श्री. हेमंतकुमार पटेरीया, सदस्य यांचे आदेशांन्वये.
- आ दे श -
(पारित दिनांक - 08 नोव्हेंबर, 2016)
तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचे संक्षिप्त विवरण येणेप्रमाणे.
1. वि.प.क्र. 1 मे. सुरज मोबाईल विला मोबाईल विक्रेता असून वि.प.क्र. 2 हे मोबाईल निर्माता कंपनी आहे व वि.प.क्र. 3 निर्माता कंपनीचे अधिकृत सर्विस सेंटर आहे. तक्रारकर्त्याने वि.प.क्र. 1 कडून वि.प.क्र. 2 निर्मित मायक्रोमॅक्स मॉडेल क्र. A107 हा मोबाईल दि.23.05.2015 रोजी रु.6,700/- मध्ये खरेदी केला. सदर M-IMEI क्र. 911417451707859 आणि S-IMEI क्र. 911417451808855 असा होता.
मोबाईल खरेदी केल्यावर 7 ते 8 दिवसानंतर मोबाईलचा डिस्प्ले आपोआप बंद होत होता. तसेच नेटवर्कसुध्दा वारंवार आपोआप जात होते. त्यामुळे तक्रारकर्त्याने याबाबत वि.प.क्र. 1 कडे तक्रार केली व मोबाईल बदलवून मागितला. वि.प.क्र. 1 ने मोबाईल बदलवून देण्यास नकार देऊन तो वि.प.क्र. 3 कडे दुरुस्तीकरीता पाठविला. 10 दिवसानंतर तक्रारकर्त्याला वि.प.क्र. 3 कडून मोबाईल प्राप्त झाला. तक्रारकर्त्याने जॉबशिटची मागणी केली असता वि.प.क्र. 3 ने देण्यास नकार दिला.
जुन 2015 च्या शेवटच्या आठवडयात मोबाईलमध्ये डिस्पले व नेटवर्कची समस्या कायम असल्याने वि.प.क्र. 1 कडे तक्रार केल्यावर त्यांनी वि.प.क्र. 3 कडे दुरुस्तीकरीता पाठविला व तो त्यांनी 8 दिवसांनंतर दुरुस्त करुन परत केला. परंतू मोबाईल पूर्णतः दुरुस्त न झाल्याने तक्रारकर्त्याने दि.12.08.2015 रोजी वि.प.क्र. 1 ला सदर सदोष मोबाईल बदलवून मिळावा किंवा मोबाईलची किंमत परत मिळावी अशी विनंती केली. परंतू वि.प.क्र. 1 ने सदर सदोष मोबाईल वि.प.क्र. 3 कडे परत दुरुस्तीस पाठविला. दि.28.08.2015 रोजी मोबाईल दुरुस्त करुन तक्रारकर्त्याला दिला, मात्र जॉबशिट दिली नाही. तक्रारकर्त्याने मोबाईल वापरला असता त्यात जुनीच समस्या कायम असल्याने दि.19.09.2015 रोजी वि.प.च्या कस्टमर केअर सेंटरला तक्रार केली व वि.प.क्र.3 कडे दुरुस्ती दिला. 20 दिवसानंतर तक्रारकर्त्यास मोबाईल परत मिळाला, परंतू जॉबाशिट दिली नाही. मोबाईल दुरुस्त न झाल्याने दि.06.11.2015 तक्रारकर्त्याने वि.प.क्र. 1 ला सदर मोबाईल परत केला व वि.प.क्र. 1 यांनी मोबाईल दुरुस्तीस वि.प.क्र. 3 कडे पाठविला. तेव्हापासून सदर मोबाईल हा वि.प.कडे आहे व तो तक्रारकर्त्याला मिळाला नाही.
दि.10.01.2016 रोजी वि.प.क्र. 1 ते 3 यांना अधिवक्ता यु.डी.तिडके यांचेमार्फत नोटीस पाठवून सदोष मोबाईल बदलवून देण्याबाबत विनंती केली. परंतू सदर नोटीसला वि.प.ने प्रतिसाद न दिल्याने तक्रारकर्त्याने तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केली आहे.
- वि.प.क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्यास विकलेला मोबाईल बदलवून द्यावा किंवा मोबाईलची किंमत रु.6,700/- परत मिळावी.
- शारिरीक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.25,000/-, नोटीस खर्च रु.2,000/- आणि तक्रार खर्च रु.10,000/- देण्याचा आदेश व्हावा.
तक्रारकर्त्याने तक्रारीचे पुष्टयर्थ मोबाईल बिल, जॉबशिट, कस्टमर केयरचे पत्र, वि.प.क्र. 1 ला दिलेले पत्र, वि.प.ला पाठविलेली कायदेशीर नोटीस, पोस्टाची पावती व पोचपावती इ. दस्तऐवज दाखल केले आहेत.
2. सदर तक्रारीची नोटीस वि.प.क्र. 1 यांना प्राप्त होऊनही ते मंचासमोर हजर न झाल्याने मंचाने त्यांचेविरुध्द एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला. वि.प.क्र. 2 व 3 यांना दि.19.08.2016 रोजी दैनिक वर्तमानपत्रात नोटीस जाहिर केल्यावरही ते मंचासमोर हजर न झाल्याने मंचाने त्यांचेविरुध्द एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश पारित केला.
3. तक्रारकर्त्याच्या कथनावरुन खालील मुद्दे विचारार्थ घेण्यांत आले. त्यावरील मंचाचे निष्कर्ष व कारणमिमांसा पुढीलप्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) वि.प.ने सेवेत न्युनतापूर्ण व्यवहार केला आहे काय ? होय. 2) तक्रारकर्ती मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय ? अंशतः. 3) आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
- कारणमिमांसा -
4. मुद्दा क्र. 1 बाबत – तक्रारकर्त्याने तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे वि.प.क्र. 1 कडून दि. 23.05.2015 रोजी बिल क्र. 211 अन्वये (दस्तऐवज क्र.1) रु.6,700/- मध्ये विकत घेतला. त्या मोबाईलचा M-IMEI क्र. 911417451707859 आणि S-IMEI क्र. 911417451808855 असा आहे. यावरुन स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याने सदर मोबाईल वि.प.क्र. 1 कडून खरेदी केला.
सदर मोबाईलमध्ये खरेदी केल्यानंतर 7-8 दिवसांतच डिस्प्ले आणि नेटवर्क मध्ये समस्या आल्या आणि मोबाईल वारंवार आपोआप बंद होत होता. तक्रारकर्त्याने सदर समस्यांबाबत वि.प.क्र. 1 कडे तक्रार केली व मोबाईल बदलवून मागितला. परंतू .प.क्र. 1 ने मोबाईल बदलवून देण्यास नकार देऊन तो वि.प.क्र. 3 कडे दुरुस्तीकरीता पाठविला. वि.प.क्र. 3 जे अधिकृत सर्विस सेंटर आहे त्यांनी 10 दिवसानंतर तक्रारकर्त्याला मोबाईल दुरुस्त करुन दिला. तक्रारकर्त्याने जॉबशिटची मागणी केली असता वि.प.क्र. 3 ने दिलेली नाही. यानंतरही याच समस्या आल्याने जून 2015, ऑगस्ट 2015 आणि सप्टेंबर 2015 ला वि.प.क्र. 1 कडे तक्रारकर्ता मोबाईल बदलवून मागण्यास गेला असता वि.प.क्र. 3 कडे सदर मोबाईल दुरुस्तीस पाठविला आहे आणि वि.प.क्र. 3 ने तो तात्पुरता दुरुस्त करुन दिलेला आहे. मात्र मोबाईल कायमस्वरुपी दुरुस्त करण्यात आलेला नाही किंवा मोबाईल पूर्णपणे दोषरहित करण्यात आलेला नाही. प्रत्येकवेळेस मोबाईल थातूर-मातूर दुरुस्त करुन तक्रारकर्त्याला परत करण्यात आलेला आहे.
दि.06.11.2015 रोजी मोबाईलमध्ये परत दोष उत्पन्न झाल्याने तक्रारकर्त्याने याबाबत वि.प.क्र. 1 कडे तक्रार केली असता त्यांनी वि.प.क्र. 3 कडे दुरुस्तीकरीता पाठविला. तेव्हापासून सदर मोबाईल हा वि.प.कडे आहे. वि.प.च्या अधिकृत सेवा केंद्राने वारंवार मोबाईल दुरुस्त केल्यावरही त्यामध्ये वारंवार दोष आढळून येत होता. सदर बाब मोबाईल सातत्याने दुरुस्तीस पाठविण्यात आला यावरुन स्पष्ट होते. तसेच दि.06.11.2015 ला मोबाईल वि.प.क्र. 3 कडे दुरुस्तीस दिल्यावर त्यांनी तो दुरुस्त करुन दिलेला नाही किंवा नविन मोबाईल तक्रारकर्त्यास बदलवून दिलेला नाही. सदर बाब दस्तऐवज क्र. 2 वरील जॉबशिटवरुन स्पष्ट होते. मोबाईल खरेदी केल्यानंतर केवळ एका आठवडयात त्यात दोष उत्पन्न होणे आणि वारंवार दुरुस्तीस दिल्यावरही तो संपूर्णपणे दुरुस्त न होणे म्हणजेच मोबाईलमध्ये मुलतः निर्मिती दोष असल्याचे स्पष्ट होते. मोबाईल वारंटी कालावधीत असतांना तक्रारकर्त्याने दुरुस्तीबाबतचे दस्तऐवज तसेच कस्टरमर केयर सेंटर वि.प.क्र. 3 ला व वि.प.क्र. 1 ला मोबाईल दुरुस्त होत नसल्यास त्याची रक्कम परत करण्याबाबत किंवा दुसरा नविन मोबाईल देण्याची मागणी करणारे पत्र दाखल केले आहे. वि.प.ने सदर पत्राची दखल घेतलेली नाही. वि.प.ची सदर कृती ही सेवेतील न्यूनता आणि अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब आहे.
5. मुद्दा क्र. 2 व 3 बाबत – वि.प.क्र. 1 ते 3 वारंटीप्रमाणे सदोष मोबाईल वारंटी काळात विनामुल्य दुरुस्त करुन देण्यांस किंवा त्या बदल्यात नविन मोबाईल देण्यास जबाबदार असतांना तो त्यांनी पूर्णपणे दुरुस्त करुन दिला नाही किंवा बदलवून दिला नाही म्हणून तक्रारकर्ता त्याच मॉडेलचा नविन मोबाईल हँडसेट पुढील एक वर्षाच्या वारंटीसह मिळण्यास किंवा मोबाईलची किंमत रु.6,700/- खरेदी तारीख 23.05.2015 पासून प्रत्यक्ष अदाएगीपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह मिळण्यास पात्र आहे.
याशिवाय, आर्थिक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.3,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.2,000/- मिळण्यास देखिल तक्रारकर्ती पात्र आहे. म्हणून मुद्दा क्र. 2 व 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत.
वरील निष्कर्षास अनुसरुन खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यांत येत आहे.
- आ दे श -
तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 12 खालिल तक्रार वि.प.क्र. 1 ते 3 विरुध्द संयुक्त व वैयक्तीकरीत्या खालीलप्रमाणे अंशतः मंजूर करण्यांत येते.
1) वि.प.नी तक्रारकर्त्यास त्याच किंमतीचा व त्याच मॉडेलचा नविन मोबाईल हँडसेट पुढील एक वर्षाच्या वारंटीसह बदलवून द्यावा.
किेंवा
मोबाईलची हँडसेटची किंमत रु.6,700/- दि.23.05.2015 पासून प्रत्यक्ष अदाएगीपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह परत करावी.
2) शारिरीक, आर्थिक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.3,000/- आणि तक्रार खर्चाबाबत रु.2,000/- वि.प.नी तक्रारकर्त्यास द्यावा.
3) वि.प.क्र. 1 ते 3 ने सदर आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आत संयुक्तपणे व वैयक्तीकरीत्या करावी.
4) तक्रारीची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्त्यास परत करावी.
5) आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामुल्य पुरवावी.