(मंचाचा निर्णय: श्री. मिलींद केदार- सदस्य यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 03/11/2010) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दिनांक 14.06.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. तक्रारकर्त्याने मे. एम.एस. पांडे ऍन्ड सन्स, व्हेरायटी चौक, मेन रोड, सिताबर्डी, नागपूर यांचेकडून दि.25.01.2007 रोजी रु.975/- चा बजाज आटो पाप अप टोस्टर खरेदी केला होता. त्याच वेळी मे. एम.एस. पांडे ऍन्ड सन्स, यांनी बजाज इलेक्ट्रीकल्स लि. यांनी निर्धारीत केलेल्या कस्टमर केअर सेंटर्सची यादी दिली होती. त्या यादीमध्ये गैरअर्जदाराचे नाव व पत्ता नमुद केलेला आहे. सदर टोस्टरची हमी मुदत 2 वर्षांची होती ती मुदत दि.24.01.2009 ला संपणार होती. त्यामुळे तक्रारकर्त्याने आपला मुलगा आशिष गुप्ते याचे मार्फत टोस्टर गैरअर्जदारांचे दुकानात दि.11.09.2009 रोजी दुरुस्त करण्याकरता पाठविले, त्यावेळी गैरअर्जदाराने सर्विस स्लीप दिली व त्यावर आशिष गुप्ते याचे नाव व मोबाईल क्रमांक लिहीला व त्यातील एलिमेंट खराब झाल्याबद्दल उल्लेख केला. तसेच ‘इस्टीमेट देना है’ असा शेरा लिहीला. तक्रारकर्त्याने पुढे नमुद केले आहे की, गैरअर्जदाराने सदर टोस्टरची कॉईल उष्ण होत नाही व त्याचे दुरुस्ती करता काही सुटे भाग खरेदी करण्याकरता खर्च येईल असे सांगितले. सदर खर्च करण्यांस तयार असल्याचे आशिष गुप्ते यांनी गैरअर्जदारास सांगितले तेव्हापासुन सदर टोस्टर गैरअर्जदारांचे दुकानातच असल्याचे तक्रारकर्त्याने नमुद केले आहे. तक्रारकर्त्याने पुढे नमुद केले आहे की, गैरअर्जदाराने नेमुन दिलेल्या दिवशी तक्रारकर्त्याचा मुलगा सदर टोस्टर घेण्याकरता गेला असता इंजिनिअर उपस्थित नसल्यामुळे दुरुस्ती करता येणारा खर्च सांगता येणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर दि.17.09.2009 रोजी टोस्टरची अर्धवट तपासणी झाली असुन इंजिनिअर आल्यानंतर बाकीची तपासणी करण्यांत येईल असे सांगितले. त्यानंतर तक्रारकर्ता वारंवार गैरअर्जदाराकडे गेला असता काही ना काही कारण सांगुन गैरअर्जदार तक्रारकर्त्यास परत पाठवित होता. तक्रारकर्त्याने पुढे नमुद केले आहे की, तो दि.20.03.2010 रोजी गैरअर्जदारांकडे गेला असता त्यांनी उडवा-उडवीचे उत्तर दिले व सदर टोस्टर दुकानात दिसत नसल्याचे सांगितले. त्यानंतर तक्रारकर्ता वारंवार गैरअर्जदारांकडे गेला असता सदर टोस्टरचा तपास घेणे सुरु आहे असे कळविले व तक्रारकर्त्याला टोस्टर दिला नाही. याकरता तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली असुन सदर टोस्टर दुरुस्त करुन द्यावे व शारीरिक, मानसिक त्रासाकरीता रु.25,000/- व तक्रारीच्या खर्चाकरीता रु.10,000/- ची मागणी केली आहे. 3. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदाराला बजावण्यांत आली असता त्यांनी आपल्या उत्तरात नमुद केले आहे की, सदर टोस्टर दुरुस्ती करता ठेऊन घेतांना तक्रारकर्त्याचे मुलाला सांगितले होते की, टोस्टरचे सुटे भाग बाजारात उलपब्ध नाही व ते उपलब्ध झाले की त्यातील दोषांचे निवारण करण्यांत येईल. त्यांनी आपल्या उत्तरात नमुद केले आहे की, तक्रारकर्त्याने कोणतीही रक्कम अग्रिम दिलेली नाही, त्यामुळे तो त्यांचा ग्राहक ठरत नाही. तसेच पुढे असेही नमुद केले आहे की, सदर टोस्टरचे भाग हे स्टीलचे असुन कंपनीने ते बनविणे बंद केल्यामुळे ते दुरुस्त होऊ शकत नाही. तसेच तक्रारकर्त्याचे इतर सर्व म्हणणे नाकारले असुन सदर तक्रार खारिज करण्यांची विनंती केलेली आहे. 4. सदर तक्रार मंचासमक्ष दि.29.10.2010 रोजी युक्तिवादाकरीता आली असता मंचाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद त्यांचे वकीलांमार्फत ऐकूण घेतला. तसेच मंचासमक्ष दाखल दस्तावेज व दोन्ही पक्षांचे कथन यांचे निरीक्षण करता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षाप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 5. तक्रारकर्त्याने दि.25.01.2007 रोजी बजाज आटो पाप अप टोस्टर रु. 975/- ला खरेदी केला होता, ही बाब तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तावेज क्र.1 वरुन स्पष्ट होते. सदर टोस्टर तक्रारकर्त्याने मे. एम.एस. पांडे ऍन्ड सन्स, व्हेरायटी चौक, मेन रोड, सिताबर्डी, नागपूर यांचेकडून खरेदी केला होता. तसेच गैरअर्जदार हे सदर टोस्टर उत्पादीत कंपनीचे कस्टमर केअर सेंटर असल्याचे तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तावेज क्र.2 वरुन स्पष्ट होते. अशा परिस्थितीत ग्राहक/ तक्रारकर्त्याने खरेदी केलेल्या टोस्टरमध्ये काही बिघाड निर्माण झाल्यास ते दुरुस्त करुन देण्याची जबाबदारी ही कस्टमर केअर सेंटरची असते व गैरअर्जदार सदर कंपनीचे अधिकृत ग्राहक सेवा करणारे केंद्र आहे, ही बाब दस्तावेज क्र.2 वरुन स्पष्ट होते. त्यामुळे बजाज इलेक्ट्रीकलव्दारे निर्मीत सदर टोस्टरमध्ये झालेला बिघाड त्वरीत दोषांचे निवारण करुन देण्याची जबाबदारी गैरअर्जदाराची ठरते, असे मंचाचे मत आहे. 6. तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराकडे टोस्टर दि.25.01.2007 रोजी खरेदी केले होते असे आपल्या कथनातील परिच्छेद क्र.1 मध्ये कथन केले आहे. तसेच सदर टोस्टरची खरेदी करतेवेळी गॅरंटी 2 वर्षांची होती, असे तक्रारीत नमुद केले आहे. सदर परिच्छेदाला उत्तर देत असतांना गैरअर्जदाराने यातील मजकूर हा रेकॉर्डचा भाग आहे, त्यामुळे त्यास उत्तर देण्याची गरज नाही असे नमुद केले आहे. यावरुन सदर टोस्टरची गॅरंटी (हमी) 2 वर्षांची होती हे ग्राह्य धरण्यांत येते. 7. तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांकडे दि.11.09.2009 रोजी टोस्टर दुरुस्तीकरता दिले होते, ही बाब तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तावेज क्र.3 वरुन स्पष्ट होते. सदर दस्तावेजांमध्ये गैरअर्जदाराने कुठेही सुटे भाग उपलब्ध झाल्यानंतर दोष दुरुस्त करुन देण्यांत येईल असे नमुद केल्याचे दिसुन येत नाही, त्यामध्ये फक्त ‘इस्टीमेट देना है’, एवढेच नमुद केले आहे. यावरुन गैरअर्जदाराने आपल्या उत्तरात सुटे भाग उपलब्ध होत नाही त्यामुळे तक्रारकर्त्याचे टोस्टर दुरुस्त करुन देता येणार नाही, असे केलेले कथन मान्य करणे योग्य नाही. तसेच गैरअर्जदाराने सदर टोस्टर उत्पादीत करणा-या कंपनीने या टोस्टरला लागणा-या सुटया भागांची निर्मीती बंद केलेली आहे असे म्हटले आहे, परंतु त्याबाबतचा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे गैरअर्जदाराचा सदर बचाव मान्य करण्यांत येत नाही. 8. तक्रारकर्त्याचा टोस्टर दि.11.09.2009 पासुन आजपर्यंत दुरुस्त करुन न देणे ही अत्यंत खेदजनक बाब असुन गैरअर्जदारांचे सेवेतील त्रुटी असल्याचे मंचाचे मत आहे. मंचाचे असेही मत आहे की, गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास आवश्यक ते खर्चाचे इस्टीमेट देऊन त्याचे टोस्टर दुरुस्त करुन द्यावे व इस्टीमेट नुसार रक्कम तक्रारकर्त्याने गैरअर्जदारास द्यावी. तसेच गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यास सेवेत त्रुटी दिल्याबद्दल झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रु.1,000/- व तक्रारीच्या खर्चाबद्दल रु.1,000/- द्यावयास पाहिजे असे मंचाचे मत आहे. 9. उभय पक्षांचा युक्तिवाद व मंचासमक्ष दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता मंच वरील निष्कर्षांवरुन खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यास सेवेत त्रुटी दिल्याचे घोषीत करण्यांत येते. 3. गैरअर्जदाराला आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला आवश्यक ते खर्चाचे इस्टीमेट द्यावे व इस्टीमेट नुसार तक्रारकर्त्याने रक्कम जमा केल्यापासुन 15 दिवसांचे आंत त्याचे टोस्टर दुरुस्त करुन परत करावे. 4. गैरअर्जदाराला आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रु.1,000/- व तक्रारीच्या खर्चाबद्दल रु.1,000/- अदा करावे.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |