(मंचाचे निर्णयान्वये, श्रीमती रोझा फुलचंद्र खोब्रागडे, सदस्या)
(पारीत दिनांक : 27 फेब्रूवारी 2015)
तक्रारकर्त्याने सदर तक्रार, मोबाईल गॅरंटी अवधीमध्ये दुरुस्त करुन न दिल्याबाबत दाखल केली. तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. तक्रारकर्त्याने कुरखेडा येथील शारदा इलेक्ट्रॉनिक्स मधून दि.11.1.2014 ला कार्बन कंपनीचा (K4) मोबाईल रुपये 1700/- मध्ये खरेदी केला. तो मोबाईल 6 महिने वापरल्यानंतर मोबाईलच्या डिस्प्लेमध्ये बिघाड आला. सदर मोबाईल 26 जुलै 2014 ला गैरअर्जदाराचे दुकानामध्ये दुरुस्तीला देण्यात आला, वारंवार दुकानात जाऊनही मोबाईल दुरुस्ती करण्यात आला नाही. त्यामुळे, तक्रारकर्त्याला मोबाईलकरीता वारंवार स्वतःच्या गावावरुन येणे-जाणे करावे लागले. त्यामुळे, तक्रारकर्त्याने मोबाईलची किंमत रुपये 1700/-, फिल्ड वर्कमुळे झालेले नुकसान रुपये 6000/-, येण्या-जाण्याचा खर्च रुपये 2000/-, मानसिक व शारिरीक खर्च रुपये 4000/- व तक्रारीचा खर्च रुपये 2000/- मिळावे अशी प्रार्थना केली.
2. अर्जदाराने नि.क्र.2 नुसार 3 दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदाराने नि.क्र.6 नुसार लेखी उत्तर दाखल केले.
3. गैरअर्जदाराने नि.क्र.6 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरात नमूद केले की, गैरअर्जदाराचा मोबाईल विक्रीचे दुकान आहे व तो मोबाईल विक्रीचा व्यवसाय करतो. गैरअर्जदार मोबाईल रिपेरिंगचा व्यवसाय करीत नाही. अर्जदाराचा मोबाईल दुरुस्त करुन देणे ही कंपनीची जबाबदारी आहे. गैरअर्जदार हा आपल्या दुकानामध्ये मोबाईल दुरुस्तीकरीता कधीच आलेला नाही. अर्जदाराने गैरअर्जदारास नाहक ञास देण्याकरीता खोटा आरोप लावलेला आहे.
4. अर्जदाराने नि.क्र.7 नुसार शपथपञ दाखल केले. गैरअर्जदाराने शपथपञ दाखल केले नाही, त्यामुळे नि.क्र.1 वर दि.29.1.2015 ला गैरअर्जदाराचे शपथपञाशिवाय प्रकरण पुढे चालविण्यात यावे असा आदेश पारीत करण्यात आला. तसेच, गैरअर्जदारास लेखी युक्तीवाद दाखल करण्याची संधी मिळूनही दाखल केले नाही, त्यामुळे नि.क्र.1 वर दि.25.2.2015 ला गैरअर्जदाराचे लेखी युक्तीवादाशिवाय प्रकरण पुढे चालविण्यात यावे असा आदेश पारीत करण्यात आला. अर्जदाराने नि.क्र.10 वर लेखी युक्तीवाद दाखल केले आहे. गैरअर्जदार यांनी दाखल केलेले लेखी बयाण व अर्जदाराने दाखल केलेले दस्ताऐवज, शपथपञ, लेखी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? : होय.
2) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रती न्युनतम् सेवा दिली : होय.
आहे काय ?
3) अर्जदाराचा दावा मंजूर होण्यास पाञ आहे काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
- कारण मिमांसा –
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
5. अर्जदाराने त्याचे तक्रारीत असे कथन केले की, अर्जदार यांनी शारदा ईलेक्ट्रॉनिक्स, कुरखेडा मधून दि.11.1.2014 रोजी कार्बन कंपनीचा (K4) मोबाईल रुपये 1700/- मध्ये विकत घेतला, ही बाब अर्जदार व गैरअर्जदार दोघानांही मान्य असून अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे, असे सिध्द होते. म्हणून मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 2 बाबत :-
6. अर्जदाराने दि.11.1.2014 रोजी गैरअर्जदाराकडून मोबाईल विकत घेतला व अर्जदाराला 1 वर्षाची वॉरंटी दिली, ही बाब दोन्ही पक्षांना मान्य आहे. गैरअर्जदाराने सदर प्रकरणात शपथपञ, तसेच लेखी युक्तीवाद दाखल केलेले नाही. याउलट, अर्जदाराने तक्रारीत उल्लेख केलेला तथ्य त्यांचे साक्षी शपथपञाव्दारे सिध्द केलेले आहे. यावरुन असे सिेध्द झाले आहे की, गैरअर्जदाराने अर्जदाराचा मोबाईल दुरुस्ती करुन दिला नाही म्हणून गैरअर्जदाराने अर्जदाराप्रती न्युनतम् सेवा दर्शविली आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 3 बाबत :-
7. मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनानुसार मंचाचे असे मत ठरले आहे की, अर्जदार खालील आदेशाप्रमाणे अर्जामध्ये केलेल्या मागणीस पाञ आहे.
- अंतिम आदेश -
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
(2) गैरअर्जदाराने अर्जदाराकडून घेतलेली मोबाईलची रक्कम रुपये 1700/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांचे आत देण्यात यावे.
(3) गैरअर्जदाराने अर्जदारास झालेल्या मानसिक व शारिरीक ञासापोटी रुपये 500/- व तक्रारीचा खर्च रुपये 500/- आदेशाची प्रत मिळाल्यापासू 45 दिवसांचे आत देण्यात यावे.
(4) दोन्ही पक्षाना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 27/2/2015