श्री. हेमंतकुमार पटेरीया, सदस्य यांचे आदेशांन्वये.
- आ दे श -
(पारित दिनांक - 14 फेब्रुवारी, 2017)
तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचे संक्षिप्त विवरण येणेप्रमाणे.
1. तक्रारकर्ता हा मंचाचे कार्यक्षेत्रात राहत असून वि.प. साखरकर इलेक्ट्रीक्स अँड मशिनरी मंचाचे कार्यक्षेत्रात व्यवसाय करतो. तक्रारकर्त्याचे स्वतःच्या अंगणात मुबलक पाणी उपलब्ध व्हावे म्हणून दि.02.04.2013 रोजी वि.प.कडून रु.49,080/- चे सामान खरेदी करुन बोअरवेल तयार करुन घेतले. तक्रारकर्त्याचे म्हणण्यानुसार सदर बोअरवेलमधुन मुबलक पाणी मिळत नसल्याने व बोअरवेल मशिनमध्ये बिघाड निर्माण झाल्याने तक्रारकर्त्यास अपेक्षित पाणी पुरवठा होऊ शकत नव्हता. याबाबत वि.प.कडे तक्रारकर्त्याने तक्रार केल्यावर त्यांनी बोअरवेलच्या दुरुस्तीकरीता रु.5,000/- तक्रारकर्त्याकडून घेतले परंतू बोअरवेल मात्र व्यवस्थित दुरुस्त करुन न दिल्याने तक्रारकर्त्याच्या पाण्याच्या समस्येचे निराकरण झाले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्यास एकूण रु.54,080/- चे व मजुरी रु.6,000/- चे नुकसान सहन करावे लागले.
वि.प.ने बोअरवेल व्यवस्थित दुरुस्त करुन दिली नाही व पाण्याच्या समस्येचे निराकरण न झाल्याने तक्रारकर्त्याने दि.11.08.2014 रोजी वि.प.ला कायदेशीर नोटीस पाठविली व मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासाच्या नुकसान भरपाईची मागणी केली. परंतू वि.प.ने सदर कायदेशीर नोटीसला प्रतिसाद दिला नाही व तक्रारकर्त्याला नुकसानी भरपाईची रक्कम दिली नाही, म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन खालीलप्रमाणे मागणी केली आहे.
- बोअरवेल तयार करण्याकरीता व दुरुस्तीकरीता एकूण खर्च रु.54,080/- व मजुरीचा खर्च रु.6,000/-.
- मानसिक त्रासाबाबत रु.10,000/- व शारिरीक त्रासाबाबत रु.10,000/-.
अशी एकूण नुकसान भरपाई रु.80,080/- 10 टक्के व्याजासह मिळावी.
तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीसोबत एलन इंडस्ट्रीज चाचणी कार्ड, वि.प.ची कॅश पावती, पी.एस.जी.पम्पस् एवं मोटर्सची पावती, कायदेशीर नोटीस, पावती व पोचपावती अशा दस्तऐवजांच्या प्रती दाखल केलेल्या आहेत.
2. वि.प. यांनी लेखी उत्तरात तक्रारकर्त्याचे अंगणात तयार केलेली बोअरवेल वि.प.ने खोदलेली नसून सदर बोअरवेल खोदण्याचे काम हे श्री. सुरेश यांनी केलेले असल्याचे म्हटले आहे. सदर बोअरवेलवर वि.प.कडून दि.02.04.2013 रोजी सबमर्सिबल पंप घेऊन लावण्यात आला. सदर पंपासोबत पंप वापरण्याची संपूर्ण माहिती पुस्तकासह उपलब्ध होती. तसेच सदर बोअरवेल ही जेथे खोदण्यात आली तेथील जमिन ढिसाळ असल्याने उन्हाळयात व्यवस्थित पाणी येत होते परंतू जमिन भिसाची असल्याने पावसात बोअरवेल बुजली. त्यामुळे तक्रारकर्त्याच्या बोअरवेलमधील पंप हा उन्हाळयात व्यवस्थित चालला व पावसाळयात बोअरवेल बुजल्याने बोअरवेलमध्ये तो फसला होता. तो सबमर्सिबल पंप तक्रारकर्त्याने श्री. शंकर भूरे यांना रु.5,000/- देऊन बाहेर काढला.
पाण्याची टंचाई लक्षात घेता तक्रारकर्त्यांच्या विनंतीवरुन सबमर्सिबल पंपाऐवजी रु.13,150/- किंमतीचे 1 HP चे जेट पंप लावण्यात आले. परंतु बोअरवेलमध्ये भीस असल्याने त्यालाही पाणी कमी येत होते, म्हणून तक्रारकर्त्याने यानंतर ½ HP चे टिल्लु पंप रु.3,735/- किंमतीचे लावले. वि.प.ने तक्रारकर्त्याकडून अर्ध्या किंमतीमध्ये सबमर्सिबल पंप व पुढे रु.13,150/- किंमतीचा 1 HP चा जेट पंप परत घेतला. वि.प.ने सदर उपकरणे बसविण्याकरीता वारंवार भेटी देऊन व त्यांचेकडील कामागारांकडून सदर काम करुन घेतले आहे व त्याबाबत कुठलेही शुल्क आकारलेले नाही. जमिनीतील दोषामुळे बोअरवेल बुजल्याने जर तक्रारकर्त्यास पूरेसे पाणी मिळत नसेल तर सदरच्या नैसर्गिक बाबीस (अॅक्ट ऑफ गॉड) वि.प. जबाबदार नाही, म्हणून सदरची तक्रार ही खोटी असल्याने खर्चासह खारिज करण्याची वि.प.ने विनंती केली आहे.
3. तक्रारकर्त्याची तक्रार, वि.प.चे लेखी उत्तर, उभय पक्षांनी दाखल केलेले शपथपत्र व दस्तऐवज यांचे अवलोकन करता तक्रारीच्या निर्णीतीसाठी खालील मुद्दे विचारार्थ घेण्यांत आले. त्यावरील निष्कर्ष व कारणमिमांसा पुढीलप्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) वि.प.ने सेवेत न्युनतापूर्ण व्यवहार केला आहे काय ? नाही.
2) तक्रारकर्ती मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय ? नाही.
3) आदेश ? तक्रार खारिज.
- कारणमिमांसा -
4. मुद्दा क्र. 1 बाबत – तक्रारकर्त्याने वि.प. यांचेकडून बोअरवेलकरीता लागणारे सबमर्सिबल पंप, 1 HP चे जेट पंप व ½ HP चे टिल्लु पंप ही उपकरणे घेतल्याचे दाखल पावत्यांच्या प्रतीवरुन स्पष्ट होते व सदर बाब उभय पक्षांना मान्य आहे.
तक्रारकर्त्याने बोअरवेल वि.प.कडून खोदल्याबाबत कोणताही पुरावा मंचासमोर सादर केलेला नाही. वि.प.ने तक्रारकर्त्यास विकलेली उपकरणे दोषयुक्त होती असे संपूर्ण तक्रारीत कोठेही नमूद नाही किंवा तसा पुरावाही दाखल केलेला नाही. तक्रारकर्त्याचा विवादित मुद्दा असा की, बोअरवेल मुबलक पाणी देत नाही. बोअरमधून मुबलक पाणी येत नाही यांस तक्रारकर्त्याने वि.प.कडून घेतलेला पंप कारणीभूत आहे किंवा बोअरमधील दोष कारणीभूत आहे हे ठरविण्यासाठी वि.प.ने दिलेल्या अर्जावरुन तज्ञ व्यक्ती म्हणून वरिष्ठ भुवैज्ञानिक ग्रामिण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद, भंडारा यांची नियुक्ती मंचाने दि.04.07.2016 रोजी केली आणि त्यांचेकडून अहवाल मागविण्यांत आला.
उपअभियंता यांत्रिकी, यांत्रिकी उपविभाग, जिल्हा परिषद, भंडारा यांनी दि.31.08.2016 रोजी तक्रारकर्ता यांचे मालकीचे घरातील अंगणातील विंधन विहिरीची तपासणी तसेच पाणी क्षमता चाचणी केली. त्याप्रमाणे विंधन विहिरीची खोली 38.01 मीटर व केसिंग पाईपचा व्यास 125 मीमी आहे. तसेच विंधन विहिरीची 1 HP च्या सबमर्सिबल पंपाद्वारे पाणी क्षमता घेण्यात आली. सदर विंधन विहिरीला 250 लि./तास पाणी आढळून आले व पाणी क्षमता चाचणीचा पंप 70 फुटच्या खाली जात नाही. यावरुन स्पष्ट होते की, सदर बोअरवेलच्या ठिकाणी जमिन ठिसुळ (भिसाची) असल्यामुळे बोअरवेल ढासळली त्यामुळे सबमर्सिबल पंप काढण्यासाठी तक्रारकर्त्यास रु.5,000/- खर्च करावे लागले आहे आणि त्यानंतर सदर पंप अर्ध्या किंमतीत वि.प.ला देऊन तक्रारकर्त्याने जेट पंप खरेदी केला परंतू तोही बुजलेल्याने बोअरवेलचे पाणी काढण्यास उपयोगी ठरता नाही म्हणून पुन्हा तो अर्ध्या किंमतीत वि.प.ला परत देऊन तक्रारकर्त्याने टिल्लु पंप विकत घेतला आहे. त्याबाबतचा हिशोब वि.प.ने शपथपत्रावर सादर केला असून आवश्यक बिलाची प्रतदेखिल दस्त (सहपत्र-अ) दाखल केलेले आहेत. सदर हिशोब खालीलप्रमाणे आहे.
1) सबमर्सिबल पंप किंमत रु.20,700/-
2) सबमर्सिबल पंप अर्ध्या किंमतीत परत रु.10,350/-
3) 1 HP जेट पंप किंमत रु.13,150/- (दि.31.03.2014)
4) तक्रारकर्ता यांच्याकडे उरलेली रक्कम (रु.13,150/- - 10,350/-) = 2,800/-
5) 1 HP जेट पंप अर्ध्या किंमतीत परत रु.6,575/-
6) तक्रारकर्ता यांना देय असलेली रक्कम (रु.6,575/- - 2,800/-) = 3,775/- 7) नविन ½ HP टिल्लु पंप किंमत रु.3,735/- (दि.03.05.2014) 8) तक्रारकर्ता यांच्याकडे उरलेली रक्कम (रु.3,775/- - 3,735/-) = 40/- 9) वि.प.यांची सेवा भेट व मजूरांनी 3 वेळा पंप सुरु केला रु.2,600/-
........................................................................................................................तक्रारकर्त्याकडे वि.प. यांची आजपर्यंत असलेली थकबाकी - रु.2,640/-
यावरुन स्पष्ट होते की, वि.प. यांनी सदर बोअरवेल खणण्याचे काम केले नाही व तक्रारकर्त्यास सदोष मशिनरी दिली नाही. तक्रारकर्त्यास मुबलक पाणी न मिळण्यास वि.प.ने पुरविलेली मशिन कारणीभूत नसून जमिनीतील दोषामुळे बोरवेलचे बुजणे कारणीभूत असल्याचे तज्ञांच्या अहवालावरुन निदर्शनास येते. वरील पुराव्यावरुन वि.प.कडून सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार झाला असे म्हणता येत नाही. म्हणून मुद्दा क्र. 1 वरील निष्कर्ष नकारार्थी नोंदविला आहे.
5. मुद्दा क्र. 2 व 3 बाबत – मुद्दा क्र. 1 वरील निष्कर्षाप्रमाणे वि.प.कडे सेवेत कोणताही न्यूनतापूर्ण व्यवहार झाला नसल्याने तक्रारकर्ता वि.प.विरुध्द मागणी केलेली दाद मिळण्यास पात्र नाही, म्हणून मुद्दा क्र. 2 व 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत.
वरील निष्कर्षास अनुसरुन खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यांत येत आहे.
- आ दे श -
1) तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 12 खालिल तक्रार खारिज करण्यांत येते.
2) खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
3) तक्रारीची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्त्यास परत करावी.
4) आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामुल्य पुरवावी.