(मंचाचा निर्णय: श्री. मिलींद केदार - सदस्य यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 13/04/2011) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द मंचात दिनांक 09.12.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. तक्रारकर्तीने गैरअर्जदारांकडून शेवाळकर गार्डन खसरा नं.38, मौजा परसोडी, ता.जिल्हा नागपूर येथील गाळा क्र.38, एकूण क्षेत्रफळ 16.334 चौ.मीटर दि.21.10.2008 रोजीचे विक्रीपत्राव्दारे खरेदी केला व त्याचा मोबदला म्हणून रु.4,00,000/- गैरअर्जदारास दिले. गैरअर्जदाराने तक्रारकर्तीकडून वॅट व सेवाकर यासाठी रु.30,000/- धनादेशाव्दारे घेतले, तक्रारकर्तीनुसार अशी कुठलीही अट त्यांच्यामधे झालेली नव्हती. तसेच केंद्रीय उत्पादन शुल्क, सिमा शुल्क व सेवा कर आयुक्त कार्यालय यांचेकडून तक्रारकर्तीस लक्षात आले की, गैरअर्जदाराने वॅट व सेवाकर संबंधीत कार्यालयात जमा केले नाही, ही तक्रारकर्तीची गैरअर्जदाराने केलेली फसवणूक आहे. त्याकरीता तक्रारकर्तीने गैरअर्जदाराला नोटीस बजावली, नोटीस प्राप्त होऊन सुध्दा त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. म्हणून तक्रारकर्तीने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे. 3. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदाराला बजावण्यांत आली असता त्यांना नोटीस मिळूनही ते मंचासमक्ष हजर न झाल्यामुळे त्यांचे विरुध्द मंचाने दि.24.02.2011 रोजी एकतर्फी आदेश पारित केलेला आहे. 4. सदर प्रकरण मंचासमक्ष दि.22.03.2011 रोजी मौखिक युक्तिवादाकरीता आले असता मंचाने तक्रारकर्तीच्या वकीलांचा युक्तिवाद ऐकूण घेतला. तसेच मंचासमक्ष दाखल दस्तावेज व तक्रारकर्तीचे कथन यांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 5. तक्रारकर्तीने गैरअर्जदारांकडून खसरा नं.38, मौजा परसोडी, गोपालनगर, वार्ड नं.74, सिटी सर्वे नं.19, शिट नं.6/16 आणि सिटी सर्व्हे नं.19 चे 4 भागात विभागणी केल्यानंतर त्यावर बांधलेल्या शेवाळकर गार्डन या रहीवासी व व्यापारी इमारतीतील गाळा क्र.38, एकूण क्षेत्रफळ 16.334 चौ.मीटर खरेदी केले होते, ही बाब तक्रारकर्तीने तक्रारीसोबत दाखल केलेल्या दस्तावेज क्र.1 वरुन स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारकर्ती ही गैरअर्जदाराची ‘ग्राहक’ ठरते असे मंचाचे मत आहे. 6. गैरअर्जदाराने तक्रारकर्तीकडून रु.30,000/- वॅट व सेवाकराचे स्वरुपात घेतले होते ही बाब तक्रारकर्तीने दाखल केलेल्या दस्तावेज क्र.2 वरुन स्पष्ट होते. तक्रारकर्तीनुसार सदर वॅट व सेवाकर तिला देणे लागत नाही या तक्रारकर्तीच्या कथनाला गैरअर्जदारांनी नोटीस मिळून सुध्दा कुठलाही विरोध किंवा स्पष्टीकरण दिले नाही. तसेच तक्रारकर्तीने सदर रक्कम ही गैरअर्जदारांनी स्वतःजवळच ठेऊन घेतली व योग्य त्या कार्यालयात जमा न केल्याचे म्हटले आहे. सदर बाबीवर सुध्दा गैरअर्जदाराने आपले कोणतेही मत प्रदर्शित केले नाही व मंचाचा नोटीस मिळूनही मंचात हजर झाले नाही. तक्रारकर्तीने दाखल केलेल्या दस्तावेज क्र.6 वरुन गैरअर्जदाराने तिचेकडून घेतलेली वॅट व सेवाकराची रक्कम जमा केली नसल्याचे स्पष्ट होते. मंचाने यापूर्वी सुध्दा वॅट व सेवाकर हा घरबांधणीचे व्यावसायीकांनी वसुल करणे चुकीचे असल्याचे आपल्या अनेक निकालपत्रात नमुद केले आहे. 7. वरील निष्कर्षांच्या आधारे मंचाचे असे मत आहे की, गैरअर्जदाराने तक्रारकर्तीकडून स्विकारलेली रक्कम रु.30,000/- परत करावी. सदर रक्कम आदेशाची प्रत मिळाल्या पासुन 30 दिवसांचे आंत न दिल्यास त्यावर द.सा.द.शे.12% दराने रक्कम अदा होईपर्यंत व्याज देय राहील. तसेच तक्रारकर्ती शारीरिक, मानसिक त्रासाकरीता रु.3,000/- व तक्रारीच्या खर्चाकरीता रु.1,000/- मिळण्यांस पात्र आहे असे मंचाचे मत आहे. 8. प्रस्तुत प्रकरणात दाखल दस्तावेजांचे तसेच युक्तिवादाचे अवलोकन केले असता आम्ही वरील निष्कर्षांच्या आधारे खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. गैरअर्जदाराला आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्तीकडून स्विकारलेली रक्कम रु.30,000/- परत करावी. जर सदर रक्कम आदेशाची प्रत मिळाल्या पासुन 30 दिवसांचे आंत न दिल्यास त्यावर द.सा.द.शे.12% दराने रक्कम अदा होईपर्यंत व्याज देय राहील 3. गैरअर्जदाराला आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला शारीरिक, मानसिक त्रासाकरीता रु.3,000/- व तक्रारीच्या खर्चाकरीता रु.1,000/- अदा करावे. 4. वरील आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदाराने आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |