( पारीत दिनांक :20/01/2014 ) ( द्वारा अध्यक्ष(प्रभारी)श्री.मिलींद भि.पवार(हिरुगुडे) ) 01. अर्जदार यांनी प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये गैरअर्जदार यांच्या विरुध्द दाखल केली असून, तीद्वारे पुढील प्रमाणे मागण्या केलेल्या आहेत. 1. गैरअर्जदार यांनी नविन मोटार पंप गॅरंटीसह किंवा पंपाची किंमत रु.25,000/- व्याजासह परत करावे. 2. नुकसान भरपाई रु.10,000/-, मानसिक व शारिरीक त्रासाकरीता रु.15,000/- व तक्रार खर्च रु.5000/- गैरअर्जदार यांनी द्यावे. अर्जदाराच्या तक्रारीचा थोडक्यात आशय खालीलप्रमाणे आहे. अर्जदार यांनी सदर तक्रार अर्जामध्ये नमुद केले आहे की, त्याने दिनांक 31/10/2012 रोजी गैरअर्जदार क्र.1 कडुन शेतातील विहिरीवर बसविण्याकरीता 5 एच.पी.मोनोब्लॉक शक्ती मोटर पंप विकत घेतला. परंतु दोन दिवसानंतर बंद पडला त्यामुळे अर्जदाराने त्याबाबतची तक्रार गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे केली. गैरअर्जदार क्र.1 यांनी त्याचा मेकॅनिक पाठवुन पंपात असलेला रिलेचा फॉल्ट दुरुस्त करुन परत पंप सुरु करुन दिला. परत काही दिवसानंतर मोटर पंप बंद पडल्यानंतर गैरअर्जदार यांच्या मेकॅनिकने मोटार पंपात तांत्रिक बिघाड असल्यामुळे मोटार पंप दुरुस्त न करता तो वायफळ येथे घेवुन येण्यास सांगीतले. अर्जदार यांनी पुढे नमुद केले आहे की, सदर मोटार पंप घेतल्यानंतर 15 दिवसांच्या आंत दोनदा मोटार पंप बिघडला व सदर मोटार पंपात तांत्रिक बिघाड असल्याचेही गैरअर्जदार क्र.1 यांच्या मेकॅनिकने सांगीतले त्यामुळे अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे नविन मोटार पंप देण्याची किंवा त्याएवजी मोटार पंपाची किंमत रु.25,000/- व्याजासह परत करण्याची विनंती केली. परंतु गैरअर्जदार क्र.1 यांनी टोलवाटोलवीचे उत्तर दिले व मोटार पंप हा गैरअर्जदार क्र.2 कंपनीचा असल्यामुळे त्यांच्या प्रतिनिधीशी बोलावे असे सुचविण्यात आल्यामुळे अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.2 च्या प्रतिनीधीशी मोटारपंपाबाबत बोलले असता त्यांनी सर्व जबाबदारी ही गैरअर्जदार यांचीच असल्याचे सांगीतले. त्यामुळे गैरअर्जदार क्र.1 व 2 हे आपली जबाबदारी एकमेकावर ढकलत होते, परंतु अर्जदार यांचे म्हणणे कोणीही ऐकुन घेत नव्हते. त्यामुळे अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना पत्र पाठवुन नविन मोटार पंप किंवा त्याची किंमत रु.25,000/- परत करण्याची विनंती केली. परंतु गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना नोटीसपत्र मिळुनही नोटीसला उत्तर दिले नाही किंवा नोटीसमधील मागणीही मान्य केली नाही. सदर बाब हि गैरअर्जदार क्र.1 व 2 यांच्या सेवेतील त्रृटी असुन त्यांनी अनुचित व्यापार प्रणालीचा अवलंब करणारी आहे. त्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदारांविरुध्द प्रस्तुत तक्रार मंचामध्ये दाखल केली आहे व वरीलप्रमाणे मागणी केली आहे. अर्जदाराने तक्रार अर्जातील कथनाचे पुष्ठयर्थ निशाणी 3 कडे 6 कागदपत्रे हजर केलेली आहेत. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना तक्रार नोंदणी करुन नोटीस काढण्यात आली. त्याप्रमाणे गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना नोटीसची बजावणी झाली. परंतु गैरअर्जदार क्र.1 यांनी नोटीस घेण्यास नकार दिला व त्यांचा नोटीस हा ‘नॉट क्लेम’ या कारणासह परत आला. म्हणुन गैरअर्जदार क्र.1 विरुध्द सदर प्रकरण एकतर्फा चालविण्याचा निर्णय मा.मंचाने नि.1 वर पारीत केला. 02. गैरअर्जदार क्र.2 यांनी निशाणी 12 नुसार आपला लेखी जवाब दाखल केलेला आहे. त्यानुसार गैरअर्जदार क्र.2 यांनी तक्रारीतील विपरित विधाने/आरोप अमान्य करुन पुढे असे नमुद केले की, त्यांचे गैरअर्जदार क्र.1 यांच्याशी वर्धा जिल्ह्रयाचे वितरक म्हणुन असलेले संबंध हे दिनांक 31/3/2012 रोजीच संपुष्टात आलेले आहे व अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडुन दिनांक 31/10/2012 रोजी मोटार पंप विकत घेतलेला आहे. त्यामुळे गैरअर्जदार क्र.1 यांनी दिनांक 31/3/2012 नंतर केलेल्या कुठल्याही व्यवहाराशी त्यांचा संबंध नसल्यामुळे, अर्जदाराने तक्रारीत केलेल्या घटनेचा त्यांच्याशी कुठलाच संबंध नाही. अर्जदाराने तक्रारीत केलेल्या घटनेचा फक्त गैरअर्जदार क्र.1 यांचाच संबंध येत असल्यामुळे झालेल्या सर्व घटनेला फक्त गैरअर्जदार क्र.1 हेच जबाबदार आहे. गैरअर्जदार क्र.2 यांनी पुढे नमुद केले आहे की, अर्जदार यांनी पाठविलेले पत्र त्यांना प्राप्त झाले होते, परंतु त्याच्यातील मजकुराचा फक्त गैरअर्जदार क्र.1 यांच्याशीच संबंध असल्यामुळे सदर पत्राला उत्तर देण्यात आले नाही. अर्जदार यांना झालेल्या व होत असलेल्या प्रकाराला फक्त गैरअर्जदार क्र.1 हेच जबाबदार आहे. गैरअर्जदार क्रं. 2 यांनी पुढे नमूद केले आहे की, अर्जदार यांनी पाठविलेले पत्र त्यांना प्राप्त झाले होते, परंतु त्याच्यातील मजकुराच्या फक्त गैरअर्जदार क्रं. 1 यांच्याशीच संबंध असल्यामुळे सदर पत्राला उत्तर देण्यात आले नाही. अर्जदार यांना झालेल्या व होत असलेल्या प्रकाराला फक्त गैरअर्जदार क्रं. 1 हेच जबाबदार असल्यामुळे अर्जदाराची त्यांच्याविरुध्दची तक्रार रु.10,000/- खर्चासह खारीज करण्यात यावी अशी प्रार्थना गैरअर्जदार 2 यांनी त्यांच्या लेखी उत्तरा्द्वारे मा.मंचास केलेली आहे. गैरअर्जदार यांनी लेखी जवाब पुष्ठयर्थ काहीही कागदपत्रे हजर केलेली नाहीत. परंतु नि.क्रं. 14 कडे लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. 03. अर्जदाराची तक्रार, त्यांचे वकीलांचा युक्तीवाद व प्रतिज्ञापत्र व त्यासोबतची कागदपत्रे, गैरअर्जदार क्र.2 यांनी दाखल केलेले म्हणणे यावरुन सदर प्रकरण निकाली करणे करिता ठेवण्यात आले. -: कारणे व निष्कर्ष :- 04 अर्जदार यांनी प्रस्तुत तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली आहे व निशाणी क्रं. 13 कडे आपला पुरावा प्रतिज्ञालेखावर दाखल केला आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्रं. 1 कडून शक्ती कंपनीचा 5 एच.पी. मोनोब्लॉक मोटर पंप खरेदी केला आहे हे नि.क्रं. 3/1 वरील पावती वरुन दिसून येते. तसेच सदर पंप हा शक्ती कंपनीचा आहे. त्यामुळे गैरअर्जदार क्रं. 1 व 2 यांचे अर्जदार हे ग्राहक आहे. सदर मोटर पंप अर्जदार यांनी खरेदी केल्यानंतर वारंवार त्यामध्ये बिघाड निर्माण झाला व तो बिघाड गैरअर्जदार क्रं.1 यांनी दुरुस्त सुध्दा करुन दिला. मात्र सदर मोटार पंपातून कायमस्वरुपी दोष गैरअर्जदार क्रं. 1 यांनी दुरुस्त केला नाही. उलटपक्षी तो दुरुस्त करण्यासाठी अर्जदार यांना नागपूरला जाण्यास सांगितले. त्यामुळे ग्राहकांस सदोष सेवा गैरअर्जदार क्रं. 1 यांनी दिली आहे हे दिसून येते. गैरअर्जदार क्रं. 2 यांना गैरअर्जदार क्रं. 1 यांनी अर्जदारांना दिलेला मोटर पंप बंद पडला आहे व त्यामध्ये बि घाड झाला आहे याची कल्पना होती, तसेच गैरअर्जदार क्रं.1 व गैरअर्जदार क्रं.2 यांचे मध्ये असलेले उत्पादक व डिलर म्हणून असलेले नाते संपुष्टात आले आहे हे गैरअर्जदार क्रं. 2 यांचे लेखी जबाबावरुन दिसून येते. गैरअर्जदार क्रं. 1 यांनी अर्जदाराला दिलेला मोटार पंप कोणाकडून खरेदी केला होता हे गैरअर्जदार क्रं. 1 यांनी वि.मंचात हजर राहून स्पष्ट केलेले नाही किंवा त्यांनी गैरअर्जदार क्रं. 1 ने सदर खराब मोटार पंपाबाबत काय कार्यवाही केली हे सुध्दा स्पष्ट होत नाही. गैरअर्जदार क्रं. 2 यांचे मतानुसार त्यांनी सदर कंपनीचा मोनोब्लॉक वर्धा जिल्हयात विकलेलाच नाही. त्यामुळे त्यांची सदर खराब पंपाबाबत जबाबदारी येत नाही. त्यामुळे गैरअर्जदार क्रं.1 यांनी या कामी हजर होवून अर्जदार यांची तक्रारीतील मुद्दे तसेच गैरअर्जदार क्रं.2 यांनी त्यांचे बद्दल केलेली विधाने खोडून काढलेली नाहीत. त्यामुळे अर्जदार यांचे तक्रारीच पूर्णतः गैरअर्जदार क्रं.1 हेच जबाबदार असल्याचे सिध्द होत आहे. त्यामुळे अर्जदार यांनी गैरअर्जदार क्रं.1 यांचे कडून खरेदी केला मोटार पंप बदलवून नवीन मिळण्यास किंवा सदर मोटारपंपाची किंमत रु.25,000/- मिळण्यास अर्जदार पात्र आहे असे वि. मंचास वाटते. 05. प्रस्तुत कामी अर्जदार यांनी सदर नादुरुस्त पंपामुळे शेतीच्या उत्पन्नाचे नुकसान झाले असे कथन केले आहे. मात्र नुकसान नेमके किती झाले याबाबत कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे सदर नुकसान भरपाईची मागणी मान्य करता येवू शकत नाही. 06. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्रं.1 यांचे कडून खरेदी केलेला पंप जर वेळेस दुरुस्त करुन दिला असता किंवा बदलवून नवीन दिला असता तर तो अर्जदार यांचे उपयोगी पडला असता. परंतु गैरअर्जदार क्रं.1 यांनी तसे न केल्यामुळे अर्जदार यांचे शेतीचे नुकसान झाले व वारंवार गैरअर्जदार क्रं.1 कडे चकरा मारावयास लावल्या, त्यामुळे अर्जदार यांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला व वारंवार गैरअर्जदार क्रं.1 यांच्याकडे हेलपाटे मारावे लागले. तसेच वि. मंचात प्रस्तुत तक्रार दाखल करावी लागली. त्यामुळे गैरअर्जदार क्रं. 1 कडून मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.2500/- तसेच तक्रारीचा खर्च रु.1000/- मिळण्यास अर्जदार पात्र आहे असे विद्यमान मंचास वाटते. एकंदरीत वरील कारणे व निष्कर्ष यावरुन गैरअर्जदार क्रं.1 यांनी अर्जदार यांना दुषीत व त्रुटीपूर्ण सेवा दिली असल्याचे निर्णयाप्रत हे मंच आलेले असल्याने खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे. // अंतिम आदेश // 01 अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 02 गैरअर्जदार क्रं.1 यांनी अर्जदाराने खरेदी केलेला मोटार पंप बदलवून त्याच कंपनीचा व मॉडेलचा नवीन पंप अर्जदाराला द्यावा किंवा गैरअर्जदार क्रं.1 यांनी सदर मोटारपंपाची किंमत रु.25,000/-अर्जदाराला परत करावी. 03 वरील आदेशाचे पालन गैरअर्जदार यांनी आदेशाची प्रत प्राप्त दिनांकापासून 30 दिवसांच्या आंत करावे अन्यथा उपरोक्त रक्कम रु.25,000/- वर द.सा.द.शे. 10 टक्के व्याज तक्रार दाखल दिनांकापासून म्हणजेच दिनांक 02/01/2013 पासून द्यावे लागेल. 04 गैरअर्जदार क्रं. 1 यांनी अर्जदार यांना मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.2500/- व तक्रारीचा खर्च रु.1000/- द्यावा. 05 आदेश क्रं. 4 मधील आदेशाचे पालन गैरअर्जदार यांनी आदेशाची प्रत प्राप्त दिनांकापासून 30 दिवसांच्या आंत करावे. 06 मा. सदस्यांसाठीच्या ‘ब’ व ‘क’ फाईल्स संबंधितांनी परत घेवून जाव्यात. 07 निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधीत पक्षांना माहितीस्तव व उचित कार्यवाहीकरिता पाठविण्यात याव्यात. |