मंचाचे निर्णयान्वये - श्री. मिलींद केदार, सदस्य //- आदेश -// (पारित दिनांक – 04/02/2011) 1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 कलम 12 अन्वये दाखल केलेली असून तक्रारकर्त्याची तक्रार अशी आहे की, गैरअर्जदार हे मोबाईल सेवा पुरविणारी कंपनी असून गैरअर्जदारांकडून तक्रारकर्त्याने मोबाईल क्र.9373181888 जानेवारी 2007 मध्ये विकत घेतला. तक्रारकर्ता नियमितपणे गैरअर्जदाराने बजावलेल्या देयकाचा भरणा करीत होता. परंतू तक्रारकर्त्याला दि.20.01.2010 ते 24.02.2010 या कालावधीचे रु.1263/- चे देयक हे मोबाईल नादुरुस्त असतांनाच्या कालावधीचे आले व ते नेहमीपेक्षा जास्त असल्याने तक्रारकर्त्याने अंडर प्रोटेस्ट त्याचा भरणा केला. दि.12.02.2010 रोजी तक्रारकर्त्याची मोबाईल व सेवा बंद झाली. याबाबत तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र. 2 कडे तक्रार केली असता त्यांनी सदर सेवा व मोबाईल सुरु असल्याने तक्रारीचे काहीच कारण नसल्याचे सांगितले. तक्रारकर्त्याने दुस-या फोनवरुन त्याचा मोबाईल क्रमांक लावला असता तो सोलापूर येथील ईसमास लागला व त्याने तक्रारकर्त्याला सांगितले की, 9373181888 या क्रमांकाकरीता येणारे कॉल्स त्याला येत आहे व तो जेव्हा दुस-यांना कॉल्स करतो तेव्हा त्याचा मोबाईल क्रमांक हा 937181883 न जाता 9373181888 हा जात आहे. याचाच अर्थ सदर इसमाला तक्रारकर्त्याला मोबाईल क्रमांक देण्यात आला होता. सदर बाब गैरअर्जदारांच्या निदर्शनास आणल्यावर त्यांनी सीमकार्ड खराब झाल्याने रु.100/- भरुन नविन सिमकार्ड व मोबाईल घेण्यास सांगितले. वारंवार विनंत्या करुनही तक्रारकर्त्याच्या तक्रारीबाबत कार्यवाही केली नाही. त्रासून शेवटी तक्रारकर्त्याने पोलिस स्टेशन, सदर येथे तक्रार नोंदविली असता गैरअर्जदारांच्या अधिका-यांनी तात्काळ कार्यवाही करुन 16.02.2010 रोजी तक्रारकर्त्याचा मोबाईल सुरु केला. तक्रारकर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे जर मोबाईल व सिमकार्ड खराब झाले होते तर परत कसे सुरु करण्यात आले. यावरुन गैरअर्जदारांनी अनुचित व्यापार प्रथा अवलंबून तक्रारकर्त्याला नविन सिमकार्ड व मोबाईल घेण्यास भाग पाडले होते. तक्रारकर्त्याच्या मते गैरअर्जदार यांनी सदर कालावधीतील वापराकरीता पाठविलेले देयकसुध्दा अवास्तव होते. गैरअर्जदाराच्या सदर कृतीने तक्रारकर्त्याला मानसिक त्रास झाल्याने त्याने सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन मानसिक व शारिरीक त्रासाबाबत भरपाई, तक्रारीचा खर्च याबाबत रु.5,00,000/- ची मागणी केलेली आहे. 2. सदर तक्रार मंचासमोर दाखल झाल्यानंतर मंचाने गैरअर्जदारांवर नोटीस बजावला असता गैरअर्जदारांना सदर नोटीस प्राप्त झाला. गैरअर्जदारांना वारंवार उत्तर दाखल करण्याकरीता संधी देऊनही त्यांनी लेखी उत्तर दाखल न केल्याने मंचाने त्यांच्याविरुध्द उत्तराशिवाय कारवाई चालविण्याचा आदेश दि.03.09.2010 रोजी पारित केला. 3. सदर तक्रार मंचासमोर दि.24.01.2011 रोजी युक्तीवादाकरीता आली असता तक्रारकर्त्याचा युक्तीवाद त्यांच्या वकिलांमार्फत ऐकला. गैरअर्जदार गैरहजर. तसेच मंचाने प्रकरणातील उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले. -निष्कर्ष- 4. तक्रारकर्त्याकडे गैरअर्जदारांचा मोबाईल व सेवा क्र. 9373181888 हा होता ही बाब तक्रारकर्त्याचे कथन व त्याने दाखल केलेल्या दस्तऐवजावरुन स्पष्ट होते. तसेच गैरअर्जदाराने याबाबतचे तक्रारकर्त्याचे कोणतेही कथन किंवा दस्तऐवज नाकारले नसल्याने सदर बाब ग्राह्य धरण्यास मंचाला हरकत वाटत नाही आणि म्हणून तक्रारकर्ता हा गैरअर्जदाराचा ग्राहक ठरतो असे मंचाचे मत आहे. 5. तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या ही बाब तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तऐवजावरुन सिध्द होते. तसेच तक्रारकर्त्याचे मोबाईल बंद असतांना दुस-या फोनवरुन कॉल केला असता तो सोलापूर येथील इसमास 937181883 या क्रमांकावर जात होता. ही बाब तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांना कळविल्याचे दाखल दस्तऐवजावरुन स्पष्ट होते. परंतू त्याबाबत गैरअर्जदारांनी कोणतीही काळजी घेतली नाही व तक्रारकर्त्याचे सीमकार्डमध्ये बिघाड झाल्याचे तक्रारकर्त्यास कळवून नविन मोबाईल व सिमकार्ड घेण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारकर्त्याने पोलिस स्टेशन, सदर येथे तक्रार केली असता तक्रारकर्त्याची मोबाईल सेवा ही सुरु करण्यात आली म्हणजेच ग्राहकांच्या तक्रारीकडे गैरअर्जदार दुर्लक्ष करीत होते ही बाब स्पष्ट होते. म्हणून मंचाचे असे मत आहे की, गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याला सेवेत त्रुटी दिलेली असून अक्षम्य निष्काळजीपणा केल्याचे सिध्द होते. 6. गैरअर्जदाराने भविष्यात तक्रारकर्त्याला योग्य सेवा द्यावी व त्याच्या क्रमांकावर इतर कोणाचाही वापर होऊ देऊ नये याची काळजी घ्यावी. तक्रारकर्त्याने तक्रारीमध्ये शारिरीक व मानसिक त्रासाबाबत रु.5,00,000/- ची मागणी केलेली आहे. सदर मागणीचे पुष्टयर्थ जरीही तक्रारकर्त्याने पुरावा दाखल केलेला नसला तरीही देयकांचा नियमितपणे भरणा केल्यावर मोबाईल सेवा बंद करणे, तक्रारकर्त्याचा क्रमांक अवैधरीत्या दुस-याला वापरु देणे व तक्रार केल्यावरही त्यावर काहीही कारवाई न करणे यामुळे तक्रारकर्त्याला मानसिक व शारिरीक त्रास होणे सहन शक्य आहे. तसेच मोबाईलची सेवा आवश्यक असतांनाही तो त्याचा वापर करु शकला नाही. याचा परिणाम त्याच्या दैनंदिन कामकाजावरही झालेला असणार. या सर्व बाबींचा विचार केला तर तक्रारकर्ता रु.25,000/- शारिरीक व मानसिक त्रासाबाबत मिळण्यास पात्र ठरतो असे मंचाचे मत आहे. तसेच तक्रारीच्या खर्चाबाबत रु.2,000/- मिळण्यास पात्र ठरतो. उपरोक्त निष्कर्षावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला शारिरीक व मानसिक त्रासाबाबत रु.25,000/- द्यावे. 3) तक्रारीच्या खर्चाबाबत गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने तक्रारकर्त्याला रु.2,000/- द्यावे 4) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने संयुक्तपणे किंवा पृथ्थकपणे आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत करावे.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |