तक्रारदार - स्वत:
जाबदार क्र. 1 - नो से
जाबदार क्र. 2 तर्फे - अॅड.श्री. गोखले
// निकाल //
पारीत दिनांकः- 18/04/2013
(द्वारा- श्रीमती. अंजली देशमुख, अध्यक्ष)
1. सदरचा तक्रार अर्ज तक्रारदारांनी पुणे जिल्हा ग्राहक मंच येथे दाखल केला होता तेव्हा त्यास पीडीएफ/2005/75 असा नोंदणीकृत क्रमांक देण्यात आला होता. मा.राज्य आयोग, मुंबई यांचे आदेशान्वये सदरचे प्रकरण अतिरिक्त पुणे जिल्हा मंच येथे वर्ग केल्यानंतर सदरचा तक्रार अर्ज एपीडीएफ/2008/90 असा नोंदविण्यात आला आहे.
2. तक्रारदारांनी जाबदार क्र. 2 यांच्या कंपनीच्या टाईल्स त्यांच्या घरासाठी व बाथरुम फिटींग्जचे कामासाठी दि.10/5/2004 रोजी खरेदी केल्या. 24” x 24” Atlanta (M) J/N या मालाच्या 68 बॅग्ज प्रत्येकी 1225/- प्रमाणे रक्कम रु.83,300/- रुपयाच्या टाईल्स खरेदी केल्या. या टाईल्स खरेदी करताना तक्रारदारांनी जाबदारांना एकच रंग शेड असलेला, एकाच बॅचचे, एकाचवेळी तयार केलेला माल पाहिेजे असे स्पष्टपणे सांगितले होते. परंतु टाईल्स (फिटींग) बसविल्यानंतर तक्रारदाराच्या असे लक्षात आले की, टाईल्समध्ये ब-याच प्रकारचे शेडस, टाईल्समध्ये वेगवेगळेपणा (रंग) दिसत आहेत, एकाच रंगाच्या सर्व टाईल्स नाहीत. त्यामुळे त्यांच्या घरातील फलोअरींगची रंगसंगती बदलून गेली यासाठी तक्रारदारांनी जाबदार साठे ब्रदर्स यांना याबद्दलची कल्पना दिली. त्यांनी जाबदार क्र. 2 यांना ही तक्रार कळविण्याबद्दल सांगितले. परंतु दोन्ही जाबदारांनी त्यांची या तक्रारीची दखल घेतली नाही म्हणून तक्रारदारांनी जाबदार क्र. 1 व 2 यांना दि.8/7/2004 रोजी, त्यानंतर दि.28/8/2004 रोजी पत्र दिले. दोन्ही पत्राची उत्तरेही जाबदारांनी दिली नाहीत आणि शंकानिरसन केले नाही म्हणून तक्रारदारांनी दि.11/10/2004 रोजी वकीलांकडून नोटीस दिली. नोटीसीस उत्तरही दिले नाही म्हणून सदरील तक्रार.
तक्रारदार जाबदार क्र. 1 व 2 यांचेकडून त्यांच्या स्वत:च्या खर्चाने तक्रारदारास दिलेल्या टाईल्स व त्याअनुषंगाने होणा-या खर्चासहित टाईल्स बदलून दयाव्यात किंवा टाईल्सचे पैसे परत करावेत, मजूरी व इतर केलेल्या खर्चासहित. टाईल्स खरेदीपोटी रक्कम रु.83,300/-, टाईल्स फिटींग कामगार पगार, वाळू, सिमेंट तसेच मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.5,000/-, दाव्याचा खर्च रु.5,000/- अशी एकूण रक्कम रु. 1,18,300/- मागतात.
तक्रारदारांनी शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली आहेत.
3. जाबदार क्र. 1 यांचे प्रतिनिधी दि.20/9/2011 रोजी हजर राहिले परंतु त्यांनी त्यांचा लेखी जबाब दाखल केला नाही. म्हणून मंचाने दि.28/11/2011 जाबदार क्र. 1 विरुध्द “नो से” आदेश पारीत केला.
4. जाबदार क्र. 2 यांनी त्यांचा लेखी जबाब दाखल करुन तक्रारदाराच्या मागणीस विरोध दर्शविला. त्यांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदारांनी त्यांच्या घरात टाईल्स बसविल्या आहेत याबद्दलचा पुरावा दाखल केला नाही. तक्रारदार हे बिजनेसमॅन दिसतात त्यामुळे तक्रारदारांनी जाबदारांकडून जी खरेदी केली आहे ती व्यावसायिक कारणासाठी घेतली आहे म्हणून तक्रारदार हे ग्राहक होऊ शकत नाहीत म्हणून तक्रार नामंजूर करावी. पूर्वी जाबदार क्र. 2 यांचे नाव एच् अॅण्ड आर जॉन्सन इंडिया लिमीटेड होते ते आता प्रिझम सिमेंट लिमीटेड यांच्यामध्ये सर्व जबाबदारी सहीत विलीन झाले. सन 2004 मध्ये जाबदार क्र. 1 साठे ब्रदर्स हे त्यांचे डिलर होते परंतु ते आता नाहीत. दि.16/4/2004 रोजी जाबदार क्र. 1 यांनी Atlanta Tiles च्या 71 बॉक्सेसच्या एकाच बॅचची विक्री केली. जाबदार क्र. 1 यांनी तक्रारदारास कुठल्या टाईल्सची विक्री केली हे जाबदार क्र. 2 यांना माहित नाही. परंतु तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, Atlanta Tiles या एकाच बॅचची खरेदी केली होती हे कळते. जाबदार पुढे असे म्हणतात की, सिरॅमिक टाईल्समध्ये फार प्रमाणात शेड व्हेरीएशन येते हे त्यांना मान्य आहे. शेड व्हेरीएशन हा उत्पादकीय दोष नाही, खबरदारी म्हणून जाबदारांनी प्रत्येक कार्टनवर टाईल कशी फिक्स करावी याबद्दलची माहिती दिलेली आहे. जाबदार हे प्रत्येक ग्राहकाला त्यांच्या टाईल्सच्या कलर / शेडमध्ये व्हेरीएशन येण्याबाबत सांगत असतात. प्रत्येक टाईल्सच्या मागे एक बाणाची खूण आहे त्यानुसार त्या टाईल्स जमिनीवर बसवावयाच्या असतात. त्या टाईल्स तशा बसविल्या गेल्या नाहीत, जर बसविण्याची पध्दत चुकली तर (Allignment overlapping) शेडच्या एकसारखेपणाचा परिणाम मिळत नाही. टाईल्स कार्टनवर काही सुचना दिलेल्या आहेत. तक्रारदारांना जर टाईल्स शेड व्हेरीएशन दिसून आल्या होत्या तर त्यांनी बसविण्यापूर्वीच जाबदार क्र. 1 व 2 यांना सांगावयास हवे होते. टाईल्सच्या कार्टनवरील इन्सट्रक्शन्सप्रमाणे जर खबरदारी घेतली गेली नाही तर त्याची जबाबदारी जाबदार क्र. 1 व 2 यांचेवर नसते. टाईल्स बसविण्यापूर्वी टाईल्सचा ड्राय रन घेणे आवश्यक आहे त्यामुळे तक्रारदार तसेच त्यांचे लेबर कॉन्ट्रॅक्टर यांचा टाईल्स बसविण्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये निष्काळजीपणा आहे असे दिसून येते. संपूर्ण टाईल्स बसविल्यानंतर त्या खराब निघाल्या तर त्याची जबाबदारी घेण्यास ते बांधील नाहीत अशाप्रकारचे डिक्लेरेशन टाईल्स कार्टनवर किंवा ब्रोशरवर लिटरेचरवर दिलेले असते. टाईल्स ब्रोशरमध्ये असे डिक्लेर केले आहे की, सिरॅमिक टाईल्स / व्हीट्रीफाईड टाईल्सच्या शेडमध्ये व्हेरीएशन येणे हा उत्पादनातील मूलभूत भाग आहे (shade variation is inherent in manufacturer of ceramic tiles). उत्पादनामध्ये ज्या प्रकारच्या शेडस असतात त्यास उत्पादकीय दोष म्हणता येणार नाही. वरील कारणांवरुन तक्रारदारांची तक्रार नामंजूर करावी अशी विनंती केली.
जाबदारांनी शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली आहेत.
5. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी दि.17/5/2004 रोजी जाबदारांकडून Atlanta (M) – J/N Tiles रक्कम रु.83,300/-च्या टाईल्स खरेदी केल्याचे या पावतीवरुन दिसून येते. ही टाईल्स साठे ब्रदर्स यांचेकडून खरेदी केली होती. टाईल्स बसविल्यानंतर त्यांना टाईल्सच्या शेडमध्ये व्हेरीएशन दिसून आल्या. म्हणून त्यांनी अनेकवेळा जाबदारांना सांगितले. त्यानंतर तक्रारदारांनी जाबदार क्र. 2 यांना दि.8/7/2004 रोजी, दि.28/8/2004 रोजी, पत्र पाठविली. तसेच दि.11/10/2004 रोजी वकीलांमार्फत पाठविलेली नोटीस असा पत्रव्यवहार केलेला दिसून येतो. याबाबत जाबदारांचे असे म्हणणे आहे की, एकदा टाईल्स बसविल्यानंतर त्यामध्ये कुठलाही दोष निर्माण झाला तर त्याची जबाबदारी जाबदारांवर नसते तसे त्यांच्या कार्टनवर, ब्रोशरवर, लिटरेचरमध्ये नमुद केले आहे. जाबदारांनी हे ब्रोशर, लिटरेचर, कार्टन तक्रारदारांना दिले होते त्याबद्दलचा कुठलाही पुरावा त्यांनी मंचात दाखल केला नाही. तक्रारदारांनी Atlanta Tiles खरेदी केल्या होत्या त्याबद्दलचे कुठलेही ब्रोशर किंवा माहितीपुस्तिका दाखल केली नाही तर Rak Ceramics, Asian Tiles world इ. कंपनीची माहितीपुस्तिका दाखल केली आहे. परंतु Atlanta (M) – J/N Tiles H & R Johnson (India) Ltd. या कंपनीची माहितीपुस्तिका दाखल केली नाही. टाईल्समध्ये मूलत: उत्पादनातच व्हेरीएशन येतात म्हणून शेडमध्ये व्हेरीएशन येणे हे स्वाभाविक आहे हे जाबदारांचे म्हणणे मंचास पटत नाही कारण ज्या टाईल्स खरेदी केल्या जातात त्याची किंमत पाहता तक्रारदारानी ज्या टाईल्स पसंत केल्या होत्या त्याच शेडसच्या टाईल्स पुरविणे हे जाबदारांचे कर्तव्य होते, ज्याचे ते उत्पादक आहेत अशी ते जाहिरात करतात आणि आता जाबदारांचे टाईल्समध्ये शेडमध्ये व्हेरीएशन येणे हे मंचास पटत नाही. तक्रारदारांनी मैत्रानी राजन दिनानाथ या सिव्हील इंजिनिअर आणि कॉन्ट्रॅक्टरचा अहवाल दाखल केला आहे. दि.5/5/2012 रोजी त्यांनी अहवालामध्ये टाईल्स बाबतची माहिती दिलेली आहे. टाईल्स योग्यप्रकारे बसविलेल्या आहेत, (Tiles fitted according to normal practice in proper way. There are visible difference colors shades in the floor tiles which are much more than common practice, All floor tiles are fitted at one time) त्या शेडमध्ये फरक दिसून येतो, नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात हे कलर व्हेरीएशन दिसून येतात, या सर्व टाईल्स एकाचवेळी बसविल्याचे दिसून येतात असे त्यात नमुद केलेले आहे. तक्रारदारांनी फोटोग्राफस इ. दाखल केलेले आहेत. फोटोग्राफसमध्ये कलर व्हेरीएशन दिसून येतात. फोटोग्राफसवर आधारित न राहता मंच तज्ञाचा अहवाल पुरावा म्हणून ग्राहय धरत आहे. जाबदार क्र.1 व 2 यापैकी जाबदार क्र. 2 हे टाईल्स मॅन्यूफॅक्चरींग उत्पादकीय कंपनी आहे, त्यांनी त्यांच्या जबाबात टाईल्समध्ये कुठलेही व्हेरीएशन आले किंवा नाही याबद्दलचा योग्य खुलासा दिला नाही, तज्ञ असूनही तज्ञाचे शपथपत्र किंवा अहवाल दिलेला नाही. तक्रारदारांनी एकाच बॅचच्या एकाच शेडच्या टाईल्स घेऊनही त्यांना त्या बॉक्समध्ये वेगवेगळया शेडसच्या टाईल्स मिळाल्या आणि त्या त्यांना बसवाव्या लागल्या, ही जाबदारांची सेवेतील त्रुटी ठरते. जाबदारांचे असे म्हणणे आहे की, टाईल्स बसविण्यापूर्वी त्यात व्हेरीएशन आल्यानंतर ते जाबदारांना सांगणे गरजेचे होते. परंतु ज्या टाईल्स तक्रारदारांनी खरेदी केल्या होत्या, सुटया टाईल्समध्ये कलर व्हेरीएशन दिसत नसावेत फलोअरींग झाल्यानंतर दिसत असावेत. एकसारखेपणाचा परिणाम दिसण्यासाठी या टाईल्स निवडल्या होत्या त्याचा योग्य परिणाम न मिळाल्यामुळे तक्रारदारास साहजिकच त्रास सहन करावा लागला असेल म्हणून तक्रारदार नुकसानभरपाईसाठी पात्र ठरतात.
जाबदार क्र. 1 व 2 यांचेकडून तक्रारदारांनी या टाईल्स सन 2004 मध्ये रक्कम रु. 83,300/- च्या खरेदी केल्या होत्या. त्या सन 2012 पर्यंत घरामध्ये आहेत हे तज्ञाच्या अहवालावरुन दिसून येते त्यामुळे फक्त पाहिजे तो परिणाम तक्रारदारांना मिळाला नाही, त्या अजूनही फुटलेल्या किंवा तुटलेल्या दिसून आल्या नाहीत, फक्त तक्रारदारास ज्याप्रकारच्या टाईल्स पाहिजे होत्या त्या त्यांना मिळाल्या नाहीत, त्यामुळे टाईल्सच्या किंमतीबाबतची तक्रारदाराची मागणी मंच नामंजूर करते. तथापि जरी तक्रारदारांनी मानसिक त्रासासाठी नुकसानभरपाईची रक्कम रु.5,000/- मागितली असली तरी तक्रारदारांचे झालेले नुकसान विचारात घेता, मंच नुकसानभरपाईसाठी रक्कम रु.50,000/- तसेच तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी खर्चाची रक्कम रु..5,000/- दोन्ही जाबदारांनी तक्रारदारास दयावेत असा आदेश करत आहे.
वरील सर्व विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
// आदेश //
1. तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. जाबदेणार क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीक
व संयुक्तीकरित्या तक्रारदारांना रक्कम रु. 50,000/-
(रु.पन्नास हजार मात्र) नुकसान भरपाई तसेच रक्कम
रु. 5,000/- (रु. पाच हजार मात्र) तक्रारीचा खर्च
म्हणून या आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहा
आठवडयांच्या आंत द्यावी
4. निकालाच्या प्रती उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात
याव्यात.