रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग – रायगड.
तक्रार क्रमांक 25/2012
तक्रार दाखल दिनांक :- 27/03/2012
निकालपत्र दिनांक 27-02-2015
श्री. जियालाल एस. गुप्ता,
तर्फे कुलमुखत्यारधारक विशाल विनोद गुप्ता,
रा. 202, भरत कुटीर अपार्टमेंट, प्रभूपथ नगर,
काटेमानिवली, कल्याण (पूर्व), जि. ठाणे 421306. ..... तक्रारदार
विरुध्द
मेसर्स साईस्वस्तिक होम मेकर्स,
1. तर्फे प्रोप्रा. श्री. प्रदीप अर्जुन शिंदे,
कार्यालय – सी – 476, दुसरामजला,
वाशी प्लाझा, सेक्टर 17, वाशी,
नवी मुंबई 400705.
2. श्री. राजेश यादव,
रा. बी.पी.टी. कॉलनी, बिल्डींग नं. 8,
रुम नं. 178, वडाळा रोड, (पूर्व), मुंबई. ..... सामनेवाले
उपस्थिती - तक्रारदारातर्फे वकील ॲड. जी. एल. एडके
सामनेवाले 1 तर्फे ॲड. रमाकांत पवार
सामनेवाले 2 स्वत: हजर.
समक्ष – मा. अध्यक्ष, श्री. उमेश वि. जावळीकर,
मा.सदस्या, श्रीमती उल्का अं. पावसकर.
मा. सदस्य, श्री.रमेशबाबू बी. सिलीवेरी,
– न्यायनिर्णय –
द्वारा मा. अध्यक्ष, श्री. उमेश वि. जावळीकर
1. सामनेवाले यांनी तक्रारदारांस कराराप्रमाणे सदनिकेचा ताबा न देऊन सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडून सदनिका क्र. 502, साईसिध्दी बिल्डींग, ए विंग, पाचवा मजला, क्षेत्रफळ 840 चौ. फूट प्लॉट नं. 131, मौजे काळुंद्रे, ता. पनवेल, जि. रायगड या मिळकतीचा खरेदी व्यवहार रक्कम रु. 16,63,200/- ठरवून दि. 06/07/10 रोजी आवंटन पत्र (Allotment letter) प्राप्त केले. परंतु व्यवहाराची रक्कम रु. 16,63,200/- निश्चित झालेली असून देखील सामनेवाले यांनी तक्रारदारांस दिलेल्या आवंटन पत्रात व्यवहाराची रक्कम रु. 18,48,000/- नमूद केल्याने त्याबाबत सामनेवाले यांस विचारणा केली असता, सामनेवाले यांनी कोणतेही समर्थनीय उत्तर दिले नाही, व सदरील टंकलेखनाची चूक असून मूळ करार नोंदणी करतेवेळी रक्कम रु. 16,63,200/- नमूद करण्यात येईल असे कळविले. त्यानंतर तक्रारदाराने अनेकवेळा नोंदणीकृत दस्तऐवज तयार करण्यासाठी पाठपुरावा करुनही व दि. 20/04/11 पर्यंत सामनेवाले यांस एकत्रित रक्कम रु. 7,30,000/- अदा करुनही दि. 15/07/11 रोजीच्या पत्रात रक्कम रु. 5,50,000/- प्राप्त असल्याबाबत नमूद केले. तक्रारदारांनी कमी रक्कम नमूद केल्याचे सामनेवाले यांचे निदर्शनास आणल्यानंतरही सामनेवाले यांनी कोणतीही दुरुस्ती रकमेमध्ये करुन तक्रारदारांस लेखी कळविले नाही.
3. सामनेवाले यांनी सदनिकेचा नोंदणीकृत करारनामा न करुन देऊन तक्रारदारांस चालू भावाने रकमेची मागणी केली. एकंदरीत सामनेवाले यांनी सदनिका विक्री व्यवहार नोंदणीकृत न करुन सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
4. तक्रार दाखल झाल्यानंतर मंचाने सामनेवाले क्र. 1 व 2 यांना नोटीस पाठविली. नोटीस प्राप्त झाल्यावर सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी मंचासमक्ष हजर होऊन लेखी जबाब दाखल केला. लेखी जबाबात सामनेवाले क्र. 1 यांनी तक्रारीतील मुद्दयांचे खंडन करुन मंचाच्या अधिकारीतेस आक्षेप घेतला. तक्रारदार यांनी सदनिका व्यवहाराची एकूण किंमत सामनेवाले यांस अदा न केल्याने सामनेवाले यांनी तक्रारदारांस जमा केलेली रक्कम परत घेऊन जाण्यासाठी कळविले असता, त्यास तक्रारदाराने कोणताही प्रतिसाद दिला नाही. प्रस्तुत तक्रारीतील वाद दिवाणी न्यायालयाच्या कक्षेत येत असल्यामुळे तक्रार अमान्य करण्यात यावी असे कथन सामनेवाले क्र. 1 यांनी करुन ग्राहक संरक्षण अधिनियम 26 अन्वये खर्चासह तक्रार अमान्य करण्यात यावी असे कथन केले आहे. सामनेवाले क्र. 1 यांनी तक्रारदाराने सदनिका मूल्य रक्कम रु. 16,63,200/- पैकी केवळ रु. 5,50,000/- सामनेवाले यांस अदा केले असून उर्वरित मूल्य अदा न केल्याने सामनेवाले यांनी तक्रारदारासोबत नोंदणीकृत करारनामा अद्याप केलेला नाही. सामनेवाले यांनी दि. 18/01/11 रोजी तक्रारदारांस सदनिकेचे मूल्य रु. 16,63,200/- अदा केल्याबाबत आवंटन पत्र (Allotment letter) पाठविले. तसेच टप्प्याटप्प्याने अदा करावयाच्या रकमेचे माहिती पत्रकही तक्रारदारांस दाखविले. परंतु तक्रारदाराने कराराप्रमाणे रक्कम अदा न केल्याने सामनेवाले यांनी दि. 09/08/11 रोजी तक्रारदारांस सदनिकेचे उर्वरित मूल्य अदा न केल्याने सदनिकेचा व्यवहार रद्द करण्यात आला असल्याची बाब लेखी कळविली होती. त्यानंतर दि. 15/01/12 रोजी सदनिकेमध्ये त्रयस्थ व्यक्तीचे हितसंबंध स्थापन केले असून सामनेवाले तक्रारदारांस सदनिकेची रक्कम परत देण्यास तयार असून ती तक्रारदारांनी घेऊन जावी व तक्रार खर्चासह अमान्य करण्यात यावी असे कथन सामनेवाले क्र. 1 यांनी केले आहे.
5. सामनेवाले क्र. 2 यांनी आपल्या लेखीजबाबात असे कथन केले आहे की, त्यांचेमध्ये व तक्रारदारामध्ये वादग्रस्त सदनिकेबाबत कोणताही व्यवहार झालेला नाही. त्यांनी तक्रारदारांना कोणतीही सेवा पुरविलेली नाही. म्हणून तक्रारदार हे त्यांचे ग्राहक होऊ शकत नाहीत. या एकमेव कारणावरुन प्रस्तुतची तक्रार फेटाळण्यास पात्र आहे. सामनेवाले क्र. 2 यांनी पुढे असे कथन केले आहे की, ते सामनेवाले क्र. 1 यांचेकडे नोकरी करीत असून त्यांनी सामनेवाले क्र. 1 यांचे एजंट म्हणून काम केलेले नाही. तक्रारदारांनी त्यांचेविरुध्द दाखल केलेली तक्रार खोटी व निराधार आहे. त्यांच्यात व तक्रारदारामध्ये वादग्रस्त सदनिकेबाबत कोणताही व्यवहार झालेला नसल्याने त्यांचेविरुध्द दाद मागण्याचा अधिकार तक्रारदारांना नाही. सबब, तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती सामनेवाले क्र. 2 यांनी केली आहे.
6. उभयपक्षांनी दाखल केलेली वादकथने, पुरावा शपथपत्र, सामनेवाले क्र. 1 व 2 यांचा लेखी जबाब व लेखी युक्तीवादाचे अवलोकन केले असता, तक्रार निकालकामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात –
मुद्दा क्रमांक – 1 सामनेवाले यांनी तक्रारदारांस नोंदणीकृत करारनामा न करुन देऊन
व सदनिकेचा ताबा न देऊन सेवासुविधा पुरविण्यात कसूर
केल्याची बाब तक्रारदार सिध्द करतात काय ?
उत्तर होय.
मुद्दा क्रमांक - 2 सामनेवाले तक्रारदारांस नुकसानभरपाई देण्यास पात्र
आहेत काय ?
उत्तर होय.
मुद्दा क्रमांक - 3 आदेश ?
उत्तर तक्रार अंशत: मान्य
कारणमीमांसा
7. मुद्दा क्रमांक - 1 सामनेवाले यांनी तक्रारदाराकडून सदनिकेच्या एकूण मूल्यापैकी 20% पेक्षा अधिक रक्कम स्विकारल्यानंतरही मोफा कायद्यानुसार नोंदणीकृत करारनामा करण्यासाठी कोणतीही उपाययोजना न केल्याची बाब कागदोपत्री पुराव्यावरुन सिध्द होते. तसेच तक्रारदारांनी सामनेवाले यांस वेळोवेळी पाठपुरावा करुन देखील सामनेवाले यांनी तक्रारदारांस आवंटनपत्र पाठवून देखील सदनिकेचा करारनामा नोंदणीकृत करण्यासाठी न्यायोचित उपाययोजना केली नाही. तक्रारदाराने सामनेवाले यांना दि. 10/06/10 ते 20/04/11 पर्यंत धनादेशाद्वारे सदनिका मूल्य अदा केल्याबाबत कागदोपत्री पुरावा अभिलेखावर दाखल आहे.
त्यानंतर सामनेवाले यांनी दि. 25/11/10 ते 15/07/11 पर्यंत सातत्याने उर्वरित रक्कमेची मागणी करणारी पत्रे तक्रारदारांस पाठविली आहेत. तसेच दि. 18/01/11 रोजी पाठविलेल्या आवंटनपत्रा सोबत टप्प्याटप्प्याने द्यावयाच्या रकमेचा तपशिलही तक्रारदारांस दिला आहे. त्याप्रमाणे तक्रारदाराने रक्कम सामनेवाले यांस अदा न केल्याने सामनेवाले यांनी दि. 09/08/11 रोजी सदनिका नोंदणी रद्द केल्याबाबत पत्र पाठविले आहे. तसेच तक्रारदाराने दि. 01/09/11 रोजी पाठविलेल्या नोटीसला दि. 09/09/11 रोजी उत्तरही पाठविले आहे. त्याप्रमाणे तक्रारदाराने सामनेवाले यांस अदा केलेली रक्कम रु. 7,30,000/- मधून सामनेवाले यांनी दि. 20/06/11 रोजी मागणी केलेली रक्कम रु. 6,57,361/- वजा केली असता, सामनेवालेकडे रक्कम रु. 72,639/- अतिरिक्त असल्याची बाब सिध्द होते. तसेच तक्रारदारांनी सामनेवाले यांस करारनामा नोंदणीकृत करून देण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा व विनंती करुनदेखील सामनेवाले यांनी फक्त रकमेची मागणी करणारी पत्रे तक्रारदारांस पाठविली आहेत. सामनेवाले यांनी नोंदणीकृत करारनामा न केल्यामुळे तक्रारदारांना वित्तसहाय्य उपलब्ध करता आले नाही. सामनेवाले यांनी सदनिका मिळकतीत त्रयस्थ व्यक्तीचे हितसंबंध स्थापित केल्याबाबत अनोंदणीकृत करारनामा दाखल केला आहे. सदर करारनामा अनोंदणीकृत तसेच तक्रारदारांसोबत झालेल्या करारानंतरचा असल्याने सामनेवाले यांचे त्याबाबतचे कथन न्यायोचित नसल्याने तक्रारदारांची कायदेशीर जबाबदार सामनेवाले नाकारु शकत नाहीत. उपरोक्त निष्कर्षावरुन व वित्तसहाय्य उपलब्ध न करुन दिल्यामुळे देखील सामनेवाले यांनी तक्रारदारांस सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केला असल्याची बाब सिध्द होते. सबब मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
8. मुद्दा क्रमांक - 2 सामनेवाले यांनी तक्रारदारांनी अदा केलेली रक्कम स्विकारल्यानंतरही कोणतेही न्यायोचित कारण नसताना सदनिकेचा नोंदणीकृत करारनामा न करुन तक्रारदाराने अदा केलेली रक्कम स्वहितासाठी वापरल्याची बाब कागदोपत्री पुराव्यावरुन सिध्द होते. तसेच सामनेवाले यांनी तक्रारदाराकडून 20% पेक्षा अधिक रक्कम स्विकारुनही मोफा कायद्यातील तरतूदीप्रमाणे कोणतीही उचित कार्यवाही पार पाडली नसल्याने सामनेवाले तक्रारदारांस नुकसानभरपाई देण्यास पात्र आहेत. तक्रारदाराने सामनेवाले यांस एकूण रु. 7,30,000/- अदा केल्याबाबत पावत्या कागदोपत्री दाखल आहेत. तसेच सदरील रक्कम ही दि. 20/04/11 पासून सामनेवाले यांना कोणत्याही उचित कारणाशिवाय तक्रारदारासोबत करारनामा नोंदणीकृत न करुन देऊन अन्यत्र वापरली आहे. त्यामुळे सामनेवाले तक्रारदारांस नुकसानभरपाई देण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्रमांक 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
9. सामनेवाले क्र. 2 हे सामनेवाले क्र. 1 यांचे एजंट म्हणून काम करतात असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. तथापि, या म्हणण्याला पुष्टी देणारा एकही पुरावा तक्रारदारांनी रेकॉर्डवर दाखल केलेला नाही. म्हणून सामनेवाले क्र. 2 कडून कोणतीही दाद मिळण्यास तक्रारदार पात्र नाहीत.
10. उपरोक्त निष्कर्षावरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
-: अंतिम आदेश:-
1. तक्रार क्र. 25/12 अंशत: मान्य करण्यात येते.
2. सामनेवाले क्र. 1 यांनी तक्रारदारांस करारानुसार सदनिका व्यवहार नोंदणीकृत न करुन देऊन सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले क्र. 1 यांनी तक्रारदारांसोबत सदनिका क्र. 502, साईसिध्दी बिल्डींग, ए विंग, पाचवा मजला, क्षेत्रफळ 840 चौ. फूट प्लॉट नं. 131, मौजे काळुंद्रे, ता. पनवेल, जि. रायगड या मिळकतीचा खरेदीखत करारनामा (Agreement of sale) या आदेशप्राप्ती दिनांकापासून 30 दिवसांत नोंदणीकृत करुन द्यावा.
4. सामनेवाले क्र. 1 यांनी तक्रारदारांसोबत वर नमूद क्र. 3 मध्ये नमूद सदनिकेचा करारनामा नोंदणीकृत केल्यानंतर तक्रारदार यांनी सामनेवाले यांस कराराप्रमाणे उर्वरित रक्कम रु. 9,33,000/- (रु. नऊ लाख तेहेतीस हजार मात्र) 60 दिवसांत अदा करावी.
5. सामनेवाले क्र. 1 यांनी तक्रारदारास वर नमूद क्र. 3 व 4 ची पूर्तता विहीत मुदतीत केल्यानंतर सदनिका क्र. 502, साईसिध्दी बिल्डींग, ए विंग, पाचवा मजला, क्षेत्रफळ 840 चौ. फूट प्लॉट नं. 131, मौजे काळुंद्रे, ता. पनवेल, जि. रायगड या मिळकतीचा कायदेशीर ताबा सर्व सोयीसुविधांसहीत तद्नंतर 30 दिवसांत द्यावा.
6. सामनेवाले क्र. 1 यांनी तक्रारदारास मानसिक व शारिरिक त्रासापोटी व तक्रार खर्चापोटी तसेच सदनिकेचा ताबा देण्यास टाळाटाळ केल्याबद्दल एकत्रित नुकसानभरपाई रु. 1,00,000/- (रु. एक लाख मात्र) या आदेशप्राप्ती दिनांकापासून 30 दिवसांत अदा करावेत.
7. सामनेवाले क्र. 2 यांचे विरुध्दची तक्रार अमान्य करण्यात येते.
8. न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभयपक्षांना त्वरित पाठविण्यात याव्यात.
ठिकाण - रायगड-अलिबाग.
दिनांक – 27/02/2015
(रमेशबाबू बी. सिलीवेरी) (उल्का अं. पावसकर) (उमेश वि. जावळीकर)
सदस्य सदस्या अध्यक्ष
रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.