आदेश पारीत व्दाराः श्रीमती स्मिता नि. चांदेकर, मा. सदस्य.
तक्रारकर्ताने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत दाखल केली असुन तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालिल प्रमाणे...
- तक्रारकर्ता उपरोक्त पत्त्यावर राहतो. तक्रारकर्त्याचा मुलगा हा भारतीय लष्करात भटींडा, पंजाब येथे नोकरीवर आहे. विरुध्द पक्ष क्र.1 ही कुरिअर सेवा पुरवणारी खाजगी कंपनी असुन तिचे मुख्य कार्यालय दिल्ली येथे आहे. विरुध्द पक्ष क्र.2 हे विरुध्द पक्ष क्र. 1 चे शाखा कार्यालय असुन विरुध्द पक्ष क्र.3 हे विरुध्द पक्षाचे नागपूर येथील बुकींग कार्यालय आहे. विरुध्द पक्ष क्र. 1 हे विरुध्द पक्ष क्र.2 व 3 इतर शाखा व एजंट यांचेमार्फत ग्राहकांकडून पार्सल स्विकारुन भारतात वेगवेगळया ठिकाणी पोहचवुन देण्याची सेवा पुरवितात. तक्रारकर्त्याने दि.02.11.2015 रोजी विरुध्द पक्ष क्र.3 यांचेकडे पार्सल बुक केले, सदर पार्सल बुक करते वेळेस विरुध्द पक्ष क्र.3 यांनी तक्रारकर्त्याचे पार्सल दि.06.11.2015 रोजी किंवा त्यापूर्वी गंतव्य ठिकाणी पोहचेल असे सांगितले होते. त्यामुळे तक्रारकर्त्याने सदर पार्सल बुक केले. विरुध्द पक्ष क्र.3 ने त्याकरीता तक्रारकर्त्याकडून रु.120/- शुल्क स्विकारले, त्याचा पावती क्र.441306028 दि.02.11.2015 असा होता. सदर पार्सल हे तक्रारकर्त्याच्या मुलाच्या पत्त्यावर भटींडा, पंजाब येथे पाठवावयाचे होते. तक्रारकर्त्याने बुक केलेल्या पार्सलमध्ये दोन महागडया साड्या होत्या ज्याची अंदाजे किंमत रु.16,300/- होती. सदर साड्या तक्रारकर्त्याच्या सुनेच्या होत्या व त्या तिला लग्नानंतर नातेवाईकांकडून भेट म्हणून देण्यांत आलेल्या होत्या. तक्रारकर्त्याच्या सुनेला सदर साड्या ह्या भारतीय सैन्याच्या भटींडा येथे दि.06 व 07.11.2015 रोजी होणार असलेल्या दिवाळी उत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमात नेसावयाच्या होत्या. सदर पार्सल बुक केल्यानंतर तक्रारकर्ता हा सतत त्याच्या मुलाच्या संर्पकात होता, विरुध्द पक्ष क्र.3 च्या सांगण्यानुसार तक्रारकर्त्याचे पार्सल हे त्याच्या मुलाच्या पत्त्यावर भटींडा येथे दि.06.11.2015 पर्यंत पोहचले नाही असे तक्रारकर्त्याला त्याचे मुलाने कळविले असता तक्रारकर्त्याने लगेच विरुध्द पक्ष क्र.3 कडे तोंडी तक्रार केली. त्यानंतर अनेकदा तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र.3 चे कार्यालयात जाऊन तसेच फोनवरुन चौकशी केली असता विरुध्द पक्ष क्र.3 यांनी तक्रारकर्त्याला त्याचे पार्सल हे पोहोचण्याच्या मार्गावर असल्याबाबत कळविले. परंतु तक्रारकर्त्याचे पार्सल हे भटींडा येथे पोहचले नाही व तक्रारकर्त्याचे पत्त्यावर परतही आले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र.3 चे एरिया मॅनेजर, श्री.निलेश शर्मा यांचेकडे दि.20.11.2015 रोजी लेखी तक्रार केली. परंतु विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला योग्य प्रतिसाद दिलेला नाही व त्याच्या पार्सलबाबत काही कळविले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने दि.28.11.2015 रोजी ई-मेल व्दारे विरुध्द पक्ष क्र.1 चे कस्टमर्स केअर यांचेकडे तक्रार नोंदविली. परंतु विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांनी तक्रारकर्त्याचे ई-मेल ला प्रतिसाद दिला नाही त्यामुळे त्याने दि.08.12.2015 रोजी पुन्हा एक ई मेल पाठविला. दरम्यान तक्रारकर्ता हा विरुध्द पक्ष क्र.2 चे ऑफीसमध्ये जाऊन तेथील एरिया मॅनेजर श्री. शंतनु दळवी यांना भेटून त्यांच्याकडे तोंडी तक्रार केली. अश्या प्रकारे वारंवार चौकशी केल्यानंतर विरुध्द पक्ष क्र. 2 व 3 यांनी तक्रारकर्त्याचे पार्सल हे गहाळ झाले असुन त्याचा शोध विरुध्द पक्ष क्र.1 चे मदतीने घेण्यात येत आहे व लवकरच ते भटींडा येथे पोहचविण्यांत येईल असे सांगितले. परंतु तक्रारकर्त्याचे पार्सल हे भटींडा येथे पोहचले नाही, तसेच ते त्याला परतही मिळाले नाही. विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी त्यांचे कर्तव्यात निष्काळजीपणा करुन सेवेत त्रुटी केलेली आहे, असे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे. तक्रारकर्त्याने दि.23.01.2016 रोजी विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांना वकीलामार्फत नोटीस पाठवुन गहाळ झालेल्या पार्सलची किंमत रु.16,300/- तसेच नुकसान भरपाई रु.1,00,000/- देण्यांत यावा असे कळविले.
- परंतु विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांना सदर नोटीस प्राप्त होऊन देखिल तक्रारकर्त्याचे विनंतीला प्रतिसाद दिला नाही म्हणून तक्रारकर्त्याने सदरची तक्रार दाखल केली असुन विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 कडून त्याच्या हरविलेल्या पार्सलची किंमत रु.16,300/- व्याजासह मिळावी तसेच नुकसान भरपाई रु.1,50,000/- व तक्रारीचा खर्च रु.25,000/- मिळावा अश्या मागण्या केलेल्या आहेत.
- विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी त्यांचे लेखीउत्तर संयुक्तपणे नि. क्र.10 वर दाखल करुन तक्रारकर्त्याचे तक्रारीस सक्त विरोध केलेला आहे. तक्रारकर्त्याने दि.02.11.2015 रोजी नागपूर येथून भटींडा, पंजाब येथे पाठविण्यासाठी पार्सल बुक केले होते ही बाब मान्य केलेली आहे. परंतु सदर पार्सलमध्ये दोन महागडया साड्या होत्या ही बाब अमान्य केलेली आहे. त्याच प्रमाणे तक्रारकर्त्याचे पार्सल हे नागपूर ते भटींडा मार्गावर असतांना गहाळ झाले व विरुध्द पक्षाने सर्व प्रयत्न केल्यावरही सापडून आले नाही असे विरुध्द पक्षाने त्याचे लेखीउत्तरात नमुद केले आहे. विरुध्द पक्षाने पुढे असेही कथन केले आहे की, त्यांच्या बुकींग पावतीवर त्यांनी अटी व शर्ती नमुद केलेल्या आहेत, त्यातील अट क्र.3 नुसार पार्सल पाठविणा-याने त्यातील वस्तुचे संपूर्ण वर्णन नमुद करणे आवश्यक आहे. तसेच अट क्र.4 ही वस्तुला कुठलेही नुकसान झाले किंवा चोरी गेले त्याबाबत आहे. अट क्र.6 नुसार पार्सल पाठविणा-याने त्याची किंमत जाहीर करणे आवश्यक असुन त्याकरीता अतिरिक्त गॅरंटी शुल्क वेगळ्या पावतीव्दारे आकारण्यांत येते, तसे शुल्क न भरल्यास कंपनीकडून कुठलाही दावा हाताळण्यात येणार नाही असे विरुध्द पक्षाच्या अटी व शर्तींमध्ये नमुद केले आहे. तक्रारकर्त्याने सदर अटी व शर्तींचे पालन न केल्यामुळे तक्रारकर्ता हा करारानुसार नुकसान भरपाईस पात्र नाही, असे विरुध्द पक्षाने नमुद केले आहे.
- 4. विरुध्द पक्ष पुढे असे कथन करतो की, योग्य काळजी घेतल्यावरही कधीकधी पार्सल हे रस्त्यात गहाळ होण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही म्हणून ते ग्राहकांना मौल्यवान वस्तुंच्या पार्सल करीता ट्रांझीट विमा काढण्यांस सांगत असतात. तक्रारकर्त्याने त्याचे पार्सल बुक करीत असतांना सदर विमा घेतला नाही. विरुध्द पक्षाने अश्या परिस्थितीत त्यांच्या कार्यप्रणालीनुसार तक्रारकर्त्याला कुरिअर चार्जेसच्या चौपट रक्कम देण्याचा प्रस्ताव मांडला होता. तक्रारकर्त्याने सदर प्रस्ताव सुरवातीला मान्य केला परंतु त्यानंतर तक्रारकर्त्याने तसे न करता सदर तक्रार विरुध्द पक्षाला त्रास देण्याकरीता दाखल केलेली आहे. विरुध्द पक्षाने सेवेत कुठलीही त्रुटी केलेली नाही म्हणून त्यांचे विरुध्द तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार खारीज करण्यांत यावे अशी विनंती केली आहे.
- 5. तक्रारकर्त्याने तक्रारीचे पृष्टयर्थ एकूण 8 दस्तावेज दाखल केलेल असुन त्यामधे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे पार्सल नोंदविल्याची पावती, साड्यांच्या बिलाच्या पावत्या तक्रारकर्त्याने वेळोवेळी विरुध्द पक्षाकडे केलेल्या तक्रारीच्या छायांकीत प्रति तसेच विरुध्द पक्षांना पाठविलेल्या नोटीस व पोच पावत्यांचा समावेश आहे.
- 6. तक्रारकर्त्याने त्याचे प्रतिउत्तर निशाणी क्र.11 वर दाखल केलेले असुन त्यासोबत विरुध्द पक्षाने त्याचे नोटीसला दिलेल्या उत्तराची प्रत, तसेच कुरीअरचे ट्रॅकींग रिपोर्ट इत्यादींच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. तक्रारकर्त्याने त्याचे तक्रारी पृष्ठयर्थ 2016 SCC Online NCDRC 1123 या न्याय निवाडयाची प्रत दाखल केलेली आहे. उभय पक्षांनी त्यांचा लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे.
- 7. उभय पक्षांचे वकीलांचा युक्तिवाद ऐकण्यात आला, उभय पक्षांचे परस्पर विरोधी कथन तसेच अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता मंचाचे निष्कर्ष खालिल प्रमाणे..
8. तक्रारकर्त्याने दि.02.11.2015 रोजी विरुध्द पक्ष क्र.3 कडे नागपूर येथून भटींडा, पंजाब येथे पाठविण्यासाठी पार्सल बुक केले होते, याबाबत उभय पक्षांत वाद नाही. तक्रारकर्त्याने अभिलेखावर दाखल केलेल्या पावतीवरुनही सदर बाब स्पष्ट होते.
9. तक्रारकर्त्याचे म्हणण्यानुसार सदर पार्सलव्दारे त्याने दोन साड्या ज्यांची एकूण किंमत रु.16,300/- होती त्या नागपूर येथून त्याचे मुलाचे पत्त्यावर भटींडा, पंजाब येथे पाठविल्या होत्या. परंतु सदर पार्सल हे दि.06.11.2015 पर्यंत त्याचे मुलाचे पत्त्यावर पोहचले नाही. सदर पार्सल वेळेवर पोहचले नसल्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे वारंवार तक्रारी नोंदविल्या होत्या परंतु विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचे तक्रारीस योग्य प्रतिसाद दिलेला नाही. त्यानंतर विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचे सदर पार्सल हे नागपूर ते दिल्ली या दरम्यान गहाळ झाल्याची बाब कबुल करुन सदर पार्सलचा शोध घेऊन भटींडा येथे पोहचवण्यात येईल असे सांगितले. परंतु तक्रारकर्त्याला सदर पार्सल परत मिळाले नाही व भटींडा येथे पोहचले नाही. त्यामुळे तक्रारकर्ता सदर साड्यांची किंमत तसेच नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली आहे.
10. विरुध्द पक्षाने हे मान्य केले आहे की, तक्रारकर्त्याचे पार्सल हे नागपूर ते दिल्ली दरम्यान वाहतुकीत गहाळ झाले आहे. परंतु विरुध्द पक्षाच्या म्हणण्यानुसार तक्रारकर्त्याने उभय पक्षांतील करारानुसार अटीं व शर्तींचे पालन न केल्यामुळे तक्रारकर्ता हा मागणी प्रमाणे नुकसान भरपाई मिळण्यांस पात्र नाही.
हि बाब स्पष्ट आहे की, तक्रारकर्त्याचे पार्सल हे विरुध्द पक्षांकडे पोहचविण्याकरीता दिले असता वाहतुकी दरम्यान गहाळ झाले आहे. तक्रारकर्त्याने वर्णनयादी नि.क्र.12 नुसार दस्तावेज क्र.3 त्याचा विरुध्द पक्षाकडे दिलेल्या पार्सलचा ट्रॅकींग रिपोर्ट दाखल केला आहे. सदर ट्रॅकींग रिपोर्टचे अवलोकन केले असता असे दिसुन येते की, तक्रारकर्त्याचे पार्सल हे विरुध्द पक्षाचे कुरीअर कंपनीने द.02.11.2015 रोजी नागपूर येथून गंतव्य ठिकाणाकरीता पाठविले होते व ते भटींडा येथे दि.06.11.2015 रोजी पोहोचले होते. परंतु विरुध्द पक्ष कंपनीने ते पूढे तक्रारकर्त्याने पाठविलेल्या पत्त्यावर पोहोचविल्याचे दिसून येत नाही. कारण सदर पार्सल हे पुन्हा अंबाला येथुन दिल्लीमार्गे नागपूर येथे दि.10.11.2015 रोजी परत आल्याचे दिसून येते. त्यानंतरही विरुध्द पक्षाने सदर पार्सल तक्रारकर्त्याला नागपूर येथे परत दिले नाही. वास्तविक पाहता जरी विरुध्द पक्ष हा तक्रारकर्त्याचे पार्सल भटींडा येथे पोहचवू शकला नाही तरी सदर पार्सल नागपूर येथे परत आल्यावर सहज तक्रारकर्त्याला परत करु शकला असता परंतु विरुध्द पक्षाने तसे केलेले नाही. उलट पार्सल नागपूर ते दिल्ली दरम्यान गहाळ झाले आहे असे तक्रारकर्त्याला कळविले. विरुध्द पक्षाने पार्सल पोहचविण्याकरीता तक्रारकर्त्याकडून रु.120/- शुल्क आकारले असल्यामुळे विरुध्द पक्षाने सदर पार्सल हे गंतव्य ठिकाणी पोहोचविणे हे त्यांचे कर्तव्य होते. परंतु विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 च्या निष्काळजीपणामुळे तक्रारकर्त्याचे पार्सल गहाळ झाले असल्याने विरुध्द पक्षांनी त्यांचे कर्तव्य योग्य रितीने पार न पाडल्यामुळे सेवेत कमतरता ठेवली आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
11. विरुध्द पक्षांच्या म्हणण्यानुसार तक्रारकर्त्याने त्याचे पार्सल बुक करतांना त्यांना त्याची सखोल माहिती दिली नाही. तसेच बुकींग करतांना पार्सल मधील सामानाचे मुल्य घोषीत केलेले नाही, त्यामुळे तक्रारकर्ता हा बिलावर नमुद अटी व शर्तींनुसार पार्सल पाठविण्याकरीता घेण्यात आलेल्या मोबदल्याचे चौपट रक्कम म्हणजेच (रु. 120 x 4 = रु. 480/-) परत मिळण्यांस पात्र आहे किंवा स्पेशल दिवस चार्जेस भरल्यास जास्तीत जास्त रु.2,000/- मिळण्यांस पात्र आहे. याउलट तक्रारकर्त्याच्या वकीलांनी असा युक्तिवाद केला की, विरुध्द पक्षांनी दिलेल्या बिलावर त्याची स्वाक्षरी नाही. तसेच सदर पार्सल देतांना त्याने पार्सलबाबत संपूर्ण माहिती दिली होती परंतू त्यावेळी विरुध्द पक्षाने त्याला कोणत्याही अटी व शर्तींबाबत माहिती दिली नाही तसेच त्याचे पार्सल वेळेत भटींडा येथे पाहोचेल अशी खात्री देऊन रु.120/- तक्रारकर्त्याकडून घेतले व त्याला ते बिल दिले आहे. त्यामुळे सदर बिलावर लिहीलेल्या अटी व शर्ती त्याला लागू होत नाही.
12. तक्रारकर्त्याने सदर बिलाची प्रत त्यावरील अटी व शर्तींसह अभिलेखावर दाखल केली आहे. बिलाचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, त्यात पार्सलचे वजन 3 किलो नमुद केले आहे, तसेच ठिकाण भटींडा नमुद केले असून इतर सर्व माहिती रिकामी ठेवलेली असुन तक्रारकर्त्याकडून एकूण चार्जेस रु.120/- घेतलेले आहे. त्याच प्रमाणे सदर बिलावर ज्या अटी व शर्ती नमुद केल्या आहेत त्या अत्यंत लहान अक्षरात नमुद केल्या असुन त्यामध्ये अट क्र.3 नुसार पाठविणा-याने पार्सल बाबत संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. अट क्र. 4 व 5 नुसार वस्तु गहाळ झाल्यास कुरीअर कंपनीची जबाबदारी केवळ मोबदल्याचे चार पट अथवा ते बुक करणा-या व्यक्तिने स्पेशल रिक्स चार्जेस भरल्यास पार्सल करीता रु.2,000/- एवढी मर्यादीत जबाबदारी असल्याचे नमुद केले आहे.
13. निश्चितपणे तक्रारकर्त्याला देण्यांत आलेल्या बिलावरील माहिती ही विरुध्द पक्षाने लिहीलेली आहे, परंतु विरुध्द पक्षाने सदर बिलावर पाठविणा-याच्या सहीच्या ठिकाणी सही घेतलेली नाही. वास्तविक पाहता ग्राहकास देण्यात येणा-या बिलावर संपूर्ण माहिती भरणे तसेच त्यावर नमुद अटी व शर्ती समजवुन सांगणे ही देखील विरुध्द पक्षांची जबाबदारी होती. विरुध्द पक्षाने पार्सल स्विकारतांना सदर अटी व शर्तीं तक्रारकर्त्याला समजावून सांगितल्या होत्या याबाबत कोणताही पूरावा मंचासमक्ष सादर केलेला नाही. तसेच तक्रारकर्त्याची सदर बिलावर स्वाक्षरी देखील नाही. म्हणून तक्रारकर्त्याला बिलावरील छापील अटी समजावून सांगितल्या होत्या व सदर अटी व शर्तीवर चर्चा होऊन तक्रारकर्ता व विरुध्द पक्षामध्ये करार झाला होता असे म्हणता येणार नाही. त्यामुळे सदर अटी व शर्ती या एकतर्फी असल्यामुळे तक्रारकर्त्यावर बंधरकारक नाहीत असे मंचाचे मत आहे.
14. तक्रारकर्त्याने पार्सल बुक करताना त्याचे मुल्य घोषीत करण्याकरीता कोणतेही दस्तावेज विरुध्द पक्षाकडे सादर केल्याचे अभिलेखावरुन दिसुन येत नाही. सदर पार्सल गहाळ झाल्यावर तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षासोबत केलेल्या पत्र व्यवहारात सदर पार्सल मधील साड्यांची किंमत रु.16,300/- असल्याबाबत सांगितल्याचे अभिलेखावर दाखल दस्तावेजांवरुन दिसुन येते. तक्रारकर्त्याने अभिलेखावर साड्या खरेदी केल्याबाबतचे दि.22.02.2014 चे दोन बिलांच्या छायांकीत प्रती दाखल केल्या आहेत. त्यामधील दोन साड्यांची किंमत रु.16,300/- जरी होत आहे, तरी पार्सलची किंमत बुक करतांना घोषीत न केल्यामुळे पार्सलमधील साड्या त्याच होत्या व त्यांची किंमत तक्रारकर्त्याचे म्हणण्यानुसार रु.16,300/- होती हे सिध्द होत नाही. बिलांवरील अटी व शर्ती तक्रारकर्त्याला बंधरकारक नसल्यामुळे त्यात निर्धारीत विरुध्द पक्षाची जबाबदारी नुसारच नुकसान भरपाई देण्यांस मंच बाध्य नाही. तक्रारकर्त्याने प्रकरणात एकूण रक्कम रु.1,92,300/- नुकसान भरपाईची मागणी केली आहे जी मंचाच्या मते अवास्तव आहे. अश्या परिस्थितीत प्रकरणातील वस्तुस्थितीचा विचार करता तक्रारकर्ता हा त्याचे पार्सल गहाळ झाल्यामुळे त्याला झालेल्या आर्थीक नुकसान भरपाईपोटी रु.12,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- मिळण्यांस पात्र आहे या निष्कर्षाप्रत मंच येते.
15. विरुध्द पक्षाने त्याचे बचावाप्रित्यर्थ तीन न्याय निवाडयांच्या प्रती अभिलेखावर दाखल केल्या आहेत....
1. Supreme Court of India, “Bharathi Knitting Company –v/s- DHL Worldwide Express
Courier” Dtd. 09/05/1996.
2. National Consumer Disputes Redressal Commission,New Delhi, “Desk To Desk Courier
And Cargo –v/s- Kerala State Electronics”, Dtd. 17/02/2004.
3. National Consumer Disputes Redressal Commission,New Delhi,”M/s Blue Dart Courier
Service and another –v/s- M/s Modern Wool Ltd.”,Dtd. 26/07/1993.
सदर तिन्ही निवाडयातील प्रकरणांमध्ये बिलावर पाठविणा-याची स्वाक्षरी होती. त्यामुळे सदर प्रकरणातील वस्तुस्थिती हातातील प्रकरणाशी विसंगत असल्यामुळे त्यातील तथ्य या प्रकरणात लागू होत नाही.
वरील विवेचनावरुन मंच खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
- तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
- विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 ने वैयक्तिक किंवा संयुक्तपणे तक्रारकर्त्याला आर्थीक नुकसान
भरपाईपोटी रु.12,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- अदा करावा.
- वरील आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 ने वैयक्तिक किंवा संयुक्तपणे
आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी.
4. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्क देण्यांत यावी.
5. तक्रारकर्त्यास तक्रारीची ‘ब’ व ‘क’ प्रत परत करावी.