श्री. विजयसिंह राणेयांचे कथनांन्वये.
- आदेश -
(पारित दिनांक – 18/01/2012)
1. तक्रारकर्ते यांनी सदर तक्रार या ग्रा.सं.का. 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली असून तक्रारकर्त्यांची तक्रार थोडक्यात अशी आहे की, त्यांच्या बहिणीने मौजा-कळमना, प.ह.क्र.17, ख.क्र.27/1, भुखंड क्र.677, एकूण क्षेत्रफळ 600 चौ.फु. हा रु.36,000/- मध्ये विकत घेण्याचा गैरअर्जदारांसोबत सौदा केला. तक्रारकर्त्यांच्या बहिणीने गैरअर्जदारांना डिसेंबर 2008 पर्यंत एकूण रु.4,500/- दिले होते. पुढे तक्रारकर्त्याने सदर भुखंड बहिणीच्या संमतीने आपल्या नावाने हस्तांतरीत केला व हस्तांतरण शुल्क रु.1,000/- गैरअर्जदारास दिले आणि वेळोवेळी रु.36,000/- गैरअर्जदारास अदा केले. परंतू भुखंडाच्या किमतीबाबत संपूर्ण रक्कम अदा करुनही गैरअर्जदारांनी विक्रीपत्र करुन दिले नाही. पुढे यासंबंधी माहिती काढली असता, त्यांना सदर खसरा क्र.27 पूर्णपणे हा प्रत्यक्षात कामठी कळमना रोडमध्ये गेलेला आहे अशी माहिती संबंधित विभागाने दिली. त्यामुळे गैरअर्जदार या भुखंडाचे विक्रीपत्र करुन देऊ शकत नाही हे स्पष्ट झाले. यास्तव तक्रारकर्त्याने ही तक्रार दाखल केली आणि तीद्वारे गैरअर्जदाराने त्याची केलेली फसवणूक, अनुचित व्यापार प्रथेबद्दल रु.1,00,000/- चा मोबदला, भुखंडाची आजच्या बाजारभावाने व्याजासह किंमत, शारिरीक, मानसिक आणि आर्थिक नुकसान भरपाई रु.25,000/- मिळावी अशा मागण्या केलेल्या आहेत. तसेच तक्रारीचे पुष्टयर्थ करारनामा, रकमेच्या पावत्या, लेआऊट नकाशा, संबंधित विभागाने दिलेली माहिती यांचा समावेश आहे.
2. गैरअर्जदारांना तक्रारीचा नोटीस पाठविण्यात आला. त्यांना मिळाल्याची पोचपावती प्राप्त आहे. मात्र गैरअर्जदार गैरहजर. म्हणून त्यांचेविरुध्द 15.12.2011 रोजी प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश पारित केला.
3. तक्रारकर्त्याचा युक्तीवाद ऐकण्यात आला. तसेच तक्रारीत दाखल दस्तऐवजांचे सुक्ष्म अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले.
-निष्कर्ष-
4. सदर प्रकरणातील गैरअर्जदारांनी मंचात हजर होऊन कोणत्याही प्रकारे आपला बचाव केलेला नाही आणि तक्रारकर्त्याचे म्हणणे कोणत्याही पूराव्यानिशी खोडून काढले नाही. तक्रारकर्त्याने जी तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली आहे, ती आणि गैरअर्जदारासोबतचा करारनामा व गैरअर्जदाराने वेळोवेळी रक्कम घेतल्याबद्दल दिलेल्या पावत्या आणि रक्कम भरल्याचे विवरण या दस्तऐवजाद्वारे सिध्द केलेली आहे. तक्रारकर्त्याने त्यावरुन रु.36,000/- गैरअर्जदारांना दिल्याचे स्पष्ट होते. सदर ठिकाणी प्लॉट दिसून आले नाही अशी माहिती जन माहिती अधिकारी, नगर भूमापन अधिकारी, यांचे कार्यालयाकडून प्राप्त झालेली आहे. तसेच त्यांनी यासंबंधीचा नकाशा दाखल केलेला आहे. त्यातून रस्ता गेल्याचे दिसते. थोडक्यात सदर भुखंड अस्तित्वात नाही असे दिसून येते आणि गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यांची फसवणूक केलेली आहे हे उघड झालेले आहे. ही त्यांच्या सेवेतील त्रुटी असून, अवलंबिलेली अनुचित व्यापारी प्रथा होय. यास्तव खालीलप्रमाणे आदेश.
-आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) गैरअर्जदारांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी सदर परिसरात असलेले भुखंडाचे आज रोजी जेवढी किंमत बाजार भावाप्रमाणे आहे, त्याप्रमाणे येणारी किंमत द्यावी. यासाठी शासकीय निबंधक कार्यालयातील शिघ्रगणना पत्रिकेचा आधार घ्यावा.
3) तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.10,000/- आणि तक्रारीच्या खर्चाबाबत रु.2,000/- द्यावे.
4) आदेशाचे पालन गैरअर्जदाराने आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक महिन्याचे आत करावे, न पेक्षा त्यापुढे गैरअर्जदार हे बाजार भावाने येणा-या किमतीवर द.सा.द.शे.12% देणे लागतील.