मते 10 टक्के इतकी वजावट करुन उर्वरित रक्कम तक्रारदारास परत करण्याचे आदेश करणे न्यायोचित होईल व नैसर्गिक न्यायतत्वास अनुसरुन राहील असे वाटते. त्यानी ही रक्कम जमा केली आहे व ती ते मागत असल्याच्या तारखेपासून वजा करुन त्यांची मागणी तारखेपासून म्हणजेच दि.10-9-08 पासून 18 टक्के प्रमाणे व्याज मिळण्याबाबतची आहे. त्यांची ही मागणी उचित आहे, परंतु त्याला 18 टक्के ऐवजी 10 टक्के व्याज देणे हे न्यायोचित होईल असे मंचाचे मत आहे, तसेच त्याला जो शारिरीक, मानसिक त्रास झाला आहे त्यापोटी त्याने रु.10,000/- मागितले आहेत. ही रक्कम मंचास अवास्तव वाटते. त्याला निश्चितपणे त्रास झाला आहे, परंतु रु.10,000/-ची भरपाई देणे उचित होणार नाही. सबब एकूण विचार करता त्याला रु.5,000/- देण्याचा आदेश करणे योग्य होईल. 8. सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यात येत आहे. -ः आदेश ः- सामनेवालेनी खालील नमूद केलेल्या आदेशाचे पालन आदेश पारित तारखेपासून 45 दिवसाचे आत करावे- 1. सामनेवालेनी तक्रारदारास रक्कम रु.33,725/- मधून 10 टक्के रक्कम कॅन्सलेशन चार्जेस म्हणून वजा करुन उर्वरित रक्कम तक्रारदारास दि.10-9-08 पासून 10 टक्के व्याजदराने आदेश पारित तारखेपासून दयावी. 2. तक्रारदारास झालेल्या शारिरीक,मानसिक त्रासापोटी व न्यायिक खर्चापोटी रु.5,000/- सामनेवालेनी दयावेत. 3. वरील पोटकलम अ व ब मधील आदेशाचे पालन सामनेवालेनी न केल्यास या सर्व रकमा आदेश पारित तारखेपासून 8 टक्के व्याजदराने वसूल करण्याचा अधिकार तक्रारदारास राहील. 4. सदर आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना पाठविण्यात याव्यात. ठिकाण- रायगड-अलिबाग. दिनांक- 15-4-2009. (बी.एम.कानिटकर) (आर.डी.म्हेत्रस) सदस्य अध्यक्ष रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.
......................Hon'ble Shri R.D.Mhetras ......................Post vacant ......................Shri B.M.Kanitkar | |