(आदेश पारीत व्दारा - श्री नितीन मा. घरडे, मा.सदस्य)
(पारीत दिनांक : 04 ऑक्टोंबर 2016)
1. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केली असून तक्रार थोडक्यात अशाप्रकारे आहे की, तक्रारकर्ता याचे स्वतःच्या पालनपोषणाकरीता व उदरनिर्वाहाकरीता पिठाची चक्की चालवीतो. सदर पिठाची गिरणी मे.उस्मान फ्लोअर मिल ही दिवंगत श्री शेख उस्मान या नावाने असून गिरणी पूर्वी तक्रारकर्त्याचे आजोबा चालवायचे व तक्रारकर्त्याच्या वडीलाच्या मृत्युनंतर तक्रारकर्ता सदर पिठाची गिरणी चालवीतो. विरुध्दपक्ष क्र.1 व 2 ही विद्युत वितरण पुरविणारी विद्युत कंपनी असून तक्रारकर्त्याच्या पिठाच्या गिरणीला विद्युत पुरवठा मागील ब-याच वर्षापासून करीत आहे व त्याचा ग्राहक क्रमांक 410012787573 असून मिटर क्रमांक 055 एनपीएस 00002 श्री शेख उस्मान नावाने आहे. सदरच्या पिठाच्या गिरणीतून तक्रारकर्त्याचे कुंटूंब अवलंबून आहे. तक्रारकर्ता पुढे असे नमूद करतो की, तक्रारकर्त्याला वीज पुरवठा दिनांक 15.10.1987 पासून विरुध्दपक्ष कंपनी पुरवीत असून तक्रारकर्त्याचा वीज पुरवठा हा मासिक 300 ते 900 युनीटच्या दरम्यान आहे. परंतु, तक्रारकर्त्याला दिनांक 27.12.2011 चे एका महिण्याचे बिल रुपये 58,450/- एवढे आलेले असून त्याचा वापर युनीट 4092 एवढे दिलेले आहे. सदरचे तक्रारीचे बिल हे चुकीचे बिल पाठविलेले असून त्यामुळे तक्रारकर्त्याला अतिशय शारिरीक, मानसिक व आर्थिक ञास झाला. तसेच दिनांक 2.2.2012 रोजी तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष यांचे कार्यालयात जावून सदर चुकीचे बिलाबाबत माहिती दिली असता विरुध्दपक्ष वीज कंपनीकडून अशी धमकी देण्यात आली की, तुम्ही सदर बिलाचा भरणा केला नाही तर तुमचा विद्युत पुरवठा खंडीत केला जाईल. विद्युत कंपनीने त्याची कोणतीही बाजू ऐकूण घेतली नाही. सदर बाब ही विरुध्दपक्ष वीज कंपनीची सेवेत ञुटी असून अनुचित व्यापार प्रथेचा वापर करण्याची कृति स्पष्टपणे दिसून पडते, त्यामुळे तक्रारकर्त्याच्या कुटूंबाला अंतिशय ञास सहन करावा लागला. सरतेशेवटी तक्रारकर्त्याने सदरची तक्रार मंचात दाखल करुन खालील प्रमाणे मागणी मागितली आहे.
1) विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला काल्पनिक व अतिरिक्त तसेच चुकीचे देयक दिनांक 27.12.2011 चे वीज देयक रद्दबादल करण्याचे आदेश व्हावे.
2) तक्रारकर्त्याला व त्याच्या कुंटूंबाला झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक ञासाबाबत नुकसान भरपाई म्हणून रुपये 98,490/- देण्याचे आदेशीत व्हावेृ
3) तसेच, गैरअर्जदारास आदेशीत करावे की, रुपये 98,490/- वर 18 टक्के व्याजाने तक्रारकर्त्याला प्राप्त होईपर्यंत देण्यात यावे.
2. तक्रारकर्तीचे तक्रारीला अनुसरुन विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांना मंचाची नोटीस बजावण्यात आली. त्यावर विरुध्दपक्ष यांनी उपस्थित होऊन तक्रारकर्त्याच्या तक्रारीला निशाणी क्र.13 नुसार लेखीउत्तर दाखल करुन त्यात नमूद केले की, तक्रारकर्ता हा ग्राहक नाही. हे म्हणणे बरोबर आहे की, ग्राहक क्रमांक 410012787573 व मिटर क्रमांक 055 NPS 00002 हा तक्रारकर्त्याचे आजोबाचे नावे असून त्याचा मृत्यु झालेला आहे. तरी सुध्दा तक्रारकर्ता त्यांचे मृत्युपश्चात सदर मिटरचा वापर करीत आहे. तक्रारकता व त्याचे कुटूंब पिठाच्या गिरणीच्या व्यवसायावर अवलंबून आहे. तसेच, तक्रारकर्ताकडे वीज पुरवठा हा औद्योगिक वीज वापर या तत्वावर दिला आहे, त्यामुळे तक्रारकता हा व्यावसायीक असल्या कारणास्तव तक्रारकर्ता हा ग्राहक होऊ शकत नाही व सदरच्या मंचात ही तक्रार चालु शकत नाही. तसेच, मा. उच्च न्यायालय औरंगाबाद बेंच यांनी न्यायनिवाडा क्रमांक 244/2013 यात स्पष्टपणे नमूद केलेले आहे की, व्यावसायीक प्रकरणे ईलेक्ट्रीकसिटी कायदा 2003 प्रमाणे मंचात चालु शकत नाही. तसेच, तक्रारकर्त्याचे वीजचे मिटर तपासणी केले असता ते योग्यरित्या सुरक्षीत चालत आहे. त्याचप्रमाणे तक्रारकर्त्याने लावलेले दोषारोप प्रत्यारोप विरुध्दपक्षाने उत्तरात खोडून काढले. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ही विरुध्दपक्षाविरुध्द हेतुपुरस्पर दाखल केलेली असून तक्रारकर्त्याची तक्रार खारीज होण्यास पाञ आहे. तक्रारकर्त्यास कोणताच मानसिक, शारिरीक ञास झालेला नाही, त्यामुळे त्याची मागणी प्रमाणे कोणतेही शारिरीक व मानसिक ञासाबद्दल नुकसान भरपाई घेण्यास पाञ नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज होण्यास पाञ आहे.
3. तक्रारकर्त्याने सदरच्या तक्रारीबरोबर निशाणी क्रमांक 1 ते 3 प्रमाणे दस्ताऐवज दाखल करुन त्यात दिनांक 6.12.2011 चे वीज देयक, तसेच दिनांक 27.12.2011 ते 19.1.2012 चे वीज देयक दाखल केलेले आहेत. विरुध्दपक्ष यांनी दिनांक 7.3.2012 रोजीचे वीज मिटर तपासणीचा अहवाल दाखल केला आहे. त्याचे प्रमाणे विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्याच्या मिटरची CPL दाखल केली आहे.
4. तक्रारकर्त्याचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद मंचासमक्ष ऐकण्यात आला. विरुध्दपक्षाचे वकीलांचा मौखीक युक्तीवादाकरीता पुकारा करुनही वेळेत हजर झाले नाही व मौखीक युक्तीवाद केला नाही. तसेच दोन्ही पक्षाचे अभिलेखावर दाखल केलेल्या दस्ताऐवजाचे अवलोकन करण्यात आले. त्याप्रमाणे खालील प्रमाणे मुद्दे व निष्कर्ष देण्यात येते.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष वीज कंपनीचा ग्राहक : होय
होतो काय ?
2) विरुध्दपक्ष यांचेकडून तक्रारकर्त्या प्रती सेवेत ञुटी व : होय
अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला आहे काय ?
3) आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
// निष्कर्ष //
5. तक्रारकर्त्याची सदरची तक्रार ही विरुध्दपक्षाकडून दिनांक 27.12.2011 चे वीज देयक हे त्याच्या वीज वापरापेक्षा जास्त आल्यामुळे दाखल केली असून ते वीज देयक रद्दबादल करण्यासाठी सदरची तक्रार दाखल केलेली आहे. यामध्ये विरुध्दपक्ष वीज निर्मिती कंपनी यांनी प्राथमिक आक्षेपात असे नमूद केले की, तक्रारकर्ता हा त्यांचा ग्राहक नाही व तक्रारकर्ता याचे पिठ गिरणीचा व्यवसाय आहे त्यामुळे व्यावसायीक व्यक्ती ग्राहक संरक्षण कायद्याप्रमाणे विरुध्दपक्ष वीज कंपनीचा ग्राहक होत नाही. परंतु, तक्रारकर्ता हा सध्या त्याच्या पिढीजात असणारा व्यवसाय म्हणजे पिठाची गिरणी चालवीतो आणि सदरचे मिटर हे तक्रारकर्त्याच्या आजोबाचे नावानी असून उस्मान फ्लोअर मिल या नावाने वीजेचे मिटर आहे. पिठाच्या गिरणीवर तक्रारकर्त्याचे संपूर्ण कुटूंबाचे पालनपोषणाची जबाबदारी तक्रारकर्त्यावर आहे, त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष वीज वितरण कंपनीचा ग्राहक होतो. तसेच तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्ताऐवजाचे अवलोकन केले असता, तक्रारकर्त्याला दिनांक 27.12.2011 रोजीचे विद्युत देयक रुपये 58,450/- एवढे आलेले दिसून येते. सदर वीज देयकाचा सुक्ष्म अवलोकन केले असता एजर्जी चार्जेस रुपये 25,265.24 पैसे, टीडीओ ट्राफीक ईसी रुपये 1,389.90, एफएसी रुपये 2,299.70, ईलेक्ट्रीक ड्युटी रुपये 3,210.59, इतर चार्जेस रुपये 818.40, टॅक्स ऑन सेल रुपये 327.36, पी.एफ.पिनल चार्जेस रुपये 15,395.96, चार्जेस ऍक्सेस लोड डिमांड रुपये 3,600/- आणि ऐरीयर्स पेबल रुपये 2,747.92 असे दिसून येते. तसेच तक्रारकर्त्याने दाखल दिनांक 6.12.2011 चे विद्युत देयक याचे अवलोकन केले असता उपरोक्त संपूर्ण हेड मधल्या रकमा व दिनांक 27.12.2011 चे देयकामधील रकमा यामध्ये अतिशय तफावत दर्शविते. तसेच विरुध्दपक्ष यांनी दोन्ही बिलांमध्ये येणा-या तफावतीचे कोणतेही स्पष्टीकरण मंचासमक्ष दाखल केले नाही. तसेच सदरचे अतिरिक्त रकमा कोणत्या आधारावरती बिलामध्ये नमूद केल्या याबाबतचे स्पष्टीकरण दिलेले नाही. तसेच, विरुध्दपक्ष यांनी दाखल केलेल्या CPL चे अवलोकन केले असता, तक्रारकर्त्यावर दिनांक 27.12.2011 पूर्वीच्या विद्युत देयकामध्ये त्याच्यावर बाकी असलेले कोणत्याच रकमा दिसून येत नाही. तसेच तक्रारकर्ता हा नियमितपणे विद्युत देयके भरीत आहे असे दिसून येते, त्यामुळे तक्रारकर्त्याला एकदम रुपये 58,450/- चे विद्युत देयक कोणत्या आधारावर देण्यात आले हे स्पष्ट होत नाही. तसेच, विरुध्दपक्ष यांनी दाखल केलेले दस्ताऐवज ज्यामध्ये तक्रारकर्त्याचे विद्युत मिटरची तपासणी अहवाल दाखल केला त्याचे सुक्ष्म अवलोकन केले असता, त्यावर एक शेरा असा दिसून येतो की, ‘’बटन पुस करनेके बाद पल्स अपने आप फास्ट होते है.’’ यावरुन मंचाला असे वाटते की, मिटरमध्ये कोणत्याही प्रकारचा तांञिक बिघाड असल्यामुळे तक्रारकर्त्याला दिनांक 27.12.2011 चे विद्युत देयक अतिरिक्त आले आहे, त्यामुळे विरुध्दपक्ष वीज वितरण कंपनीला आदेशीत करण्यात येते की, तक्रारकर्त्याचा दिनांक 27.12.2011 चे विद्युत देयक रद्दबादल करुन योग्य वाचन करुन विद्युत देयक देण्यात यावे. सदरच्या विद्युद देयकानंतर तक्रारकर्त्याला कोणत्याही प्रकारचे थकबाकी, दंड लावू नये व योग्य वाचन करुन योग्य विद्युत बिल देण्यात यावे. सबब, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्ष वीज वितरण कंपनीला आदेशीत करण्यात येते की, दिनांक 27.12.2011 चे वीज देयक रद्दबादल करण्यात यावे व योग्य वाचन करुन योग्य बिल देण्यात यावे.
(3) तसेच, विरुध्दपक्ष वीज वितरण कंपनी यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक ञासापोटी रुपये 10,000/- व तक्रार खर्च म्हणून रुपये 7,000/- द्यावे.
(4) तसेच, विरुध्दपक्ष वीज वितरण कंपनी यांनी नुकसान भरपाई पोटी दिलेली रक्कम त्याचे समोरील विद्युत देयकामध्ये समायोजीत करुन वजा करावी.
(5) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 04/10/2016