-निकालपत्र–
(पारित व्दारा- श्री नितीन माणिकराव घरडे, मा.सदस्य )
( पारित दिनांक-15 जुन, 2016)
01. तक्रारकर्ता सहकारी संस्थे तर्फे तिचे निवासी गाळेधारकांनी विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) विरुध्द ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली दाखल केली आहे.
02. तक्रारीचे स्वरुप थोडक्यात खालील प्रमाणे-
तक्रारकर्ता ही एक राहूल कॉम्प्लेक्स-1, विंग-3 मधील निवासी गाळे धारकांची एक सहकारी संस्था असून महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप एक्ट 1972 चे नियम-3 नुसार तक्रारकर्ता अणि विरुध्दपक्ष क्रं-1) बिल्डर यांचेमध्ये डिड ऑफ डिक्लरेशन झालेले आहे. तक्रारकर्ता सहकारी संस्थेमध्ये एकूण 40 निवासी गाळेधारक सभासद आहेत. यातील विरुध्दपक्ष क्रं-1) हे बिल्डर व डेव्हलपर असून भूखंड विकसित करुन त्यावर सदनीका बांधण्याचा व्यवसाय करतात. नागपूर शहरात विरुध्दपक्ष क्रं-1) बिल्डरने राहुल कॉम्प्लेक्स क्रं-1, विंग क्रं-3) ही ईमारत बांधून त्यात व्यापारी आणि निवासी गाळे तयार केलेत व ते तक्रारकर्त्यांना व इतर व्यक्तींना विकलेत.
तक्रारकर्त्या संस्थे तर्फे पुढे असे नमुद करण्यात आले की, पूर्वीपासूनच तक्रारकर्ता संस्थेचे सभासद राहत असलेल्या विंग-3 या जागेवर पाण्याची टंचाई आहे. तक्रारकर्ता संस्थेचे एकूण-40 निवासी गाळेधारक असून त्यांचे कुटूंबासह अंदाजे एकूण-200 व्यक्तींची संख्या आहे. दैनंदिन वापरा करीता पाण्याची या गाळेधारकांना गरज पडते. तक्रारदार संस्थेचे सभासद राहत असलेल्या विंग-3 मध्ये बोअर टँकची व्यवस्था होण्यापूर्वी, विरुध्दपक्ष क्रं-2) श्रीमती फुलझेले यांचे आंगणात असलेल्या बोअरचे टँक वरुन पाण्याची व्यवस्था विरुध्दपक्ष क्रं-1) बिल्डरने केली होती व तेथून नियमित पाणी पुरवठा तक्रारदार संस्थेच्या सभासदानां होत होता.
तक्रारकर्ता संस्थेच्या निवासी गाळेधारक सभासदानीं पुढे असे नमुद केले की, विरुध्दपक्ष क्रं-1) बिल्डरने, तक्रारकर्ता संस्थेचे सभासद राहत असलेल्या विंग-3 ईमारती मध्ये पाण्याची सोय करुन देण्यासाठी बोअर टँक बांधून दिला, ज्यावर तक्रारदार संस्थेच्या सभासदांचा हक्क असावा व तो बोअर टँक तक्रारदार संस्थेच्या सभासदांच्या हद्दीत आहे. परंतु विरुध्दपक्ष क्रं-1) बिल्डरने, तक्रारदार संस्थेचे सभासद राहत असलेल्या विंग-3 मधील बोअर टँक वरील पाण्याचा पुरवठा विंग-2 मधील गाळेधारक आणि इतर गाळेधारकांना करुन दिला व तक्रारकर्ता संस्थेच्या सभासदानां त्यांच्याच स्वतःच्या बोअर टँक पाण्याचे वापरा पासून वंचित केले. अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्रं-1) बिल्डरने तक्रारकर्ता संस्थेच्या निवासी गाळेधारकांना योग्य ती सेवा पुरविली नाही.
तक्रारकर्ता संस्थेच्या निवासी गाळेधारकांनी पुढे असे नमुद केले की, ते राहत असलेल्या विंग-3 मध्ये, विरुध्दपक्ष क्रं-2) श्रीमती फुलझेले यांचे हद्दीत असलेल्या बोअर टँक वरुन पाणी पुरवठा देण्यात येत होता व प्रथमतः ही बोअर टँक सन-2010 साली नादुरुस्त झाली असता, विरुध्दपक्ष क्रं-2) यांना तिचे दुरुस्ती बाबत विनंती केली असता त्यांनी दुरुस्त करु देण्यास अडथळा निर्माण केला होता, त्यामुळे तक्रारकर्ता संस्थेच्या निवासी गाळेधारकांनी दिनांक-03/11/2010 रोजी या बाबत गणेशपेठ पोलीस स्टेशन येथे तक्रार केली होती व त्यानंतर पोलीसांच्या सहाय्याने विरुध्दपक्ष क्रं-2 चे हद्दीत असलेली बोअर टँक दुरुस्त करुन पाणी पुरवठा सुरु करण्यात आला. परंतु पुन्हा नोव्हेंबर-2010 मध्ये तक्रारकर्ता संस्थेच्या निवासी गाळेधारकांचा विरुध्दपक्ष क्रं-2) श्रीमती फुलझेले यांचे हद्दीत असलेल्या बोअर वरुन पाणी पुरवठा बंद करण्यात आला, तेंव्हा पासून ते आज पर्यंत तक्रारकर्ता संस्थेचे विंग-3) मधील गाळेधारक सभासदांना पाण्याचे टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तक्रारकर्ता संस्थेचे एकूण-40 सभासद आणि त्यांचे कुटूंबातील सदस्य असे मिळून एकूण-200 व्यक्तींना पाण्याअभावी प्रत्येक दिवशी शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे व यासाठी सर्वस्वी जबाबदार हे विरुध्दपक्ष क्रं-1) बिल्डर आणि विरुध्दपक्ष क्रं-2) हेच आहेत.
तक्रारकर्ता संस्थे तर्फे अधिवक्त्यांनी विरुध्दपक्षांना दिनांक-22/03/2012 रोजी नोटीस पाठवून त्वरीत पाणी पुरवठा द्दावा अशी मागणी केली परंतु नोटीसचे उत्तर दिले नाही वा कारवाई सुध्दा केली नाही. याउलट, विरुध्दपक्ष क्रं-2) श्रीमती फुलझेले यांनी तक्रारदारां विरुध्द दिवाणी न्यायालय, कनिष्ठस्तर, नागपूर येथे दिवाणी दावा क्रं-3679/2012 दाखल करुन तक्रारदारांना पाणी पुरवठा देण्यास मनाई आदेश व्हावा तसेच बोअर दुरुस्त न करु देण्याचा आदेश व्हावा अशी मागणी केली असल्याचे तक्रारदारांना समजले.
म्हणून शेवटी तक्रारकर्ता सहकारी संस्थेच्या निवासी गाळेधारकांनी प्रस्तुत तक्रार मंचा समक्ष दाखल करुन मागणी केली की, ते राहत असलेल्या राहूल कॉम्प्लेक्स-1) विंग-3 चे हद्दीत असलेल्या बोअर टँक वरील पाणी पुरवठा केवळ तक्रारकर्ता संस्थेच्या निवासी गाळेधारकांसाठी त्वरीत व कायमस्वरुपी देण्या बाबत आदेशित व्हावे. विरुध्दपक्ष क्रं-1) आणि क्रं-2) यांनी तक्रारकर्ता संस्थेच्या सभासदांना एकूण रुपये-3,05,000/- नुकसान भरपाई द.सा.द.शे.24 टक्के दराने व्याजासह देण्याचे आदेशित व्हावे. या तक्रारीचा अंतिम निकाल लागे पर्यंत विरुध्दपक्ष क्रं-2) श्रीमती फुलझेले यांचे हद्दीत असलेल्या बोअर टँक वरील पाणी पुरवठा जो तक्रारकर्ता संस्थेच्या सभासदानां होते परंतु सध्या बोअर नादुरुस्त असल्याने बंद आहे, तो बोअर दुरुस्त करुन पूर्ववत सुरु करण्याचा अंतरिम आदेश पारीत व्हावा. या शिवाय योग्य ती दाद तक्रारकर्ता संस्थेच्या सभासदांच्या बाजुने द्दावी अशी मागणी केली.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) बिल्डरने आपले लेखी उत्तर नि.कं-19 वर दाखल केले. वि.प.क्रं-1) ने प्राथमिक आक्षेप घेतला की, तक्रारकर्ता निवासी गाळेधारकांची संस्था असून त्या संस्थेचा आणि विरुध्दपक्षातील वाद हा ग्राहक वाद होऊ शकत नसल्याने ग्राहक मंचास अधिकारक्षेत्र येत नाही. तसेच ग्राहक संरक्षण कायद्दातील मुदतीचे तरतुदी प्रमाणे तक्रार मुदतबाहय आहे. तक्रारकर्ता ही सहकार कायद्दाखाली नोंदणीकृत संस्था असून महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप एक्ट-1972 चे नियम-3 नुसार डिड ऑफ डिक्लरेशन तक्रारकर्ता आणि त्यांच्यामध्ये झाले असल्याची बाब मान्य केली. विरुध्दपक्ष क्रं-1) चा व्यवसाय हा बिल्डर व डेव्हलपरचा असून ते सदनीका बांधून त्याची विक्री करीत असल्याचे नमुद केले. तक्रारकर्ता राहत असलेल्या विंग-3 मध्ये पाण्याची टंचाई असल्याची बाब नाकबुल केली. विरुध्दपक्ष क्रं-1) ने , विरुध्दपक्ष क्रं-2) चे आंगणात असलेल्या बोअर टँक वरुन तक्रारकर्ता राहत असलेल्या विंग-3 मधील गाळेधारकांना पाणी पुरवठा दिला असल्याची बाब कबुल केली. तसेच हे ही कबुल केले की, तक्रारकर्ता राहत असलेल्या विंग-3 मध्ये पाण्याची सोय होण्यासाठी टँक बांधली. परंतु हे म्हणणे नाकबुल केले की, त्याने विंग-3 मधील टँकचा पाणी पुरवठा विंग-2 मधील गाळेधारक व इतरांना करुन दिला. निवासी गाळेधारकांना राहत असताना काही समस्या निर्माण झाल्यास ते सोडविण्याची जबाबदारी त्यांनी स्थापीत केलेल्या संस्थेची असते कारण सदर संस्था ही देखभाल व दुरुस्तीचा खर्च तिचे सदस्य असलेल्या गाळेधारकां कडून वसुल करीत असेते. त्यामुळे विंग-3 मधील समस्या सोडविण्याची संपूर्ण जबाबदारी ही तक्रारकर्ता संस्थेची आहे.
विरुध्दपक्ष क्रं-1) बिल्डरने पुढे असे नमुद केले की, विंग-3 मध्ये नागपूर महानगरपालिके तर्फे भरपूर पाणी पुरवठा होत आहे तसेच उपरोक्त कॉम्प्लेक्स समोर विहिर असून त्या विहिरीला भरपूर पाणी आहे व त्यामधून सुध्दा सदर गाळेधारकांना भरपूर पाणी पुरवठा होतो असे असताना तक्रारकर्ता संस्थेनी सुडबुध्दीने ही तक्रार त्यांचे विरुध्द दाखल केली आहे. महाराष्ट्र ओनरशिप अपार्टमेंट एक्ट नियम-162 नुसार गाळेधारकांच्या देखभालीची संपूर्ण जबाबदारी ही तक्रारकर्ता संस्थेची आहे. तक्रारकर्ता संस्थेची तक्रार ही खोटी असल्याने ती खारीज व्हावी, अशी विनंती विरुध्दपक्ष क्रं-1) बिल्डर तर्फे करण्यात आली.
04. विरुध्दपक्ष क्रं-2) श्रीमती भावना भास्कर फुलझेले यांनी लेखी उत्तर नि.क्रं 17 प्रमाणे मंचा समक्ष दाखल केले. त्यांनी लेखी उत्तरात त्यांचे अंगणात असलेल्या बोअर टँक वरुन तक्रारकर्ता संस्थेचे विंग-3 मधील गाळेधारकांना पाण्याची व्यवस्था केली होती ही बाब मान्य केली आहे. विरुध्दपक्ष क्रं-2 च्या अंगणा नंतर असलेल्या घराचे भिंतीचे पायव्यात बोअर टँक आहे त्यामुळे त्या भिंतीचे पायव्याला व त्यावर उभ्या असलेल्या घराला भविष्यात धोका संभवतो. सदर कॉम्प्लेक्स मध्ये नागपूर महानगर पालिकेव्दारे पाणी पुरवठा होतो तसेच कॉम्प्लेक्स समोर विहिर असून भरपूर पाणी आहे. असे असताना विरुध्दपक्ष क्रं 2 यांच्या भिंतीच्या पायव्यातील बोअरचे पाण्याचा वापर करण्याचा अट्टाहास केला जात आहे. सन-2010 मध्ये वि.प.क्रं 2 ने बोअर दुरुस्त करण्यास मनाई केली असता अन्य गाळेधारकांनी गोंधळ घातला होता म्हणून वि.प.क्रं 2 ने गणेशपेठ पोलीस स्टेशनला तक्रार केली होती. त्यावेळी पोलीसांना दुसरी पाण्याची व्यवस्था करण्याचे गाळेधारकांनी आश्वासन दिल्याने त्यांनी त्यांचे अंगणातील बोअरची दुरुस्ती करण्याची परवानगी दिली होती. वि.प.क्रं -2) यांनी बोअरचे पाण्यास मनाई हुकूम मिळावा म्हणून दिवाणी न्यायालयात दावा दाखल केलेला आहे. सबब तक्रारकर्ता संस्थेची तक्रार खारीज व्हावी, अशी विनंती विरुध्दपक्ष क्रं-2) यांनी केली.
05. उभय पक्षांचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. तसेच त्यांनी दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन करण्यात आले. त्यावरुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे देण्यात येतो-
::निष्कर्ष ::
06. विरुध्दपक्ष क्रं-1) बिल्डरचे लेखी उत्तरा प्रमाणे असा प्राथमिक आक्षेप आहे की, तक्रारकर्ता निवासी गाळेधारकांची संस्था आणि वाद हा ग्राहक वाद होऊ शकत नसल्याने ग्राहक मंचास अधिकारक्षेत्र येत नाही. तसेच ग्राहक संरक्षण कायद्दातील मुदतीचे तरतुदी प्रमाणे तक्रार मुदतबाहय आहे.
तक्रारकर्ता संस्थेच्या गाळेधारकांनी विरुध्दपक्ष क्रं-1) बिल्डरला योग्य तो मोबदला देऊन सदनीका विकत घेतलेल्या आहेत तसेच तक्रारकर्ता ही जरी सहकारी कायद्दा खालील नोंदणीकृत संस्था असली तर तिचे सभासदांना ग्राहक न्यायमंचा समक्ष जाऊन दाद मागता येऊ शकते आणि ग्राहक मंच ही कायद्दाने निर्माण केलेली अतिरिक्त सोय आहे. त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं-1) बिल्डरचे या आक्षेपात तथ्य नाही की, ग्राहक मंचास सदर तक्रार चालविण्याचे अधिकारक्षेत्र येत नाही. विरुध्दपक्ष क्रं-1) बिल्डरचा दुसरा आक्षेप असा आहे की, ग्राहक संरक्षण कायद्दातील तरतुदी नुसार तक्रारीचे कारण घडल्या पासून दोन वर्षाचे आत तक्रार दाखल करता येत असल्याने प्रस्तुत तक्रार मुदतबाहय आहे परंतु या तक्रारीतील मुख्य कारण हे तक्राकर्ता संस्थेच्या निवासी गाळेधारकांना पाण्याचे पाणी अपर्याप्त स्वरुपात मिळत असल्याचे असल्याने व पाणी ही दैनंदिन गरज असल्याने जो पर्यंत योग्य तो पाणी पुरवठा दिल्या जात नाही तो पर्यंत तक्रारीचे कारण हे सतत घडत असल्याने तक्रार मुदतीत आहे, त्यामुळे मुदतीचे आक्षेपातही मंचास तथ्य दिसून येत नाही.
07. विरुध्दपक्ष क्रं-1) ने तो बिल्डर असून त्याने तक्रारकर्ता संस्थेच्या गाळेधारकांना सदनीकांची विक्री केल्याची बाब मान्य केली आहे. विरुध्दपक्ष क्रं-1) ने , विरुध्दपक्ष क्रं-2) चे आंगणात असलेल्या बोअर टँक वरुन, तक्रारकर्ता राहत असलेल्या विंग-3 मधील गाळेधारकांना पाणी पुरवठा दिला असल्याची बाब कबुल केली आहे तसेच हे ही कबुल केले की, तक्रारकर्ता संस्थेचे गाळेधारक राहत असलेल्या विंग-3 मध्ये पाण्याची सोय होण्यासाठी टँक बांधली. परंतु हे म्हणणे नाकबुल केले की, त्याने विंग-3 मधील टँकचा पाणी पुरवठा विंग-2 मधील गाळेधारक व इतरांना करुन दिला. विरुध्दपक्ष क्रं-1) बिल्डरने असे नमुद केले की, विंग-3 मध्ये नागपूर महानगरपालिके तर्फे भरपूर पाणी पुरवठा होत आहे तसेच उपरोक्त कॉम्प्लेक्स समोर विहिर असून त्या विहिरीला भरपूर पाणी आहे व त्यामधून सुध्दा सदर गाळेधारकांना भरपूर पाणी पुरवठा होतो.
08. परंतु असे जरी असले तरी, कॉम्प्लेक्स समोरील विहिरीचा पाणी पुरवठा हा फक्त तक्रारकर्ता संस्थेच्या गाळेधारकांसाठीच आहे असे म्हणता येणार नाही व तसे विरुध्दपक्ष क्रं-1) बिल्डरचे म्हणणे सुध्दा नाही. तसेच हे ही पाहणे अत्यंत गरजेचे आहे की, तक्रारकर्ता संस्थेचे एकूण-40 निवासी गाळेधारक हे त्यांचे कुटूंबातील सदस्यां सोबत विंग-3 ईमारतीत राहत आहेत व तक्रारकर्ता संस्थेच्या तक्रारी प्रमाणे त्यांची एकूण संख्या ही जवळपास दोनशे आहे. एवढया मोठया लोकांना पाण्याची गरज मोठया प्रमाणावर पडते. पाणी ही दैनंदिन गरज आहे आणि पाण्यासाठी कोणालाही वंचीत राहू नये म्हणून तक्रारकर्ता संस्थेचे गाळेधारक राहत असलेल्या राहुल कॉम्प्लेक्स-1, विंग-3 चे हद्दीत असलेल्या बोअर टँक वरील पाणी पुरवठा हा प्राधान्याने त्यांनाच होणे आवश्यक आहे. याशिवाय विरुध्दपक्ष क्रं-1) बिल्डरने तक्रारकर्ता संस्थेच्या गाळेधारकांना पाण्या पासून वंचित ठेवल्यामुळे त्यांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-5000/- तक्रारकर्ता संस्थेस द्दावेत असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
09. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, आम्ही प्रस्तुत तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश ::
(1) तक्रारकर्ता यांची तक्रार विरुध्दपक्ष क्रं-1) बिल्डर यांचे विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्ष क्रं-1) बिल्डरला आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्ता संस्थेचे निवासी गाळेधारक राहत असलेल्या राहूल कॉम्प्लेक्स-1, विंग-3 मधील गाळेधारकांसाठी विंग-3 चे हद्दीत असलेल्या बोअर टँक वरील पाणी पुरवठा हा प्राधान्याने त्यांनाच होईल अशी व्यवस्था करावी.
(4) तक्रारकर्ता संस्थेच्या सभासदांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं-1) बिल्डरने तक्रारकर्ता संस्थेस द्दावेत.
(5) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं-1) बिल्डरने प्रस्तु त निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून तीस दिवसांचे आत करावे.
(6) विरुध्दपक्ष क्रं-2) विरुध्द कोणतेही आदेश नाहीत.
(7) प्रस्तुत निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षांना निःशुल्क उपलब्ध करुन
देण्यात याव्यात.