(मंचाचा निर्णय: श्री. मिलींद केदार - सदस्य यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 13/04/2011) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द मंचात दिनांक 09.12.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. तक्रारकर्त्याने तक्रारीत नमुद केले आहे की, त्याने गैरअर्जदाराकडे ‘रिलायन्स पॉवर’ चे समभाग खरेदी करण्याकरता रु.3,46,500/- जमा केले. त्यापैकी रु.2,30,000/- हे नगदी स्वरुपात व रु.1,16,500/- धनादेशाव्दारे दिले. तक्रारकर्त्यास नंतर असे लक्षात आले की, गैरअर्जदाराने त्याला आश्वासन दिल्याप्रमाणे समभाग खरेदी केले नाही व त्याचे डी-मॅट खात्यामधे रु.5,00,000/- जमा केले नाही. तक्रारकर्त्यास गैरअर्जदाराने आश्वासन दिले होते की, सदर समभाग विकून त्याला रु.5,00,000/- मिळतील. परंतु तसे झाले नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराने दिलेले धनादेश वटविण्याकरीता बँकेत टाकले असता खाते बंद झाले म्हणून ते अनादरीत झाले. म्हणून तक्रारकर्त्याने गैरअर्जदारा विरुध्द परक्राम्य अधिनियम 1881( Negotiable Act 1881 ) च्या कलम 138 अंतर्गत कारवाई केलेली आहे. तसेच तक्रारकर्त्याने गैरअर्जदारा विरुध्द त्यांनी सेवेत त्रुटी दिली व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्यामुळे सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे. 3. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदाराला बजावण्यांत आली असता त्यांना नोटीस मिळूनही ते मंचात हजर झाले नाही व तक्रारकर्त्याचे म्हणणे खोडून काढले नाही. त्यामुळे त्यांचे विरुध्द मंचाने दि.04.02.2011 रोजी एकतर्फी कारवाईचा आदेश पारित केला. 4. सदर प्रकरण मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.30.03.2011 रोजी आले असता मंचाने तक्रारकर्त्याचा युक्तिवाद त्यांचे वकीला मार्फत ऐकूण घेतला, तसेच मंचासमक्ष दाखल दस्तावेज व तक्रारकर्त्याचे कथन यांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 5. तक्रारकर्त्याने सदर तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केलेली आहे, तसेच तक्रारीसोबत दाखल केलेले दस्तावेज व कथनाचे पृष्ठयर्थ प्रतिज्ञालेख सुध्दा दाखल केलेला आहे. गैरअर्जदाराला सदर तक्रारीची नोटीस मिळूनही ते हजर झाले नाही व तक्रारकर्त्याने तक्रारीत केलेले कथन नाकारले नसल्यामुळे तक्रारकर्त्याचे तक्रारीतील आशय गृहीत धरण्यांत येतो व तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराला रु.3,46,500/- जे समभाग खरेदीकरता दिलेले होते, त्यांचे समभाग खरेदी केले नाही ही बाब ग्राह्य धरण्यांत येते व असे करणे ही गैरअर्जदारांचे दृष्टीने अनुचित व्यापार पध्दत असुन सेवेतील त्रुटी आहे. 6. तक्रारकर्त्याने गैरअर्जदारास दिलेली रक्कम रु.3,46,500/- परत मिळण्याकरता त्याला गैरअर्जदाराने दिलेले धनादेश सुध्दा अनादरीत झाल्याचे तक्रारकर्त्याचे तक्रारीतील कथन आहे. त्यामुळे तक्रारकर्ता हा सदर रक्कम मिळण्यांस पात्र ठरत असल्यामुळे गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याकडून स्विकारलेली रक्कम रु.3,46,500/- शेवटचा दिनांक 03.11.2007 पासुन द.सा.द.शे.9% दराने रक्कम अदा होईपर्यंत व्याजासह परत करावी. 7. तक्रारकर्त्याने तक्रारीमध्ये त्याला रु.5,00,000/- एवढी रक्कम गैरअर्जदाराकडून घेणे होती व तशी हमी त्याला गैरअर्जदाराने दिल्याचे नमुद केले आहे. परंतु सदर बाब सिध्द होत नसल्यामुळे तकारकर्त्याची सदर मागणी अमान्य करण्यांत येत आहे. 8. सदर प्रकरणी तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांचे सेवेतील त्रुटी व अनुचित व्यापार पध्दतीमुळे त्याला शारीरिक, मानसिक त्रास सहन करावा लागला त्याकरीता तक्रारकर्ता रु.15,000/- व तक्रारीच्या खर्चाकरीता रु.2,000/- मिळण्यांस पात्र ठरतो असे मंचाचे मत आहे. 9. प्रस्तुत प्रकरणात दाखल दस्तावेजांचे तसेच युक्तिवादाचे अवलोकन केले असता आम्ही वरील निष्कर्षांच्या आधारे खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. गैरअर्जदाराला आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याकडून स्विकारलेली रक्कम रु.3,46,500/- दिनांक 03.11.2007 पासुन द.सा.द.शे.9% दराने रक्कम अदा होईपर्यंत व्याजासह परत करावी. 3. गैरअर्जदाराला आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला शारीरिक, मानसिक त्रासाकरीता रु.15,000/- व तक्रारीच्या खर्चाकरीता रु.2,000/- अदा करावे. 4. वरील आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदाराने आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |