(मंचाचा निर्णय: श्री. मिलींद केदार - सदस्य यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 14/02/2011) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दिनांक 03.03.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. तक्रारकर्तीने गैरअर्जदाराकडून डुप्लेक्स घर क्र.सी/56 विकत घेण्याचा करार केला होता व त्या पोटी संपूर्ण किंमत रु.5,20,000/- प्रदान केले आहे. तिने पुढे असेही नमुद केले आहे की, गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीचे घराचे संपूर्ण बांधकाम झाल्याचे सांगितले होते व दि.01.10.2008 रोजी विक्रीपत्र करुन दिले व दि.08.10.2008 रोजी ताबा देऊन घर सर्व बाबींनिशी पूर्ण करण्यांत आल्याचे सांगितले. 3. त्यानंतर तक्रारकर्तीने सदर घराला भेट दिली असता घराचे बांधकामात अनेक त्रुट्या व कमतरता होत्या, त्यामध्ये पाण्याच्या तोटया लावल्या नव्हत्या, वॉश बेशीन लावले नव्हते, पाणी पुरवठा सुरु नव्हता, कुंपण अपुर्ण व प्लास्टरविना सोडून देण्यांत आले होते. तसेच खिडक्या लोखंडी चौकटीतून बाहेर आल्या होत्या व अपूर्ण अवस्थेत होत्या, लोखंडी दाराला गंज लागुन छिद्रे होती व त्यांना रंग लावला नव्हता. सदर त्रुट्या दूर करण्या करता तक्रारकर्तीस रु.24,000/- पेक्षा जास्त खर्च आला होता. तसेच गैरअर्जदारांच्या निष्काळजीपणामुळे रु.76,000/- मानसिक त्रास झाला असुन सदर तकार मंचासमक्ष दाखल करुन एकूण रु.1,00,000/- ची मागणी केलेली आहे. 4. प्रस्तुत प्रकरणी मंचामार्फत गैरअर्जदारावर नोटीस बजावण्यांत आली असता, त्यांनी सदर तक्रारीला खालिल प्रमाणे उत्तर दाखल केलेले आहे. 5. गैरअर्जदाराने आपल्या उत्तरात नमुद केले आहे की, तक्रारकर्तीने डुप्लेक्स घर क्र.सी-56 विकत घेण्याचा करार केला होता. तसेच तक्रारकर्तीने करारातील रक्कम रु.5,20,000/- दिली होती व त्यानंतर तिला विक्रीपत्र करुन देण्यांत आले. त्यांनी पुढे असेही नमुद केले आहे की, विक्रीपत्रातील पान क्र.8 वर संपूर्ण कामाचे वर्णन दिले आहे व त्यावर तक्रारकर्तीची स्वाक्षरी असुन घराचे घराचे काम संपूर्णपणे करुन देण्यांत आले आहे. गैरअर्जदाराने आपल्या उत्तरात तक्रारकर्तीचे इतर सर्व म्हणणे नाकारले असुन सदर तक्रार खारिज करण्यांची मंचास विनंती केलेली आहे. 6. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.05.02.2011 रोजी आली असता मंचाने उभय पक्षांचा युक्तिवाद त्यांचे वकीला मार्फत ऐकला. तसेच तक्रारीत दाखल दस्तावेज व उभय पक्षांचे कथन यांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 7. तक्रारकर्तीने गैरअर्जदाराकडून घर क्र. सी-56 विकत घेण्याचा करार केला होता व त्यानुसार त्याने गैरअर्जदाराला रु.5,20,000/- प्रदान केले होते व गैरर्जदारांनी तक्रारकर्त्यास विक्रीपत्र करुन दिले होते, ही बाब उभय पक्षांना मान्य असल्याचे तक्रारीत दाखल दस्तावेजांवरुन स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारकर्ती ही गैरअर्जदारांची ‘ग्राहक’ ठरते, असे मंचाचे मत आहे. 8. तक्रारकर्तीने तक्रारीमध्ये मुख्यत्वे गैरअर्जदारांनी घराचे बांधकामात काही त्रुटया ठेवल्याचे म्हटले आहे, त्या त्रुटया सिध्द करण्याकरता डॉ. जनेंद्र कुमार बडजाते यांचे शपथपत्र निशाणी क्र.24, पान क्र.100 वर दाखल केलेले आहे. तसेच तक्रारकर्तीने गैरअर्जदाराला वारंवार विनंती केल्याचे पत्र सुध्दा दाखल केलेले असुन स्वतःचे शपथपत्र दाखल केलेले आहे. गैरअर्जदारांनी बांधकाम पूर्ण झाल्याचे संदर्भात कार्यालय ग्राम पंचायत, बुटीबोरी यांचे पुर्णत्वाचे प्रमाणपत्र दाखल केलेले आहे. मंचाने उभय पक्षांनी दाखल केलेल्या दस्तावेजांचे अवलोकन केले असता तक्रारकर्तीने दाखल केलेले डॉ. जनेंद्र कुमार बडजाते, यांच्या शपथपत्रामध्ये तक्रारीत नमुद बाबी गैरअर्जदाराने पूर्ण केल्या नसल्याचे स्पष्ट होते. तसेच तक्रारकर्तीने गैरअर्जदारांना पत्र लिहून सुध्दा तक्रारीत नमुद बांधकामांचे त्रुटयांची कल्पना दिल्याचे स्पष्ट होते. तसेच तक्रारकर्तीने डॉ. जनेंद्र कुमार बडजाते, यांचे शपथपत्र दाखल केल्यानंतर गैरअर्जदारानी सदर शपथपत्राला कोणताही आक्षेप घेतला नाही किंवा डॉ. जनेंद्र कुमार बडजाते, त्याची उलट तपासनी करण्याकरता कोणताही अर्ज सादर केलेला नाही. गैरअर्जदाराने दाखल केलेले ग्राम पंचायतीचे प्रमाणत्रामध्ये रस्ते, पाण्याची व्यवस्था, संडास पाईप लाईन, पथ दिवे, ट्रान्सफार्मर, खुली जागा, पाण्याची टाकी, योगासन मंदी, स्वयंपाकाचे पाणी इत्यादीची व्यवस्था केल्याचे नमुद आहे. परंतु प्रत्यक्षात बांधकामाची पाहणी केल्याबद्दलचा कोणताही उल्लेख नाही किंवा सदर प्रकरणपत्र देण्या-याचे कोणतेही प्रतिज्ञापत्र दाखल नाही. सदर प्रमाणपत्र हे पाहणी केल्यानंतर दिल्या गेले याबद्दलचा कोणताही स्पष्ट उल्लेख नाही, त्यामुळे सदर प्रमाणपत्राला ग्राह्य धरण्यांत येत नाही. म्हणून तक्रारीत नमुद घराचे बांधकामात काही त्रुटया आहेत किंवा नाही याचा काहीही बोध होत नाही. तक्रारकर्तीने मंचासमक्ष दाखल केलेले फोटोग्राफ दस्तावेज क्र.3 चे अवलोकन केले असता त्यामुध्ये बांधकामात त्रुटया असल्याचे स्पष्ट दिसते. म्हणून मंचाचे असे मत आहे की, गैरअर्जदाराने विक्रीपत्र जरी करुन दिले असले तरीपण बांधकामात त्रुटया ठेवलेल्या आहेत व ही त्यांचे सेवेतील त्रुटी आहे व सदर बाब तक्रारकर्तीस घराचा ताबा घेतल्यानंतरच लक्षात आली हे सुध्दा सिध्द होते. 9. तक्रारकर्तीने सदर त्रुटयांचे निस्तारण करण्याकरता रु.24,000/- चा खर्च आल्याचे तक्रारीत नमुद केले आहे व त्या प्रित्यर्थ तक्रारकर्तीने दस्तावेज क्र.11 व 12 दाखल केलेला आहे. तसेच तक्रारकर्तीने दर्शविलेल्या त्रुटयांचे निस्तारण करण्याकरता साहजिकच आजच्या बाजार भावांचा विचार करता तेवढा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे सदर कर्ज मिळण्यांस तक्रारकर्ती पात्र असल्याचे मंचाचे मत आहे. 10. तक्रारकर्तीने मानसिक त्रासाकरीता रु.76,000/- ची मागणी केलेली आहे, सदर मागणी अवास्तव वाटत असल्यामुळे तक्रारकर्ती न्यायोचितदृष्टया रु.5,000/- मिळण्यांस पात्र ठरते, तसेच तक्रारीच्या खर्चाचे रु.2,000/- मिळण्यांस पात्र ठरते, असे मंचाचे मत आहे. प्रस्तुत प्रकरणात दाखल दस्तावेजांचे तसेच युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. गैरअर्जदाराने तक्रारकर्तीस सेवेत त्रुटी दिल्याचे घोषीत करण्यांत येते. 3. गैरअर्जदाराला यांना आदेश देण्यांत येतो की, त्याने तक्रारकर्तीला घर क्र. सी-56 चे बांधकामातील त्रुटयांचे निस्तारण करण्याकरता आलेला खर्च रु.24,000/- परत करावा. 4. गैरअर्जदाराला यांना आदेश देण्यांत येतो की, त्याने तक्रारकर्तीला झालेल्या मानसिक त्रासाबद्दल रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चाचे रु.2,000/- अदा करावे. 5. वरील आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदार यांनी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |