निकालपत्रः- श्रीमती दिपा बिदनुरकर, सदस्या, ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- न्यायनिर्णय 1. तक्रारीचे संक्षिप्त स्वरुप खालील प्रमाणे आहे. 2. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांनी सा.वाले क्र.1 यांचेकडून सा.वाले क्र.3 यांची 1 लाखाची गृप मेडीक्लेम पॉलीसी दिनांक 31.12.2009 रोजी घेतली. 3. तक्रारदार यांचे असे म्हणणे आहे की, त्यांना सेनाई कॅट्रॅकमुळे कृष्णा आय केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दिनांक 18.2.2010 ते 18.2.2010 रोजी दाखल करावे लागले. त्यानुसार त्यांनी सा.वाले क्र.1 याना आधी सूचना दिलेली होती. उपचारानंतर तक्रारदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह मेडीक्लेम फॉर्म भरुन दिला. तरीही सा.वाले यांचेकडून कोणताच प्रतिसाद नव्हता. वारंवार संपर्क साधल्यानंतर सा.वाले यांनी दिनांक 27.3.2010 रोजी रुपये 10,000/- चा धनादेश पाठविला. 4. तक्रारदारांची अशी तक्रार आहे की, सा.वाले यांनी पॉलीसीच्या अटी शर्ती प्रमाणे प्रत्यक्ष येणारा खर्च किंवा पॉलीसी रक्कमेच्या 25 टक्के रक्कम यापैकी कमी असलेली रक्कम तक्रारदारांना मिळावयास हवी होती. तक्रारदारांना एकूण 26,264/- रु. खर्च आला. पॉलीसीच्या अटी शर्ती प्रमाणे तक्रारदारांना रु.25,000/- चा धनादेश पाठवून द्यावयास हवा होता. परंतु सा.वाले यांनी तक्रारदारांना रु.25,000/- चा धनादेश न देता फक्त 10,000/- चा धनादेश पाठविला. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार सा.वाले यांचेकडून त्यांना अजुनही रु.15,000/- येणे बाकी आहे. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे सदर रक्कमेची वारंवार मागणी केली. परंतु सा.वाले यांचेकडून कोणताही प्रतीसाद नाही म्हणून तक्रारदारांनी मंचापुढे तक्रार दाखल करुन खालील मागण्या केल्या. 1) सा.वाले यांनी तक्रारदारांना रु.15,000/-15 टक्के व्याज दराने पैसे देईपर्यत व्याजासह द्यावेत. 2) मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रु.50,000/-द्यावेत. 5. तक्रार अर्ज, पुराव्याचे शपथपत्रासह दाखल कले आहे. 6. सा.वाले यांनी हजर राहून तक्रार अर्जास उत्तर दाखल करावे अशी नोटीस मंचाकडून सा.वाले यांना पाठविण्यात आली होती. सा.वाले यांना नोटीस मिळाली या बाबतची पोच पावती निशाणी क्रमांक 5,6 व 7 वर दाखल केली आहे. नोटीस मिळूनही सा.वाले गैरहजर राहीलेत म्हणून सा.वाले यांचे विरोधात एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. 7. तक्रार अर्ज व अनुषंगीक कागदपत्रे यांची पडताळणी व वाचन केले असता निकालासाठी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात. क्र. | मुद्दे | उत्तर | 1 | तक्रारदार सा.वाले यांच्या सेवेतील कमतरता सिध्द करतात काय ? | होय. | 2 | तक्रारदार सा.वाले यांचेकडून रुपये 15,000/- 15 टक्के व्याज दराने व्याजासह मागू शकतात काय ? | होय. रु.15,000/- मागू शकतात. नुकसान भरपाईचा आदेश दिल्यामुळे व्याज मागता येणार नाही. | 3. | तक्रारदार सा.वाले यांचेकडून नुकसान भरपाई म्हणून रु.50,000/- मागू शकतात काय ? | होय- रुपये 10,000/- | 4. | अंतीम आदेश | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा 8. तक्रारदार यांनी सा.वाले क्र.3 यांची 1 लाखाची गृप मेडीकल पॉलीसी घेतली. सदर पॉलीसी तक्रार अर्जासोबत पृष्ट क्र.10 वर निशाणी ए वर दाखल केली आहे. तक्रारदारांना सेनाई कॅट्रॅकमुळे उपचारासाठी कृष्णा आय केअर सेंटरमध्ये दिनांक 18.2.2010 दाखल करण्यात आले. तक्रारदार यांनी सा.वाले यांचेकडे सर्व आवश्यक त्या कागदपत्रासह क्लेम फॉर्म भरुन दिला होता. त्याबाबतचे कागदपत्रे तक्रारदार यांनी अभिलेखात दाखल केले आहेत. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार सा.वाले यांनी पॉलीसीच्या अटी शर्तीनुसार तक्रारदार यांना रुपये 25,000/- देणे आवश्यक होते. परंतु सा.वाले यांनी अटी शर्तीनुसार संपूर्ण रक्कम न देता रु.10,000/- येवढी रक्कम अदा केली हे तक्रारदारांचे म्हणणे सा.वाले यांनी हजर राहून खोडले नाही. तसेच तक्रारदारांनी दाखल केलेल्या पॉलीसीच्या अटी शर्तीच्या कलम 1.2 प्रमाणे सेनाई कॅट्रॅकच्या उपचारासाठी प्रत्यक्षात येणारा खर्च किंवा पॉलीसी रक्कमेच्या 25 टक्के रक्कम मिळण्यास पॉलीसीधारक पात्र आहेत हे स्पष्ट होते. पण तरीही सा.वाले यांनी तक्रारदारांना रु.25,000/-पाठविण्याऐवजी रुपये 10,000/- चा धनादेश पाठविला आहे. पॉलीसीची बारकाईने निरीक्षण केले असता पॉलीसीच्या Exclusion clause 4.1 प्रमाणे Contract साठी पॉलीसीची रक्कम पॉलीसी सुरु झाल्यापासून पहिले दोन वर्षे लागू पडत नाही. तक्रारदारांनी दिनांक 31.12.2009 मध्ये पॉलीसी घेतली आहे आणि ऑपरेशन दिनांक 18.2.2010 मध्ये कॅट्रॅकवर उपचार झाले आहे. 4.1 कलमानुसार पॉलीसी लागू पडत नाही. परंतु सा.वाला यांनी मेडीक्लेमसाठी फॉर्म भरुन दिल्यानंतर 1.2 कलमानुसार तक्रारदारांना 10,000/- चा धनादेश पाठवला. परंतु 1.2 प्रमाणे जर पाठवला असेल तर पॉलीसीच्या रक्कमेच्या 10 टक्के रक्कम न देता कलम 1.2 प्रमाणे 25 टक्के रक्कम द्यावयास हवी होती. तसे न दिल्यामुळे सा.वाले यांची सेवेत कमतरता दिसून येते. म्हणून सा.वाले हे तक्रारदारांना पॉलीसीच्या कलम 1.2 प्रमाणे रु.25,000/- देण्यास जबाबदार आहेत. यापैकी तक्रारदारांना रु.10,000/- मिळालेले आहे व बाकी उर्वरित रक्कम सा.वाले यांना तक्रारदारांना द्यावेत. 9. सा.वाले यांच्या सेवेतील कमतरतेमुळे तक्रारदारांना मानसिक त्रास झाला या बद्दल वाद नाही. म्हणून त्यांना मानसिक त्रासासाठी व झालेल्या नुकसानीबद्दल भरपाई म्हणून व तसेच तक्रार खर्च मिळून रु.10,000/- देण्यास सा.वाले जबाबदार राहातील. 10. वरील परिस्थितीत खालील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे. आदेश 1. तक्रार क्रमांक 563/2010 अंशतःमान्य करण्यात येते. 2. तक्रारदारांना सामनेवाले क्र.3 यांनी विम्याच्या कराराप्रमाणे बाकी रक्कम रक्कम रु.15,000/- द्यावेत. 3. सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी व झालेल्या नुकसानीबद्दल भरपाई व तक्रार अर्ज खर्च मिळून भरपाई म्हणून रु.10,000/- द्यावेत. 4. वरील आदेशाची पुर्तता सामनेवाले यांनी या न्यायनिर्णयाची प्रमाणित प्रत मिळाल्यापासून 6 आठवडयाचे आत करावी. अन्यथा विलंबापोटी सामनेवालने 3 यांनी दरमहा रु.500/- दंडात्मक रक्कम तकारदारांना द्यावी. 4. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT | |