तक्रारदार : स्वतः वकील श्री.एस.जी.लाल यांचे सोबत हजर.
सामनेवाले : प्रतिनिधी मार्टीस यांचे मार्फत हजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. सा.वाले ही विद्युत पुरवठा करणारी कंपनी आहे. तर तक्रारदार हे सा.वाले यांचे ग्राहक आहेत. तक्रारदारांनी बीएसईएस या कंपनी कडून विद्युत मिटर घेतला होता. व त्यानतर बीएसईएस कंपनी ही सा.वाले यांनी ताब्यात घेतल्याने तक्रारदार सा.वाले यांचे ग्राहक झाले.
2. तक्रारदारांचे तक्रारीत असे कथन आहे की, तक्रारदारांच्या विद्युत मिटरव्दारे सा.वाले हे निवासीकामी विद्युत पुरवठा करत आहेत. तकारदारांचे पती हे दुचाकी वाहनाच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय स्वयंरोजगार म्हणून आपल्या निवास्थानी करतात. त्या व्यवसायाकामी बरेच दुचाकीचे मालक आपली दुचाकी तक्रारदारांचे घरासमोर लावत असत. सा.वाले यांचे अधिकारी तक्रारदारांच्या मिटरची व जागेची तपासणी करणेकामी आले असतांना तक्रारदारांनी त्यांना त्यांच्या पतीचे व्यवसायाची कल्पना दिली. सा.वाले यांच्या अधिका-यांनी तक्रारदारांना असे सूचविले की, तक्रारदारांनी वाणिज्य व्यवसायाकामी असलेले मिटर सा.वाले यांचेकडून प्राप्त करुन घ्यावे. त्याप्रमाणे नोव्हेंबर, 2007 मध्ये तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे तसा अर्ज दिला. वरील अर्ज प्रलंबीत असतांना सा.वाले यांनी डिसेंबर, 2007 पासून विजेचा वापर वाणिज्य व्यवसायाकामी केलेला आहे असा निष्कर्ष काढून ज्यादा दराने विद्युत आकारणी केली व जून, 2007 ते नोव्हेंबर, 2007 कालावधीकरीता ज्यादा दराने विद्युत आकारणी करुन तसे आदेश पारीत केले व तक्रारदारांकडून रु.32,834/- येवढी बाकी दाखविली. तक्रारदारांनी त्यानंतर सा.वाले यांचेकडे पत्र व्यवहार केला. परंतु सा.वाले यांनी आपल्या आदेशामध्ये बदल केला नाही. अंतीमतः तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार सा.वाले यांचे विरुध्द दाखल केली व त्यामध्ये सा.वाले यांनी तक्रारदारांच्या विद्युत आकारणीचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असा आरोप केला व तसेच तक्रारदारांच्या विद्युत मिटरची आकारणी निवासी दराने करण्यात यावी असा आदेश सा.वाले यांना देण्यात यावा तसेच सा.वाले यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाइ अदा करावी आशी दाद मागीतली.
3. सा.वाले यांनी आपली कैफीयत दाखल केली. व त्यामध्ये असे कथन केले की, सा.वाले यांनी चौकशी करुन कलम 126 प्रमाणे विद्युत आकारणी संबंधित आदेश पारीत केलेला आहे. तक्रारदारांना विद्युत कायद्याचे कलम 127 प्रमाणे अपील दाखल करण्याची तरतुद असतांना तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली. सा.वाले यांचे असेही कथन आहे की, तपासणी दरम्यान तक्रारदार यांचे पती आपल्या निवासस्थानाचा वापर तसेच विद्युत पुरवठयाचा वापर व्ही.की.मोटर्स या नांवाने दुचाकी वाहनाचा व्यवसाय करीत आहेत. व तक्रारदार व त्यांचे पती यांनी निवासी दराने विज प्राप्त करुन तो वाणिज्य व्यवसायाकामी वापरली आहे. या प्रमाणे सा.वाले यांनी आपल्या कार्यवाहीचे समर्थन केले.
4. तक्रारदारांनी तक्रारीसोबत विद्युत देयके तसेच सा.वाले यांनी पारीत केलेला आदेश याच्या प्रती हजर केल्या. सा.वाले यांच्या कैफीयतीस तक्रारदारांनी प्रति उत्तराचे शपथपत्र दाखल केले व त्यामधील कथनांचा पुर्नउच्चार केला. दोन्ही बाजुंनी आपला लेखी युक्तीवाद दाखल केला.
5. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्रे, कागदपत्रे, व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले यांनी तक्रारदारांच्या निवासस्थानी असलेल्या विद्युत मिटरची आकारणी निवासी दराऐवजी वाणिज्य व्यवसाकामी या दराने करुन तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली हा आरोप तक्रारदार सिध्द करतात काय ? | नाही. |
2 | तक्रारदार प्रस्तुत तक्रारीमध्ये सा.वाले यांचेकडून नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? | नाही. |
3. | अंतीम आदेश | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा
6. तक्रारदारांनी तक्रारीसोबत पृष्ट क्र.17 येथे विद्युत देयकाची प्रत हजर केलेली आहे. त्यावरुन तक्रारदारांच्या विद्युत मिटरची आकारणी निवासी दराने करण्यात येत होती असे दिसून येते. तक्रारदारांनी पृष्ट क्र.19 वर डिसेंबर, 2007 चे विद्युत देयक दाखल केलेले आहे. त्यावरील नोंदीवरुन असे दिसून येते की, सा.वाले यांनी तक्रारदारांच्या विद्युत मिटरची आकारणी वाणिज्य व्यवसायाकामी या दराने केलेली आहे. हा बदल सा.वाले यांनी करणेकामी योग्य ती कार्यवाही केली काय ? व तो बदल समर्थनिय आहे काय ? असा मुद्दा तक्रारीच्या निकालाच्या संबंधात निर्माण होतो. या संबंधात सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीमध्ये असे कथन केलेले आहे की, सा.वाले यांच्या अधिका-यांनी तक्रारदारांच्या जागेची तपासणी केली असता त्यामध्ये तक्रारदार यांचे पतीचा विंकी मोटर्स यांचे नावाने दूचाकी वाहनांचा व्यवसाय आहे असे तपासणी पथकास दिसून आले. सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीसोबत तपासणी अहवालाची प्रत दाखल केलेली आहे. त्यावर तक्रारदारांचे पती श्री.इंद्रजितसिंग यांची सही आहे. ती तक्रारदारांनी नाकारलेली नाही, किंबहुना मान्य केलेली आहे. तपासणी अहवालामध्ये अशी नोंद आहे की, तक्रारदारांचे पती विंकी मोटर्स या नावाने निवासस्थानामध्ये व्यवसाय करीत आहेत व विजेचा वापर निवासाकामी तसेच व्यवसायाकरीता केला जातो.
7. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत पृष्ट क्र.21 वर हंगामी आकारणी आदेश दिनांक 5.12.2007 ची प्रत दाखल केलेली आहे. त्यातील मजकुरावरुन असे दिसते की, सा.वाले यांचे अधिका-यांनी तपासणी अहवालावर आधारीत प्रस्तुतचा आदेश पारीत केला व तपासणीपूर्वी 6 महीने या प्रकारचा वाणिज्य व्यवसायाकामी विजेचा वापर होत होता असा निष्कर्ष काढून त्या प्रमाणे आकारणी केली. त्यानंतर सा.वाले यांनी दिनांक 3.1.2008 रोजी तो हंगामी आदेश अंतीम केला. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीच्या परिच्छेद क्र.33 वर असे कथन केलेले आहे की, तक्रारदारांना दिनांक 3.1.2008 रोजीचा अंतीम आदेश प्राप्त झाला व त्यानंतर तक्रारदारांच्या पतीने सर्व कागदपत्रे अभिलेख सा.वाले यांना दाखविली. तक्रारदारांनी तक्रारीच्या परिच्छेद क्र.29 मध्ये असे कथन केलेले आहे की, तक्रारदारांना सा.वाले यांनी पाठविलेले पत्र दिनांक 5.12.2007 प्राप्त झाले होते. त्यानंतर तक्रारदारांचे पती चौकशी करणेकामी सा.वाले यांचेकडे गेले असतांना ती चौकशी वाणिज्य व्यवसायाकामी होणा-या विजेच्या वापराबद्दल आहे असे तक्रारदार व त्यांच्या पतीला सांगण्यात आले असे तक्रारदारांचे कथन आहे. दिनांक 5.12.2007 रोजीचे तक्रारदारांनी उल्लेख केलेले पत्र म्हणजे सा.वाले यांनी पारीत केलेला हंगामी आदेश दिनांक 5.12.2007 होय. यावरुन तक्रारदारांना हंगामी आदेश दिनांक 5.12.2007 ची माहिती मिळाली होती व त्यानंतर तक्रारदार व त्यांचे पती यांनी सा.वाले यांचेकडे चौकशी केली व त्यानंतर सा.वाले यांना अंतीम आदेश पारीत केला असे दिसून येते. या प्रमाणे सा.वाले यांनी तक्रारदारांना चौकशीकामी नोटीस देवून हंगामी आदेश दिनांक 5.12.2007 हा दिनांक 3.1.2008 च्या आदेशाव्दारे अंतीम केला. तक्रारदारांनी अंतीम आदेश दिनांक 3.1.2008 या आदेशास कलम 127 व्दारे कधीही आव्हान दिलेले नाही.
8. या संबंधीत महत्वाची बाब म्हणजे तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत पृष्ट क्र.25 वर तक्रारदारांनी सा.वाले यांना दिनांक 17.1.2008 रोजी दिलेल्या पत्राची प्रत हजर केलेली आहे. ते पत्र विंकी मोटर्स याच्या लेटरहेडवर आहे. सा.वाले यांच्या कैफीयतीमध्ये असे कथन आहे की, तक्रारदारांच्या पतीने विंकी मोटर्स या नावाने दुचाकी वाहनांचा व्यवसाय सुरु केलेला आहे. तक्रारदारांनी दिनांक 17.1.2008 चे पत्रामध्ये ही बाब मान्य केली आहे की, ते पत्र देण्यापूर्वी तिन महीने त्यांनी दुकान सुरु केले होते. येवढेच नव्हेतर या पत्राव्दारे तक्रारदारांनी त्यांच्या निवासास्थानी असलेला विद्युत मिटर वाणिज्य व्यवसायाकामी करविण्यात यावा अशी देखील विनंती सा.वाले यांना केलेली होती. यावरुन सा.वाले यांचा तकारदार विद्युत मिटरचा वापर वाणिज्य व्यवसायाकामी करीत आहेत या प्रकारचा निष्कर्ष चूक किंवा गैर समजुतीवर आधारीत आहे असे म्हणणे शक्य नाही.
9. सा.वाले यांनी पारीत केलेला दिनांक 5.12.2007 चा हंगामी आदेश असे दर्शवितो की, सा.वाले यांनी मागील 5 महिने करीता म्हणजे दिनांक 19.6.2006 ते 17.11.2007 या कालावधीकरीता तक्रारदारांनी वाणिज्य व्यवसायाकामी विद्युत मिटरचा वापर केलेला आहे असा निष्कर्ष नोंदविला. विद्युत कायद्याचे कलम 126(5) प्रमाणे विद्युत कंपनी ही या प्रकारची विद्युत आकारणी विजेचा वापर जर वाणिज्य व्यवसायाकामी झाला असेल तर मागिल 6 महिन्याकरीता करु शकते. प्रत्यक्षात ती सा.वाले यांनी 5 महिन्याकरीता केलेली आहे. व त्यानंतर डिसेंबर, 2007 पासून वाणिज्य व्यवसायाकामी वापर धरुन तक्रारदारांना देयके पाठविली. तक्रारदारांनी आपल्या दिनांक 17.1.2008 च्या अर्जामध्ये जागेचा वापर वाणिज्य व्यवसायाकामी होत आहे व तक्रारदारांना त्या प्रमाणे मिटर देण्यात यावे अशी मागणी केलेली होती. या प्रकारचे कथन तक्रारदारांच्या पत्रात असल्याने तक्रारदारांचे लेखी युक्तीवादातील कथन निरर्थक ठरते व ते केवळ एक (शब्दछल) ठरतो.
10. वरील परिस्थितीत सा.वाले तक्रारदारांना विद्युत आकारणीचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असा निष्कर्ष काढणे शक्य नाही.
11. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 199/2008 रद्द करण्यात येते.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.