(आदेश पारीत द्वारा- श्री.विजयसिंह ना. राणे, मा.अध्यक्ष) -/// आ दे श ///- (पारीत दिनांक – 09 ऑगस्ट, 2011) यातील तक्रारदाराने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये मंचासमक्ष दाखल केलेली आहे. यातील तक्रारदाराची गैरअर्जदार यांचेविरुध्द थोडक्यात तक्रार अशी आहे की, त्यांनी गैरअर्जदार यांचेसोबत स्वप्नवाटीका लेआऊटमधील भूखंड क्र. 205, 206 खसरा नं.110 व 111, मौजा कालडोंगरी, ता. जि. नागपूर हे विकत घेण्याचा करार केला. रुपये 1 लक्ष एवढी रक्कम सुरुवातीला दिली आणि पुढे रुपये 1,50,000/- याप्रमाणे एकूण रुपये 2,50,000/- एवढी रक्कम दिली. भूखंडाची एकूण किंमत रुपये 3,44,960/- पैकी राहिलेली उर्वरित रुपये 94,960/- सदर जमिनीचे अकृषक रुपांतरण करुन विक्रीपत्र करुन देण्याचे वेळी द्यावयाची असे मान्य केले होते. सदर जमिनीचे अकृषक रुपांतरण झाले नाही तर तक्रारदाराने जमा केलेली रक्कम द.सा.द. शे. 10% दराने व्याजासह परत द्यावयाची असेही करारात ठरलेले होते. तक्रारदाराने सदर जमिनीचे अकृषक रुपांतरण याची माहिती विचारली आणि पुढे तशी नोटीसही दिली, मात्र त्याबाबत गैरअर्जदाराने माहिती दिली नाही व सदर नोटीसला उत्तरही दिले नाही. म्हणुन शेवटी तक्रारदार यांनी सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन तीद्वारे वादातील भूखंडाचे विक्रीपत्र करुन नोंदवून द्यावे आणि जर काही कायदेशिर अडचणी असल्यास रुपये 2,50,000/- एवढी रक्कम व्याजासह परत द्यावी, नुकसान भरपाई म्हणुन रुपये 20,000/- द्यावी, तसेच तक्रारदारास झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रुपये 50,000/- आणि तक्रारीचा खर्च म्हणुन रुपये 5,000/- मिळावेत अशा मागण्या केल्या आहेत. सदर प्रकरणात गैरअर्जदार यांना मंचाद्वारे नोटीस बजाविण्यात आली, त्यावरुन हजर होऊन त्यांनी आपला लेखी जबाब मंचासमक्ष दाखल केला आहे. गैरअर्जदार यांनी कराराची बाब मान्य केली आणि तक्रारदार यांचेकडून रुपये 2,50,000/- मिळाल्याचीही बाब मान्य केली. त्यांचे म्हणणे असे आहे की, विक्रीपत्राची मुदत दिनांक 10/2/2009 नंतर सुरु होणार होती. त्यानंतर गैरअर्जदार सदर जमिनीचे अकृषक रुपांतरण करुन देणार होते, मात्र सदर लेआऊट नागपूर सुधार प्रन्यासचे हद्दीत असल्यामुळे आता सगळे हक्क नागपूर सुधार प्रन्यास यांचेकडे आहेत आणि तसा अर्ज गैरअर्जदाराने त्यांचेकडे केलेला आहे. गैरअर्जदार यांनी नागपूर सुधार प्रन्यास यांचेकडे डीमांड नोटप्रमाणे रुपये 55,019/- एवढी रक्कम दिनांक 20/5/2011 रोजी जमा केलेली आहे. थोडक्यात तक्रारदाराची सदर तक्रार ही चूकीची व गैरकायदेशिर आहे, म्हणुन ती खारीज व्हावी असा उजर घेतला. यातील तक्रारदाराने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केलेली असून, सोबत विक्रीचा करारनामा, किस्ती भरल्याच्या रसीदा, उभय पक्षात विक्रीपत्रासंबंधाने झालेल्या पत्रव्यवहाराच्या प्रती, नोटीस आणि पोस्टाची पावती व पोचपावती इत्यादी दस्तऐवज मंचासमक्ष दाखल केले आहेत. गैरअर्जदार यांनी त्यांचा लेखी जबाब प्रतिज्ञालेखावर दाखल केला असून, नागपूर सुधार प्रन्यास यांचेकडे भरलेली रुपये 55,019/- ची डिमांट नोट असा एक दस्तऐवज मंचासमक्ष दस्तऐवज दाखल केला आहे. सदर प्रकरणात दोन्ही पक्षांचा तोंडी युक्तीवाद मंचाने ऐकला. सदर प्रकरणात उभय पक्षांत झालेला विक्रीचा करार आणि तक्रारदाराने रुपये 2,50,000/- एवढी रक्कम दिल्याची बाब गैरअर्जदार यांनी मान्य केलेली आहे. पुढे गैरअर्जदार यांनी आपल्या जबाबात असेही नमूद केले आहे की, नागपूर सुधार प्रन्यास यांचेकडून मंजूरी प्राप्त होताच ते भूखंड नोंदवून देण्यास तयार आहेत आणि नागपूर सुधार प्रन्यास यांचेकडे दिनांक 20/5/2011 रोजी रुपये 55,019/- एवढी रक्कम जमा केलेली आहे असे मंचाचे निदर्शनास आलेले आहे. वरील सर्व वस्तूस्थितीचा एकत्रितपणे विचार करता, आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. -000 अं ती म आ दे श 000- 1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदार यांनी आवश्यक परवानगी घेऊन व नागपूर सुधार प्रन्यास यांचेकडून आदेश प्राप्त झाल्यापासून 6 महिन्यांचे आत वादातील भूखंडाचे (भूखंड क्रमांक 205 व 206) विक्रीपत्र करुन नोंदवून द्यावे. त्यापूर्वी तक्रारदाराकडून विक्रीपत्राचे नोंदणीशुल्क व मुद्रांकशुल्क आणि राहिलेली रक्कम रुपये 94,960/- ची मागणी, रजीस्टर्ड पोस्टाद्वारे करावी व अशी मागणी प्राप्त होताच, तक्रारदाराने सदरची रक्कम मंचात जमा करावी व तशी सूचना गैरअर्जदार यांना द्यावी. त्यानंतर गैरअर्जदार यांनी 1 महिन्याचे आत सदर भूखंडाचे विक्रीपत्र करुन नोंदवून द्यावे. किंवा तक्रारदार तयार असल्यास गैरअर्जदार यांनी रुपये 2,50,000/- एवढी रक्कम, तीवर दिनांक 01/9/2008 पासून रकमेच्या प्रत्यक्ष अदायगीपावेतो द.सा.द.शे. 10% व्याजासह मिळून येणारी रक्कम द्यावी. 3) गैरअर्जदार यांनी तक्रारदारास तक्रारीचे खर्चाबद्दल रुपये 2,000/- (रुपये दोन हजार केवळ) एवढी रक्कम द्यावी. गैरअर्जदार यांनी सदर आदेशाचे पालन आदेशाची प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून सहा महिन्याचे आत करावे.
| [HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONORABLE Shri V. N. Rane] PRESIDENT | |