मंचाचे निर्णयान्वये - श्री. विजयसिंह राणे, अध्यक्ष. //- आदेश -// (पारित दिनांक – 21/04/2011) 1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 कलम 12 अन्वये दाखल केलेली असून तक्रारकर्त्यांच्या तक्रारीचा आशय असा आहे की, त्यांनी मे 2008 मध्ये टाटा सफारी वाहन विकत घेतले, ज्याचा नोंदणी क्र. MH 31/C R 6777 होता व त्याचा विमा हा पॉलिसी क्र.1705782311002369 अन्वये गैरअर्जदारांकडून दि.12.05.2008 ते 11.05.2009 पर्यंत काढलेला होता. सदर वाहनाला अपघात झाल्याने वाहन संपूर्ण क्षतिग्रस्त झाले. वाहन दुरुस्तीकरीता पाठविण्यात आल्यानंतर मे. ए. के. गांधी कार्स यांच्या इंजिनियर्सने वाहनाची संपूर्ण पाहणी केल्यानंतर सदर प्रकरण हे संपूर्ण नुकसानीचे आहे व सुधारण्याची अंदाजित किंमत ही रु.8,19,296.64 सांगितली गैरअर्जदारांकडे तक्रारकर्त्यांनी विमा दावा दाखल केला. परंतू त्यांनी विमा दावा निकाली न काढल्याने तक्रारकर्त्यांना पार्किंग चार्जेस द्यावे लागत आहे. तसेच वाहन हे टोटल लॉस (संपूर्ण नुकसान) असल्यामुळे दुरुस्त करण्याचा प्रश्न येत नाही. गैरअर्जदारांना विमा दाव्याबाबत विचारले असता त्यांनी आधी वाहन दुरुस्त करावे व देयक सादर करावे असे सांगितले. तक्रारकर्त्यांनी गैरअर्जदारांना कायदेशीर नोटीस पाठविली. परंतू त्याची दखल त्यांनी घेतली नाही, म्हणून तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार दाखल करुन तीद्वारे मागणी केली की, विमा दाव्याची रक्कम ही व्याजासह मिळावी, पार्किंगचा खर्च, मानसिक त्रासापोटी, वाहन भाडयाने घेतलेला खर्च व इतर खर्च मिळावे. 2. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना पाठविण्यात आली असता गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी प्रारंभिक आक्षेपासह तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले. 3. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्याचा दावा छाननी व पडताळणी करुन 20.08.2009 रोजी निकाली काढल्याचे नमूद केले. तक्रारकर्त्याने मागणी केल्याप्रमाणे वाहन दुरुस्तीची देयके व वाहन तज्ञांच्या निरीक्षणाकरीता सादर केलेले नाही. त्यामध्ये त्यांची सेवेतील कोणतीही त्रुटी नाही. त्याने उजर घेतला आहे की, त्यांचे तज्ञ व्यक्तीनी वाहनाच्या नुकसानीचे मुल्यांकन केले व रु.3,69,000/- विमा पत्राअंतर्गत पात्र रक्कम मिळण्याकरीता दुरुस्तीची देयके सादर करण्याबाबत निर्देश दिले होते. परंतू सदर दस्तऐवज दाखल केले नाही. म्हणून तक्रारकर्त्यांची तक्रार ही चुकीची व गैरकायदेशीर असल्याचा उजर त्यांनी घेतला आहे. 4. सदर प्रकरण मंचासमोर युक्तीवादाकरीता 07.04.2011 आले असता गैरअर्जदारांचा युक्तीवाद त्यांचे वकिलांमार्फत ऐकण्यात आला. तक्रारकर्त्यांना वारंवार संधी देऊनही त्यांनी युक्तीवाद केला नाही. 5. सदर प्रकरणी उभय पक्षांमध्ये वाहनाचा झालेला अपघात व विमा पॉलिसीबाबत वाद नाही. तक्रारकर्त्याने वाहनाचे प्रकरणी संपूर्ण नुकसानीबाबतचे आपले म्हणणे योग्य पुराव्याद्वारे सिध्द केले आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे गैरअर्जदारांनी वाहनाचे नुकसानीसंबंधी तज्ञ व्यक्तींचे मुल्यांकनाबाबत केलेली विधाने प्रतिज्ञालेख देऊन कोणत्याही प्रकारे खोडून काढलेले नाही. त्यामुळे सदरचा अहवाल व तज्ञ व्यक्तींनी केलेले मुल्यांकन ग्राह्य धरण्याजोगे आहे. त्याप्रमाणे तक्रारकर्त्यांच्या वाहनाच्या नुकसानीचे मुल्यांकन रु.3,69,000/- एवढे आढळून आलेले आहे. गैरअर्जदाराने ती रक्कम देण्यात येईल असे तक्रारकर्त्यांना कधीही कळविले नाही व ती रक्कम देय केलेली नाही. या प्रकरणात तक्रारकर्त्याने दि.27.11.2008 रोजी दावा दाखल केलेला आहे. दावा दाखल झाल्यापासून दोन महिन्यात निकाली काढणे गरजेचे होते. परंतू गैरअर्जदारांनी तसे केलेले नाही. म्हणून तक्रारकर्ते या रकमेवर दि.02.02.2009 पासून व्याजसुध्दा मिळण्यास पात्र ठरतात. तक्रारकर्त्यांच्या नोटीसला, जी वकिलांमार्फत देण्यात आली होती, ती गैरअर्जदारांना प्राप्त झालेली होती, तिचे उत्तर सुध्दा दिलेले नाही आणि अशा प्रकारे गैरअर्जदारांनी आपल्या सेवेत त्रुटी ठेवलेली आहे. गैरअर्जदारांच्या सदर कृतीने तक्रारकर्त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला व मंचासमोर येऊन वाद दाखल करावा लागला, म्हणून तक्रारकर्ते मानसिक त्रासाची भरपाई व तक्रारीचा खर्च मिळण्यास पात्र ठरतात. वरील सर्व वस्तूस्थितीचा विचार करुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला रु.3,69,000/- ही विमा दाव्याची रक्कम, आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत, दि.02.02.2009 पासून द.सा.द.शे.9 टक्के व्याज संपूर्ण अदायगीपावेतो द्यावे. न पेक्षा द.सा.द.शे. 9 टक्केऐवजी 12 टक्के व्याज देय राहील. 3) तक्रारकर्त्याला मानसिक त्रासाच्या भरपाईबद्दल रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चाबाबत रु.2,000/- द्यावे. 4) सदर आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत, संयुक्तपणे किंवा एकलपणे करावी.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |