तक्रारदार : स्वतः वकील श्री.प्रकाश पी.जगताप यांचे सोबत हजर.
सामनेवाले : गैरहजर.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*--
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
न्यायनिर्णय
1. सा.वाले क्र.1 ही विकासक/बिल्डर कंपनी असून सा.वाले क्र.2 हे भुखंडाचे मालक आहेत. सा.वाले क्र.3 यांनी सा.वाले क्र.1 यांना मालमत्तेचे हक्क हस्तांतरीत केले.
2. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथना प्रमाणे तक्रारदारांनी सा.वाले क्र.1 यांचेकडे सदनिका क्रमांक 202, बी-विंग, 800 चौरस फुट क्षेत्रफळ असलेली सदनिका खरेदी करण्याचे ठरविले. व खरेदीच्या किंमतीपोटी सा.वाले क्र.1 यांना दिनांक 5.2.2003 रोजी रु.2,85,000/- अदा केले. त्यानंतर दिनांक 19.5.2003 रोजी तक्रारदार व सा.वाले क्र.1 यांचे दरम्यान नोंदणीकृत करारनामा करण्यात आला व त्यामध्ये सदनिकेची एकूण किंमत रु.10 लाख नमुद करण्यात आली व तक्रारदारांनी सदनिकेची किंमत सा.वाले यांना अदा करण्याचे हप्त्यांचा तपशिल नमुद करण्यात आला. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथना प्रमाणे सा.वाले क्र.1 यांनी इमारतीचे बांधकाम केले नाही व तक्रारदारांना करारनाम्याप्रमाणे सदनिकेचा ताबा दिला नाही. येवढेच नव्हेतर सा.वाले तक्रारदारांना भेट घेण्याचे टाळू लागले व तक्रारदारांनी पाठविलेल्या पत्रांना उत्तरही दिले नाही. दरम्यान तक्रारदारांनी सा.वाले यांना रु.1 लाख दिनांक 22.2.2003 व रु.2,55,000/- दिनांक 28.2.2003 म्हणजे करारनाम्याचे पूर्वीच अदा केले होते. तक्रारदारांच्या कथना प्रमाणे तक्रारदारांनी सदनिकेच्या किंमतीपोटी सा.वाले यांना रु.6,40,000/- अदा केले. ती रक्कम तक्रारदारांनी बँकेकडे कर्ज काढून सा.वाले यांना अदा केलेली आहे. तरी देखील सा.वाले यांनी इमारतीचे बांधकाम पूर्ण करुन तक्रारदारांना सदनिकेचा ताबा दिला नाही. अंतीमतः तक्रारदारांनी सा.वाले यांना दिनांक 19.3.2010 व दिनांक 2.12.2010 रोजी दोन कायदेशीर नोटीसा दिल्या. सा.वाले क्र.1 विकासक/बिल्डर यांनी नोटीसीप्रमाणे पुर्तता केली नाही म्हणून अंतीमतः तक्रारदारांनी सा.वाले यांचे विरुध्द प्रस्तुतची तक्रार दाखल केली. व त्यामध्ये सा.वाले यांनी तक्रारदारांना इमारतीचे बांधकाम पूर्ण करुन सदनिकेचा ताबा द्यावा अथवा मुळ रक्कम 24 टक्के व्याजासह व नुकसान भरपाई सहीत अदा करावी अशी विनंती केली.
3. सा.वाले क्र.1 चे मालक श्री.अनील जगन्नाथ आणेराव यांना रजिस्ट्रर पावती पोचव्दारे नोटीस पाठविण्यात आली होती व ती नोटीस सा.वाले क्र.1 यांचे मालकाने प्राप्त केली. सा.वाले क्र.2 यांना देखील नोटीस पाठविण्यात आली होती व ती बजावण्यात आली. सा.वाले क्र.3 यांनासुध्दा नोटीस बजावण्यात आली. तक्रारदारांनी या बद्दल शपथपत्र दाखल केलेले आहे. सा.वाले गैर हजर असल्याने त्यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फा करण्यात आले.
4. तक्रारदारांनी आपले पुराव्याचे शपथपत्र दाखल केले व त्यामध्ये सदनिकेच्या व्यवहारासंबंधी कथन केले.
5. प्रस्तुत मंचाचे तक्रार, शपथपत्र, कागदपत्रे यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले यांनी तक्रारदारांना कराराप्रमाणे सदनिकेच्या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय. |
2. | तक्रारदार सदनिकेचा ताबा अथवा आवश्यक त्या नुकसान भरपाईचा आदेश मिळण्यास पात्र आहेत काय ? | होय. |
3 | अंतीम आदेश | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा
6. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथन व शपथपत्रातील कथन याचे सा.वाले यांनी हजर होऊन खंडण केले नाही. या प्रमाणे तक्रारदारांच्या तक्रारीतील सदनिकेच्या संदर्भातील कथने अबाधीत राहीली. त्या व्यतिरिक्त तक्रारदारांच्या कथनास तक्रारदारांनी यादी सोबत दाखल केलेल्या कागदपत्रावरुन पुष्टी मिळते. तक्रारदारांनी करारनामा दिनांक 19.5.2003 ची छायांकीत प्रत दाखल केलेल्या आहेत. त्यात सदनिका क्रमांक 202 बी, दुसरा मजला, ही सा.वाले क्र.1 यांनी तक्रारदारांना विक्री केल्याचे नमुद केले आहे. त्याची एकूण किंमत रु.10 लाख अशी देखील नमुद आहे. सा.वाले यांनी तक्रारदारांना सदनिकेचा ताबा डिसेंबर, 2004 पर्यत देण्याचे कबुल केले होते. तक्रारदारांनी सा.वाले यांना सदनिकेच्या किंमतीपोटी अदा केलेल्या रक्कमांच्या पावत्यांच्या छायाप्रती हजर केलेल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे आहेत.
क्र. | पावती क्रमांक | दिनांक | रक्कम (रुपये) |
1. | 000001 | 5.2.2003 | 2,85,000/- |
2. | 000003 | 22.2.2003 | 1,00,000/- |
3. | 000002 | 28.2.2003 | 2,55,000/- |
| एकूण | 6,40,000/- |
7. वर नमुद केल्याप्रमाणे तक्रारदारांनी सा.वाले यांना सदनिकेच्या किंमतीपोटी रुपये 6,40,000/- रक्कम अदा केली. करारनाम्याप्रमाणे सदनिकेचा ताबा डिसेंबर, 2004 पर्यत देण्याचे सा.वाले यांनी मान्य केले होते परंतु सदनिकेचा ताबा दिला नाही व पैसेही परत केले नाही. या वरुन सा.वाले यांनी तक्रारदारांना सदनिकेच्या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब सिध्द होते.
8. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीमध्ये सा.वाले यांचे विरुध्द सदनिकेचा ताबा अथवा मुळ रक्कम व्याजासहीत परत मिळावी अशी मागणी केलेली आहे. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथन, सा.वाले यांना अदा केलेली रक्कम, व दरम्यानचा आठ वर्षाचा कालावधी या बाबी लक्षात घेता सा.वाले यांनी तक्रारदारांनाकडून येणे बाकी रक्कम प्राप्त करुन सदनिकेचा ताबा द्यावा अथवा मुळ रक्कम 18 टक्के व्याजासहीत परत करावी असा आदेश देणे योग्य व न्याय राहील असे प्रस्तुत मंचाचे मत झाले आहे.
9. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 15/2011 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदारांना सदनिका क्रमांक 202, दुसरा मजला, अशा अरुण अपार्टमेंट, या सदनिकेच्या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले यांनी तक्रारदारांकडून सदनिकच्या किंमतीपोटी रु.10 लाख त्यापैकी शिल्लक रक्कम रु.3,60,000/- तक्रारदारांकडून प्राप्त करुन घेवून तक्रारदारांना करारनाम्याप्रमाणे सदनिकेचा ताबा द्यावा असा आदेश देण्यात येतो.
अथवा
सामनेवाले क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तीकरित्या तक्रारदारांना मुळ रक्कम रु.6,40,000/- त्यावर 18 टक्के व्याज मूळ रक्कम प्राप्त झालेल्या दिनांकापासून ते देय दिनांकापर्यत अदा करावी असा ही आदेश देण्यात येतो.
4. या व्यतिरिक्त क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तीकरित्या तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चाबद्दल रुपये 5000/- अदा करावेत असाही आदेश देण्यात येतो.
5. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.