अॅड सौरभ एस. मेहता तक्रारदारांतर्फै
जाबदेणार क्र 1 एकतर्फा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
द्वारा- मा. श्री. श्रीकांत. एम. कुंभार, सदस्य
:- निकालपत्र :-
दिनांक 23/ऑगस्ट/2013
तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार जाबदेणार यांच्याविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत सेवेतील त्रुटी संदर्भात दाखल केलेली आहे. यातील कथने थोडक्यात खालीलप्रमाणे-
[1] जाबदेणार क्र 2 हे सर्व्हे नं 96, हिस्सा नं 3/2 व सर्व्हे न 97, सर्व्हे नं 3/2 क्षेत्र 465.50 चौ.मिटर कोथरुड, भुसारी कॉलनी, पुणे या जागेचे मालक असून त्यांनी डेव्हलपमेंट करारनामा दिनांक 30/12/2003 नुसार जाबदेणार क्र 1 यांना सदरहू जागा डेव्हलप करण्यासाठी दिली. जाबदेणार क्र 1 यांनी पुणे महानगरपालिकेच्या दिनांक 18/3/2008 रोजीच्या आदेशानुसार इमारत बांधकामास मंजूरी घेतली. वर नमूद जागेवर उभा राहिलेला प्रकल्प म्हणजेच “सुर्या रेसिडन्सी”. तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याकडून सुर्या रेसिडन्सी मध्ये सदनिका क्र 6, तिसरा मजला, क्षेत्रफळ 65.40 चौ. मिटर अधिक टेरेस कार्पेट एरिया 17.72 चौ.मिटर एकूण 92.82 चौ.मिटर दुचाकी पार्किंगसह विकत घेतला. जाबदेणार क्र 1 यांनी दिनांक 28/1/2008 रोजी पुर्णत्वाचा दाखला घेतला व दिनांक 5/2/2008 रोजी जाबदेणार क्र 1 यांनी तक्रारदारांना सदनिकेचा ताबा दिला. परंतू अद्यापही जाबदेणार यांनी सदनिका धारकांची सोसायटी करुन दिली नाही, कन्व्हेअन्स डीड करुन दिले नाही, तसेच लिफटला बॅटरी बॅक अप दिला नाही. तक्रारदारांनी जाबदेणार क्र 1 यांना दिनांक 5/2/2010 रोजी नोटीस पाठवूनही उपयोग झाला नाही. म्हणून तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याविरुध्द प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार जाबदेणार क्र 1 यांच्याकडून सोसायटी स्थापन करुन मागतात, लिफटला बॅटरी बॅक अप मागतात, तसेच नुकसान भरपाई पोटी जाबदेणार क्र 1 यांच्याकडून रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 20,000/- मागतात.
[2] तक्रारदारांच्या दिनांक 29/3/2013 रोजीच्या अर्जानुसार जाबदेणार क्र 2 यांना सदरहू तक्रारीतून वगळण्यात आले.
[3] जाबदेणार क्र 1 यांना मंचाची नोटीस लागूनही गैरहजर, त्यांनी कोणत्याही प्रकारचे लेखी म्हणणे दाखल केलेले नाही म्हणून सदरचे प्रकरण एकतर्फा चौकशीसाठी ठेवण्यात आले.
[4] तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीच्या पुष्टयर्थ शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता जाबदेणार यांनी तक्रारदारांना सुर्या रेसिडन्सी मधील सदनिका क्र 6 चा ताबा दिल्याचे स्पष्ट होते. तक्रारदार व जाबदेणार यांच्यात दिनांक 19/12/2007 रोजी झालेल्या नोंदणीकृत करारनाम्यानुसार जाबदेणार यांनी लिफटला बॅटरी बॅक अप दयावयाचा होता. जाबदेणार क्र 1 यांना नोटीस बजावूनही त्यांनी मंचासमोर उपस्थित राहून लेखी जबाब दाखल करुन तक्रारीतील कथने नाकारलेली नसल्यामुळे लिफटला बॅटरी बॅक देण्यात आलेला नाही हे तक्रारदारांचे म्हणणे नाकारण्यास कोणतेही कारण नाही. नोंदणीकृत करारात मान्य केलेल्या सोई सुविधा न देणे ही जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी ठरते. लिफटला बॅटरी बॅक अप न दिल्यामुळे तक्रारदारांना वीज गेल्यानंतर निश्चितच शारिरीक, मानसिक त्रास सहन करावा लागला असेल. म्हणून तक्रारदार हे जाबदेणार क्र 1 यांच्याकडून नुकसान भरपाई पोटी रक्कम रुपये 5000/- मिळण्यास पात्र ठरतात. जाबदेणार यांनी सदनिका धारकांची सोसायटी स्थापन करुन दिलेली नाही तसेच कन्व्हेअन्स डीडही करुन दिलेले नाही ही देखील जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी ठरते. सबब जाबदेणार क्र 1 यांनी सोसासटी स्थापन करुन दयावी कन्व्हेअन्स डीड करुन दयावे असे आदेशित करणे न्यायोचित ठरेल.
वर उल्लेख केलेल्या विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहे.
:- आदेश :-
1. तक्रार जाबदेणार क्र 1 यांच्याविरुध्द अंशत: मंजूर करण्यात येत
आहे. जाबदेणार क्र 2 यांना तक्रारीमधून वगळण्यात येत आहे.
2. जाबदेणार क्र 1 यांनी नोंदणीकृत करारानुसार सोई सुविधा न
देऊन सेवेत त्रुटी निर्माण केलेली आह असे जाहिर करण्यात येत आहे.
3. जाबदेणार क्र 1 यांनी “सुर्या रेसिडन्सी”, सर्व्हे नं 96, कोथरुड, भुसारी कॉलनी, पुणे मधील लिफटला बॅटरी बॅक अप आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहा आठवडयांच्या आत दयावा.
4. जाबदेणार क्र 1 यांनी आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत सोसायटी स्थापन करुन दयावी तसेच कन्व्हेअन्स डीड – हस्तांतरणपत्र करुन दयावे. जाबदेणार यांनी मुदतीत हस्तांतरण पत्र नोंदवून न दिल्यास तक्रारदारांनी स्वत: सक्षम अधिका-यांकडून मानीव हस्तांतरणपत्र नोंदवून घ्यावे.
5. जाबदेणार क्र 1 यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई पोटी रक्कम रुपये 5000/- व तक्रारीचा खर्च रुपये 3000/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावा.
6. तक्रारदारांनी मा. सदस्यांसाठी दिलेले संच आदेशाच्या दिनांकापासून एका महिन्याच्या आत घेऊन जावेत. अन्यथा ते नष्ट करण्यात येतील.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.
स्थळ- पुणे
दिनांक – 23 ऑगस्ट 2013
[श्रीकांम एम. कुंभार] [व्ही. पी. उत्पात]
सदस्य अध्यक्ष