मंचाचे निर्णयान्वये - श्री. मिलींद केदार, सदस्य //- आदेश -// (पारित दिनांक – 16/03/2011) 1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्रा.सं.का.चे कलम 12 अन्वये मंचासमोर दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात अशी आहे की, त्यांचेकडे शेवर लेट हे वाहन ज्याचा क्र. MH 31 / CP 9524 होता. तक्रारकर्त्याने सदर वाहनाचा गैरअर्जदार क्र. 2 विमा कंपनीकडे रु.312,000/- चा दि.29.12.2009 ते 29.12.2010 करीता पॉलिसी क्र. 1601031090100205189 अन्वये विमा काढला होता. तक्रारकर्ते कामठी मार्गावर प्लॉटची पाहणी करावयास गेले असतांना MH 40 / 4833 या ट्रकने तक्रारकर्त्याचे वाहनास जोरदार धडक दिली. त्यामुळे वाहन हे क्षतिग्रस्त झाले. सदर घटनेची नोंद पोलिस स्टेशन कामठी येथे देण्यात आली व वाहन हे दुरुस्तीकरीता वर्कशॉपमध्ये नेले आणि वाहनाच्या दुरुस्तीच्या खर्चाचे अंदाजपत्रक मागितले. गैरअर्जदार क्र. 1 यांचेनुसार सदर वाहनाचे अनेक भाग व छत पूर्णपणे बदलविण्याचे सांगून त्यांनी रु.4,75,678/- चे अंदाजित देयक दिले. सदर अंदाजित देयकासह विमा रकमेची मागणी तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र. 2 कडे केली असता त्यांनी तपासनीस नियुक्त केला आणि त्यांच्या तपासनीसाने वाहनाची बॉडीशेल बदलविण्याकरीता आक्षेप नोंदवून दुरुस्त करुन घेण्याचा खर्च मान्य केला. गैरअर्जदार क्र. 1 यांचे मते सदर क्षतिग्रस्त वाहनाचे बॉडीशेल हे दुरुस्त करण्यायोग्य नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने वाहन वर्कशॉपमध्ये पडून आहे. याबाबत गैरअर्जदारांना नोटीस पाठविली असता त्यांनी टाळाटाळ करुन तक्रारकर्त्याचे वाहन दुरुस्त करुन दिले नाही किंवा विमा दावाही मंजूर केला नाही, म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन रु.3,12,000/- ची मागणी केली, तसेच मानसिक व शारिरीक त्रासाबाबत भरपाई व कार्यवाहीचा खर्च इ. मागण्या केलेल्या आहेत. 2. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांवर बजावण्यात आली असता गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले. 3. गैरअर्जदार क्र. 1 ने आपल्या लेखी उत्तरामध्ये शॉप मॅनेजर आणि सुपरवाईजर यांच्या मते वाहनाचे बॉडी शेल हे वाईटरीत्या मोडतोड झाल्याने ते बदलविणे आवश्यक असल्याने तसा अंदाजित खर्च तक्रारकर्त्याला देण्यात आला होता. विमा दावा मंजूर करण्याचे काम हे गैरअर्जदार क्र. 2 चे असल्याने, विमा दावा रकमेबाबत त्यांचा काहीही संबंध नसल्याने व त्यांनी सेवेत त्रुटी केलेली नसल्याने सदर तक्रार खारीज करण्याची मागणी केलेली आहे. 4. गैरअर्जदार क्र. 2 यांनी लेखी उत्तरामध्ये नमूद केले आहे की, त्यांनी तक्रारकर्त्याच्या वाहनाबाबतचा दावा योग्य ती छाननी करुन त्वरित निकाली काढला व तज्ञाने केलेल्या मुल्यांकन अहवालानुसार तक्रारकर्त्याला वाहन दुरुस्त करुन वाहनाची दुरुस्तीची देयके त्वरित सादर करण्यास निर्देश दिले. परंतू तक्रारकर्त्याने वाहन दुरुस्त करुन घेतले नाही किंवा तज्ञांच्या पुर्ननिरीक्षणाकरीता सादर केले नाही. त्यांच्या तज्ञाने वाहनाचे दुरुस्तीचे मुल्यांकन रु.1,47,701/- दिले होते. गैरअर्जदार क्र. 2 ने तक्रारकर्त्याला वारंवार 16.04.2010, 24.05.2010 व 13.07.2010 रोजी स्मरणपत्रे पाठविली. परंतू त्यांनी काहीही कारवाई केली नाही. आवश्यक दस्तऐवजांची मागणी करुनही ती गैरअर्जदारांना पुरविली नसल्याने त्याचा विमा दावा मंजूर करण्यात आला नाही. तक्रारकर्त्याने सदर तक्रार विचाराअंती दाखल केलेली असल्याने ती खारीज करण्यात यावी अशी मागणी गैरअर्जदार क्र. 2 विमा कंपनीने केलेली आहे. 5. सदर तक्रार मंचासमोर युक्तीवादाकरीता दि.04.03.2011 रोजी आली असता उभय पक्षांचा युक्तीवाद त्यांच्या वकिलांमार्फत ऐकला. तसेच सदर प्रकरणी दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले. -निष्कर्ष- 6. तक्रारकर्त्याने शेवर लेट हे वाहन ज्याचा क्र. MH 31 / CP 9524 होता, खरेदी केल्यानंतर त्याचा विमा गैरअर्जदार क्र. 2 कडे उतरविला होता ही बाब दाखल दस्तऐवजावरुन व उभय पक्षांच्या कथनावरुन स्पष्ट होते. तसेच सदर वाहनाचा विमा कालावधी हा 30.12.2009 ते 29.12.2010 होता व त्याचे विमामुल्य हे रु.3,12,000/- होते ही बाबसुध्दा तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तऐवज क्र. 2 वरुन स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारकर्ता गैरअर्जदार क्र. 2 चा ग्राहक ठरतो असे मंचाचे मत आहे. तसेच गैरअर्जदार क्र. 1 हे वाहन निर्मित कंपनीचे अधिकृत डिलर असून त्यांचेकडून तक्रारकर्त्याने वाहन खरेदी केले असल्याने तक्रारकर्ता गैरअर्जदार क्र. 1 चा ग्राहक ठरतो. 7. तक्रारकर्त्याच्या वाहनाचा अपघात झाला होता व त्यामुळे ते वाहन दुरुस्त करण्याकरीता गैरअर्जदार क्र. 1 च्या वर्कशॉपमध्ये नेण्यात आले. गैरअर्जदार क्र. 1 चे वर्कशॉपमध्ये सदर वाहनाचे निरीक्षण केल्यानंतर, त्यांनी वाहनाचे दुरुस्तीचा खर्च रु.4,75,678/- एवढा दिला, हि बाबही तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तऐवज क्र. 4 वरुन स्पष्ट होते. गैरअर्जदार क्र. 2 ही विमा कंपनी आहे व त्यांच्या निरीक्षकाने दिलेल्या अहवालानुसार वाहनाचे बॉडीशेल बदलविण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावर गैरअर्जदार क्र. 1 यांनी तक्रारकर्त्याच्या वाहनाचे बॉडीशेल हे दुरुस्त करण्याच्या स्थितीत नसल्याचे म्हटले आहे व ते बदलविणे गरजेचे आहे असे त्यांनी लेखी उत्तरात नमूद केले आहे. गैरअर्जदार क्र. 2 ने मंचासमक्ष सर्व्हे रीपोर्ट दाखल केलेला आहे आणि त्या सर्व्हे रीपोर्टसोबत सर्व्हेयर श्री. गंगादत्त रामराव पाटील यांचे शपथपत्र दाखल केले आहे. सदर शपथपत्रामध्ये सर्व्हेयरने क्षती न झालेले सुटे भाग आणि त्यातील दुरुस्तीचा समावेश गैरअर्जदार क्र. 1 च्या ईस्टीमेटमध्ये असल्याचे नमूद केले आहे. परंतू त्याबाबत स्पष्ट खुलासा केलेला नाही. कारण सुटे भाग जे क्षतिग्रस्त झालेले नाहीत, त्यांचाही गैरअर्जदार क्र. 1 ने समावेश केलेला आहे. तसेच त्यांनी प्रतिज्ञापत्रात असेही नमूद केले आहे की, बॉडी शेल दुरुस्ती करण्यायोग्य आहे. याउलट गैरअर्जदार क्र. 1 यांनी आपल्या उत्तरात नमूद केले आहे की, बॉडी शेल हे दुरुस्त करण्याचे स्थितीत नाही. सदर प्रकरणामध्ये वाहन दुरुस्त करण्याचा मुख्य अनुभव गैरअर्जदार क्र. 1 यांचे वर्कशॉपमधील कारागीरास आहे व त्यांना वाहन दुरुस्त करावयाचे आहे. जर बॉडी शेल दुरुस्त होऊ शकत नाही असे गैरअर्जदार क्र. 1 चे स्पष्ट मत असतांना ते दुरुस्त कसे काय होऊ शकते याबद्दलचे सविस्तर पत्र गैरअर्जदार क्र. 2 ने गैरअर्जदार क्र. 1 ला व तक्रारकर्त्याला द्यावयास पाहिजे होते. सदर बाब ही तांत्रिक असल्यामुळे त्या क्षेत्रातील गैरअर्जदार क्र. 1 चे कारागीर व गैरअर्जदार क्र. 2 चे तपासणीस दोन्ही तज्ञ आहेत व दोघांचे वेगवेगळी मते आहेत. अशा परिस्थितीत ज्यांना प्रत्यक्षात वाहन दुरुस्त करावयाचे आहे त्यांच्या मताला प्राधान्य देणे गरजेचे आहे असे मंचास वाटते व त्यामुळे गैरअर्जदार क्र. 1 चे सुपरवाईजर यांचे मताशी मंच सहमत असल्यामुळे गैरअर्जदार क्र. 2 ने बॉडी शेल दुरुस्त करण्याविषयी केलेला आग्रह अमान्य करण्यात येतो. 8. सदर प्रकरणामध्ये गैरअर्जदार क्र. 2 ने असेही नमूद केले आहे की, विमाधारकाला वारंवार सुचित करुनही त्यांनी अपघातग्रस्त वाहन दुरुस्त केले नाही व तसे निर्देश गैरअर्जदार क्र. 1 स्टार मोटर्स यांना दिलेले नाही. परंतू सदर वाद वाहन दुरुस्त करण्यावरुन व बॉडी शेल दुरुस्तीवरुन विवादित होते व वाहन वर्कशॉपमध्ये होते. गैरअर्जदार क्र. 1 नुसार बॉडी शेल दुरुस्त करणे अशक्य आहे व गैरअर्जदार क्र. 2 नुसार ते शक्य होते. या गैरअर्जदारांच्या विवादामुळे वाहन दुरुस्त होऊ शकले नाही असे स्पष्ट निदर्शनास येते व त्याकरीता तक्रारकर्त्यांना दोष देण्याचे काहीही कारण नाही 9. सदर प्रकरणामध्ये गैरअर्जदार क्र. 1 यांनी वाहनाचे दुरुस्तीचा अंदाजित खर्चाचे आकलन केलेले आहे व त्याचा खर्च रु.4,75,678/- एवढा दिलेला आहे. गैरअर्जदार क्र. 2 यांचे निरीक्षकाने वाहनाचे दुरुस्तीचे अंदाजित मुल्यांकन हे रु.1,47,701/- एवढे काढलेले आहे. दोन्ही पक्षांचे वेगवेगळे मुल्यांकनाचा विचार केला असता व त्यामधील तफावतीचा विचार केला असता नैसर्गिक न्याय तत्वाचे दृष्टीकोनातून मंचाचे असे मत आहे की, सदर विमा पॉलिसीमध्ये वाहनाचे विमा मुल्य रु.3,12,000/- एवढे दिलेले आहे व पॉलिसीचे अटी व शर्तीनुसार वाहन निर्मितीपासून जर वाहन हे एक वर्षापेक्षा जास्त कालावधीकरीता वापरले असेल तर 10 टक्के घसारा आकारण्याचे प्रावधान आहे. याचा विचार करता तक्रारकर्ता हा रु.3,12,000/- मधून 10 टक्के घसारा रु.31,200/- इतकी कपात केली असता (रु.3,12,000/- - रु.31,200/- = रु.2,80,800/-) रु.2,80,800/- विमा दाव्याबाबत मिळण्यास पात्र ठरतो असे मंचाचे मत आहे व गैरअर्जदाराने तसा विमा दावा मान्य करावा व त्याकरीता गैरअर्जदारांना आवश्यक असलेले सर्व दस्तऐवज तक्रारकर्त्याने द्यावे असे मंचाचे मत आहे. तक्रारकर्त्याने शारिरीक व मानसिक त्रासाकरीता रु.1,00,000/- ची मागणी केलेली आहे. सदर मागणी ही अवास्तव असल्यामुळे न्यायोचितदृष्टया तक्रारकर्ता हा रु.5,000/- मिळण्यास पात्र ठरतो. तसेच तक्रारीच्या खर्चाबाबत रु.2,000/- मिळण्यास पात्र ठरतो असे मंचाचे मत आहे. उपरोक्त निष्कर्षावरुन व दाखल दस्तऐवजांवरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदार क्र. 2 ला आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला पॉलिसीप्रमाणे वाहनाचे विमा मुल्य रु.3,12,000/- मधून 10 टक्के घसा-याची रक्कम वजा करुन (रु.3,12,000/- - रु.31,200/- = रु.2,80,800/-) उर्वरित रक्कम रु.2,80,800/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आत द्यावी अन्यथा गैरअर्जदार क्र. 2 हे सदर रकमेवर तक्रार दाखल दि.31.07.2010 पासून संपूर्ण प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याज देण्यास बाध्य राहतील. 3) शारिरीक व मानसिक त्रासाकरीता गैरअर्जदार क्र. 2 ने रु.5,000/- तक्रारकर्त्याला द्यावे. 4) गैरअर्जदार क्र. 2 ने तक्रारकर्त्याला तक्रारीच्या खर्चाबाबत रु.2,000/- द्यावे. 5) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार क्र. 2 ने आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |