मंचाचे निर्णयान्वये - श्री. मिलींद केदार, सदस्य //- आदेश -// (पारित दिनांक – 27/12/2010) 1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 कलम 12 अन्वये दाखल केलेली असून तक्रारकर्त्याची तक्रार अशी आहे की, त्यांनी दैनिक नवभारत या वर्तमानपत्रात गैरअर्जदारांनी दि.26 जानेवारी 2006 ला ’29 जानेवारी 2006 पर्यंत बूकींग करणा-या ग्राहकास आकर्षक उपहार दिले जातील’ असे प्रसिध्द केल्यानुसार, त्यावर विश्वास ठेवून गैरअर्जदारांच्या ‘रजत इन्क्लेव्ह विंग क्रमांक- II’ मध्ये फ्लॅट क्र.114 हा रु.11,000/- देऊन बुक केला. गैरअर्जदाराने त्याबाबत रीतसर पावतीही तक्रारकर्त्यास दिली. तसेच उभय पक्षांमध्ये 6 ऑक्टोबर 2006 रोजी लेखी करारनामा पंजिबध्द करण्यात आला. तक्रारकर्त्याने संपूर्ण रक्कम रु.4,00,000/- दिल्याचे नमूद करुन अतिरिक्त रक्कम रु.67,000/- गैरअर्जदारास दिल्याचे नमूद केले आहे. तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार गैरअर्जदाराने सदनिकेचा ताबा हा 23 महिन्याचे विलंबाने दिला. तसेच बांधकाम हे करारनाम्यात दर्शविल्याप्रमाणे केलेले नाही. करीता सदर तक्रार दाखल करुन अतिरिक्त रक्कम रु.67,000/- परत मिळावे, विलंबाने ताबा दिल्यामुळे रु.69,000/- मिळावे, नोंदणी रक्कम परत मिळावी, आकर्षक बक्षिसांची किंमत मिळावी, सदोष बांधकामाच्या दुरुस्तीचा खर्च मिळावा, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केलेली आहे. 2. सदर तक्रारीचा नोटीस गैरअर्जदारांवर बजावण्यात आला असता त्यांनी तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले. 3. गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने तक्रारीस लेखी उत्तर दाखल करुन नमूद केले आहे की, सदर तक्रार ही कालबाह्य असल्याचे म्हटले आहे. तसेच तक्रारकर्त्याने इतर घेतलेले आक्षेप हे अमान्य केलेले आहेत. गैरअर्जदाराने वर्तमानपत्रात 26.01.2006 रोजी दिलेल्या जाहिरातीत 29 जानेवारी 2006 पर्यंत सदनिका किंवा दुकानाची नोंदणी करणा-या ग्राहकास आकर्षक उपहार दिले जातील असे प्रसिध्द केले होते ही बाब मान्य केली आहे. तक्रारकर्त्याने इतर नमूद केलेली विपरीत विधाने नाकारलेली असून सदर तक्रार खारीज करण्याची मागणी केलेली आहे. 4. सदर प्रकरण युक्तीवादाकरीता मंचासमोर दि.16.12.2010 रोजी आले असता उभय पक्षांच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकला. मंचाने सदर प्रकरणी दाखल शपथपत्रे, दस्तऐवज यांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले. -निष्कर्ष- 5. तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराकडून सदनिका खरेदी केली होती ही बाब दस्तऐवजावरुन व उभय पक्षांच्या कथनावरुन स्पष्ट होत असल्यामुळे तक्रारकर्ता गैरअर्जदाराचा ग्राहक असल्याचे स्पष्ट होते असे मंचाचे मत आहे. 6. गैरअर्जदाराने सदर तक्रार ही कालबाह्य असल्याचे म्हटले आहे. परंतू गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याला सदर सदनिकेचा ताबा 01.04.2009 रोजी दिलेला आहे व तक्रार ही 11.02.2010 रोजी दाखल केलेली आहे. त्यामुळे सदर तक्रार ही कालबाह्य ठरत नाही असे मंचाचे मत आहे. 7. तक्रारकर्त्यांच्या वकिलांनी युक्तीवादाचेवेळेस असे प्रतिपादित केले की, त्यांनी तक्रारीतील परिच्छेद क्र. 8 मध्ये नमूद केलेल्या मागण्या अतिरिक्त रक्कम रु.67,000/, विलंबाने ताबा दिल्यामुळे रु.69,000/-, बुकिंगकरीता दिलेले रु.11,000/-, सदोष बांधकामाचा खर्च इ. बाबत आपला दावा सोडत आहे. फक्त तक्रारकर्ता हा तक्रारीत नमूद गैरअर्जदाराने दिलेल्या जाहिरातीनुसार उपहार मिळण्यास पात्र ठरत असतांना ते गैरअर्जदाराने दिले नाही व त्याबद्दलची मागणी ते फक्त करीत असल्याचे युक्तीवादाचे वेळी म्हटले. गैरअर्जदाराने सुध्दा त्याच्या लेखी उत्तरामध्ये त्याने वर्तमानपत्रात जाहिरात दिली होती ही बाब मान्य केली आहे. परंतू युक्तीवादाचेवेळेस गैरअर्जदाराचे वकिलांनी रु.4,00,000/- च्या सदनिकेवर एक लाखाची योजना देणे अपरिहार्य आहे असे म्हटले. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत दाखल केलेल्या जाहिरातीचे अवलोकन केले असता त्यामध्ये मोड्युलर किचन, होन्डा ऍक्टीवा, फर्निचर, सोफा सेट, डायनिंग टेबल, डबल बेड पलंग, ड्रेसिंग टेबल, टी टेबल, साईड टेबल व वार्ड शेल्फ इ. उपहाराबाबतची जाहिरात आहे व त्यात दि.26 जानेवारी 2006 ते 29 जानेवारी 2006 पर्यंत बूकींग करणा-या ग्राहकास आकर्षक उपहार दिले जातील असे असे नमूद आहे. परंतू सदर जाहिरातीमध्ये कोठेही नोंद नाही की, सर्व वस्तू देण्यात येतील की काही वस्तू देण्यात येतील याबाबत स्पष्ट उल्लेख नाही. त्यामुळे सदर जाहिरात ही ग्राहकांना आकर्षित करण्याकरीता गैरअर्जदाराने दिलेली आहे हे सुस्पष्ट होते व ते आकर्षित करीत असून नमूद उपहार कोणते व केव्हा देण्यात येणार याबद्दलचा उल्लेख करणे आवश्यक होते. अशी जाहिरात देऊन ग्राहकास आकर्षित करुन नंतर त्या न देणे ही अनुचित व्यापार प्रथा असल्याचे मंचाचे मत आहे. याकरीता मंच मा. राष्ट्यि आयोग यांच्या Ashok Kumar Shivpuri Vs. Akbarally’s and another, 2011 CTJ 57 (CP) या न्यायनिवाडयावर आपली भिस्त ठेवते. तक्रारकर्त्याने तक्रारीमध्ये उपहाराबद्दल एक लाखाची मागणी केली आहे व त्याबद्दल कोणताही आधार किंवा जाहिरातीमध्ये दिलेल्या आकर्षक उपहाराच्या किमती स्पष्ट करणारे कोणतेही पत्रक दाखल केले नाही. त्यामुळे न्यायोचितदृष्टया तक्रारकर्ता हा उपहारात्मक वस्तू गैरअर्जदाराने न दिल्यामुळे रु.25,000/- मिळण्यास पात्र ठरतात, कारण सर्वसाधारणपणे देऊ केलेल्या वस्तूची किंमत जवळपास रु.25,000/- आहे. 8. तक्रारकर्त्याने तक्रारीमध्ये शारिरीक व मानसिक त्रासाबाबत रु.2,00,000/- ची मागणी केलेली आहे. साहजिकच तक्रारकर्त्याने जाहिरातीवर विश्वास ठेवून सदनिका खरेदी केलेली आहे व गैरअर्जदाराने नमूद केलेली उपहारे व भेट वस्तू न दिल्याने त्यांना मानसिक त्रास झालेला आहे. त्यामुळे ते मानसिक त्रासाबाबत भरपाई मिळण्यास पात्र आहे. परंतू त्याबाबत त्यांनी केलेली रु.2,00,000/- ची मागणी ही अवाजवी व अवास्तव वाटते. तथापि, शारिरीक व मानसिक त्रासाबाबत भरपाई म्हणून रु.10,000/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे असे मंचाचे मत आहे. तसेच तक्रारीच्या खर्चाबाबत रु.2,000/- मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. उपरोक्त निष्कर्षावरुन मंच सदर प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदाराला आदेश देण्यात येतो की, त्याने तक्रारकर्त्याला उपहारात्मक वस्तू न दिल्यामुळे रु.25,000/- त्याबाबत द्यावे. 3) गैरअर्जदाराने शारिरीक व मानसिक त्रासाची भरपाई म्हणून रु.10,000/- तक्रारकर्त्याला द्यावे. 4) गैरअर्जदाराने तकारीच्या खर्चाबाबत तक्रारकर्त्याला रु.2,000/- द्यावे. 5) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |