नि. 17
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष : श्री.ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्य : श्री के.डी.कुबल
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 323/2011
----------------------------------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : 05/12/2011
तक्रार दाखल तारीख : 31/12/2011
निकाल तारीख : 24/05/2013
-----------------------------------------------------------------
श्री अशोक रघुनाथ पाटील
वय वर्षे – 43, धंदा – शेती
द्वारा ओंकार मेडिकल, एस.टी.स्टँड रोड,
कुंडल, ता.पलूस जि. सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
एक्स्लेंट अॅटोमोटीव्ह प्रायव्हेट लि. सांगली
ऑथोराईज्ड सर्व्हिस डिलर,
रि.स.नं.454/1, इंदिरानगर,
सिव्हील हॉस्पीटलचे मागे, सांगली ..... जाबदार
तक्रारदार तर्फे : अॅड के.सी.कदम
जाबदार तर्फे : अॅडएस.एम.जंगम
- नि का ल प त्र -
द्वारा – मा. सदस्य - श्री के.डी.कुबल
1. तक्रारदाराने आपल्या इंडिगो गाडीचा बॉशपंप नादुरुस्त झाल्याने जाबदाराकडे दुरुस्तीसाठी दिला. दुरुस्तीचा मेहनताना घेऊनही बॉशपंप सदोष राहिला, त्यामुळे तक्रारदारास झालेल्या नुकसान भरपाईपोटी प्रस्तुतची तक्रार मंचासमोर दाखल करण्यात आली आहे.
2. तक्रारदाराने त्याच्या ताब्यातील चारचाकी गाडी इंडिगो क्र.एमएच 06/डब्ल्यू 3516 चे इंजिनचे काम असलेने इक्बाल मेस्त्री नामक मॅकॅनिककडे कामासाठी दिली. सदर मॅकेनिकने इंजिनचे काम केले. मात्र बॉशपंप मध्ये दोष असलेने बॉशपंप दुरुस्तीसाठी जाबदारच्या वर्कशॉपमध्ये दि.18/1/2001 रोजी देण्यात आला. जाबदाराने सदर बॉशपंप दुरुस्त करुन दि.20/1/2011 रोजी दुरुस्ती कामाचे बिलासह तक्रारदाराकडे परत केला. तक्रारदाराने बॉशपंप दुरुस्तीचे दिलेले बिल रु.9,471/- पोच केले. सदर बॉशपंप इंडिगो गाडीला बसविला असता गाडी व्यवस्थित चालू होईना. याचा अर्थ जाबदाराने बॉशपंप व्यवस्थित दुरुस्त केलेला नव्हता. तक्रारदारास दिलेल्या सेवेमध्ये त्रुटी ठेवून, सदोष सेवा देऊन, तक्रारदारास निष्कारण खर्चात पाडल्याने पुनःश्च अन्यत्र बॉशपंप दुरुस्त करुन घ्यावा लागला. जाबदाराने बॉशपंप योग्य पध्दतीने दुरुस्त केल्याचे सांगितले, इंजिनमध्ये दोष आहे असे तक्रारदारास सांगितले. तक्रारदाराने दि.6/3/2011 रोजी बॉशपंप कोल्हापूर येथील कॅडसन इंजिनिअर्स यांचेकडे दुरुस्तीसाठी दिला. त्यांनी तक्रारदाराकडून बॉशपंप पुनर्दुरुस्तीची रु.1,938/- रक्कम घेतली तरीही त्यामधील दोष निघाला नाही. यासाठी तक्रारदाराला कुंडल ते सांगली, कुंडल ते कराड, कराड ते कोल्हापूर, कुंडल ते कोल्हापूर असे हेलपाटे मारावे लागले. दरम्यानचे काळात दि.8/3/11 रोजी स. 11.44.35 वाजता टी.व्ही.एस. ल्यूकास कंपनीचे कोल्हापूर येथील अधिका-यांशी संपर्क साधला. त्यांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. कॅडसन इंजिनिअर्स कोल्हापूर यांनी सांगितले की, जाबदाराने एक्सलंट ऑटोमोटीव्ह यांनी जो बॉशपंप दुरुस्त करुन दिला, त्यातील सर्व पार्ट खराब आहेत. ते सर्व पार्ट बदलले तर बॉशपंप दुरुस्त होईल व कराड येथे दि.17/5/2011 रोजी “जैसे थे” स्थितीत गाडी कॅडसन यांचेकडे नेली. त्यांनी चांगल्या पध्दतीने बॉशपंप दुरुस्त करुन दिला. सदर बॉशपंप गाडीला बसविला असता गाडी व्यवस्थित सुरु झाली. याचा अर्थ जाबदारांनी बॉशपंप दुरुस्तीचे रु.9,471/- घेवूनही चांगले काम केले नव्हते. तक्रारदाराचा बॉशपंप दुरुस्त करुन न देताच, बिल मात्र भरमसाठ घेतले. ही कृती बेकायदेशीर असून तक्रारदाराला झालेल्या आर्थिक शारिरिक मानसिक त्रास व नुकसानीस जाबदार जबाबदार असून झालेली नुकसान भरपाई रु.1,50,000/- व तक्रारीचा खर्च रु.1,500/- मिळावेत यासाठी हा तक्रारअर्ज मंचासमोर दाखल करण्यात आला. यासंदर्भात वकीलांमार्फत तक्रारदाराने जाबदारास एक नोटीस पाठविली परंतु त्यांनी थातुरमातूर उत्तरे देवून तक्रारदाराची बोळवण केल्यानेच न्यायासाठी तक्रारदाराने मंचाकडे धाव घेतली.
3. आपले तक्रारीच्या पुष्ठयर्थ तक्रारदाराने स्वतःचे शपथपत्रासह नि.क्र.4 वर एकूण 9 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्याचप्रमाणे नि.13 वर ईक्बाल बाबू मुजावर यांचे शपथपत्र जोडलेले आहे.
4. जाबदारतर्फे लेखी म्हणणे नि.क्र.7 वर देण्यात आलले असून तक्रारदाराचे सर्व मुद्दे फेटाळले आहेत. ‘आपण केवळ एस्टिमेट दिलेले होते अन्य कोणतीही कृती केली नव्हती’ असे जाबदारचे म्हणणे आहे. सदरची तक्रार खोडसाळ असलेचे कथन केले आहे.
5. आपले म्हणणेचे पुष्ठयर्थ नि.क्र.10 वर एकूण 5 कागदपत्रे दाखल करणेत आली आहेत.
6. सदर तक्रार युक्तिवादाकरिता ठेवण्यात आलेनंतर अनेक तारखांना जाबदार अनुपस्थित राहिलेने त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश नि.क्र.1 वर पारीत करण्यात आला व प्रकरण निकालावर घेण्यात आले.
7. प्रस्तुत प्रकरणात तक्रारदाराची तक्रार, लेखी म्हणणे, कागदोपत्री पुरावा, विधिज्ञांनी केलेला युक्तिवाद व जाबदारचे लेखी म्हणणे-पुरावा यांचे अवलोकन केले असता न्यायमंचापुढे निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होत आहेत.
अ.क्र. |
मुद्दे |
उत्तरे |
1. |
तक्रारदार हे जाबदार यांचा ग्राहक आहेत काय ? |
होय |
2 |
जाबदार यांनी तक्रारदारास द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? |
होय |
3 |
काय आदेश ? |
खालीलप्रमाणे |
कारणमिमांसा
मुद्दा क्र.1 ते 3
i. तक्रारदाराने बॉशपंप दुरुस्त करणेसाठी जाबदारकडे दिलेला होता. बॉशपंप दुरुस्त केल्यावर नि.क्र.4/2 वर VAT TIN NO. 27730660068 V/30-5-2008 व CST TIN 27730660068 C/30-5-2008 सह बिल नं.855/11.1.2011 जोडलेले आहे. त्यामुळे तक्रारदार आणि जाबदार यांचेमध्ये ग्राहक सेवादार नाते निर्माण झाल्याचे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हा जाबदारचा निश्चितपणे ग्राहक ठरतो हे सदर बिल पावतीवरुन दिसून येते. सदर बिल हे इक्बाल मेस्त्री म्हणजे ईक्बाल बाबू मुजावर यांचे नावे असले तरी त्याबाबत आपण तक्रारदाराच्या वतीने जाबदार यांचेशी व्यवहार केला होता व तसे शपथपत्र नि.क्र.13 वर दाखल करणेत आले आहे.
ii. जाबदारकडे बॉशपंप दुरुस्ती दिल्यानंतर त्याने रु.9,471/- दुरुस्तीचे घेवून सुध्दा योग्यरित्या बॉशपंप दुरुस्त करुन दिला नाही. किंबहुना त्यामध्ये वापरलेले पार्टस दुय्यम दर्जाचे होते असे दुस-या कॅडसन इंजिनिअर्स कोल्हापूर यांनी सांगितले. म्हणजे दर्जेदार पार्टस न वापरता सर्वसाधारण पार्टस जाबदाराने वापरल्याचे दिसून येते. त्यामुळेच जाबदाराने दुरुस्त करुन दिलेला बॉशपंप गाडीला बसविल्यानंतर गाडी चालत नव्हती व आवाज होत होता, यावरुन असे दिसते की, जाबदाराने अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब करुन सेवेमध्ये त्रुटी निर्माण केल्याचे दिसून येते.
iii. तक्रारदार यांनी नि.क्र.4/2 वर दाखल केलेला कागदोपत्री पुरावा हे बिल नसून केवळ कोटेशन होते, बॉशपंपाच्या दुरुस्तीस येणा-या खर्चाचे एस्टिमेट दर्शविण्यात आले होते असे जाबदाराचे म्हणणे आहे. सदर बिल क्र.855/18.1.2011 चे अवलोकन केले असता त्याचेवर VAT TIN NO. व CST TIN NO. नमूद आहे. साधारणतः पक्क्या बिलावरच अशा नोंद असतात असे मंचाला वाटते. त्या बिलावर VAT TIN NO. 27730660068 V/30-5-2008 व् CST TIN 27730660068 C/30-5-2008 नमूद आहेत. हयाचा अर्थ जाबदाराने सदर दिलेले बिल हे TAX NVOICE होते, बॉश पंप दुरुस्त केल्याची रक्कम रु.9,471/- जाबदाराने घेतल्याचे स्पष्ट होते.
iv. जाबदाराने आपले लेखी म्हणणे दिल्यानंतर युक्तिवादापर्यंत मंचामध्ये सातत्याने अनुपस्थिती दर्शविली. जाबदार सतत्याने गैरहजर असल्यामुळे मंचाने त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत केला. त्यामुळे या प्रकरणात जाबदारची असलेली अनास्था प्रत्यही दिसून येते.
v. जाबदारने तक्रारदाराशी ग्राहक म्हणून जी वागणूक दिली ती योग्य नाही. त्यामुळे तक्रारदाराला अन्य ठिकाणी हेलपाटे मारावे लागले, वेळ आणि पैसा खर्च करावा लागला, त्यामुळे तक्रारदाराने मागणी केल्याप्रमाणे रु.1,50,000/- ची मानसिक शारिरिक त्रास व नुकसान भरपाईची मागणी अंशतः मान्य करण्यात येत आहे. सबब हे न्यायमंच
खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येत आहेत.
2. जाबदारने तक्रारदारास शारिरिक मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु.50,000/- देण्याचे आदेश देण्यात येत आहेत.
3. जाबदारने तक्रारदारास तक्रारीचा खर्च रु.1,000/- देण्याचे आदेश देण्यात येत आहेत.
4. वर नमूद आदेशाची अंमलबजावणी जाबदार यांनी 30 दिवसांत करावी. जाबदार यांनी आदेशाची पुर्तता न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायदयातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दि. 24/05/2013
(के.डी. कुबल ) ( ए.व्ही. देशपांडे )
सदस्य अध्यक्ष