(आदेश पारीत व्दारा- श्रीमती.चारु वि.डोंगरे, मा.सदस्या)
1. तक्रारदार नं.1 ते 3 यांनी सदरील तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाला यांनी द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे. म्हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केलेली आहे.
2. तक्रारदार क्र.1 ते 3 हे रा.जामखेड जि.अहमदनगर येथील रहिवासी आहेत. सामनेवाला क्र.1 हे सामनेवाला नं.3 यांचे गॅस वितरक आहेत. सामनेवाला नं.2 हे सामनेवाला नं.1 यांचेकरीता गॅस एजन्सीमध्ये व्यवस्थापक म्हणून कामकाज पाहातात. सामनेवाला नं.1 हे ग्राहकांना जामखेड शहरासाठी गॅस सिलेंडर पुरविण्याचा व्यवसाय करतात. तक्रारदार नं.1 ते 3 यांचेकरीता श्री.रामचंद्र मारुती इंगळे हे संपुर्ण तक्रारीचे कामकाज त्यांचे वतीने पाहाणार आहेत. याबाबतचे अधिकारपत्र तक्रारदार नं.1 ते 3 यांनी करुन दिलेले आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला नं.1 यांचेकडे संपर्क साधला व कागदपत्रे सादर करुन सिलेंडरची मागणी केली. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी सर्व ग्राहकांना सिलेंडरसह कुकर व टिफीनचा डबा खरेदी करण्याची सक्ती केली. याबाबतच्या संपुर्ण बातम्या ह्या वर्तमानपत्रात प्रसिध्द झाले आहेत. सामनेवाला नं.3 यांचे योजनेनुसार सामनेवाले नं.1 व 2 यांना अशा प्रकारची सक्ती करता येत नाही. सदरहू सक्ती ही बेकायदेशिर आहे. तक्रारदार क्र.1 ते 3 यांना दुस-या सिलेंडरसह कुकर व टिफीनचा डबा घेण्यास भाग पाडले. त्याविषयी त्याचे बिल मागितले असता ते सामनेवाले नं.1 व 2 यांनी बिल दिले नाही. अशा प्रकारे सामनेवाला नं.1 व 2 यांनी अनेक ग्राहकाकडून वेगवेगळया रक्कमा आकारल्या आहेत. तक्रारदार व सामनेवाला नं.1 ते 3 यांचेमध्ये ग्राहक हे नातेसंबध तयार झाले. तक्रारदार यांनी दिनांक 17.06.2014 रोजी ग्राहक पंचायतीकडे तक्रार केली. त्यानुसार ग्राहक संघटनेने मा.तहसिलदार अहमदनगर यांचेकडे दिनांक 13.05.2014 रोजी निवेदन दिले होते. जिल्हाधिकारी यांचेसोबत याबाबत संयुक्त बैठकी झाल्या आहेत. सदरहू सुचनाचे पालन करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी सामनेवाले नं.1 ते 3 यांना अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे असे कळविले. तक्रारदार यांनी दिनांक 21.05.2014 रोजी सामनेवाला नं.1 व 2 यांचे कडे सिलेंडरची मागणी करण्यासाठी गेले असता, सामनेवाला नं.1 व 2 यांनी तक्रारदार क्र.1 यांना सिलेंडर सोबत कुकर व टिफीन डबा घेण्याची सक्ती केली. त्यांचेकडून कुकर व टिफीन पोटी 1,400/- रुपये घेतले. मात्र त्याची पावती दिली नाही. त्यानंतर सामनेवाला नं.1 व 2 यांनी तक्रारदारास बिल नं.4758 दिले, त्याप्रमाणे गॅसची किंमत रुपये 454.50 पैसे, सिलेंडर अनामत रक्कम रु.1,450/-, स्टॅम्प डयुटी रुपये 100/-, इन्स्टॉलेशन चार्जेश रुपये 50/- अशी एकुण रक्कम रुपये 2,244.50 पैसेचे बिले दिले. मात्र प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारे स्टॅम्प घेण्यात आला नाही, इन्स्टॉलेखन म्हणजे घरपोच सिलेंडर दिला नाही. अशा प्रकारे सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला. त्यामुळे तक्रारदार यांनी त्यांनी दिलेल्या रकमेची मागणी केली. परंतू सामनेवाला नं.1 ते 3 यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे तक्रारदाराने मंचात तक्रार दाखल करुन परीच्छेद क्र.15 प्रमाणे तक्रारदाराने मागणी केली आहे.
3. सामनेवाला नं.2 हे प्रकरणात वकीलामार्फत हजर झाले. परंतू त्यांनी त्यांची लेखी कैफियत प्रकरणात दाखल केली नाही. सबब त्यांचे विरुध्द विना कैफियत प्रकरण पुढे चालविण्याचा आदेश निशाणी 1 वर पारीत करण्यात आला. सामनेवाला नं.1 व 3 यांना नोटीस बजावणी होऊनही ते प्रकरणात हजर झाले नाही. सबब त्यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश निशाणी 1 वर पारीत करण्यात आला.
4. तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, शपथपत्र, त्यांचे वकील सौ.हेंद्रे यांनी केलेला युक्तीवाद ऐकला व न्याय निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
| मुद्दे | उत्तर |
1. | तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय.? | ... होय. |
2. | सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सेवा देणेत त्रुटी दिली आहे काय. | ... होय. |
3. | आदेश काय ? | ...अंतीम आदेशानुसार. |
का र ण मि मां सा
5. मुद्दा क्र.1 ः- तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडून सिलेंडर खरेदी केलेला आहे व त्याचे बिल सामनेवाला यांनी दिलेले आहे. ही बाब उभयतांना मान्य आहे. म्हणून तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
6. मुद्दा क्र.2 ः- तक्रारदार नं.1 ते 3 यांनी श्री.रामचंद्र मारुती इंगळे यांना अधिकारपत्र देऊन सदरची तक्रार चालविण्यास अधिकारपत्र दिलेले आहे. तक्रारदार यांनी तक्रारीत असे कथन केलेले आहे की, सामनेवाला नं.1 व 3 हे गॅस वितरक आहेत. सामनेवाला नं.2 हे सामेनवाला नं.1 यांचेकरीता गॅस एजन्सीमध्ये व्यवस्थापक म्हणून काम पाहत आहेत. सामनेवाला नं.1 हे जामखेड शहरात गॅस सिलेंडरचा पुरवठयाचा व्यवसाय करतात. त्यामुळे तक्रारदार नं.1 ते 3 यांनी सामनेवाला नं.1 व 2 यांचेकडे कागदपत्रे सादर करुन सिलेंडरची मागणी केली. त्याप्रमाणे सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सिलेंडर दिले आहेत ही बाब प्रकरणात दाखल असलेल्या कागदपत्रावरुन स्पष्ट होते. व तक्रारदाराचे तक्रारीचे अवलोकन केले असता त्यामध्ये सदरची बाब नमूद आहे. पुढे तक्रारदाराने असे कथन केले आहे की, सामनेवाला नं.1 व 2 यांनी सर्व ग्राहकांना सिलेंडरसह कुकर व टिफीन डबा खरेदी करण्याची सक्ती केली. तक्रारदाराला सामनेवाला नं.1 व 2 यांनी बिल दिलेले नाही. मात्र तक्रारदाराकडून सिलेंडर खरेदीपोटी तसेच त्यासोबत कुकर व टिफीन डबा घेतलेचे बिल प्रकरणात दाखल केले यावरुन ही बाब स्पष्ट होते की, तक्रारदार यांना सामनेवाला यांनी सिलेंडर खरेदीपोटी बिल दिलेले आहे. तसेच त्यांनी तक्रारदाराकडून वेगवेगळया वस्तुसाठी रक्कमा आकारलेल्या आहेत ही बाब स्पष्ट करण्यासाठी तक्रारदाराने दाखल केलेले बिलाचे अवलोकन केले. सदरहू बिल हे 2,244/- रुपयाचे आहे. त्यासोबत दुसरे बिल टिफीन डबा व कुकरचे 1,400/- रुपयाचे दिलेले आहे. प्रकरणात दाखल केलेले बिलावरुन ही बाब स्पष्ट होते की, सामनेवाला नं.1 ते 3 यांनी प्रत्येक तक्रारदाराला सिलेंडरपोटी व वस्तु खरेदीपोटी बिल दिलेले आहे. तक्रारदाराने पुढे असे कथन केलेले आहे की, सामनेवाला नं.1 ते 3 यांनी तक्रारदाराला टिफीन डबा व कुकर खरेदी करण्याची सक्ती केली. सदरचे बिल हे प्रकरणात दाखल आहे. तक्रारदारारच्या या कथनाला खोडून काढण्यासाठी सामनेवाला नं.1 व 3 यांनी प्रकरणात दाखल होऊन त्यांचे म्हणणे दाखल करण्याची आवश्यकता होती. परंतु सामनेवाले नं.1 व 3 यांना नोटीस बजावणी होऊन ते प्रकरणात हजर झाले नाहीत. सबब त्यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचे आदेश निशाणी 1 वर पारीत करण्यात आले. सामनेवाला नं.2 हे प्रकरणात हजर झाले, परंतू त्यांनी कैफियत दाखल केली नाही. त्यामुळे त्यांचे विरुध्द निशाणी 1 वर विना कैफियत तक्रार चालविण्याचे आदेश पारीत करण्यात आले.
7. तक्रारदार यांना दिलेले सिलेंडरचे कनेक्शन मिळण्यासाठी सामनेवाला यांचेकडे संपुर्ण कागदपत्रासह मागणी केली. त्यानुसार सामनेवाला यांनी सिलेंडर तक्रारदारास दिलेला आहे व त्यापोटी सिलेंडर गॅसची किंमत रुपये 454.50 पैसे, सिलेंडरची अनामत रक्कम रुपये 1450/-, स्टॅम्प डयुटी रुपये 100/-, इन्स्टॉलेशन चार्जेस रुपये 50/-, रबर टयुब रुपये 190/- असे एकुण रुपये 2,244 एवढी रक्कम आकारलेली आहे. मात्र सामनेवाला यांनी तक्रारदाराला इन्स्टॉलेशन करुन दिलेले नाही व सिलेंडर खर्चापोटी दिले नाही. तसेच रबर टयुबची रक्कम आकारली मात्र रबर टयुब दिले नाही. स्टॅम्प डयुटी रक्कम आकारली त्याचे स्टॅम्पडयुटी रक्कम दिलेली नाही असे तक्रारदाराने तक्रारीत कथन केलेले आहे. यावरुन ही बाब स्पष्ट होते की, तक्रारदाराकडून ज्यादा रक्कम सामनेवालाने आकारली मात्र वस्तु तक्रारदारास दिलेल्या नाहीत. तसेच तक्रारदाराने तक्रारीत केलेल्या कथनाप्रमाणे टिफीन डबा व कुकर घेण्यास सामनेवाला यांनी सक्ती केली त्याबाबत सिलेंडर घेताना सामनेवाला यांनी तक्रारदाराना कल्पना दिलेली नव्हती. या वस्तुपोटी 1,400/- रुपये आकारले आहे. त्याबाबतचे बिल प्रकरणात दाखल आहे यावरुन ही बाब स्पष्ट होते की, सामनेवाला यांनी त्या दोन वस्तुपोटी तक्रारदाराकडून रक्कमा आकारल्या आहेत. त्यानंतर तक्रारदार हे सामनेवाला यांचेकडे वेळोवेळी जाऊन ज्यादा आकारलेल्या रक्कमेची मागणी केली. परंतू त्यांनी वस्तू दिले नाही व रक्कमा परत दिले नाहीत. त्यामुळे तक्रारदाराला नुकसान सहन कराले लागले आहे. अशा प्रकारे सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी केलेली आहे. सबब मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
8. मुद्दा क्र.3 – तक्रारीचे अवलोकन केले असता ही बाब स्पष्ट होते की, सामनेवाला यांनी तक्रारदाराला कुकर व टिफीन डबा घेण्यासाठी सक्ती केली आणि त्यामुळे तक्रारदाराला निश्चीतच मानसिक, शारीरीक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. सबब या नुकसानीपोटी काही रक्कम तक्रारदाराला देणे न्यायोचित ठरेल. सबब मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन मुद्दा क्र.3 चे उत्तरार्थ खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येत आहे.
- अं ति म आ दे श -
1) तक्रारदार नं.1 ते 3 यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2) तक्रारदार नं.1 ते 3 यांनी सामनेवाला नं.1 ते 3 यांनी सक्ती केलेल्या वस्तू टिफीन डबा व कुकर ज्या स्थितीत असतील त्या स्थितीत सामेनवाला नं.1 ते 3 यांचेकडे परत कराव्यात. आणि सदरच्या वस्तू टिफीन डबा व कुकर सामनेवाला नं.1 ते 3 यांना मिळाल्यानंतर सामनेवाला नं.1 ते 3 यांनी संयुक्तिकरित्या व वैयक्तिकरित्या तक्रारदार नं.1 ते 3 यांना प्रत्येकी 1,400/- (रुपये एक हजार चारशे फक्त) द्यावे.
3) सामनेवाला नं.1 ते 3 यांनी तक्रारदार नं.1 ते 3 यांचेकडून आलेली ज्यादाची रक्कम रबर टयुबचे 190/- रुपये, स्टॅम्प डयुटीचे 100/- रुपये, इन्स्टॉलेशन चार्जेसचे 50/- रुपये असे एकूण रक्कम रु.340/- (रक्कम रुपये तीनशे चाळीस फक्त) सामनेवाला नं.1 ते 3 यांनी संयुक्तिकरित्या व वैयक्तिकरित्या तक्रारदार नं.1 ते 3 यांना प्रत्येकी द्यावेत.
4) सामनेवाला नं.1 ते 3 यांनी तक्रारदार नं.1 ते 3 यांना शारीरीक व मानसिक त्रासापोटी प्रत्येकी रक्कम रु.500/- [रक्कम रुपये पाचशे फक्त] व या तक्रारीचा खर्च प्रत्येकी रक्कम रु.500/- [रक्कम रुपये पाचशे फक्त] द्यावा.
5) सामनेवाला नं.1 ते 3 यांनी संयुक्तिकरित्या व वैयक्तिकरित्या सदर आदेशाची अंमलबजावणी या निकालाची प्रत मिळालेपासून 30 दिवसाचे आत करावी.
6) या आदेशाची प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्क दयावी.
7) या प्रकरणाची “ ब ” व “ क ” फाईल तक्रारकर्तास परत दयावी.