(मा.सदस्या अॅड.सौ.एस.एस.जैन यांनी निकालपत्र पारीत केले) नि का ल प त्र सामनेवाले यांचेकडून खराब बिनीयरशिटची किंमत रक्कम रु.2,71,360/- मिळावी, पॉलिशसाठी आलेला अतिरीक्त खर्च रु.80,000/- व मजुरीसाठी आलेला अतिरीक्त खर्च रु.67,840/- मिळावेत मानसिक त्रासापोटी रु.1,00,000/- मिळावेत असे एकूण रु.5,19,200/- मिळावेत या मागणीसाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा तक्रार अर्ज या मंचासमोर दि.04/05/2012 रोजी दाखल केलेला आहे. अर्जदार यांचा तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 2(ड)2 प्रमाणे चालणेस पात्र आहे काय? याबाबत अर्जदार यांचे म्हणणे ऐकून घेण्यात यावे असे आदेश दि.04/05/2012 रोजी करण्यात आलेले आहेत. अर्जदार यांनी पान क्र.1 लगत तक्रार अर्ज, पान क्र.2 लगत प्रतिज्ञापत्र व पान क्र.3 चे यादीसोबत पान क्र.4 ते पान क्र.10 लगत कागदपत्रे दाखल केलेली आहेत. याकामी अर्जदार यांनी पान क्र.12 लगत लेखी युक्तीवाद सादर केलेला आहे. या कामी अर्जदार यांनी तक्रार अर्ज हेडनोटमध्येच मे.पॉवरडील एनर्जी सिस्टिम्स (इं) प्रा.लि. तर्फे दिपक भय्याजी मालेराव असा उल्लेख केलेला असून विल्होळी, नाशिक येथील पत्ता दिलेला आहे. तक्रार अर्ज कलम 1 मध्ये “अर्जदार यांचे विल्होळी येथे स्वतःचे कॉर्पोरेट ऑफीसचे काम चालू असून त्यासाठी विनीयरशिट सामनेवाला क्र.1 व 2 यांचे ग्रीनप्लाय या नावाने ओळखल्या जाणा-या कंपनीकडून विनीयर व इतर साहित्य कंपनीने नियुक्त केलेल्या सामनेवाला क्र.3 यांचेकडून खरेदी केलेले आहे.” हे मान्य केलेले आहे. अर्जदार यांची मे.पॉवरडील एनर्जी सिस्टिम्स (इं) प्रा.लि. या नावाची स्वतःची कंपनी आहे. अर्जदार हे सदरचा व्यवसाय हा निश्चीतपणे मोठया प्रमाणावर नफा मिळविण्याच्या हेतुनेच व्यापारी कारणाकरीता मोठया प्रमाणावर करीत आहेत ही बाब अर्जदार यांचे तक्रार अर्जामधील कथनामधूनच स्पष्ट झालेली आहे. अर्जदार हे मे.पावरडील एनर्जी सिस्टीम्स (इं) प्रा.लि. हा व्यवसाय/धंदा स्वयंरोजगारासाठी केवळ एकटयानेच करीत आहेत. अर्जदार यांचेकडे कोणतेही नोकर चाकर नाहीत व धंदा व्यवसाय करण्यासाठी अर्जदार हे कोणाचीही मदत घेत नाहीत असा कोणताही उल्लेख अर्जदार यांनी तक्रार अर्ज व प्रतिज्ञापत्रामध्ये कोठेही केलेला नाही. वरील सर्व कारणांचा विचार होता अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडून व्यापारी कारणासाठी मोठया प्रमाणावर नफा मिळविण्यासाठी विनीयरशिट खरेदी घेतलेले आहेत असे दिसून येत आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता अर्जदार यांचा तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 2(ड)(2) प्रमाणे चालण्यास पात्र नाही असे या मंचाचे मत आहे. तसेच अर्जदार यांनी संपुर्ण तक्रार अर्जामध्ये कोठेही सेवेतील निष्काळजीपणा किंवा विनीयरशिटमधील दोषाबाबत दाद मागितलेली नाही. तसेच विनीयरशिट बदलून मिळावे अशीही दाद अर्जदार यांनी तक्रार अर्जामध्ये मागितलेली नाही. याउलट तक्रार अर्ज विनंती कलम 12 मधील मागणीचा विचार होता अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडून केवळ रक्कम वसूल करुनच मागितलेली आहे असे दिसून येत आहे. तक्रार अर्ज विनंती कलम 12 मधील मागणीचा विचार होता अर्जदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्द दिवाणी स्वरुपाची दाद मागितलेली आहे असे दिसून येत आहे. या कामी अर्जदार यांनी मा.सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांचेसमोरील सिव्हील अपील क्र.1879/2003 कर्नाटक पावर ट्रान्समीशन कॉर्पोरेशन विरुध्द अशोक आयर्न वर्कस् हे वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्र दाखल केलेले आहे. परंतु या वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्रामध्ये व्यापारी कारण (Commercial purpose) या बाबत कोणतेही विवेचन करण्यात आलेले नाही यामुळे अर्जदार यांनी दाखल केलेले व वर उल्लेख केलेले वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्र या कामी लागु होत नाही. याकामी मंचाचेवतीने पुढीलप्रमाणे वरिष्ठ कोर्टांचे निकालपत्रांचा आधार घेतलेला आहेः 1) 1(2011) सि.पी.जे. महाराष्ट्र राज्य आयोग. पान 55. दयाराम भिका अहिरे नाशिक विरुध्द कोटक महिंद्रा बँक शाखा नाशिक. 2) 4(2011) सि.पी.जे.राष्ट्रीय आयोग. पान 455 जे के अग्रवाल विरुध्द थ्री सी युनिर्व्हर्सल डेव्हलपर्स 3) 2(2012) सि.पी.जे. राष्ट्रीय आयोग. पान 173 एम सी एस कॉम्प्युटर्स सर्व्हीसेस विरुध्द अलिना अॅटो इंडस्ट्रीज. अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, लेखी युक्तीवाद, मंचाचे वतीने आधार घेतलेली व वर उल्लेख केलेली वरिष्ठ कोर्टांची निकालपत्रे आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेः आ दे श अर्जदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे. |