(आदेश पारीत व्दारा - श्री शेखर पी. मुळे, मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 03 सप्टेंबर 2016)
1. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केली आहे. ही तक्रार वाहन निर्मिती कंपनी आणि वाहन विक्रेत्याचे विरुध्द सदोष टायर संबंधीची आहे. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालील प्रमाणे.
2. तक्रारकर्त्याने MH/31/DC/6969 या नंबरची ‘चेवरोलेट कॅपटीवा’ कार विरुध्दपक्ष क्र.1 कडून जानेवारी 2010 मध्ये विकत घेतली होती. डिसेंबर 2010 मध्ये त्या गाडीचे दोन टायर खराब झाले. त्यामुळे ती गाडी रोडवर किंवा रस्त्यावर चालविणे धोकादायक होऊ लागले, त्यामुळे विरुध्दपक्ष क्र.1 कडे पाठविण्यात आले. विरुध्दपक्ष क्र.1 ने त्याला सांगितले की, थंडीच्या दिवसात टायरमध्ये अशाप्रकारे दोष निर्माण होऊ शकतो त्यामुळे त्याला काही दिवस थांबण्याचा सल्ला देण्यात आला, परंतु त्यानंतर दुसरा टायर सुध्दा खराब झाला. विरुध्दपक्ष क्र.1 ने त्याला आश्वासन दिले की, सर्विसींग मध्ये गाडीत असलेला दोष काढून टाकण्यात येतील, परंतु तसे झाले नाही. गाडीच्या टायरची विरुध्दपक्षाकडून तपासणी करण्यात आली, परंतु दोषाचे निवारण केले नाही. तेंव्हा तक्रारकर्त्याने दोषपूर्ण टायर बदलवून देण्याची विनंती केली, परंतु विरुध्दपक्षाने नवीन टायर दिले नाही. दिनांक 26.8.2011 ला तो त्या गाडीतून जबलपुर येथे जात असतांना रस्त्यात गाडीचे टायर फुटले, त्यावेळी त्याने ओळखीच्या इसमाकडे त्याच कंपनीचे वाहन असल्याने त्याचे टायर लावले व तो जबलपुरला गेला. तेथे त्याने चार नवीन टायर रुपये 43,601/- मध्ये विकत घेतले. परंतु, त्यातील एका टायर मध्ये सुध्दा एका बाजुने फुगावट उत्पन्न झाले, त्याची तक्रार विक्रेताकडे केली असता तो टायर बदलवून नवीन टायर लावून दिला. अशाप्रकारे त्याच्या विरुध्दपक्ष क्र.2 च्या निर्मित गाडीच्या टायरमध्ये निर्मिती दोष होता म्हणून या तक्रारीव्दारे त्याने रुपये 1,00,000/- नुकसान भरपाई तसेच 3 टायरची किंमत रुपये 39,000/- व तक्रारीचा खर्च मागितला आहे.
3. विरुध्दपक्ष क्र.1 कार विक्रेता यांनी निशाणी क्र.8 खालील लेखी जबाब दाखल केला व असे नमूद केले की, ज्याअर्थी ही तक्रार गाडीच्या टायर मधील दोषासंबंधीची आहे त्याअर्थी त्याची जबाबदारी टायर निर्माण कंपनीची आहे. विरुध्दपक्ष क्र.1 ही फक्त कार विक्रेता असल्याने टायरच्या निर्मिती दोषा संबंधी जबाबदार राहू शकत नाही. टायरच्या दोषा संबंधी असे नमूद केले आहे की, त्याच्या एक्सपर्टने टायरची तपासणी केली होती त्या असे आढळून आले की, टायरमध्ये कमी हवा असल्याने व कमी हवेचा दाबाब गाडी चालविल्यामुळे त्या टायरचा एका बाजुने नुकसान होऊन फुगवटे उत्पन्न झाले. याप्रकारचे नुकसान गाडीच्या विमा करारा अंतर्गत येत नसल्याने तक्रारकर्त्याला टेकनिकल इंजिनियरशी बोलण्यास सांगितले होते, तसेच त्याला सांगण्यात आले की, विरुध्दपक्ष क्र.2 कार निर्माण कंपनी यांनी तयार केलेल्या Prorata warranty नुसार 3 टायरची 30 टक्के रक्कम ही गाडी निर्माण कंपनीची राहिल आणि 70 टक्के रक्कम तक्रारकर्त्याला भरावी लागेल, परंतु तक्रारकर्त्याला हे मान्य नव्हते. त्यामुळे गाडीचे टायर बदलवून न दिल्यामुळे विरुध्दपक्ष क्र.1 जबाबदार नाही. इतर मजकुर अमान्य करुन तक्रार खारीज करण्याची विनंती केली.
4. विरुध्दपक्ष क्र.2 ने आपले लेखी जबाब निशाणी क्र.9 खाली दाखल केला. त्याच्या जबाबानुसार त्याच्या गाडीच्या टायरची तपासणी केली व त्यावेळी टायरला Pinch cuts आढळून आले जे चाकातील कमी हवेच्या दाबामुळे उत्पन्न होतात व त्यामुळे टायरला फुगवटा येतो, यामध्ये कुठलाही निर्मिती दोष नाही. तक्रारकर्ता स्वतः त्याच्या गाडीचा नीट देखभाल करण्यास व चाकामध्ये योग्य तो हवेचा दाब ठेवण्यामध्ये निष्काळजी होता. सबब ही तक्रार खारीज करण्याची विनंती करण्यात आली.
5. तक्रारकर्ती आणि विरुध्दपक्ष क्र.1 च्या वकीलांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. तसेच दाखल केलेल्या दस्ताऐवजाचे अवलोकन करण्यात आले. विरुध्दपक्ष क्र.2 कडून युक्तीवादाकरीता कोणीही हजर झाले नाही. युक्तीवाद व अभिलेखावरील दस्ताऐवजाचे अवलोकन करण्यात आले, त्याप्रमाणे खालीप प्रमाणे निष्कर्ष देण्यात येते.
// निष्कर्ष //
6. टायर मध्ये असलेल्या दोषासंबंधी विरुध्दपक्षाने त्या टायर मध्ये दोष होता व तो वॉरंटीच्या काळात उत्पन्न झाला हे नाकबूल केलेले नाही. प्रश्न फक्त इतकाच आहे की, तो दोष निर्मिती दोष होता की गाडीची देखभाल नीट न केल्यामुळे उत्पन्न निर्माण झाला झाला होता. विरुध्दपक्ष क्र.2 हा टेकनिकल इंजिनियरने दिलेल्या अहवालावर भिस्त ठेवत आहे व त्यावर त्याच्या तर्फे असा युक्तीवाद करण्यात आला की, गाडीच्या टायर मध्ये निर्मिती दोष नसून चाकात कमी हेवेच्या दाबामुळे टायर मध्ये दोष उत्पन्न झाला. परंतु, विरुध्दपक्षाने टेकनिकल इंजिनियरचा तो अहवाल आमच्या समोर दाखल केला नाही. त्यामुळे केवळ लेखी जबाबा व्यतिरिक्त विरुध्दपक्षाच्या या म्हणण्याला दुसरा कुठलाही पुरावा नाही. तक्रारकर्त्याने निशाणी क्र.14 प्रमाणे देविदास जमनानी याचे शपथपञ दाखल केले. ज्यावेळी तक्रारकर्ता जबलपुरला जात होता आणि त्याचे गाडीचे टायर खवासा गांवाजवळ खराब झाले, त्यावेळी त्याने देविदास जमनानी याला बोलावून त्याच्या मिञाच्या गाडीचे टायर बसवून घेतले होते. तक्रारकर्त्याचे या म्हणण्याला देविदास जमनानीचे शपथपञाने पुष्टी दिली आहे. या पुराव्याला विरुध्दपक्षाकडून कुठलेही आव्हान दिलेले नाही. त्याशिवाय गाडीचे टायर वॉरंटी पिरेड मध्येच खराब झाले होते त्यावरुनही ही बाब सिध्द होते की, या टायरमध्ये निर्मिती दोष होता, यासाठी “United Auto Centre –Vs.- Gurpeet Singh, I(2011) CPJ 85 (State Commission, Chandigarh)”, यांनी दिलेल्या न्यायनिवाड्याचा आधार घेतला.
7. त्याशिवाय, तक्रारकर्त्याने जबलपुर येथील ओरियंटल मोटर्सकडून दिनांक 27.8.2011 ला त्याचे गाडीचे चार नवीन टायर विकत घेतले होते. त्याचे रिटेल इनवाईस अभिलेखावर दाखल केले आहे. टायर मध्ये निर्मिती दोष असल्याशिवाय चारही टायर मध्ये जवळपास एकाचवेळी एक सारखा दोष उत्पन्न होण्याची शक्यता फार कमी असते. त्यामुळे परिस्थिती व बाबीचा विचार करता तक्रारकर्त्याचे गाडीचे टायर मध्ये निर्मिती दोष होता. त्यामुळे विरुध्दपक्ष क्र.2 ही जबाबदार होती त्याने एकतर सदोष टायर बदलवून द्यायला हवे होते किंवा टायरची किंमत परत करावयास हवी होती. ज्याअर्थी त्याने असे केले नाही त्याअर्थी त्याचे सेवेमध्ये कमतरता होती असे म्हणावे लागेल.
8. याठिकाणी टायर संबंधी असलेला Warranty Clause विचारात घेणे आवश्यक आहे. त्यात असे नमूद केले आहे की, टायरची वॉरंटी ही टायर निर्मिती कंपनीची राहिल व ती एक वर्ष मुदतीकरीता वैध राहिल. तक्रारक्तर्याने विरुध्दपक्ष क्र.2 ची निर्मित गाडी विरुध्दपक्ष क्र.1 कडून विकत घेतली होती, त्यामुळे ते दोघेही तक्रारकर्त्याला सेवा देणारे होते म्हणून तक्रारकर्त्याला ते जबाबदार राहतात. तक्रारकर्त्याला विरुध्दपक्ष क्र.2 विरुध्द रकमेचा दावा करु शकतो त्यासाठी विरुध्दपक्ष क्र.2 आपली जबाबदारी या कारणास्तव टाळू शकत नाही की, टायरमध्ये असलेल्या दोषाची जबाबदारी टायर निर्मिती कंपनीची आहे.
अशाप्रकारे आम्हीं ही तक्रार अंशतः मंजूर करुन खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्ताची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्ष क्र.2 ला आदेशीत करण्यात येते की, तक्रारकर्त्याला त्याच्या गाडीच्या 3 टायरच्या मोबदल्यात रुपये 39,000/- द्यावेत.
(3) तसेच, विरुध्दपक्ष क्र.2 यांनी तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक व शारिरीक ञासापेाटी नुकसान भरपाई म्हणून रुपये 25,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 5000/- द्यावे.
(4) विरुध्दपक्ष क्रि.1 विरुध्द ही तक्रार खारीज करण्यात येते.
(5) विरुध्दपक्ष क्र.2 यांनी आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.
(6) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 03/09/2016