(मंचाचा निर्णय: श्री. नरेश बनसोड - सदस्य यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक : 18/10/2011)
1. तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत विरुध्द पक्ष क्र.1 व 2 विरुध्द दाखल केली असुन मंचास मागणी केली आहे की, विरुध्द पक्ष क्र.2 ने दिलेली सेवा त्रुटीपूर्ण व अनुचित व्यापार प्रथेचा वापर केल्याचे घोषीत करावे किंवा वातानुकूलीन यंत्र (A.C.) परत घेऊन त्याची रक्कम परत करावी किंवा वातानुकूलीन यंत्र परत घेऊन चांगले नवीन वातानुकूलीन यंत्र द्यावे.
तक्रारकर्तीचे तक्रारीच आशय थोडक्यात खालिल प्रमाणे...
2. गैरअर्जदार क्र.1 हे वातानुकूलीन यंत्राचे निर्माते आहेत, गैरअर्जदार क्र.2 हे वितरक असुन गैरअर्जदार क्र.3 हे वातानुकूलीन यंत्राचे फायनान्सर असुन तक्रारकर्ती ही विरुध्द पक्षांची ग्राहक आहे.
3. तक्रारकर्तीने दि.23.04.2010 रोजी व्हर्लपुल कंपनीचे 1.5 टनाचे 3 स्टार स्प्लीट वातानुकूलीन यंत्र मॉडेल क्रोम, रंग सिल्व्हर विरुध्द पक्ष क्र.2 यांचेकडून दि.23.04.2010 रोजी रु.23,500/- ला विकत घेतले, त्याचा डिलेव्हरी चालान क्र.इपीएबीएक्स/09-09/1793 असा आहे. सदर वातानुकूलीन यंत्र तक्रारकर्ती नगदीने घ्यावयास तयार होती, परंतु विरुध्द पक्ष क्र.2 यांचे दुकानात बसुन असलेले विरुध्द पक्ष क्र.3 च कर्मचारी यांनी रु.20,000/- कर्ज घेण्याचा आग्रह केला व कर्ज घेण्यांस बाध्य केले. म्हणून तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष क्र.2 ला रु.3,500/- डाऊन पेमेंटकरीता नागपूर डिट्रीक्ट सेंट्रल को-ऑपरेटीव्ह बँकेचा क्र.116363, दि.23.04.2010 रोजीचा धनादेश दिला व बाकी रक्कम रु.20,000/- विरुध्द पक्ष क्र.3 ने विरुध्द पक्ष क्र.2 ला परस्पर दिली.
4. सदर वातानुकूलीन यंत्र विकतांना विरुध्द पक्ष क्र.2 ने वातानुकूलीन यंत्राची 5 वर्षांची वारंटी दिली व वारंटी कालावधीत मशीन उत्तम प्रकारे चालेल व तशी न झाल्यास वा काही बिघाड आल्यास वा निर्मीतीत काही दोष व त्रुटी आल्यास सदरची त्रुटी विरुध्द पक्ष क्र.2 दुरुस्ती करुन देईल. तसेच त्यातील दोष दुरुस्त होण्याजागा नसल्यास तक्रारकर्तीकडून कुठलाही मोबदला न घेता नवीन वातानुकूलीन यंत्र देण्यांत येईल. दिनांक 23.04.2010 रोजी विरुध्द पक्ष क्र.2 चे अभियंत्याने वातानुकूलीन यंत्र बसवुन दिले. तक्रारकर्तीस आश्चर्याची बाब म्हणजे विरुध्द पक्ष क्र.2 ने नवीन मॉडेल न देता त्याच्या दुकानातील डेमो मॉडेल दिला व पहिल्याच दिवसी वातानुकूलीन यंत्रात कुलींग इफेक्ट नव्हता, तेव्हा विरुध्द पक्षांचा अभियंता म्हणाला की, आज टेंपरेचर जास्त आहे, हळूहळू इफेक्ट येईल परंतु वातानुकूलीन यंत्राला आवश्यक कुलींग इफेक्ट आलाच नाही.
5. तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष क्र.2 चे दुकानात मे-2010 च्या पहिल्या आठवडयात श्री. योगेश यांचेकडे तक्रार दाखल केली त्याचा क्रमांक 14653 असा आहे. विरुध्द पक्ष क्र.2 चे मालक श्री. नरेंद्र यांनी वातानुकूलीन यंत्राचे टेक्नीशियन श्री. सुधीर ढावके, यांचेशी बोलायला सांगितले व श्री. सुधीर ढावके यांनी विनायक व धुंडेवार यांना वातानुकूलीन यंत्र दुरुस्त करण्याच्या सुचना दिल्या, परंतु दोघांपैकी कोणीही वातानुकूलीन यंत्र दुरुस्त करण्यांस आलेले नाही. तक्रारकर्तीने सुधील ढावकेला मोबाईल क्र.9371666044, विनायकला 937166044 व गुंडेवार याला 8421815330 यावर संर्पक केला परंतु त्यांनी दाद दिली नाही. तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष क्र.2 चे मालकांशी संपर्क साधून वातानुकूलीन यंत्र विकत घेतल्यापासून समाधानकारक कुलींग इफेक्ट मिळत नाही व वातानुकूलीन यंत्र बदलवुन देण्याची विनंती केली. परंतु आवश्यक कारवाईचे वचन देऊन सुध्दा विरुध्द पक्ष क्र.2 ने काहीही केले नाही.
6. तक्रारकर्तीने पुढे म्हटले आहे की, विरुध्द पक्ष क्र.3 चे श्री. आशीष यांचेशी फोन 0712-3061861 वर बोलली व वातानुकूलीन यंत्र व कर्जाबाबत जाणीव करुन दिली. श्री. आशीष यांनी वितरकोशी बोलतो म्हणून सांगितले मात्र त्यांनी काहीही केले नाही. बँकेचा इ.एम.आय. रु.1,600/- असुन विरुध्द पक्ष क्र.3 ने इ.सी.एस. रु.2,500/- केला, त्यामुळे तक्रारकर्तीने बँकेस पत्र लिहून विरुध्द पक्ष क्र. 3 चे इ.सी.एस. थांबविण्याची विनंती केली. परंतु विरुध्द पक्ष क्र.3 ने इ.सी.एस. चारदा लावले व प्रत्येक वेळी रु.111/- ची पेनॉल्टी लावली. तक्रारकर्तीचे म्हणणे आहे की, विरुध्द पक्ष क्र.2 व 3 च्या या त्रुटीपूर्ण व्यवहारामुळे व आवश्यक सेवा न दिल्यामुळे तिला शारीरिक, मानसिक व आर्थीक त्रास सहन करावा लागला, ही विरुध्द पक्षांचे सेवेतील त्रुटी असुन त्यांनी अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केलेला आहे. तक्रारकर्तीने दि.22.12.2010 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठविली, सदर नोटीस तिनही विरुध्द पक्षांना प्राप्त झाली मात्र त्यांनी नोटीसचे उत्तर दिले नाही.
7. तक्रारकर्तीने तक्रारीसोबत निशाणी क्र.3 वर अनुक्रमे वातानुकूलीन यंत्राचे बील/ डिलेव्हरी मेमो, वारंटी, तक्रारकर्तीचे पत्र, वकीलांची नोटीस व पोच पावत्या इत्यादींच्या छायांकीत प्रति दाखल केलेल्या आहेत.
8. मंचामार्फत विरध्द पक्षांना नोटीस बजावण्यांत आला असता सदर नोटीस विरुध्द पक्ष क्र.1 यांना दि.18.05.2011 रोजी विरुध्द पक्ष क्र.2 व 3 यांना दि.13.05.2011 रोजी प्राप्त झाल्याचे दाखल दस्तावेजांवरुन स्पष्ट होते.
9. मंचाने विरुध्द पक्षांना पुरेपुर संधी देऊनही त्यांनी मंचासमक्ष आपले उत्तर दाखल केले नाही व सतत गैरहजर राहीले, त्यामुळे मंचाने दि.17.08.2011 रोजी पुकारा केला असता ते गैरहजर असल्यामुळे मंचाने विरुध्द पक्ष क्र.1 व 3 विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश पारित केला आहे.
10. सदर तक्रार मंचासमक्ष मौखिक युक्तीवादाकरीता दि.20.09.2011 रोजी आली असता तक्रारकर्त्याचे वकील हजर, मंचाने त्यांचा युक्तिवाद ऐकला विरुध्द पक्ष एकतर्फी. सदर प्रकरणी दाखल तक्रार व दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील प्रमाणे निष्कर्षाप्रत पोहचले.
-// निष्कर्ष //-
11. तक्रारकर्तीने तक्रारीसोबत दाखल केलेले वातानुकूलीन यंत्राचे बील/ डिलेव्हरी मेमो, यावरुन हे स्पष्ट होते की, तिने दि.23.04.2010 रोजी सदरील वातानुकूलीन यंत्र विरुध्द पक्ष क्र.1 निर्मीत, विरुध्द पक्ष क्र.3 व्दारे कर्ज घेऊन, विरुध्द पक्ष क्र.2 कडून विकत घेतले होते. त्यामुळे तक्रारकर्ती ही विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांची ग्राहक ठरते. तसेच वारंटी कार्डवरुन हे स्पष्ट होते की, सदर वातानुकूलीन यंत्राची वारंटी ही दि.23.04.2010 पासुन पुढील 5 वर्षांकरीता होती. विरुध्द पक्षांनी तक्रारीची नोटीस प्राप्त होऊन सुध्दा आपले उत्तर मंचासमक्ष दाखल केले नाही, त्यामुळे तक्रारकर्तीने विशद केलेली वस्तुस्थिती त्यांना मान्य आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. सदर वातानुकूलीन यंत्र हे वारंटी कालावधीत असुन ते लावल्यापासुनच कुलींग इफेक्ट देत नव्हते हे तक्रारकर्तीने सुरवातीलाच विशद केलेले आहे. तसेच तक्रारकर्तीचे म्हणणे आहे की, तिच्या घरी लावण्यांत आलेले वातानुकूलीन यंत्र हे दुकानातील डेमो मॉडेल असुन विरुध्द पक्षांनी अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केलेला आहे. तसेच तक्रारकर्तीची विरुध्द पक्ष क्र.1 उत्पादका विरुध्द काहीही मागणी नाही, त्यामुळे त्यांचे विरुध्दची तक्रार खारिज करणे मंचास संयुक्तिक वाटते. तक्रारकर्तीचे सर्व आरोप हे विरुध्द पक्ष क्र.2 विरुध्द असुन त्यांनी वातानुकूलीन यंत्राला आवश्यक कुलींग इफेक्ट यावा म्हणून कुठलीही सेवा दिलेली नाही. तसेच तक्रारकर्तीच्या घरी नवीन वातानुकूलीन यंत्र न लावता जुने डेमो मॉडेल लावले ही त्यांचे सेवेतील त्रुटी असुन अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केलेला आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. म्हणून विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी तक्रारकर्तीच्या घरचे जुने वातानुकूलीन यंत्र परत घेऊन त्याच मॉडेलचे नवीन वातानुकूलीन यंत्र वारंटीसह लावुन द्यावे. किंवा वातानुकूलीन यंत्राची किंमत रु.23.500/- परत करावी, तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरीता रु.10,000/- नुकसान भरपाई द्यावी व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- द्यावे असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
12. तक्रारकर्तीने गैरअर्जदार क्र.3 विरुध्द केलेली मागणी पूर्णतः असंयुक्तिक स्वरुपाची असल्यामुळे ती नाकारण्यांत येते.
वरील सर्व बाबी लक्षात घेता आम्ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. विरुध्द पक्ष क्र.2 ला आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्तीच्या घरचे जुने वातानुकूलीन यंत्र परत घेऊन त्याच मॉडेलचे नवीन वातानुकूलीन यंत्र वारंटीसह लावुन द्यावे. किंवा वातानुकूलीन यंत्राची किंमत रु.23.500/- परत करावी,
3. विरुध्द पक्ष क्र.2 ला आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला शारीरिक, मानसिक त्रासाकरीता रु.10,000/- नुकसान भरपाई व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- अदा करावे.
4. विरुध्द पक्ष क्र. 1 व 3 यांचे विरुध्दची तक्रार खारिज करण्यांत येते
5. वरील आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष क्र.2 यांनी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी. अन्यथा आदेश क्र.1 मधील रकमेवर द.सा.द.शे.12% दराने व्याज देण्यांस बाध्य राहील.