(मंचाचा निर्णय: श्रीमती जयश्री येंडे - सदस्या यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 19/07/2011) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द मंचात दिनांक 04.09.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. प्रस्तुत तक्रारीतील तक्रारकर्तीचे म्हणण्यानुसार तिने तिचे मालकीच्या मारोती झेन या वाहनाचा गैरअर्जदार यांचेकडे विमा उतरविला होता. या वाहनास दि.02.08.2009 रोजी अपघात झाला, तक्रारकर्तीने सदर बाबीची सुचना संबंधीत पोलिस स्टेशनला दिली व दि.04.08.2009 रोजी सदर वाहनाचा विमादावा गैरअर्जदारांकडे सादर केला. गैरअर्जदारांचे सुचनेवरुन तक्रारकर्तीने सदर वाहन मे. महावीर ऑटोमोबाईल्स्, झीरो माईल्स्, नागपूर येथे दुरुस्ती करीता पाठविले, त्यांनी दुरुस्तीचा खर्च रु.1,24,918/- एवढा सांगितल्यानंतर देखिल गैरअर्जदारांनी सदरची खर्चाची रक्कम मे. महावीर ऑटोमोबाईल्स्, यांना दिले नाही अथवा तक्रारकर्तीचा दावाही फेटाळला नाही. ही गैरअर्जदारांचे सेवेतील कमतरता आहे त्यामुळे गैरअर्जदारांकडून वाहनाचे दुरुस्तीचा, टॅक्सीचा खर्च, मानसिक त्रास इत्यादींकरीता रु.3,14,918/- ची व्याजासह मागणी केलेली आहे. 3. प्रस्तुत प्रकरणी मंचामार्फत गैरअर्जदारांवर नोटीस बजावण्यांत आली असता, त्यांना नोटीस मिळाल्यानंतर ते मंचात हजर झाले असुन त्यांनी आपला लेखी जबाब खालिल प्रमाणे दाखल केलेला आहे. 4. गैरअर्जदारांनी आपल्या लेखी जबाब असे नमुद केले आहे की, तक्रारकर्तीकडून वाहनाच्या अपघाताची सुचना प्राप्त झाल्यावर दाव्याची सत्यता आणि नुकसानीचे मुल्यांकन करण्यासाठी स्वतंत्र सर्वेअरची नेमणुक केली. तसेच तक्रारकर्तीस वारंवार पत्रे/ स्मरणपत्रे/ तोंडी सुचना देऊनही तिने मुळ दुरुस्ती देयके, भुगतान रशिद, पोलिसांना दिलेल्या एफ.आय.आर. व घटनास्थळ पंचनामा, वाहन दुरुस्तीनंतर पुर्ननिरीक्षणासाठी सादर करणे, वाहन चालकाचा मुळ वाहन परवाना सादर करणे, दावा प्रपत्र सादर करण्यांस सांगितले. परंतु तक्रारकर्तीने आजपावेतो सदरचे दस्तावेज गैरअर्जदारांकडे सादर केली नाहीत, त्यामुळे तक्रारकर्तीचा दावा प्रलंबीत आहे. तक्रारकर्तीने सदरच्या दस्तावेजांची पुर्तता केली तर गैरअर्जदार पॉलिसीच्या अटी व शर्तींना अधीन राहून तज्ञांनी केलेल्या मुल्यांकनाप्रमाणे रक्कम तसेच ग्राहक संरक्षण कायद्याला अनुसरुन रक्कम देण्यांस तयार आहे. तक्रारकर्तीने वाहनाच्या दुरुस्तीची मागणी कुठल्याही आधाराशिवाय गैरफायदा घेण्याचे हेतूने केलेली आहे. वरील सर्व बाबी लक्षांत घेता गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीस दिलेल्या सेवेत कुठलीही सेवेतील कमतरता नसल्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार खारिज करण्यांत यावी, अशी मंचास विनंती केलेली आहे. 5. तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रारीसोबत निशानी क्र. 3 वर दस्तावेजांची यादी जोडलेली असुन त्यात विमा पॉलिसी, दावा फॉर्म, शपथपत्र व महावीर ऑटोमोबाईल्सने वाहन दुरुस्तीचे दिलेले निवाडे इत्यादींच्या छायांकित प्रति जोडलेल्या आहेत. 6. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.08.07.2011 रोजी आली असता तक्रारकर्ती गैरहजर, गैरअर्जदारांचे वकील हजर त्यांचा वकीला मार्फत केलेला युक्तिवाद ऐकला. तक्रारीसोबत दाखल दस्तावेजांचे, युक्तिवादाचे व दोन्ही पक्षांनी दाखल केलेले निवाडे यांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 7. तक्रारकर्तीने सादर केलेल्या दस्तावेजांवरुन असे निदर्शनांस येते की, गैरअर्जदाराने दि. 20.02.2010 रोजीच्या पाठविलेल्या पत्रानुसार तक्रारकर्तीस काही दस्तावेजांची मागणी केली होती. त्यानंतर पुन्हा दि.20.03.2010 रोजी पत्र पाठवुन मुळ दुरुस्ती देयके, भुगतान रशिद, पोलिसांना दिलेल्या एफ.आय.आर. व घटनास्थळ पंचनामा तसेच वाहन दुरुस्तीनंतर पुर्नतपासणीकरीता गैरअर्जदारांकडे सादर करण्याबाबत सुचित करुनही तक्रारकर्तीने दस्तावेज व वाहन पुर्नतपासणीसाठी गैरअर्जदारांकडे सादर केले नाही. गैरअर्जदारांच्या मते मागणी केल्याप्रमाणे तक्रारकर्तीने आवश्यक ती कागदपत्रे गैरअर्जदारांकडे सादर न केल्यामुळे तक्रारकर्तीचा विमा दावा प्रलंबीत आहे. 8. वरील वस्तुस्थीती पाहता तक्रारकर्तीने विमा दाव्याकरता आवश्यक असलेली कागदपत्रे गैरअर्जदार विमा कंपनीकडे सादर करावी. तक्रारकर्तीने कागदपत्रे सादर केल्यानंतर गैरअर्जदारांनी 15 दिवसांचे आंत त्यावर निर्णय घ्यावा, तसेच तक्रारकर्तीने गैरअर्जदार कंपनीचा जो काही निर्णय होईल तो निर्णय तक्रारकर्तीस मंजूर नसल्यास तिला या ग्राहक मंचाकडे दाद मागण्याचा अधिकार कायम राहील. -// अं ति म आ दे श //- 1. वरील निरीक्षणानुसार सदरची तक्रार निकाली काढण्यांत येते.
| [HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |