तक्रारदारातर्फे अॅड. श्री. महाजन हजर.
जाबदेणार क्र. 1 तर्फे प्रतिनिधी हजर
जाबदेणार क्र. 2 तर्फे अॅड. श्रीमती कुलकर्णी हजर
द्वारा मा. श्री. व्ही. पी. उत्पात, अध्यक्ष
** निकालपत्र **
(01/03/2014) प्रस्तुतची तक्रार ग्राहकाने जाबदेणार विक्रेते व कंपनीविरुद्ध निकृष्ट दर्जाची सेवा दिल्याबद्दल आणि अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याबद्दल ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 12 नुसार दाखल केलेली आहे. तक्रारीतील कथने खालीलप्रमाणे आहेत.
1] तक्रारदार हे ज्येष्ठ नागरिक असून शेतकरी आहेत. तालुका वेल्हे येथे ते शेतीचा व्यवसाय करतात. जाबदेणार क्र. 1 हे वाहन विक्रेते आहेत व जाबदेणार क्र. 2 हे वाहन निर्माते आहेत. तक्रारदार यांनी दि. 16/12/2010 रोजी जाबदेणारांकडून एमएच 12/एफडी-5483 हे चारचाकी मोटार वाहन मालवाहतुकीसाठी विकत घेतले. सदरचे वाहन खरेदी करताना तक्रारदार यांना या वाहनाकडून 700 ते 800 किलो वजनाच्या मालाची वाहतुक होईल अशी अपेक्षा होती. त्यासंबंधी जाबदेणार यांनी सदर वाहनाचे प्रसिद्धीपत्रक दिलेले होते. त्यामध्ये सदर वाहन 865 किलो वजनापर्यंत मालवाहतुक कुठल्याही चढणीवर चढेल, असे नमुद केले होते. या गोष्टी विचारात घेऊन तक्रारदार यांनी रक्कम रु. 2,84,000/- देऊन सदर वाहन विकत घेतले. दि. 21/12/2010 रोजी सदर वाहन शेतावर नेत असताना लादलेल्या सामानापैकी निम्मे सामान उतरवून ठेवावे लागले व फक्त 300 किलो वजनाचा माल सदर वाहनाने वाहून नेला. यावरुन जाबदेणार यांनी दिलेले आश्वासन पोकळ होते, त्यामुळे तक्रारदारांना धक्का बसला, असे तक्रारदार यांनी कथन केले आहे. दुसर्या दिवशी कंपनीने त्यांचा ड्रायव्हर घेऊन सदर वाहनामध्ये 50 किलो वजनाची 17 पोती वाहण्याचे ठरविले, परंतु ड्रायव्हरने 12 पोतीच घेऊ असे संगितले, त्यामुळे तेवढेच वजन घेऊन मालाची वाहतुक करण्याचे ठरले. पुढे चढणीवर निम्मी सहा पोती उतरवून ठेवावी लागली, तेव्हा ते वाहन कसेबसे चढले. यावरुनदेखील जाबदेणार यांचे आश्वासन पोकळ होते हे निश्चित झाले. त्यानंतर अनेकवेळा जाबदेणारांकडे तक्रारी करुन पुन्हा या वाहनाची चाचणी घेतली, तेव्हा 350 किलो वजनाचा माल या वाहनाने वाहून नेला. जाबदेणार यांच्या अधिकार्यांनी देखील सदर वाहन केवळ 435 किलो वजनाचा माल नेईल, असे म्हटले आहे. जाबदेणार यांनी अशाप्रकारे अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे, त्याचप्रमाणे निकृष्ट दर्जाची सेवा दिलेली आहे, असे तक्रारदार यांनी कथन केले आहे. सबब, सदरच्या वाहनाची किंमत रक्कम रु. 2,84,000/-, मानसिक त्रासाबद्दल रक्कम रु. 1,00,000/-, डिझेलचा खर्च रक्कम रु. 2,500/-, सर्व्हिसिंग चार्जेस रक्कम रु.2,500 परत मिळावेत म्हणून प्रस्तुतची तक्रार तक्रारदारांनी दाखल केलेली आहे.
2] या प्रकरणात जाबदेणार क्र. 1 व 2 यांनी हजर होवून आपले लेखी म्हणणे दाखल केले, त्यामध्ये त्यांनी तक्रारीतील कथने नाकारलेली आहेत. जाबदेणार यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणण्याचा सारांश म्हणजे, तक्रारदार यांचे शेत हे वेल्हे घाटावर आहे. त्यामुळे सदरचे वाहन त्या शेतापर्यंत कबुल केलेल्या वजनाचा माल वाहू शकत नाही. जाबदेणार यांच्या कथनानुसार, सदरच्या वाहनाचे ग्रेडेशन आर.टी.ओ. ने 17° असल्याचे मान्य केले आहे. तक्रारदार यांच्या शेताचे चढण त्यापेक्षा जास्त आहे. सबब, जाबदेणार यांनी दिलेल्या वाहनामध्ये कोणताही दोष नाही व तक्रारदार यांची तक्रार खोटी आहे, असे कथन जाबदेणार यांनी केलेले आहे. त्याचप्रमाणे जाबदेणार यांनी वेळोवेळी तक्रारदार यांना विनामुल्य सेवा दिलेली आहे व त्यांनी दिलेल्या सेवमध्ये कोणतीही त्रुटी नाही, त्यामुळे तक्रारदार यांची तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती जाबदेणार यांनी केलेली आहे.
3] दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले शपथपत्र व कागदोपत्री पुरावे, लेखी कथने आणि तोंडी युक्तीवाद विचारात घेता खालील मुद्दे निश्चित करण्यात येत आहेत. सदरचे मुद्ये, त्यावरील निष्कर्ष व कारणे खालीलप्रमाणे-
अ.क्र. | मुद्ये | निष्कर्ष |
1. | जाबदेणार यांनी जाहीरातीमध्ये प्रसिद्ध केलेल्या वर्णनाप्रमाणे माल वाहून नेणारे वाहन न देऊन अनुचित व्यापारी पद्धतीचा अवलंब करुन निकृष्ट दर्जाची सेवा दिली आहे का ? | होय |
2. | तक्रारदार नुकसान भरपाईस पात्र आहेत | होय. |
3. | अंतिम आदेश काय ? | तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते |
कारणे
4] या प्रकरणामध्ये दोन्ही बाजूंनी बरीच कागदपत्रे दाखल केलेली आहेत. तक्रारदारांनी दरम्यान तक्रार दुरुस्त करुन जाबदेणार यांनी त्यांच्याकडून ज्यादा रक्कम वसुल केली असे नमुद केले. तक्रारदार यांच्या कथनानुसार जाबदेणार यांनी आपल्या जाहीरातीमध्ये सदर वाहन कोणतेही चढण सहज चढू शकेल, असे प्रसिद्ध केल होते. सदर जाहीरातीमध्ये वाहन 865 किलोचे वजन वाहू शकेल असे नमुद केले आहे. त्याचप्रमाणे सदर वाहनाचा वेग 65 कि.मी. प्रती तास व 17% ग्रेडीबिलीटी आहे, असे नमुद केले आहे. जाबदेणार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता असे स्पष्ट होते, की जाबदेणार यांनी ARAI या भारत सरकारने नेमलेल्या अधिकृत संस्थेने दिलेले प्रमाणपत्रामध्ये सदर वाहनाची ग्रेडीबिलीटी पहिल्या गिअरमध्ये 8° नमुद केलेली आहे. ज्यावेळी जाबदेणार यांनी या वाहनाची चाचणी घेतली त्यावेळी त्यामध्ये असे आढळून आले की, जाहीरातीमध्ये नमुद केल्यानुसार कोणत्याही चढणीवर 865 किलोचे वजन सदर वाहन वाहून नेऊ शकत नाही. यावरुन सदरची जाहीरात ही ग्राहकांना भुलविणारी आहे, असे मंचाचे मत आहे. सदरच्या जाहीरातीमध्ये नमुद केलेला मजकुर विचारात घेऊनच तक्रारदार यांनी सदरचे वाहन खरेदी केले आहे. तक्रारदारांनी या प्रकरणात वाहनाची पूर्ण किंमत परत मिळावी अशी मागणी केलेली आहे. परंतु मा. वरिष्ठ न्यायालयांच्या निवाडे विचारात घेतले असता जर एखादे वाहन रस्त्यावर चालविण्यात येत असेल व बर्याच कालावधीकरीता ते वापरले असेल, तर वाहनाची पूर्ण किंमत परत करणे योग्य नाही. परंतु या प्रकरणात तक्रारदारांना मानसिक, शारीरिक तसेच आर्थिक त्रास सहन करावा लागला. जाबदेणार कंपनी आणि विक्रेते यांनी तक्रारदार यांची दिशाभुल केलेली आहे. जाहीरातीमध्ये नमुद केलेल्या वर्णणाप्रमाणे वाहनाची विक्री केलेली नाही. अशा परिस्थितीमध्ये जाबदेणार यांनी अनुचित व्यापारी पद्धतीचा अवलंब केल्याचे दिसून येते. या कारणासाठी जाबदेणार क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीक व संयुक्तीकरित्या रक्कम रु.25,000/- नुकसान भरपाई द्यावी व मानसिक, शारीरिक तसेच आर्थिक त्रासासाठी रक्कम रु. 10,000/- द्यावेत असे मंचाचे मत आहे. वर उल्लेख केलेले मुद्दे, निष्कर्षे आणि कारणे यांचा विचार करता, खालील आदेश पारीत करण्यात येतो.
** आदेश **
1. तक्रारदार यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात
येते.
2. जाबदेणार क्र. 1 व 2 यांनी चुकीची जाहीरात
2.देऊन तक्रारदार यांची दिशाभुल केलेली आहे
2.व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला
आहे, असे जाहीर करण्यात येते.
3. जाबदेणार क्र. 1 व 2 यांनी तक्रारदार यांना
वैयक्तीक व संयुक्तीकरित्या रक्कमरु.25,000/-
(रु. पंचवीस हजार फक्त) नुकसान भरपाई व
रक्कम रु. 10,000/- (रु. दहा हजार फक्त)
मानसिक, शारीरिक तसेच आर्थिक त्रासासाठी
आणि तक्रारीच्या खर्चापोटी आदेशाची प्रत
मिळाल्यापासून सहा आठवड्यांच्या आंत द्यावी.
5. जाबदेणार क्र. 1 व 2 यांनी तक्रारदार यांना
वर नमुद केलेली रक्कम जर दिलेल्या मुदतीत
दिली नाही, तर तक्रार दाखल दिनांकापासून पूर्ण
रक्कम फिटेपर्यत सदर रक्कम द.सा.द.शे. 9%
व्याजदराने मिळण्यास तक्रारदार हक्कदार राहतील.
6. आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क
पाठविण्यात यावी.
7. दोन्ही पक्षकारांना असे आदेश देण्यात येतात
की त्यांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक
महिन्याच्या आंत सदस्यांकरीता दिलेले तक्रारीचे
संच घेऊन जावेत, अन्यथा सदरचे संच नष्ट
करण्यात येतील.
स्थळ : पुणे
दिनांक : 01/मार्च/2014