तक्रारदारातर्फे : वकील श्री. निलेश पार्टे
सामनेवाले विनाकैफियत : तर्फे प्रतिनीधी श्री. सम्राट रसाळ,
(युक्तीवादाच्या वेळी)
निकालपत्रः- श्री. एम.वाय.मानकर अध्यक्ष, -ठिकाणः बांद्रा
निकालपत्र
(दिनांक 08/08/2017 रोजी घोषीत )
1. तक्रारदार यांनी सामनेवाले यांनी कराराप्रमाणे निवासी सुविधा व इतर सोयी न पुरविल्यामूळे ही तक्रार दाखल केली. तक्रारदारांनी तक्रारीसोबत आवश्यक ती कागदपत्रे दाखल केली. सामनेवाले यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर ते मंचात उपस्थित झाले व वकीलांचे वकीलपत्र दाखल केले व त्यांना संधी दिल्यानंतर सुध्दा लेखीकैफियत दाखल न केल्यामूळे त्यांचेविरूध्द प्रकरण विना लेखीकैफियत चालविण्यात आले.
2. तक्रारदारानूसार सामनेवाले यांचे अध्यक्ष श्री. एन.एन.पै त्यांचे परिचीत होते व त्यांनी सामनेवाले यांच्या स्टर्लींग व्हॅकेशन टाईम शेअर योजनेबाबत माहिती दिली व त्यांना योजनेमध्ये सामील होण्याकरीता प्रोत्साहित केले. तक्रारदार यांना महाबळेश्वर येथील योजना आवडल्यामूळे सामनेवाले यांचे सदस्य झाले व वेळोवेळी त्यांनी सामनेवाले यांना एकुण रू. 79,000/-,अदा केले. परंतू सामनेवाले यांनी महाबळेश्वर येथे कोणताही विकास केला नाही. त्यामुळे सामनेवाले यांनी तक्रारदारांना सेवा देण्यात कसुर केला व त्यांच्या कडून पैसे उखळण्यात आले. तक्रारदारांनी सामनेवाले यांना दि. 07/12/2011 ला पत्र पाठवून 21 टक्के व्याजानी रक्कम परत करण्याबाबत मागणी केली आहे. याबाबत सुध्दा सामनेवाले यांनी निःष्काळजीपणा दाखविला. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचे दि. 07/12/2011 च्या पत्राबाबत कार्यवाही न केल्यामूळे तक्रारदार यांना तक्रार दाखल करणेकामी सततचे कारण प्राप्त झाले. तक्रारदारांनी ही तक्रार दाखल करून रू. 79,000/-, 18 टक्के व्याजासह, मानसिक त्रासासाठी रू. 1,00,000/-, व तक्रारीचा खर्च रू. 25,000/-,व इतर मागण्या केल्या.
3. तक्रारदारांनी पुराव्याचे शपथपत्र व लेखीयुक्तीवाद दाखल केला. तक्रारदारातर्फे वकील श्री. निलेश पार्टे व सामनेवाले तर्फे प्रतिनीधी श्री. सम्राट रसाळ यांचा तोंडीयुक्तीवाद ऐकण्यात आला.
4. तक्रारदार यांचा पुरावा अबाधीत आहे. कागदपत्राचे सबळ पुरावे सादर आहेत. तक्रारदार यांनी सामनेवाले यांना रक्कम अदा केल्याबाबत कोणतीच शंका नाही. तसेच सामनेवाले यांनी कराराप्रती त्यांची जबाबदारी पार पाडली नाही हे सुध्दा स्पष्ट होते. तेव्हा तक्रार मंजूर करण्याकरीता काही कायदेशीर अडचण व अडथळा आहे काय ते पाहणे आवश्यक आहे.
5. तक्रारदार यांनी त्यांना सेवासुविधा न पुरविल्यामूळे दि. 07/12/2011 ला पत्र पाठविले व भरलेली रक्कम 21 टक्के व्याजासह परत मागीतली. या पत्राला सामनेवाले यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. तेव्हा आमच्या मते तक्रारदारांनी ही तक्रार ग्रा.सं.कायदयाच्या कलम 24 (अ) प्रमाणे दि. 07/12/2013 ला किंवा त्यापूर्वी दाखल करणे आवश्यक होते. परंतू ही तक्रार या मंचात दि. 29/10/2015 ला दाखल करण्यात आली. त्यामुळे आमच्या मते तक्रार दाखल करण्यास अंदाजे 22 महिन्याचा विलंब झाला आहे. तो क्षमापित करण्याकरीता कोणताही अर्ज सादर नसल्यामूळे तो क्षमापित करता येत नाही. ही तक्रार कालबाहय ठरते आणि या तक्रारीला सततचे कारण आहे, या तक्रारदाराच्या कथनाशी आम्ही पूर्णपणे असहमत आहोत. आम्ही मा. राष्ट्रीय आयोगानी प्रथम अपील क्र 430/2012 मे. तोलानी शिपींग कंपनी विरूध्द स्टॅर्लींग हॉलीडे रिसॉर्ट (I) लि. निकाल तारीख 30/07/2013 चा आधार घेत आहोत.
6. वरील चर्चेनुरूप व निष्कर्षावरून आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
7. या मंचाचा कार्यभार पाहता व इतर प्रशासकीय कारणांमुळे ही तक्रार यापूर्वी निकालात काढता येऊ शकली नाही. सबब खालीलः-
आदेश
1. तक्रार क्र 385/2015 ही कालबाहय असल्यामूळे ती ग्रा.सं.कायदयाच्या कलम 24 (अ) प्रमाणे दाखल करून घेता येत नाही व त्यातील मागणी मंजूर करता येत नाहीत. सबब, ती खारीज करण्यात येते.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. आदेशाची प्रत उभयपक्षांना विनामुल्य पाठविण्यात यावी.
4. अतिरीक्त संच तक्रारदारांना परत करण्यात यावे.
npk/-