नि. 13
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष : श्री.ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्य : श्री के.डी.कुबल
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 141/2011
-----------------------------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : 20/05/2011
तक्रार दाखल तारीख : 25/05/2011
निकाल तारीख : 16/03/2013
-----------------------------------------------------------------
नामदेव रामू आलासे
वय वर्षे – 58, व्यवसाय – सेवानिवृत्त
रा. मु.पो. इनामधामणी, ता.मिरज सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
व्यवस्थापक
मे.भगीरथ व्हील्स प्रा.लि.
ऑथोराइज्ड डिलर ऑफ सुझुकी,
स्वराज्य, इंद्रप्रस्थनगर, माधवनगर रोड,
सांगली ..... जाबदार
तक्रारदार तर्फे : अॅडडी.एन.बेले
जाबदारतर्फे : अॅडजे.एस.कुलकर्णी
- नि का ल प त्र -
द्वारा – मा. सदस्य - श्री के.डी.कुबल
1. प्रस्तुतची तक्रार तक्रारदार यांनी दोन चाकी वाहनाची खरेदीची पूर्ण किंमत भरुनही डिलीव्हरी कबूल केलेप्रमाणे मुदतीत दिली नाही व भरलेली रक्कम फक्त परत करुन कोणतीही नुकसान भरपाई व्याज देणेत आले नाही त्यामुळे सेवेत त्रुटी झाली म्हणून हा तक्रारअर्ज मंचासमोर सादर केला आहे.
2. सदर तक्रार अर्जाचा तपशील थोडक्यात पुढीलप्रमाणे -
तक्रारदार यांनी जाबदारकडे दि.16/2/2011 रोजी दोन चाकी मॉडेल सुझुकी अॅक्सेस 125 खरेदी घेणेकरिता रक्कम रु.10,000/- रोखीने भरुन बुकींग केले. सदर वाहनाची डिलीव्हरी एक महिन्याचे आत पाहिजे असल्यास वाहनाचे पूर्ण पेमेंट भरावे लागेल असे जाबदार यांनी तक्रारदार यांना सांगितले. त्यामुळे तक्रारदार यांनी दी रत्नाकर बँक लि. शाखा सांगली वरील डी.डी.नं.027417 दि.21/2/2011 ने रु.41,200/- जाबदारकडे भरले. एक महिना पूर्ण झालेनंतर दि.21/3/2011 रोजी गाडीच्या डिलीव्हरी संबंधी फोनद्वारे जाबदार यांचेकडे चौकशी केली असता गाडीची डिलीव्हरी दि.28/3/2011 रोजी मिळेल व त्याकरिता गाडी पासिंगसाठी फोटो, रेशनकार्ड, व्होटींग कार्ड यांच्या झेरॉक्स प्रती व्हेरिफाय करुन घेवून यावे असे सांगितलेवरुन तक्रारदार यांनी दि.22/3/11 रोजी कागदपत्रांची पूर्तता केली. दि.28/3/2011 रोजी तक्रारदार यांनी फोनवरुन गाडी पासिंग झाली का याबाबत जाबदारकडे विचारणा केली असता दि.28/3/2011 ऐवजी दि.30/3/2011 रोजी गाडीचे पासिंग करुन डिलीव्हरी देणेत येईल असे जाबदार यांनी सांगितले मात्र दि.31/3/2011 रोजी तक्रारदार हे प्रत्यक्ष शोरुममध्ये गेले असता जाबदार यांनी गाडीची डिलीव्हरी देण्यास नकार देवून तक्रारदार यांना अपमानकारक वागणूक दिली. गाडीची डिलीव्हरी दिली नाही. त्यानंतर तक्रारदार यांनी दि.3/4/2011 रोजी रजिस्टर पोस्टाने भरलेले पैसे सव्याज आणि अपमानास्पद वागणूकीची नुकसान भरपाई मिळणेबाबत जाबदारला तक्रारदार यांनी नोटीस पाठविली. त्याला अनुसरुन जाबदार यांनी दि.12/4/2011 रोजी पत्र पाठविले व त्यासोबत गाडीपोटी भरलेली निव्वळ रक्कम रु.51,200/- चा धनादेश पाठवून दिला. तक्रारदारांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र विभाग यांचेकडे तक्रार दाखल केली. मात्र चर्चेने प्रश्न सोडविणेसाठी ग्राहक पंचायतीने दि.28/4/2011 रोजी जाबदारला उपस्थित राहणेबाबत कळविले मात्र त्यावेळी ते उपस्थित राहिले नाहीत किंवा कोणतीही दखल घेतली नाही. सबब तक्रारदाराने मंचाकडे धाव घेवून जाबदारकडे गाडीसाठी भरलेल रक्कम रु.51,200/- व या रकमेवर द.सा.द.शे. 18 टक्के प्रमाणे 1,565/- व्याज मिळावे व मानसिक त्रासापोटी रु.40,000/- तसेच तक्रारीचा खर्च म्हणून रु.3,000/- मिळावेत म्हणून प्रस्तुतचा अर्ज दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रार अर्जासोबत शपथपत्र, पैसे भरणा केलेच्या पावत्या, नोटीस पत्र, ग्राहक पंचायत सांगली यांची नोटीस इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.
3. जाबदार यांचेवर नोटीस बजाविण्यात आल्यावर त्यांनी तक्रारदाराच्या तक्रारीवर आपले लेखी म्हणणे सादर केले असून तक्रारदाराचे सर्व आरोप फेटाळलेले आहेत. आपले म्हणणेचे पुष्ठयर्थ त्यांनी तक्रारदाराच्या पत्राला दिलेले उत्तर नि.9/1 वर व नि.9/2 वर रु.51,200/- रकमेचा चेक इत्यादी कागदपत्रे सादर केलेले आहेत.
4. तक्रारदार यांनी दाखल केलेला नि. .... वरील लेखी युक्तिवाद तसेच तोंडी युक्तिवाद व जाबदार यांचे लेखी म्हणणे वाचले.
5. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज, दाखल केलेली कागदपत्रे, लेखी युक्तिवाद व ऐकण्यात आलेला तोंडी युक्तिवाद या सर्व बाबींवरुन तक्रारदार यांनी गाडी बुकींगसाठी व खरेदीसाठी जाबदार यांचेकडे रकमेचा भरणा केला होता व जाबदारने ती रक्कम स्वीकारली होती हे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे जाबदर यांचे ग्राहक होतात ही बाब स्पष्ट होते. तक्रारदार यांनी दाखल केलेला अर्ज व प्रतिउत्तर व जाबदार यांनी दिलेले म्हणणे व दाखल कागदपत्रे यावरुन खालील मुद्दे मंचाच्या निष्कर्षासाठी उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | उत्तरे |
1. | तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक होतो काय ? | होय |
2 | तक्रारदार यांचे गाडी खरेदी प्रकरणात अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब करुन जाबदार यांनी तक्रारदारास सदोष सेवा दिली आहे काय ? | होय |
3 | तक्रारदार हे मागणीप्रमाणे अनुतोष मिळणेस पात्र आहेत काय ? | अंशतः मंजूर |
4 | काय आदेश ? | अंतिम आदेशाप्रमाणे |
कारणमिमांसा
मुद्दा क्र.1
तक्रारदारांनी जाबदारकडे दुचाकी गाडी बुकींगसाठी रोख रु.10,000/- आगाऊ रक्कम व गाडीची डिलीव्हरी 1 महिन्यात मिळणेसाठी रु.41,200/- अशी एकूण रु.52,200/- रक्कम स्वीकारलेली आहे. त्यामुळे दोघांमध्ये ग्राहक सेवेकरी नाते निर्माण झाले होते हे नि.2/1, 2/2, व 2/3 वरुन दिसून येते त्यामुळे तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत हे स्पष्ट होते.
मुद्दा क्र.2
तक्रारदाराकडून आगाऊ रक्कम घेवून वस्तू न देणे हा अनुचित व्यापारी पध्दतीचा प्रकार समजला जातो. जाबदारने ती कृती केली आहे हे सबळ पुराव्यावरुन म्हणजे नि. 2/1 व नि. 2/3 वरील पावतींवरुन दिसून येते. पैसे घेवूनही दुचाकी गाडी देणेस टाळाटाळ करणे हे ग्राहकांच्या हिताचे नाही असे मंचाला वाटते. त्यामुळे जाबदार हा दोषास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
मुद्दा क्र.3
या तक्रारीत जाबदार यांच्या सेवेमध्ये त्रुटी सिध्द होत आहे व तक्रारदार हे जाबदारकडून तक्रारीत विनंती केलेप्रमाणे भरलेल्या रकमेवर व्याज मिळणेस क्रमप्राप्त आहेत. तसेच मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेस हक्कदार आहेत असे मंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येत आहेत.
2. तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे गाडीसाठी भरलेल्या रक्कम रु.51,200/- या रकमेवर दि.21/2/2011 पासून ते रक्कम परत दिले ताररखेपर्यंत म्हणजे दि.12/4/2011 पर्यंत द.सा.द.शे. 8.5 टक्के प्रमाणे व्याज जाबदार यांनी तक्रारदार यांना देणेचे आदेश करण्यात येत आहेत.
3. तक्रारदार यांना जाबदार यांनी शारीरिक, मानसिक ञासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रुपये 5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार माञ) अदा करणेचे आदेश करण्यात येत आहेत.
4. वर नमूद आदेशाची अंमलबजावणी जाबदार यांनी 45 दिवसांत करावी. जाबदार यांनी आदेशाची पुर्तता न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायदयातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दि. 16/03/2013
(के.डी. कुबल ) ( ए.व्ही. देशपांडे )
सदस्य अध्यक्ष